महागडय़ा भेटी देणं ही एक फॅशन झाली आहे. भेट देणाऱ्याला कोणताही कर भरावा लागत नाही. परंतु भेट घेणाऱ्याला भेट घेतांना कर भरावा लागू शकतो. त्यामुळे प्राप्तीकर कायद्यात ‘भेटीं’विषयी काय तरतुदी आहेत त्या जाणणे महत्त्वाचे आहे.  
मागील लेखांमध्ये आपण पगार आणि घरासंबंधी असलेल्या प्राप्तीकर कायद्यातील तरतुदी बघितल्या आता या लेखात आपण इतर उत्पन्नात गणल्या जाणारया भेटींच्या विषयी माहिती घेऊ या.
साधारणत: भेटी या प्रेम आणि आपुलकी व्यक्त करण्यासाठी दिल्या जातात. जसे पालकांनी मुलांना, मुलांनी पालकांना, भावाने बहिणींना, किंवा इतर नातेवाईकांना.. या भेटी नातेवाईकांशिवाय मित्रांना किंवा ओळखीच्या लोकांना लग्नादी समारंभात दिल्या जातात. भेटी पशांच्या स्वरुपात, वस्तूंच्या स्वरुपात किंवा स्थावर मालमत्तेच्या स्वरुपात असू शकतात. भेटींचा गरवापर कर चुकविण्यासाठी होऊ नये यासाठी प्राप्तीकर कायद्यात काही तरतुदी आहेत.
महागडय़ा भेटी देणं ही एक फॅशन झाली आहे. भेट देणाऱ्याला कोणताही कर भरावा लागत नाही. परंतु भेट घेणाऱ्याला भेट घेतांना कर भरावा लागू शकतो. त्यामुळे प्राप्तीकर कायद्यात भेटी विषयी काय तरतुदी आहेत त्या जाणणे महत्वाचे आहे.  
जर वैयक्तिक करदात्याला किंवा िहदू अविभक्त कुटुंबांला पसे किंवा मालमत्ता ही मोबदल्याशिवाय किंवा अपुऱ्या मोबदल्याने मिळाली असेल तर ते प्राप्तीकरासाठी पात्र उत्पन्न समजले जाते. याचे प्रामुख्याने खालील तीन प्रकारांमध्ये वर्गीकरण करता येईल:
१. मोबदल्याव्यतिरिक्त मिळालेले पसे
२. मोबदल्याशिवाय किंवा अपुऱ्या मोबदल्याने मिळालेली विशिष्ट वस्तू
३. मोबदल्याशिवाय किंवा अपुऱ्या मोबदल्याने मिळालेली स्थावर मालमत्ता.
या भेटी किंवा मोबदल्याशिवाय किंवा अपुऱ्या मोबदल्याने मिळालेली विशिष्ट वस्तू किंवा स्थावर मालमत्ता या जर खालील व्यक्तींकडून मिळाल्या असतील तर त्या करपात्र नाहीत:
१. नातेवाईकांकडून मिळालेली रक्कम:
नातेवाईकांकडून मिळालेली भेट ही पूर्णपणे करमुक्त आहे. याला कोणतीही मर्यादा नाही. नातेवाईकांमध्ये खालील व्यक्तींचा समावेश होतो :
– पती किंवा पत्नी,
– भाऊ किंवा बहिण आणि त्यांचे पती पत्नी,
– आई, वडील
– वडिलांचे किंवा आईचे भाऊ किंवा बहिण आणि त्यांचे पती पत्नी,
– वंशपरंपरेतले
– पत्नीच्या वंशपरंपरेतले
२. लग्नात मिळालेली रक्कम:
३. वारसाहक्काने किंवा इच्छा पत्राद्वारे मिळालेली रक्कम: वारसदाराला वारसाहक्काने किंवा इच्छापत्राद्वारे जर काही रक्कम मिळाली असेल तर ती रक्कम करपात्र नाही.  
४. देणगीदाराच्या मृत्यूपत्रानुसार मिळालेली रक्कम   
५. स्थानिक स्वराज संस्थेकडून मिळालेली रक्कम
६. शैक्षणिक संस्था, विद्यापीठ, इस्पितळ किंवा वैद्यकीय संस्था या कडून मिळालेली रक्कम: उदा. शिष्यवृत्ती, वैद्यकीय मदत,
७. धर्मादाय संस्थेकडून मिळालेली रक्कम: उदा. शिष्यवृत्ती, वैद्यकीय मदत,
मोबदल्याशिवाय मिळालेले पसे (भेट) :
सुरुवातीच्या काळात एकूण २५,००० रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळाली असेल तर ती करपात्र होती. आणि २००९ नंतर एकूण ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळाली असेल तर ती करपात्र आहे.
