आपलेही करविषयक प्रश्न असतील तर ते आपण pravin3966@rediffmail.com या ई-मेलवर अथवा लोकसत्ता कार्यालय, ‘अर्थ वृत्तान्त’, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई- ४०००२१ या पत्त्यावर पाठवू शकता. अथवा ई-मेल:arthmanas@expressindia.com
प्रश्न : मला कर निर्धारण वर्ष २०१२-१३ साठीचा कर परतावा  (REFUND) १६,७०० रुपये मिळाला. यामध्ये १,५२० रुपयांचे व्याज समाविष्ट आहे. हे व्याज करपात्र आहे का?
– प्रकाश िशदे
उत्तर : प्राप्तिकर कायद्याप्रमाणे कर परताव्यावर मिळालेले व्याज हे करपात्र असते. हे व्याज इतर उत्पन्नात दाखवावे लागते.

प्रश्न : मी मागील वर्षी गृहकर्ज घेतले होते. हे कर्ज घेताना मी काही दलाली दिली होती. या दलालीची मला उत्पन्नातून वजावट मिळू शकेल का?
    – शिल्पा सावंत
उत्तर : गृहकर्ज घेतले असेल तर कलम २४ प्रमाणे त्यावर दिलेल्या व्याजाची वजावट मिळू शकते आणि मुद्दल परतफेडीची कलम ८०सी प्रमाणे वजावट मिळू शकते. परंतु कर्ज घेताना झालेल्या खर्चाची वजावट मिळत नाही.

प्रश्न : मी चार वर्षांपूर्वी गृहकर्ज घेतले होते. आíथक वर्ष २०१३-१४ मध्ये मी ५७,००० रुपये व्याज आणि २६,००० रुपयांची मुद्दल भरली. काही कारणास्तव या आíथक वर्षांत माझे करपात्र उत्पन्न फक्त २२,००० रुपये इतकेच आहे. मला या वर्षी गृहकर्जावर भरलेल्या रकमेचा फायदा पुढे घेता येईल का?
– जय कुलकर्णी
उत्तर : आपण भरलेल्या गृहकर्जावरील व्याजाची वजावट उत्पन्नातून वजा होऊन बाकी रकमेवर कर भरावा लागतो. परंतु आपले उत्पन्न २२,००० रुपये इतकेच असल्यामुळे यावर्षी फक्त २२,००० रुपये व्याजाची वजावट घेता येईल आणि बाकी ३५,००० रुपयांची (५७,००० वजा २२,०००) वजावट ही पुढील आठ वर्षांपर्यंत ‘कॅरी फॉरवर्ड’ अर्थात ती पुढील वर्षांच्या उत्पन्नातून वजावटीसाठी वापरता येईल. परंतु २६,००० रुपयांची मुद्दल परतफेड आपल्या उत्पन्नातून वजा होऊ शकत नसल्यामुळे त्याचा फायदा आपल्याला या वर्षी तसेच पुढील वर्षी घेता येणार नाही. कारण कलम ८०सी ते यू अन्वये मिळणारी वजावट ही त्यावर्षीच्या उत्पन्नापेक्षा जास्त असू शकत नाही आणि ती ‘कॅरी फॉरवर्ड’सुद्धा करता येत नाही.

प्रश्न : मी २०१४-१५ मध्ये एक घर २२,३०,००० रुपयांना विकले. हे घर मी १९९६ साली २,७५,००० रुपयांना विकत घेतले होते. मला या दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर किती प्राप्तिकर भरावा लागेल? सदर कर वाचविण्यासाठी कशात गुंतवणूक करावी लागेल.
– डॉ. राजेश्वर कोठीखाने
उत्तर : आपले घर विकून झालेला नफा हा खालीलप्रमाणे असेल-
घराची विक्री किंमत            २२,३०,०००
खरेदी किंमत            २,७५,०००
महागाई मूल्य निर्देशांकानुसार खरेदी किंमत    ९,२३,२७९
दीर्घ मुदतीचा भांडवली नफा        १३,०६,७२१
या नफ्यावर २०% कर भरावा लागतो (अधिक ३% शैक्षणिक उपकर)
हा कर वाचविण्यासाठी दोन पर्याय आहेत-
 १.    दुसऱ्या घरामध्ये दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्याएवढी गुंतवणूक. पहिले घर विकल्यापासून दोन वर्षांत नवीन घर विकत घेतले पाहिजे किंवा तीन वर्षांत नवीन घर बांधले पाहिजे. हे घर विकत घेईपर्यंत किंवा बांधेपर्यंत भांडवली नफ्याचे पसे आपल्याला बँकेत ‘कॅपिटल गेन स्कीम’ खात्यांतर्गत ठेवावे लागतात.
 २.    कलम  ५४ ईसी अन्वये बॉण्डमध्ये भांडवली नफ्याएवढी गुंतवणूक करावी (या गुंतवणुकीची मर्यादा ५० लाख रुपये इतकी आहे.).   
    
