सरलेल्या वर्षांने म्युच्युअल फंड गुंतवणुकीत नवीन गुंतवणूकदारांची अभूतपूर्व अशी वार्षकि भर घातली. तरी म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे आम्हाला काहीच ज्ञानच नाही, असे सांगणारेही अनेक जण आहेतच. त्यांच्यासाठी या गुंतवणूक पर्यायाचा ऊहापोह करणारे हे साप्ताहिक सदर.. अर्थात गेल्या वर्षांप्रमाणे चांगली कामगिरी असणाऱ्या गुंतवणूकयोग्य योजनांचा वेधही यात असेलच..
मरणाचे स्मरण असावे।
हरिभक्तीस सादर व्हावे।
मरोन कीर्तीस उरवावे।
येणे प्रकारें।।
समर्थ रामदासांच्या दासबोधातील ही ओवी आयुष्याची अशाश्वतता अधोरेखित करीत असते. ही अशाश्वतता आहे म्हणून विमा ही संकल्पना अस्तित्वात आहे. आíथक नियोजनात जीवन विमा व आरोग्य विम्यानंतर जर कुठली गोष्ट असेल तर ती गुंतवणूक. गुंतवणूक म्हणून जीवन विम्यानंतर बचतीसाठी कशाचा विचार होत असेल तर तो पोस्टाच्या किंवा बँकेच्या आवर्ती योजनेचा. या आवर्ती योजनांच्या मुदतपूर्तीनंतर रक्कम हाती आली की त्यातून त्याच बँकेत मुदतीची ठेव करणे हा अनुभव सर्वानीच आपल्या आयुष्यात घेतलेला आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने २५ डिसेंबर २०१५ रोजी जाहीर केलेल्या बँकिंग उद्योगाच्या साप्ताहिक सांख्यिकी अहवालानुसार, देशातील सर्व बँकांकडे मिळून ९१ लाख ८४ हजार कोटी रुपयांच्या ठेवी असून मागील एका वर्षांत या ठेवी संकलनात ११.७% वाढ झाली आहे. ‘सेबी’कडे नोंदणी असलेल्या म्युच्युअल फंड चालविणाऱ्या कंपन्यांची संख्या देशात ४४ असून ऑक्टोबर महिन्यात म्युच्युअल फंडांच्या एकूण संपत्तीने १३ लाख कोटींचा टप्पा पार केला होता. नोव्हेंबर महिन्यात शेअर बाजारात झालेल्या घसरणीने व एका मोठय़ा उद्योगसमूहाने म्युच्युअल फंडातील मोठी रक्कम म्युच्युअल फंडाच्या लिक्विड फंड प्रकारच्या योजनांतून काढून घेतल्याने ही मालमत्ता १३ लाख कोटींपेक्षा कमी झाली होती. तथापि डिसेंबर अखेपर्यंत एकूण संपत्तीने पुन्हा १३ लाख कोटींचा टप्पा ओलांडला असण्याचा अंदाज आहे.
अनेकांचा असा समज आहे की म्युच्युअल फंड फक्त शेअर बाजारात गुंतवणूक करतात. परंतु हा समज चुकीचा आहे. बँका कमीत कमी सात दिवसांच्या ठेवी स्वीकारतात, तर म्युच्युअल फंडांच्याही एका रात्रीसाठी (Overnight) निधी स्वीकारणाऱ्या योजना आहेत. ज्याला ‘लिक्विड फंड’ अशी संज्ञा वापरली जाते. सामान्य गुंतवणूकदारांच्या दृष्टीपल्याड असलेल्या या प्रकारच्या योजना रोकडसुलभता असणाऱ्या कंपन्यांच्या अत्यंत आवडत्या योजना आहेत. या कंपन्या शुक्रवारी दुपारी दोन वाजायच्या आधी आपली रोकड (बँकांच्या माध्यमातून) लिक्विड फंडात गुंतवितात तर दोन वाजून दहा मिनिटांनी परत मागतात. लिक्विड फंडासाठी कालमर्यादा दुपारी दोनची असल्याने दोन वाजून दहा मिनिटांनी नोंदविलेली पसे परत मागण्याची विनंती सोमवारी मान्य होते. सोमवारी सकाळी या कंपन्यांच्या खात्यात पसे जमा होतात. हे पसे म्युच्युअल फंडांकडून एका महिन्यापेक्षा कमी मुदतीच्या ‘ट्रेझरी बिल्स’मध्ये (सरकारी रोखे) गुंतविले जातात. ‘ट्रेझरी बिल्स’पेक्षा अन्य कुठलीही गुंतवणूक सुरक्षित असू शकत नाही. माझे मित्र हरीश पोवार यांच्या कार्यालयात अनेकदा जाणे होते. दुपारी १२ ते २ या दरम्यान त्यांना भेटावयास गेले असताना,
‘आयटीसीचे २०० कोटी आले का?’