वरील म्हटल्याप्रमाणे नातेवाईकांच्या व्यतिरिक्त व्यक्तींकडून मिळालेली रक्कम ही करपात्र आहे. एकूण ५०,००० पेक्षा कमी भेटींवर कर भरावा लागत नाही. उदाहरणार्थ,
(अ) एका व्यक्तीला त्याच्या मित्राकडून ३०,००० रुपयांची रक्कम भेट म्हणून मिळाली तर त्याला ही रक्कम करपात्र नाही. कारण ५०,००० रुपयांपेक्षा जास्त रक्कमच करपात्र आहे. (ब) एका व्यक्तीला काकांकडून (वडिलांचा भाऊ) ७५,००० रुपये, मित्राकडून ३०,००० रुपये आणि मित्राच्या भावाकडून ३५,००० रुपये भेट मिळाले. यामधील ७५,००० रुपये हे करपात्र नाहीत. कारण ते नातेवाईकाकडून मिळाले आहेत. या शिवाय इतरांकडून एकूण भेट रक्कम ५०,००० रुपयांपेक्षा जास्त असल्यामुळे (३०,००० + ३५,००० रुपये = ६५,००० रुपये) संपूर्ण ६५,००० रुपये करपात्र असतील.
लग्नाप्रसंगी मिळालेली अहेराची रक्कम ही पूर्णपणे करमुक्त आहे. नातेवाईकांकडून लग्नात मिळालेली रक्कम तर वर सांगितल्याप्रमाणे करमुक्त आहेच. शिवाय इतर व्यक्तींकडून मिळालेली रक्कमसुद्धा करमुक्त आहे. यात लग्नप्रसंगी म्हणजे लग्नाच्या दिवशी किंवा त्याच्या मागे पुढे (नेमके किती दिवस ते प्राप्तीकर कायद्यात सांगितले नाही) मिळालेल्या रकमेचा समावेश होतो. पण याचा अर्थ सामान्यपणे लग्नाच्या दिवसाच्या आसपास समजण्यास हरकत नाही. फक्त ज्याचे लग्न झाले त्या करदात्याला मिळणाऱ्या भेटी करमुक्त आहेत. मुलांच्या, भावाच्या, बहिणीच्या लग्नात मिळालेल्या भेटी मात्र करपात्र आहेत. मित्राच्या लग्नात जर भेट मिळाली तर ती करपात्र आहे (मर्यादा एकूण ५०,००० रुपयांपेक्षा जास्त). लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मिळणारी रक्कमही करपात्र आहे.
मोबदल्याशिवाय किंवा अपुऱ्या मोबदल्याने मिळालेली विशिष्ट वस्तू:
यामध्ये खालील वस्तूंचा समावेश होतो:
१. शेअर्स, रोखे,
२. दागिने,
३. चित्रे
४. शिल्प
५. कोणतेही कलाकुसरीचे काम
६. सोने-चांदी
७. पुरातत्व वस्तू.
यामध्ये देखील वर सांगितल्याप्रमाणे नातेवाईक, वारसा हक्काने, लग्नात, वगरे वरील वस्तुरूपाने मिळालेली भेटी या करपात्र नाहीत.
वरील वस्तुरूपात मिळालेल्या भेटीचे मूल्य हे वाजवी बाजारभावानुसार ठरविले जाते. जर भेट ही मोबदल्याशिवाय असेल तर संपूर्ण वाजवी बाजार मूल्य करपात्र असते.
उदाहरणार्थ, एका व्यक्तीला आईकडून एक सोन्याची साखळी मिळाली त्याचे वाजवी बाजार मूल्य ६५,००० रुपये इतके आहे, त्याच्या मित्राने त्याला ७५,००० रुपयांचे शेअर्स भेट दिले, आणि त्याच्या वाढदिवसाला त्याला मित्राने २,००,००० रुपयांची गाडी भेट दिली. यामधील ६५,००० रुपयांची सोन्याची साखळी ही आई (नातेवाईक) कडून मिळाली असल्यामुळे करपात्र नाही. मित्राने दिलेले ७५,००० रुपयांचे शेअर्स हे करपात्र आहेत. मित्राने दिलेली गाडी ही ‘विशिष्ट वस्तू’ नसल्यामुळे या कलमाप्रमाणे करपात्र नाही. त्यामुळे या भेटींपोटी त्याच्या करपात्र उत्पन्नात ७५,००० रुपये इतकी भर पडेल.   
जर वरीलपकी एखाद्या ‘विशिष्ट वस्तू’चा मोबदला हा वाजवी बाजार मूल्यापेक्षा कमी असेल आणि त्याचे  वाजवी बाजार मूल्य मोबादल्यापेक्षा ५०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल तर, जेवढे वाजवी बाजार मूल्य मोबदला रकमेच्या जास्त आहे तेवढी रक्कम करपात्र असते.
