पोर्टफोलियो

१९४५ साली स्थापन झालेली स्टेट बँक ऑफ त्रावणकोर (एसबीटी) ही भारतीय स्टेट बँकेच्या सहयोगी बँकांपैकी एक उत्तम बँक. सध्या बँकेच्या ९२५ पेक्षा जास्त शाखा असून त्यापैकी ७०० शाखा केवळ केरळ राज्यातच आहेत. केरळ राज्यातील बँकांपैकी अनिवासी भारतीयांच्या सर्वात जास्त ठेवी याच बँकेत आहेत. त्रिवेंद्रममध्ये सोन्यावर कर्ज देणाऱ्या ‘गोल्ड पॉइंट’ दालन असलेल्या खास १९ शाखा आहेत. केरळमधील एक अग्रगण्य बँक म्हणून एसबीटीचा उल्लेख करावा लागेल.
अपेक्षेप्रमाणे बँकेने ३१ मार्च २०१३ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षांसाठी उत्तम कामगिरी करून दाखविली आहे. गेल्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत बँकेच्या नक्त नफ्यात २०% वाढ होऊन तो ६१५ कोटी रुपयांवर गेला आहे. केवळ ५० कोटी रुपयांचे भागभांडवल असलेल्या या बँकेचा बाजारभाव सध्या तिचे पुस्तकी मूल्य रु. ८७३ पेक्षाही कमी आहे. छोटे भागभांडवल आणि त्यातही प्रवर्तकांकडील भांडवलाचा अधिकांश हिस्सा असल्याने या शेअर्सची बाजारातील उलाढाल तशी मर्यादितच आहे. आगामी काळात स्टेट बँकेत तिच्या सर्व सहयोगी बँकांचे विलिनीकरण होणार आहे हे गुंतवणूकदारांना माहितच असेल. विलिनीकरणाच्या प्रक्रियेला किती वेळ लागेल ते लागो. वर्षभरात हा शेअर तुम्हाला चांगला नफा कमावून देऊ शकेल हे मात्र नक्की!