चेन्नई पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड (सीपीसीएल) म्हणजे पूर्वाश्रमीची मद्रास रिफायनरी होय. २० वर्षांपूर्वी ७० रुपये अधिमूल्याने कंपनीची भागविक्री (आयपीओ) यशस्वी झाली होती. २००१ मध्ये सरकारी कंपनी इंडियन ऑइलने ‘सीपीसीएल’मधील ५१.८८% भांडवल ताब्यात घेतले आणि सीपीसीएल ही इंडियन ऑइलची उपकंपनी बनली. कंपनीच्या तमिळनाडू आणि मनाली येथे रिफायनरी असून मनाली येथील रिफायनरी भारतातील एक अत्याधुनिक रिफायनरी समजली जाते. इतर रिफायनरी प्रमाणेच कंपनी एलपीजी, मोटर स्पिरीट, केरोसीन, हाय स्पीड डिझेल, नाफ्ता, पॅराफिन, वॅक्स इ. पेट्रोलियम पदार्थाचे उत्पादन करते. गेली चार-पाच वर्ष पेट्रोलियम उद्योगाला लागलेले ग्रहण आता दूर होत चालले आहे. पेट्रोल आणि डिझेल या वरची अनुदाने आणि किंमतीवरील नियंत्रणही लवकरच जाईल, अशी आशा आहे. जागतिक स्तरावर उतरलेल्या कच्च्या तेलाच्या किमतीचा फायदा होताना दिसू लागला आहे. नुकत्याच जाहिर झालेल्या आíथक निकालांवरून हे स्पष्ट दिसून येते. ३० जून २०१४ अखेर समाप्त पहिल्या तिमाहीसाठी कंपनीने १२,९८५ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ५१० कोटींचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीला तोटा सहन करावा लागला होता. यंदाच्या आíथक वर्षांपासून हे पेट्रोलियम क्षेत्राला चांगले  दिवस येतील अशी अपेक्षा आहे.  सध्या पुस्तकी मूल्यापेक्षा कमी किमतीत उपलब्ध असलेला हा शेअर मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योग्य वाटतो. पेट्रोलियम क्षेत्रातील विपणन कंपन्यांना उतरत्या किमतीचा जास्त फायदा होणार असल्याने एचपीसीएल, बीपीसीएल आणि इंडियन ऑइलसारख्या कंपन्यांचा देखील गुंतवणुकीसाठी जरूर विचार करावा.