ऑगस्ट महिन्यात नोमुरा ग्लोबल फायनान्शियल प्रॉडक्ट्स या आंतरराष्ट्रीय गुंतवणूक सल्लागार कंपनीचे समभाग संशोधक व विश्लेषक ‘लोकसत्ता- अर्थ वृत्तान्त’साठी अतिथी विश्लेषकाच्या भूमिकेत असणार आहेत. आजच्या हॅवेल्स इंडिया या कंपनीचे समभाग विश्लेषक आहेत- अमर केडिया आणि विनीत वर्मा.
हॅवेल्स ही विद्युत उत्पादने व पूरक उत्पादने क्षेत्रातील सर्वात मोठी नाममुद्रा आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानुसार देशात ‘मेक इन इंडिया’ उत्पादन घेत असलेल्या या गुंतवणुकीची ही शिफारस..
हॅवेल्स इंडिया लिमिटेड ही कंपनी मुख्य विद्युत उत्पादने व पूरक उत्पादने याची देशातील एक प्रमुख उत्पादक आहे. विद्युत उपकरणातील हॅवेल्स ही विद्युत अभियांत्रिकी उद्योगाच्या बाजारपेठेतील सर्वात मोठी नाममुद्रा आहे. हॅवेल्स आपली उत्पादने हॅवेल्स व्यतिरिक्त कॅबट्री, सिल्व्हेनिया, कोन्कॉर्ड, ल्युमिनन्स व स्टॅण्डर्ड या नाममुद्रेने विकते. हॅवेल्स इंडियाने २००७ मध्ये सिल्व्हेनिया या जागतिक पातळीवरील लाईटिंग क्षेत्रातील कंपनीचे अधिग्रहण केले. कंपनी आपनी उत्पादने ५० देशात विकत आहे. भारतात कंपनीचे विद्युत उत्पादने व निर्मिती कारखाने हरिद्वार, बड्डी, फरिदाबाद नोएडा, साहिबाबाद, अल्वर व निम्राना इथे आहेत तर विदेशात युरोप, आफ्रिका, चीन व लॅटीन अमेरिका इथे आहेत.
कंपनीच्या व्यवस्थापनाने पहिल्या तिमाहीच्या निकालांनंतर विश्लेशकांशी संवाद साधला. या संवादानंतर आम्ही आमचे दोन वर्षांनंतरचे किंमतीचे लक्ष्य पुन:निर्धारित करत आहोत. आम्ही या समभागाच्या धोरणांत बदल करून ‘राखून ठेवा’ (होल्ड) वरून नव्याने खरेदी करा (बाय) असा बदल करत आहोत. व्यवस्थापनाने व्यक्त केलेल्या अंदाजनुसार आíथक वर्ष २०१४-१५ मध्ये विक्रीत १५ ते १७ टक्के तर २०१५-१६ मध्ये विक्री १७-२० टक्क्याने वाढण्याची शक्यता आहे. कंपनीच्या प्रमुख उत्पादनांपकी स्वीच गियरची विक्री २० टक्के वायर्स व केबलची विक्री १५ टक्के लाईटिंग उत्पादने २० टक्के व ग्राहक उत्पादनांची विक्री १५ टक्के वाढण्याची शक्यता व्यवस्थापनाने व्यक्त केली आहे.
