निवृत्तीनंतरच्या काळामधील पोटापाण्याच्या व्यवस्थेसाठी वित्तीय नियोजन करताना अगदी मूलभूत गोष्टीही सहसा लक्षात घेतल्या जात नाहीत. यासंबंघाने बहुतांशांकडून अभावितपणे होणाऱ्या चुका ठरावीक पठडीतल्याच आहेत. अशा ठळक सहा घोडचुकांचा हा मागोवा..

सध्याच्या काळात निवृत्तीवेतन (पेन्शन) हा प्रकार कालबाह्य़ झाला आहे आणि सरासरी वयोमर्यादाही वाढली आहे. त्यामुळे निवृत्तीनंतरच्या काळामधील पोटापाण्याच्या व्यवस्थेसाठी आíथक नियोजन अतिशय आवश्यक आहे. किंबहुना त्याला पर्याय नाही, असे म्हटले तर ते जास्त संयुक्तिक ठरेल. दुर्दैवाने आज फार कमी लोकांना त्याची जाणीव आहे आणि ज्यांना थोडीफार कल्पना आहे त्यापकी अनेक जण या नियोजनाचा गंभीरपणे विचार करत नाहीत. जर तसे झाले असते तर सहा – आठ महिन्यांपूर्वी पुण्याच्या एका मोठया आयटी कंपनीमधील तरुणांनी सरकारी पेन्शन योजनांमध्ये सरसकट पसे गुंतविण्याचे धाडस (की विवेकभ्रष्टता?) केले नसते.
नियोजन करताना ज्या काही मूलभूत गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात त्यांचा सहसा विचार केला जात नाही. भाववाढीमुळे आपला भविष्यातील खर्च किती होणार याचे कोणाला भान नसते. कारण ते फक्त वर्तमानात जगत असतात. ही आणि अशा अनेक चुका जेव्हा ध्यानात येतात तेव्हा वेळ निघून गेलेली असते. त्यासाठी सुरुवातीपासूनच खबरदारी घेणे आवश्यक आहे. गेल्या कित्येक वर्षांमधील गुंतवणूकदारांच्या समस्यांबाबत त्यांच्याशी केलेल्या चर्चेमधून एक गोष्ट ध्यानात आली की, बहुतेकांनी अभावितपणे केलेल्या चुका ठरावीक पठडीतल्याच आहेत. त्या लक्षात घेऊन योग्य ती खबरदारी घेतली तर भविष्यातील अनर्थ टाळण्यास नक्कीच मदत होईल.
एक – दोन आठवडय़ांच्या सहलीला जायचे असेल तर त्या अगोदरचा एक ते दीड महिना तरी आपण त्याची आखणी करत असतो. त्यामध्ये काही बाकी राहिले तर नाही ना हे वरचेवर तपासून बघतो. हजारो रुपयांची गुंतवणूक करताना मात्र आपण मागचा पुढचा विचारही करत नाही. १९९९ च्या ‘फॉच्र्युन’ मासिकामध्ये याबाबत फार छान परीक्षण आले होते. त्यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार -ज्यांनी सुरुवातीपासून योग्य नियोजन करून गुंतवणूक केली आहे त्यांनी निवृत्तीपर्यंतच्या काळात इतरांपेक्षा जवळजवळ पाच पट जास्त रक्कम जमा करण्यात यश मिळविले आहे.  
अर्थात कागदावर आखणी केली तर यश मिळतेच असे नाही. पण तसे करण्याने त्या कामात नीटनेटकेपणा नक्कीच येतो आणि एक प्रकारची शिस्तही लागते. त्यांनतर त्याची अंमलबजावणी करणे तितकेच महत्त्वाचे आहे. प्रत्यक्षात घडणाऱ्या गोष्टी आपण आखणी केल्याप्रमाणे होत आहेत की नाही ते वरचेवर पडताळून पाहण्यासाठी लेखी आराखडय़ाची गरज असते. काही बदल करण्याची आवश्यकता असल्यास वेळीच कारवाई करता येते.
