फ्युचर रिटेल्स लिमिटेड या कंपनीने हायपर सिटी या किरकोळ विक्री दालनांचे अधिग्रहण करण्याचे ठरविले आहे. फ्युचर रिटेल्सच्या सर्व विक्री दालनांचे क्षेत्रफळ ११ दशलक्ष चौरस फूट असून भारतातील २४० शहरांतील ३३ कोटी ग्राहक या विक्री दालनांतून दरवर्षी खरेदी करतात. कंपनीने आपला व्यवसाय हायपर मार्केट, सुपर मार्केट आणि होम सेगमेंट या तीन प्रकारांत विभागला आहे. कंपनी आपला व्यवसाय बिग बझार, होम टाऊन, इझी डे, ई झोन, फूड हॉल इत्यादी नाममुद्रांच्या खाली करीत आहे. हायपर सिटीच्या अधिग्रहणामुळे कंपनीच्या विक्री दालनांची संख्या १९ने तर क्षेत्रफळ १.२४ दशलक्ष चौरस फुटाने वाढणार आहे. या अधिग्रहणानंतर फ्युचर रिटेल्सच्या एकूण दालनांची संख्या ९००वर पोहोचणार आहे.

हायपर सिटी ही किरकोळ विक्री दालनांची शृंखला ही के रहेजा समूहाचा एक भाग आहे. शॉपर्स स्टॉप, इन ऑर्बिट मॉल, क्रॉसवर्ड ही किरकोळ विक्री दालनांची शृंखलासुद्धा के रहेजा समूहाचा एक भाग आहेत. हायपर सिटीमध्ये शॉपर्स स्टॉपची ५१ टक्के मालकी असून उर्वरित ४९ टक्के मालकी सी. एल. रहेजा समूहाकडे आहे. या कंपनीची नोंद शॉपर्स स्टॉपची उपकंपनी अशी झाली आहे. या अधिग्रहणानंतर या कंपनीची नोंद फ्युचर रिटेल्स लिमिटेडची १०० टक्के मालकी असलेली उपकंपनी अशी असेल. हायपर सिटीमध्ये सालाना २० लाख ग्राहक खरेदी करतात. साधारण वर्षभरापूर्वी रमेश मेनन यांना हायपर सिटीने मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त केले. हायपर सिटीच्या एकूण विक्रीपैकी ६५ टक्के विक्री खाद्यउत्पादनांच्या विक्रीतून, १७ टक्के तयार कपडे, तर उर्वरित विक्री अन्य साधनांच्या विक्रीतून येते. कंपनीने अलीकडे नव्याने उघडलेल्या विक्री दालनांचे सरासरी क्षेत्रफळ ७० ते ८५ हजार चौरस फुटांवरून ४० ते ४५ चौरस फूट इतके कमी केले. ‘युरोमॉनिटर’ या मार्केट रिसर्च एजन्सीच्या २०१६मधील आकडेवारीनुसार बिग बझार ही कंपनी किरकोळ विक्रीतील सर्वात मोठी कंपनी असून, बिग बझारकडे २२.४ टक्के बाजार हिस्सा आहे.

या अधिग्रहणामुळे हायपर सिटीच्या विद्यमान भागधारकांना फ्युचर रिटेल्सचे समभाग मिळतील आणि हायपर सिटीच्या कर्जाचे दायित्व फ्युचर रिटेल्स निभावेल. या आधी फ्युचर रिटेल्सने, भारती रिटेल्स आणि हेरिटेज फ्रेशचे अधिग्रहण यशस्वी करून दाखविले आहे. या अधिग्रहणाचे फ्युचर रिटेल्सला अनेक फायदे होणार आहेत. जसे की, दोन जवळच्या दुकानांपैकी एक दुकान बंद होणे, मुख्य कार्यालय बंद झाल्यामुळे खर्चात सालाना ५.५ कोटींची बचत, हायपर सिटीचा संचित तोटा मोठा असल्यामुळे २०१९ पर्यंत शून्य आयकर करदायित्व वगैरे. या फायद्यांसोबत अतिरिक्त समभागांचे वितरण, हायपर सिटीच्या कर्जाचे दायित्व निभावण्याची घेतलेली हमी आणि या अधिग्रहणासाठी मोजलेली काही रक्कम ही किंमत द्यावी लागेल. हायपर सिटीने आपल्या १९ विक्री दालनांसाठी के. रहेजा समूहाच्या मालकीच्या मालमत्ता भाडेपट्टय़ाने घेतल्या असून हा भाडेपट्टा करार विद्यमान अटींवर पुढील १० वर्षांसाठी चालू ठेवण्यास के रहेजा समूह बांधील आहे. हायपर सिटीच्या दोन विद्यमान भागधारकांना मिळालेले समभाग एका वर्षांसाठी न विकण्याची अट या अधिग्रहणाचा भाग आहे. मुंबईतील मालाड येथील हायपर सिटीच्या विक्री दालनाच्या शेजारीच बिग बझार असून लोकसंख्येच्या घनतेमुळे ही दोन्ही विक्री दालने फायद्यात राहण्याची शक्यता दोन्ही कंपन्यांनी वर्तविली आहे. हा अपवाद वगळता दोन विक्री दालने पुरेशा अंतरावर आहेत. फ्युचर रिटेल्स लिमिटेडला भारती रिटेल्सला तोटय़ातून नफ्यात आणण्याचा अनुभव आहे. हेच कौशल्य वापरून हायपर सिटीला नफ्यात आणण्यात फ्युचर रिटेल्स लिमिटेडला यश येईल. या अधिग्रहणामुळे फ्युचर रिटेल्स लिमिटेडच्या पॅकेजिंग आणि विक्री आणि वितरण खर्चात २.५ टक्के बचत होणार असल्याचा फायदा दोन्ही कंपन्यांना होणार आहे. अधिग्रहणानंतर विद्यमान विक्री करीत असलेल्या वस्तूंचे पुनर्गठन होण्याचा फायदा दोन्ही कंपन्यांना होईल. या समभागांत पाच ते सात वर्षांसाठी केलेली गुंतवणूक नक्कीच नफा मिळवून देईल.

राजेश तांबे

arthmanas@expressindia.com

(लेखक शेअर गुंतवणूकतज्ज्ञ आणि बाजार विश्लेषक आहेत.)