प्रश्न : मी मेडिक्लेम विम्याचा हफ्ता १७,५०० रुपये रोख रकमेने भरला आहे. मला किती वजावट मिळेल?
– हिमांशू जावडेकर
उत्तर : कलम ८०डी प्रमाणे मेडिक्लेम विम्याचा हप्ता हा रोख रकमेने भरला असेल तर त्याची वजावट मिळत नाही. हा हप्ता रोखीशिवाय म्हणजेच धनादेश, ऑनलाइन, क्रेडिट कार्ड वगरेने भरला असल्यासच वजावट मिळते.

प्रश्न : मला २०१३-१४ या आíथक वर्षांत ७,८०,००० रुपये वेतनाद्वारे मिळाले, ८४,००० रुपये बँकेतील मुदत ठेवीच्या व्याजाचे मिळाले, १२,००० रुपये बचत खात्याच्या व्याजाचे मिळाले. मी एक लाख रुपये जीवन विम्याचा हप्ता भरला, मेडिक्लेम विमा हप्ता १६,००० रुपये भरला. एका संस्थेला (ज्यांच्याकडे ८०जी कलमाप्रमाणे प्रमाणपत्र आहे)  १०,००० रुपयाची देणगी दिली. वेतनातून ६५,००० रुपये आणि बँकेतील व्याजावर ८,४०० रुपये इतकी उद्गम कर कपात (टीडीएस) झाली आहे. मला अजून किती कर भरावा लागेल?
– एक वाचक
उत्तर : आपले उत्पन्न आणि भरावा लागणारा कर हा खालीलप्रमाणे :
वेतनातून मिळालेले उत्पन्न                  ७,८०,०००
    इतर उत्पन्न :
    बँकेतील मुदत ठेवीवरील व्याज             ८४,०००   
    बँकेतील बचत खात्यावरील व्याज          १२,०००
    एकूण इतर उत्पन्न                               ९६,०००
            ——————————–
एकूण उत्पन्न                                       ८,७६,०००
            ——————————–
वजावट
कलम ८०क प्रमाणे (जीवन विमा)          १,००,०००
कलम ८०ड प्रमाणे (मेडिक्लेम विमा)        १५,०००
(मर्यादा १५,००० रुपये)
कलम ८०जी देणगी (५०%)                        ५,०००
८०टीटीए प्रमाणे बचत खात्यावरचे व्याज   १०,०००  
            ——————————–
एकूण वजावट                                       १,३०,०००
            ——————————–    
एकूण करपात्र उत्पन्न                          ७,४६,०००
देय कर खालीलप्रमाणे :
प्रथम २,००,००० रुपयांवर        0
२,००,००० ते ५,००,००० रुपयांवर १०%        ३०,०००
बाकी २,४६,००० रुपयांवर २०%                  ४९,२००
            ——————————–
करदायित्व                                               ७९,२००
अधिक ३% शैक्षणिक उपकर                       २,३७६
            ——————————–
एकूण कर                                                 ८१,५७६
            ——————————–
भरलेला कर :
वेतनातून टीडीएस कपात                          ६५,०००
व्याजावरील टीडीएस कपात                        ८,४००
            ——————————–
एकूण भरलेला कर                                   ७३,४००
            ——————————–
उर्वरित देय कर                                           ८,१७६
            ——————————–
आपला बाकी (टीडीएस वजा जाता) कर हा १०,००० रुपयांपेक्षा कमी असल्यामुळे अग्रिम कराचे व्याज भरावे लागणार नाही. परंतु विवरणपत्र उशिरा भरल्यास कलम २३४ए अन्वये व्याज भरावे लागेल.   
   
प्रश्न : माझ्या पत्नीच्या आईच्या नावाने एक घर होते. हे घर भाडय़ाने दिले आहे. मागील वर्षी आईचे निधन झाले. हे घर माझ्या पत्नीच्या नावाने झाले आहे. त्यामुळे भाडे माझ्या पत्नीच्या नावाने मिळते. या भाडय़ावर माझ्या पत्नीला कर भरावा लागेल का?
    – सुधीर काळे
उत्तर : पत्नीला तिच्या आईच्या मृत्यूनंतर मिळालेल्या घरावर कर भरावा लागणार नाही. हे घर पत्नीने जर विकले तर त्यावर झालेल्या भांडवली नफ्यावर कर भरावा लागेल. भाडय़ाचे उत्पन्न आईनंतर आपल्या पत्नीला मिळाले ते त्यांना करपात्र आहे. हे उत्पन्न  आपल्या पत्नीच्या उत्पन्नात गणले जाईल.