‘टीसीएसच्या खात्यात ४० कोटी जमा झाले का?’
‘अहो, अश्विनी मॅडम! आंध्र बँकेच्या २०० कोटींचे काय झाले? आपल्या खात्यात जमा झाले का?’
असे संवाद ऐकायला मिळतात. हरीश यांच्यावर त्यांच्या म्युच्युअल फंडाच्या संस्थागत गुंतवणूकदारांना गुंतवणूकविषयक सेवा देण्याची जबाबदारी आहे. हे सर्व पसे ‘लिक्विड’ व ‘लिक्विड प्लस’ प्रकारच्या फंडात गुंतविले जातात. एका रात्रीसाठी केलेल्या या गुंतवणुकीवर रिझव्‍‌र्ह बँकेच्या रेपो दराहून (७.२५%) थोडासा अधिक परतावा मिळतो. आजपर्यंतच्या इतिहासात फक्त दोन वेळा एका रात्रीसाठी केलेल्या गुंतवणुकीवर तोटा झाला आहे. म्युच्युअल फंडाच्या एकूण मालमत्तेपकी ३३ टक्के वाटा हा लिक्विड फंडांचा असला तरी लिक्विड फंडाचा विचार वैयक्तिक गुंतवणूकदार करीत नाहीत. सध्याच्या अ‍ॅपच्या जमान्यात आपल्याकडील अतिरिक्त पशाची दोन वाजायच्या आधी गुंतवणूक करणे मुळीच कठीण नाही.
लिक्विड फंडानंतरच्या पायरीवर येतात ते स्थिर उत्पन्न देणारे फंड ज्यात प्रामुख्याने शॉर्ट टर्म फंड, अल्ट्रा शॉर्ट टर्म फंड, डायनॅमिक बॉण्ड फंड, जी सेक फंड किंवा फक्त सरकारी रोख्यांत गुंतवणूक करणारे फंड. म्युच्युअल फंडांच्या मालमत्तेपकी सर्वाधिक ४४% मालमत्ता या प्रकारच्या फंडांच्या गुंतवणुकीमुळे तयार झालेली आहे. या फंडांच्या व्यवस्थापनात Accrual व Duration strategies ही दोन धोरणे वापरली जातात. देशातील व परदेशातील व्याज दर, रुपयाच्या परकीय चलनाशी असलेला विनिमय दर यावरील निधी व्यवस्थापकाचा दृष्टिकोन यावर वरीलपकी कुठले धोरण वापरावे हे ठरते. उच्च धनसंपदा बाळगणारे गुंतवणूकदार (एचएनआय) सोडले तर वैयक्तिक गुंतवणूकदार याही प्रकारच्या फंडात अभावानेच गुंतवणूक करताना दिसतात.
रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडानंतर समभाग व रोखे गुंतवणूक करणाऱ्या बॅलेन्स्ड फंडांचा समावेश होतो. गुंतवणुकीतील आपल्या जोखीम स्वीकारण्याच्या क्षमतेनुसार बॅलेन्स्ड फंडांत विकल्प उपलब्ध आहेत. ६५ टक्के समभाग ते २० टक्के समभाग गुंतवणूक असलेल्या बॅलेन्स्ड फंडांसाठी २०१५ हे वर्ष मलाचा दगड ठरले. २०१५ या वर्षांत प्रथमच एका बॅलेन्स्ड फंडाने १० हजार कोटींचा टप्पा ओलांडला असून अन्य तीन बॅलेन्स्ड फंड १,००० कोटींच्या उंबरठय़ावर उभे आहेत. सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन किंवा ‘सिप’च्या माध्यमातून संपत्तीची निर्मिती होऊ शकते हे नवश्रीमंत तरुण वर्गाला पटल्यामुळे दरमहा सुमारे ३० हजार कोटी रुपये ‘सिप’द्वारे म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतविले जात आहेत. या ‘सिप’चा मोठा हिस्सा बॅलेन्स्ड फंडांच्या गुंतवणुकीत येत आहे.
