रक्षिता तुम्ही स्वातंत्र्या,
प्राणांस घेऊनी हाती
तुमच्यासह अमुची लक्ष्मी,
तुमच्यासह शेतीभाती
एकटय़ा शिपायासाठी,
झुरतात अंतरे कोटी
सनिक हो तुमच्यासाठी..
स्वातंत्र्य दिन नुकताच साजरा झाला. दिल्लीतील राजपथावर स्वातंत्र्य दिनानिमित्त लष्कराने कवायत केली. देशाच्या लष्करी सामर्थ्यांचे प्रदर्शन दिल्लीने जगाला घडविले. देशातील कुठल्याही भागात अगदी पुण्यासारख्या एखाद्या रेल्वे स्टेशनवर एखादा लष्करी गणवेशातील अपरिचित अधिकारी दिसला तरी मनातल्या मनात तरी या अधिकाऱ्याला एक कडक सॅल्युट ठोकण्याची इच्छा होते. देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या जवानांविषयी असलेली देशवासीयांची भावना ‘गदिमां’नी वरील शब्दांत व्यक्त केली आहे. अगदी हीच भावना वायुदलातील एका अधिकाऱ्याचे आíथक नियोजन करताना आहे. म्हणूच आजची सुरुवात गदिमांच्या शब्दांनी केली.  
आजच्या भागात वायुदलातील िवग कमांडर शिरीष पेनुरकर (वय ४४) यांचे वित्तीय नियोजन जाणून घेऊ. िवग कमांडर पेनुरकर हे ‘लोकसत्ता’च्या नवी दिल्ली आवृतीचे वाचक आहेत. िवग कमांडर पेनुरकर हे वायुदलाच्या इंजिनीअिरग िवगमध्ये काम करतात. ते वायुदलात जरी नोकरी करत असले तरी त्यांचे कामाचे स्वरूप जमिनीवरचेच असते. ते विमानातून वारंवार उड्डाण करीत नाहीत. सध्या त्यांचे कामाचे ठिकाण रक्षा भवन, मानसिंग रस्ता, केंद्रीय सचिवालय, नवी दिल्ली येथे आहे. दिल्ली हे ठिकाण कुटुंबासोबत राहण्याचे असल्याने साहजिकच ते व त्यांचे कुटुंबीय एकत्र राहत आहेत. सन्यातील बदलीच्या प्रत्येक ठिकाणी कुटुंब नेता येतेच असे नाही. वायुदलाने त्यांना केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या नवी दिल्लीतील आरकेपूरम येथील वसाहतीत कर्मचारी निवासस्थान दिले आहे. ते, त्यांची पत्नी दीपा (३९), सुमोल (१३) व स्मिती (११) यांच्यासह या ठिकाणी राहत आहेत. सुमोल इयत्ता आठवीत, तर स्मिती इयत्ता सहावीत शिकते. पेनुरकर यांचे शालेय शिक्षण नांदेड येथे झाले. पेनुरकर यांनी निवृत्तीनंतर कायमच्या रहिवासासाठी औरंगाबाद इथे १९९९ मध्ये सदनिका घेतली. २०१० मध्ये या घरासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड पूर्ण झाली. सध्याच्या लष्करी नियमानुसार निवृत्तीची वयोमर्यादा ५४ वष्रे आहे. ४४ वर्षांचे पेनुरकर यांची जर त्यापूर्वी पदोन्नती झाली तर त्यांची वायुदलातील सेवा त्यापुढेही सुरू राहील. संरक्षण दलातून सेवानिवृती कधीही झाली तरी त्यानंतर नागरी सेवेत वयाची ६० वष्रे पूर्ण होईपर्यंत नोकरी करण्याचा त्यांचा विचार आहे. वायुदलातून त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांना नियमानुसार सेवानिवृत्ती वेतन लागू होईल. त्यांची वित्तीय ध्येये त्यांनी पुढीलप्रमाणे निश्चित केली आहेत.
िवग कमांडर पेनुरकर यांचे मासिक वेतन १.५१ लाख असून कर व इतर वजावटी पश्चात ६५ हजार हातात येतात. त्यांचा घरखर्च ५५ हजार आहे. त्यांच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत ३० लाख व सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीत ४ लाख जमा आहेत. त्यांच्याकडे असलेल्या समभागांचे बाजार मूल्य १० लाख असून तीन म्युच्युअल फंडात मिळून ४.५ लाख जमा आहेत. एलआयसीच्या जीवन सुरक्षा पेन्शन प्लॅनचा रु. १०,०३५, कोमल जीवनचा वार्षकि रु. ५,४३५, एलआयसीच्या ई-टर्मचा (विमाछत्र ५० लाख) वार्षकि रु. १६,१२४, पोस्टाच्या विम्याचा मासिक रु. ४७३ हप्ता भरत आहेत. ते आपल्या कुटुंबाच्या अकस्मात वैद्यकीय खर्चासाठी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या आशा किरण या योजनेचा वार्षकि रु. १५,२०३ हप्ता भरत आहेत. या योजनेअंतर्गत चौघांना मिळून ८ लाख रुपयांच्या वैद्यकीय खर्चाच्या तरतुदीची सोय आहे.
