इन्फो एज या नावावरून ही कंपनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील वाटत असली तरी ते १०० टक्के बरोबर उत्तर नाही. मात्र सध्याच्या युगात आणि विशेषत: तरुणवर्गासाठी नोकरी डॉट कॉम, नोकरी गल्फ डॉट कॉम, शिक्षा, जीवनसाथी डॉट कॉम, ९९ एकर्स डॉट कॉम इ. ऑनलाइन पोर्टल्स नवीन नाहीत. नोकरी डॉट कॉमपासून सुरुवात केलेली ही कंपनी आज अनेक पोर्टल्सवर ऑनलाइन व्यवसाय करीत आहे. कंपनीच्या एकूण उलाढालीपैकी सुमारे ७५ टक्के उलाढाल नोकरी डॉट कॉम या पोर्टलची आहे. व्यवसायाचे विस्तारीकरण करताना कंपनीने विवाह, रिअल इस्टेट, वित्त, शिक्षण इ. अनेक उपयोगी तसेच आकर्षक पोर्टल स्थापन केलीच, परंतु कालानुरूप त्यात बदलही केले. कंपनीने रेस्टॉरन्ट्स रेटिंग आणि परीक्षण करणारी सुप्रसिद्ध झोमाटो या कंपनीचे ४६ टक्के भांडवल ताब्यात घेतले. सध्या झोमाटो जगभरातील २३ देशांत कार्यरत असून कंपनीकडे १२ लाखांहून अधिक रेस्टॉरन्ट्सचा डेटा आहे. भारतात ४४ शहरांतून ७१ कार्यालये असलेल्या या कंपनीने इतरही अनेक क्षेत्रांतील विविध पोर्टलमध्ये गुंतवणूक केली आहे. यात प्रामुख्याने पॉलिसी बझार (विमा पॉलिसी संबंधात), मेरिट नेशन (शालेय विद्यार्थासाठी), मायडाला (विविध उत्पादने सवलतीत विकणारी), कॅनवेरा (फोटोग्राफीसाठी), हॅपिली अनमॅरिड, व्हेकेशन लॅब्स (सहली संबंधात), उन्नती (रोजगार संधी), बिग स्टायलिस्ट (सौंदर्य प्रसाधनांसंबंधात) आणि रेअर मीडिया इ.चा समवेश करावा लागेल. कुठलेही कर्ज नसलेल्या इन्फो एजचे डिसेंबर २०१६ साठी संपलेल्या तिमाहीचे निकाल अपेक्षेप्रमाणे उत्तम असून या कालावधीत कंपनीने २१० कोटी रुपयांच्या उलाढालीवर ८०.१ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या तिमाहीच्या तुलनेत तो १६० टक्क्यांनी अधिक आहे. सध्या ८५० रुपयांच्या आसपास असलेला हा शेअर थोडासा महाग वाटत असला तरीही आपल्या पोर्टफोलिओ मध्ये एक आधुनिक युगातील कंपनी असावी असे तुम्हाला वाटत असेल तर त्यात इन्फो एजचा समावेश करायलाच हवा.