सिल्व्हेनियाची विक्री पुढील वर्षांत ४-५ टक्के दरम्यान वाढण्याची तर निव्वळ नफ्यात ६ ते ६.५ वाढ होण्याची शक्यता व्यवस्थापनाने व्यक्त केली आहे. केबल व वायर या व्यवसायात नफ्याचे प्रमाण अतिशय कमी असते. तरीही या व्यवसायातून मिळणारया नफ्याची पातळी १३ – १३.२५ टक्क्यांपेक्षा खाली घसरणार नाही, याची व्यवस्थापनाला अशा आहे. चालू आíथक वर्षांपासून कंपनीच्या काही कारखान्यातून मिळणाऱ्या करमुक्त नफ्याची मुदत संपली आहे. याचा परिणाम कंपनीला एकूण विक्रीच्या २८ टक्के कर भरावा लागला. मागील वर्षी हेच प्रमाण २० टक्के होते. वाढलेल्या कराच्या दरामुळे नफ्यात होणाऱ्या घसरणीची भरपाई करण्यासाठी व्यवस्थापनाने उत्पादन खर्चात बचत करण्याच्या योजना आखल्या आहेत. प्राप्तीकरावर मिळणाऱ्या सवलतीची मुदत जरी संपली असली तरी उत्पादन शुल्कावर मिळणारी सवलत आíथक वर्ष २०१९ पर्यंत सुरू राहणार आहे. विद्यमान आíथक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत केबल व वायरच्या मागणीत मोठी वाढ नोंदली गेली. व्यवस्थापनाच्या मते ही वाढ सुधारलेल्या अर्थव्यवस्थेचे संकेत देत आहेत. केबल व वायर व्यवसायातील वाढ या तिमाहीत इतर व्यवसायातही पसरेल, असा व्यवास्थापानाला विश्वास वाटतो. ग्राहक उपयोगी वस्तू व्यवसायात छताला लावायच्या पंख्याचा मोठा वाटा आहे. या उत्पादन गटात कंपनी आपले आघाडीचे स्थान टिकवून ठेवेल. प्रकाश देणाऱ्या उत्पादन गटात बाजारपेठेत कंपनीचा वाटा वाढविण्यास एलईडी, सीएलएफ दिव्यांचे प्रमाण ३० टक्के आहे. साधारण गणपती ते दिवाळी सणवार असलेला कालावधी हा विद्युत उत्पादने उत्पादक कंपनीसाठी सुगीचा हंगाम समाजाला जातो. कंपनी उत्तर व पूर्व भारतात अनेक उत्पादन गटात त्यात्या व्यवसायाचे नेतृत्व करते. परंतु पश्चिम व दक्षिण भारतात कंपनीला अनेक स्थानिक उत्पादकांकडून कडय़ा स्पध्रेला तोंड द्यावे लागते. या तिमाहीत कंपनी पश्चिम व दक्षिण भारतात अनेक विक्री दलाने उघडणार असून कंपनी यासाठी १०० कोटीचा निधी खर्च करणार आहे.
स्वातंत्र्यदिनाला देशवासियांना उद्देशून केलेल्या पंतप्रधानांच्या भाषणातून सरकारची धोरणे स्पष्ट होत असतात. यावर्षी मोदींचे हे पहिलेच भाषण असल्याने देशवासियांना या भाषणाची देशवासियांना उत्सुकता होती. मोदी यांनी या भाषणात सरकारच्या धोरणांवर प्रकाश टाकला. मागील काही वर्षांत देशातील उत्पादन क्षेत्र चीनच्या तुलनेत मागे पडल्याची भावना उद्योजकांमध्ये होती. उद्योजकांच्या या भीतीची सरकारने नोंद घेतली असून सरकारने ‘मेक इन इंडिया’ हे धोरण प्रभावीपणे राबविण्याचे ठरविले आहे. या धोरणाचा लाभ भारतीय उत्पादकांना होईल. याच्या जोडीला सरकारने आदर्श ग्राम योजनेंतर्गत प्रत्येक संसद सदस्याला एक खेडे आदर्श ग्राम म्हणून विकसित करण्यास सांगितले आहे. या योजनेची १५ ऑगस्ट रोजी घोषणा होऊन या योजनेचे उद्घाटन येत्या ११ ऑक्टोबरला प्रस्तावित आहे. ही योजना आधीच्या सरकारच्या पंतप्रधान आदर्श ग्राम योजनेचे सुधारित रूप आहे. या योजनेच्या अंतर्गत जी खेडी विकसित होणार आहेत त्या खेडय़ांच्या पुíनर्मितीमध्ये विद्युत अभियांत्रिकी उत्पादनांची मागणी वाढणार आहे.
या सर्व गोष्टींचा विचार करून व कंपनीच्या पहिल्या तिमाहीचे निकाल व नंतर व्यवस्थापनाशी झालेल्या भेटीनंतर आम्ही आमच्या अपेक्षित नफ्याच्या पातळीत वाढ केली. कंपनीच्या सद्य तिमाहीच्या विक्रीत ३-५ टक्के वाढ अपेक्षित आहे. तर आíथक वर्ष २०१५-१६ व २०१६-१७ मध्ये १५ ते २० टक्के विक्रीत वाढीची अपेक्षा आहे. या वाढीमुळेच या समभागाचे फेरमुल्यांकन करून आम्ही आमच्या आधीच्या ‘राखून ठेवा’ या धोरणात बदल करून ‘नव्याने खरेदी करावा’ अशी सुधारणा केली.