िवग कमांडर पेनुरकर यांना सल्ला:
तुम्ही निवड केलेली सर्वच उत्पादने गुंतवणूकदाराच्या दृष्टीने अव्वल आहेत. तसेच आपण एलआयसीचा ‘ई-टर्म’ खरेदी केला आहे. (येथेही पुन्हा शिस्तीचा दाखला मिळतो!) साधारणत: विमा विक्रेत्यांना मालामाल करणारी व विमा इच्छुकाला कंगाल करणारी उत्पादने विमा इच्छुकाच्या गळ्यात मारली जातात. माणसाच्या पेशाचा त्याच्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम होत असतो. तुमच्या पेशात कोणत्याही लष्करी अधिकाऱ्याच्या अंगभूत असलेली शिस्त तुमच्या वित्तीय नियोजनात दिसून येते. या अनुमानाच्या समर्थनासाठी दोन निरीक्षणे नोंदवितो. एलआयसीची जीवन सुरक्षा पेन्शन ही योजना सेवानिवृती वेतनासाठी असलेल्या योजनांपकी एक चांगली योजना आहे. परंतु या योजनेत विक्रेत्याला सेवा शुल्क (कमिशन) विम्याच्या हप्त्याच्या अतिशय अल्प असल्याने ही योजना विक्रेते विकत नाहीत, त्याऐवजी वेगवेगळ्या मुदतपूर्तीच्या २५-३० पॉलिसी गळ्यात मारलेल्या आढळतात.
सद्यस्थितीत घरखर्च वगळता तुमच्याकडे मासिक ९५ हजार रुपये शिल्लक राहतात. आधीच खरेदी केलेल्या व सुरू असलेल्या एसआयपी मिळून ४५ हजार रुपये खर्च होत आहेत. वर उल्लेख केल्याप्रमाणे या सर्व एसआयपी व विमा योजनांची निवड योग्य असल्याने त्या सुरू ठेवायच्या आहेत. ऊर्वरित ५० हजार रुपयांसाठी सोयीच्या गुंतवणुकीच्या साधनांची निवड करताना काही गोष्टींचा स्पष्ट विचार करणे आवश्यक आहे. वय वर्षे ४४, पत्नी गृहिणी असणे व साधारण अजून १० वष्रे मुलांचे बाकी असलेले शिक्षण हे लक्षात घेऊन एकूण गुंतवणुकीत रोखे व समभाग यांचे प्रमाण प्रत्येकी ५० टक्के असावे. सध्या तुमची गुंतवणूक रोखे जास्त व समभाग कमी अशा धाटणीची आहे. यासाठी पुण्यात घर घेताना लागणारे अंदाजे १० लाख रुपये पीपीएफ व ईपीएफमधून उभे करावे. तसे करायचे नसेल तर, म्युच्युअल फंड व पीपीएफमधून गुंतवणूक काढून घेण्याचा विचार करावा. हे ठरल्यानंतर त्यानुसार उर्वरित गुंतवणुकीचे नियोजन करणे सोयीचे होईल. नियोजन करताना नेहमीच जे उत्पन्न भविष्यात मिळण्याची शक्यता आहे असे उत्पन्न नियोजन करताना जमेस न घेता नियोजन करायचे नसते. त्यामुळे सध्याच्या नोकरीची १० वष्रे शिल्लक आहेत हे लक्षात घेऊन हे नियोजन सुचवीत आहे. तसेच बँकसुद्धा तुम्हाला घरासाठी कर्ज देताना १० वष्रे मुदतीचे कर्ज देईल. नवीन गुंतवणुकीला सुरुवात करण्याआधी कर्जाचा तपशील ध्यानात घ्यायला हवा. सध्याची तुमची गुंतवणूकयोग्य शिल्लक व कर्जाची १० किंवा १५ वष्रे मुदत लक्षात घेता ही गुंतवणूकयोग्य शिल्लक कर्जाचे हप्ते सुरू झाल्यानंतर शिल्लक नसेल. म्हणून नवीन गुंतवणुकीचा निर्णय कर्जाची मुदत, व्याजाचा दर, हप्ता वगैरे निश्चित झाल्यावरच घेणे योग्य ठरेल.
तेव्हा तुम्ही प्रथम पसंतीचे घर व त्यासाठी कर्ज निश्चिती करा. आज गृहकर्जासाठी ‘एसबीआय मॅक्सगेन’ ही योजना कर्जदाराच्या दृष्टीने सर्वात कार्यक्षम योजना आहे. कर्ज या टप्प्यानंतरच्या नियोजनास ‘अर्थ वृत्तान्त’ मदतीला आहेच!