गुंतवणुकीला सुरुवात करण्याच्या बाबतीत अनेकदा चालढकल केली जाते.  ‘सध्या कमाई कमी आहे, नंतर वाढली की बघू’. किंवा ‘बाजार सुधारल्यावर पाहू’ किंवा ‘सध्या वेळ नाही’ अशा प्रकारच्या अनेक कारणांनी गुंतवणुकीसाठी अळमटळम केली जाते. काही जण तर ‘कल की किसने देखी है यार, आज तो जी लो’ या सलीम-जावेदटाइप ‘डायलॉग’चे भोक्तेअसतात. नवीन गुंतवणूकदारांच्या बाबतीतच नव्हे तर ज्यांनी योग्य आखणी करून गुंतवणुकीला सुरुवात केली आहे त्यांच्या बाबतही चिंतनपर परीक्षण करण्याबाबत चालढकल केल्याचे आढळून येते. याचे कारण एकच आहे आणि ते म्हणजे बहुतेकांच्या बाबतीत गुंतवणूक हा ‘महा बोअिरग’ प्रकार आहे आणि त्यामुळे रोजच्या व्यवहारामध्ये इतर गोष्टींच्या तुलनेत गुंतवणुकीला दुय्यम प्राधान्य दिले जाते. निवृत्तीचा काळ जवळ आला की हे सारे खडबडून जागे होतात. परंतु मधल्या काळात उपलब्ध झालेल्या संधींचा लाभ न उठविल्याने म्हणावी तशी रक्कम जमा होत नाही.
प्रत्येक गुंतवणुकीमध्ये जोखीम ही असतेच आणि ती कोणत्याही सिद्धांताच्या चौकटीत बसविता येत नाही. खोलात शिरून त्याबाबत माहिती करून घेण्याआधी जोखीम म्हणजे काय ते जाणून घेऊया.
प्रत्येक जण सतत कुठले ना कुठले तरी निर्णय घेत असतो आणि त्या प्रत्येक निर्णयामागे काही ना काही धोका हा असतोच. अगदी रोजचेच उदाहरण म्हणजे दिवसांतून किती वेळा आपण सिग्नलच्या आदेशानुसार रस्ता पार करतो? रोज घर सोडून परत घरी पोहोचेपर्यंत पावलापावलावर धोका असतो. पण म्हणून आपण घराबाहेर पडणे तर सोडत नाही! थोडक्यात, धोका टाळण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा थोडीफार पूर्वनियोजित जोखीम घेऊन त्यावर मात करणे केव्हाही शहाणपणाचे आहे आणि तेच आपण अगदी दररोज करत असतो. अर्थात कितपत धोका पत्कारावा किंवा माझी कोणत्या थरापर्यंत जोखीम पत्करायची तयारी आहे, हे प्रत्येकाने स्वत: ठरवायचे आहे. जरुरीपेक्षा जास्त किंवा वाजवीपेक्षा कमी धोका पत्करणे या दोन्ही गोष्टी नुकसानाला आमंत्रण देत असतात. जास्त परताव्याच्या हव्यासाने १९९२, २००० किंवा २००८ मध्ये ज्यांनी शेअर बाजारात प्रवेश केला त्यांना अतोनात नुकसानास सामोरे जावे लागले आहे. याच्या अगदी विरुद्धचे टोक म्हणजे अजिबात धोका पत्करणार नाही, अशी मनोधारणा असलेले गुंतवणूकदार. त्यांची गुंतवणूक मुख्यत: पोस्ट ऑफिस आणि बँकाच्या मुदत ठेवींमध्ये असते. आपली गुंतवणूक अगदी सुरक्षित