उदाहरणार्थ, एका व्यक्तीने मित्राकडून काही दागिने १,५०,००० रुपयांना विकत घेतले त्याचे वाजवी बाजार मूल्य ३,५०,००० रुपये इतके आहे, एका नातेवाईकाकडून ५,००,००० रुपये वाजवी बाजार मूल्य असलेले शेअर्स १,००,००० रुपयांना विकत घेतले आणि एका मित्राकडून ७५,००० रुपयांचा कॅमेरा १५,००० रुपयांना खरेदी केला. यामध्ये मित्राकडून अपुऱ्या मोबदल्यात विकत घेतलेले दागिने हे करपात्र आहेत. करपात्र रक्कम ठरवताना मोबदला रकमेपेक्षा वाजवी बाजारभाव / मूल्य जेवढे जास्त आहे म्हणजेच २,००,००० रुपये (३,५०,००० वजा १,५०,००० रुपये) ही रक्कम करपात्र उत्पन्नात गणली जाईल. ५,००,००० रुपयांचे शेअर्स नातेवाईकांकडून मिळाले असल्यामुळे करपात्र नाहीत. कॅमेरा हा ‘विशिष्ट वस्तू’ नसल्यामुळे करपात्र नाही.
मोबदल्याशिवाय किंवा अपुऱ्या मोबदल्याने मिळालेली स्थावर मालमत्ता:
यामध्ये जमीन किंवा इमारत किंवा दोन्हींचा समावेश होतो.
यामध्ये सुद्धा वर सांगितल्याप्रमाणे नातेवाईक, वारसा हक्काने, लग्नात, वगरे मिळालेली स्थावर मालमत्ताही करपात्र नाही.
स्थावर मालमत्तेच्या रूपात मिळालेल्या भेटीचे मूल्य हे मुद्रांक शुल्कानुसार ठरविण्यात आलेल्या बाजार मूल्य असते. जर भेट ही मोबदल्याशिवाय असेल तर संपूर्ण बाजार मूल्य करपात्र असते.
उदाहरणार्थ, एकाने आपल्या मित्राला एक घर भेट म्हणून दिले आणि त्याचे मुद्रांक शुल्कानुसार बाजार भाव २५,००,००० रुपये इतके आहे. तर त्या मित्राला २५,००,००० रुपये इतके उत्पन्न इतर उत्पन्नात दाखवून त्यावर कर भरावा लागेल.
जर वरीलपकी स्थावर मालमत्तेचा मोबदला हा मुद्रांक शुल्कानुसार बाजार  मूल्यापेक्षा कमी असेल आणि त्याचे  बाजार मूल्य मोबदल्यापेक्षा ५०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल तर, जेवढे बाजार मूल्य मोबदला रकमेपेक्षा जास्त आहे तेवढी रक्कम करपात्र असते.
उदाहरणार्थ : एका व्यक्तीने मित्राकडून एक दुकान १०,००,००० रुपयांना खरेदी केले आणि त्याचे मुद्रांक शुल्कानुसार बाजार मूल्य २०,००,००० रुपये इतके आहे. या मध्ये १०,००,००० रुपये (बाजार  मूल्य २०,००,००० रुपये वजा खरेदी किंमत १०,००,००० रुपये) इतकी रक्कम करपात्र उत्पन्नात गणली जाईल.
नातेवाईकांकडून मिळणाऱ्या भेटी जरी करमुक्त असल्या तरी प्राप्तीकर कायद्यातील तरतुदीप्रमाणे काही रकमा किंवा मालमत्ता यांच्यावरील उत्पन्न हे भेट देणाऱ्याच्या उत्पन्नात गणले जाते. उदाहरणार्थ, समजा पतीला पत्नीने १०,००,००० रुपये इतकी भेट दिली. आता ही भेट करमुक्त आहे. परंतु या १०,००,००० रुपयांतून पत्नीला मिळणारे उत्पन्न हे पतीच्याच उत्पन्नात गणले जाते. किंवा पतीने पत्नीला घर भेट दिले. यावर पत्नीला कर भरावा लागणार नाही. परंतु त्या घराच्या भाडे उत्पन्नावर पतीलाच कर भरावा लागतो. म्हणून भेट देताना याची खबरदारी घेणे जरुरी आहे.

भेटी आणि करदायित्वाची पाश्र्वभूमी..
* पूर्वी भेट कर कायद्याच्या (GIFT TAX ACT) अंतर्गत करपात्र होत्या.
* हा कायदा १९९८ सालापासून रद्द करण्यात आला.
* त्यानंतर काही काळासाठी या भेटींवर कर नव्हता.
* २००४ पासून या भेटी इतर उत्पन्नात दाखविण्याची तरतूद आली.
* २००९ पर्यंत यामध्ये फक्त पशांचा समावेश होता.
* २००९ नंतर यामध्ये स्थावर मालमत्ता आणि इतर वस्तूंचा समावेश झाला.  
(लेखक सनदी लेखाकार आहेत.)
pravin3966@rediffmail.com