खात्रीशीर परताव्याची शक्यता अल्प आणि सर्वात धोकादायक शेअर बाजारातील गुंतवणूक टाळावी असे आजपर्यंत वाटलेले परंतु कमी होणाऱ्या व्याज दरामुळे अपरिहार्य झालेले इक्विटी म्युच्युअल फंड अर्थात समभाग गुंतवणूक करणारे फंड हा प्रकार वैयक्तिक गुंतवणूकदारांच्या तसा परिचयाचा. परंतु पुरेसा अर्थबोध न झालेला प्रकार आहे. या प्रकारच्या फंडाचे लार्जकॅप, मिडकॅप, स्मॉलकॅप, मायक्रोकॅप, मल्टिकॅप, सेक्टोरल, थीमॅटिक हे व इतर अनेक प्रकार आहेत. काही म्युच्युअल फंडांतील गुंतवणूक ही कर वजावटीस पात्र समजली जाते. ताज्या आकडेवारीनुसार भांडवली बाजाराचा २ टक्के वाटा म्युच्युअल फंडांच्या गुंतवणुकीचा आहे.
मोठय़ा संपत्तीची निर्मिती करण्यासाठी कर्ज घेऊन घर घेण्याची आवश्यकता नसून एक शिस्तप्रिय गुंतवणुकीची आवश्यकता आहे. प्रत्येक गुंतवणुकीला काही कारण असावे लागते व एक निमित्तसुद्धा असावे लागते. जसे की मुलांचे शिक्षण, स्वत:च्या निवृत्तीपश्चात उदरनिर्वाहाची तरतूद इत्यादी. ४४ फंड घराण्यांच्या गुंतवणुकीसाठी कायम खुल्या असणाऱ्या ११,६५० योजनांमधून नेमक्या कोणत्या योजना आपल्या वित्तीय उद्दिष्टांची पूर्तता करू शकतील व या गुंतवणुकीतील धोके कोणते याचे विवेचन करणारा हा स्तंभ असणार आहे. हे विवेचन आकडेमोडीवर आधारित असल्याने शब्दांच्या जोडीला आकडेसुद्धा असणार आहेत. बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या गंगेचे विशाल रूप सहज नजरेस पडते. परंतु गंगेचा उगम गंगोत्री येथे एका लहान परंतु अखंड वाहणाऱ्या जलस्रोतापासून होतो हे विसरून चालणार नाही. हे सदर नेमके या अखंड वाहणाऱ्या जलधारेचा शोध घेणाऱ्या भूमिकेत असणार आहे.
नवे सूर अन् नवे तराणे
हवा नवा तो नूर
जाऊ द्या दूर जुने ते सूर
नवीन वर्षांत या ओळी गुणगुणत मुदत ठेवी व पारंपरिक विमा योजना यांच्या पलीकडील गुंतवणूक पर्यायांचा ऊहापोह या सदरातून करणार आहे. अनेक वाचक असे भेटले की म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे आम्हाला काहीच ज्ञान नव्हते तर काही वाचक असे भेटले की, आम्हाला एसआयपी माहीत आहे पण एसडब्यूपी माहीत नाही. हे सदर नेमके हेच काम करणार आहे.
आधीपासून ठाऊक असणाऱ्यांना गुगलच्या पलीकडे अधिक माहिती देणारे व ज्यांना काहीच ठाऊक नाही व सुरुवात कोठून करायची, हा प्रश्न पडला आहे. अशा दोन्ही प्रकारच्या वाचकांच्या गरजा लक्षात घेऊन म्युच्युअल फंडांचा हा नवा नूर नवीन वर्षांत सर्वानाच जाणून घ्यावासा न वाटला तर नवल म्हणावे लागेल!

Untitled-33

shreeyachebaba@gmail.com