आहे, अशा भ्रमात ते पूर्णत: निर्धास्त असतात. किती प्रकारचे धोके ते पत्करत आहेत याची त्यांना कल्पनाही नसते. एक म्हणजे अर्धा ते एक टक्का जास्त व्याजदर मिळतो म्हणून अनेक जण छोटय़ा मोठय़ा को-अॉपरेटिव्ह बँकांमध्ये किंवा पतपेढय़ांमधील मुदत ठेवीमध्ये पसे गुंतवितात. संस्था बुडित खात्यात निघाली की मूळ रकमेवरही पाणी सोडावे लागते. दुसरा धोका म्हणजे, बदलत्या व्याजदराचा. या वास्तविकतेबाबत अशा गुंतवणूकदारांचे एक छापील उत्तर असते ‘थोडा कमी परतावा मिळाला तर काही आभाळ कोसळत नाही. आमची ‘मूडी’ तर ‘सेफ’ आहे ना!’ दुर्दैवाने त्यांच्या ‘मुडी’ला वाळवी लागत आहे याची त्यांना कल्पनाही नसते. ठोस परताव्याच्या गुंतवणूक पर्यायांमध्ये व्याजाचा दर हा भाववाढीपेक्षा नेहमीच कमी असतो. मूळ रकमेची शाश्वती या एकाच सूत्राचा विचार करून भाववाढीकडे दुर्लक्ष करून मोठय़ा कालावधीसाठी तथाकथित सुरक्षित पर्यायामध्ये गुंतवणूक केली तर आपल्या मूळ रकमेची आणि दरवर्षी मिळणाऱ्या व्याजाची काय दशा झालेली असते ते पाहुया.
उदाहरण :
गुंतवणुकीची रक्कम     :    रु. १० लाख
व्याजाचा दर     :    ८%
भाववाढीचा दर     :     १०%
कालावधी     :     ५ वष्रे
ल्ल (तक्ता १) : पाचव्या वर्षीच्या व्याजाची रक्कम ८०,००० रुपये असते. परंतु त्याची बाजारी किंमत ४७,००० रुपये असते. मुदत ठेवीचा ५ वर्षांचा कालावधी संपल्यानंतर गुंतवणूकदाराला त्याची मूळ रक्कम (१० लाख रुपये) परत मिळते. परंतु भाववाढीच्या भस्मासुरामुळे त्या रकमेची बाजारी किंमत झालेली असते ५,९०,४७२ रुपये. ही प्रक्रिया जर ३० वर्षांपर्यंत चालू ठेवली तर काय होते ते पाहूया.
ल्ल (तक्ता २) :  ३० वर्षांनंतर त्या गुंतवणूकदाराला परत मिळालेल्या १० लाख रुपयांची प्रत्यक्षात बाजारी किंमत (Purchasing power) झालेली असते ४२,३९१ रुपये.
 गुंतवणुकीच्या बाबत आपण अनेक जणांवर नको तितका विश्वास ठेवतो. उदाहरणार्थ –
जिव्हाळ्याच्या बँकेचा अधिकारी. अनेकांची अशी धारणा असते की आपले भले करण्यासाठीच त्याने हा पेशा पत्करला आहे. त्यामुळे तो जो काही सल्ला देईल ती पूर्वदिशा असते. हल्ली बँका स्वत:च्या पारंपरिक योजनांबरोबर गुंतवणुकीचे इतरही पर्याय विकत असतात आणि त्यांच्या विक्रीबाबत कर्मचाऱ्यांना उद्दिष्ट दिलेले असते. ते पूर्ण करण्यासाठी विमा किंवा म्युच्युअल फंडाच्या निवृत्तीसारख्या योजना सरसकट खातेदारांच्या गळी उतरविल्या जातात.
दुसरा प्रकार म्हणजे जीवन विमा विक्रेता. हा एक तर नातेवाईक असतो किंवा जवळचा मित्र. किंवा जवळच्या मित्राचा मित्र. त्यामुळे साहजिकच तो विश्वासातला असतो. त्याच्यासाठीही विक्रीचे लक्ष्य दिलेले असते. त्याची पत ही त्याने कंपनीकडे जमा केलेल्या प्रीमियमच्या रकमेवर ठरविली जाते. त्यामुळे जास्तीत जास्त प्रीमियम गोळा करून आपली पत आणि आवक वाढविणे हे त्याचे ध्येय असते. विमा इच्छुकाच्या दृष्टीने विमा छत्रापेक्षा प्राप्तिकर वाचविणे आणि गुंतविलेले पसे परत मिळविणे या गोष्टींना जास्त महत्त्व असते. परिणाम: ज्या विमा योजनांमध्ये विक्रेत्यांचे आणि कंपनीचे भले आहे अशा ‘एन्डाऊमेंट’ विमा योजनांची विक्री जास्त होते. विमा इच्छुकाच्या फायद्याच्या ‘प्युअर टर्म’ योजनांची विक्री अगदी नगण्य असते. अनेक जण प्रसारमाध्यमांतील शिफारसींवर अांधळा विश्वास ठेवतात.
दूरचित्रवाणीवरील शिफारसीचे उदाहरण पहा. २००० मध्ये एचयूएलच्या शेअरची १० रुपयांची दर्शनी किंमत १ रुपये केली. ३००० रुपयांच्या शेअरची किंमत २९० रुपये झाली. २००२ च्या एप्रिलमध्ये एका जागतिक दर्जाच्या कंपनीच्या प्रवक्त्याने एका वाहिनीवरून त्या शेअरच्या खरेदीची शिफारस केली. त्याच दिवशी त्याचा बाजारभाव २४० रुपयांवरून २६३ रुपये झाला (वाढ सुमारे १० टक्के) त्यानंतर पुढील २ वर्षांमध्ये त्याचा भाव १३० रुपयांपर्यंत खाली आला आणि पुन्हा २६३ रुपयांचा भाव दिसायला चार वष्रे लागली. बहुतेक तज्ज्ञांच्या शिफारसींमध्ये काही ना काही स्वार्थ दडला असण्याची शक्यता असते. त्यामुळे नुसत्या शिफारसींवर अवलंबून राहण्यापेक्षा ती शिफारस का केली आहे ते पडताळून पाहिले तर नुकसान टाळता येईल.
अनेक जण ज्या गुंतवणुकीच्या पर्यायांना तयार बाजारपेठ नाही अशा पर्यायामध्ये illiquid products) गुंतवणूक करतात. जेव्हा विकण्याची वेळ येते तेव्हा समोर खरेदीदार नसतो आणि जो असतो तो भाव पाडून मागतो. शेअर्स किंवा म्युच्युअल फंडामध्ये भाव माहीत असतो आणि पसे तिसऱ्या दिवशी मिळतात.
काही जणांना अगदी सर्वोत्तम पर्यायच हवा असतो. आíथक बाजारामध्ये ‘द बेस्ट’ असा कोणताही पर्याय नसतो. कोणत्या ना कोणत्या काळात आपल्या गुंतवणुकीपेक्षा इतर पर्याय चांगला परतावा देत असतात. या ‘बेस्ट’च्या शोधामध्ये त्यांचा बराच वेळ वाया जातो.
बऱ्याचदा हाव किंवा लालूच गुंतवणूकदारांच्या नुकसानाला कारणीभूत ठरते. गुंतवणुकीबाबत डोके वापरण्यापेक्षा भावनेला जेव्हा जास्त महत्त्व दिले जाते तेव्हा आपण काटेकोरपणे आणि विचाराअंती केलेल्या नियोजनाची अक्षरश: विल्हेवाट लागते. व्याजदर कमी होणार आहेत, भाववाढ वाढणार आहे, कंपन्यांच्या नफ्याचे प्रमाण कमी होणार आहे अशा अनेक बातम्या येत असतात आणि त्याचबरोबर गुंतवणूकदार फरफटतही जातात. अशा वेळी नको ते निर्णय घेतले जातात आणि नंतर पस्तावण्याची वेळ येते.
अशा गोष्टींबाबत तटस्थतेने विचार केला आणि कोणा तज्ज्ञाचे मार्गदर्शन घेतले तर आíथक ध्येय गाठण्यास बऱ्याच प्रमाणात मदत होते.