जवळपास आयुष्याची ४० वर्षे मेहनत करत, पै पै गोळा करत, उत्पन्नातून बचत करत, आयुष्यभर आपण आनंदाने सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असतो. आपणास माहीतच आहे की, महागाई ही नेहमीच वाढत असते, दरवर्षी ती सरासरी ७ टक्के दराने वाढते आहे. हे गृहीत धरले तर ४० वर्षांनंतर आपणास दैनंदिन सुखी जीवनासाठी हवी असणारी रक्कम आताच्या तुलनेत ७ पट अधिक असायला हवी. वैद्यक शास्त्रामधील लक्षणीय प्रगतीमुळे भारतीय लोकांचे आयुष्यमान हे सरासरी वाढताना तर दिसते पण दुसरीकडे नवनवीन आजार डोकी वर काढत आहेत आणि त्यामुळे उपचाराचे खर्च वाढताना दिसतात. ते नजीकच्या भविष्यकाळात कमी होण्याची शक्यताही नाही. स्वत:च्या निवृत्तीनंतरच्या सुखी व स्वावलंबी दिवसांसाठी आर्थिक नियोजन करणे ही आजच्या काळाची गरज असून मुख्य म्हणजे हे आता आपल्याला कळू लागले आहे. पण तरीही आपण जी सरासरी बचत करतो त्यातून फक्त १२ टक्के रकमेची तरतूद ही निवृत्तीनंतरच्या सुखी आयुष्यासाठी केली जाते. म्हणून मनात प्रश्न येतो की, जरी आपल्याला हे सारे कळत असले तरी ते वळत का नाही..?

नुसतीच बचत करून आता भागणार नाही, आपणास आवश्यक असणारी भांडवल वृद्धी जर हवी असेल तर निवृत्तीनंतरच्या सुखी आणि समाधानी आयुष्यासाठी, तरुण वयातच निवडावे असे काही गुंतवणुकीचे पर्याय –

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) : आज सरासरी १०० पैकी जवळपास ९० लोक निवृत्तीनंतरच्या आर्थिक नियोजनाच्या उद्दिष्टांना समोर ठेवून प्रामुख्याने सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) मध्ये गुंतवणूक करताना दिसतात. पीपीएफ ही सरकारी योजना असून, पूर्णपणे मूळ भांडवल परत मिळण्याच्या हेतूने जोखीमरहित तसेच कर सवलत मिळवून देणारी असल्याकारणाने, सर्वसामान्य गुंतवणूकदारांमध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. परंतु जर बचतीचा मोठा भाग पीपीएफमध्ये गुंतविला असेल तर, महागाईचा वाढता दर भरून काढण्यासाठी केलेली ही गुंतवणूक पूरक ठरत नाही, कारण की पीपीएफचा परतावा कमी आहे. खालील काही विशिष्ट कारणांमुळे निवृत्तीनंतरच्या आर्थिक नियोजनाच्या दृष्टिकोनातून, मोठय़ा प्रमाणात फक्त आणि फक्त पीपीएफमध्ये गुंतवणूक केलेली योग्य ठरत नाही. जसे –

  • पीपीएफवर मिळणारा परताव्याचा दर हा गेल्या बऱ्याच वर्षांपासून सातत्याने कमी होताना दिसतो. (१२ टक्क्य़ांवरून आता जवळपास ८.६ टक्क्य़ांपर्यंत तो कमी झाला आहे.)
  • पीपीएफवरील परतावा प्रत्येक वर्षांच्या सरकारी रोख्याशी निगडित केला असून तो प्रत्येक वर्षी बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.
  • पीपीएफमधील गुंतवणूक १५ वर्षांसाठी करावयाची असते. म्हणजे दीर्घ मुदतीसाठी. गुंतवणुकीच्या नियमानुसार जशी जशी गुंतवणुकीची मुदत वाढत जाणार तसतसे त्या गुंतवणुकीवर मिळणारा परतावा वाढत जाणार परंतु पीपीएफच्या बाबतीत नेमके उलटे होते. हे काहीसे ओळखून बरेच जण आता गुंतवणुकीसाठी ५ वर्षांसाठी असलेल्या टप्प्यांचा लाभ घेणे पसंत करतात.
  • मुख्यत: पीपीएफ हे करसवलतीच्या लाभासाठीसुद्धा प्रसिद्ध आहे आणि त्यामुळे गुंतवणूकदार पीपीएफमध्ये दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करण्यास प्रेरित होतात.

खरे तर हा पर्याय जोखीम स्वीकारू न इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी नक्कीच उत्तम आहे

शेअर बाजारातील गुंतवणूक : परंतु जे गुंतवणूकदार तरुण वयातच निवृत्तीनंतरच्या काळासाठी, आर्थिक नियोजनाचा विचार करतात त्यांनी नक्कीच हे लक्षात घेतले पाहिजे की, तरुण वयात जोखीम स्वीकारण्याचे प्रमाण/ ताकद इतर वयाच्या गुंतवणूकदारांच्या मानाने जास्त असते. स्वत:चा आर्थिक ताळेबंद मांडून, आपण आर्थिकदृष्टय़ा किती जोखीम घेऊ  शकतो याचा आढावा घेणे महत्त्वाचे असते. गृहीत धरूयात की इतर सर्व खर्चाकरिता पैशाची तरतूद करून आपल्याकडे काही रक्कम शेअर बाजारातील गुंतवणुकीला वेगळी ठेवली असेल. तरीही प्रश्न समोर येतो की, इतर अनेक गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध असताना निवृत्तीनंतरचा एक पर्याय म्हणून शेअर बाजारात गुंतवणूक का करावयाची? याचे मुख्य कारण चलनवाढीच्या दरावर मात करून परतावा मिळवणे आणि हे शेअर बाजारातील गुंतवणुकीतूनच शक्य होते. आपल्याकडे असणाऱ्या शेअर्सचा योग्य पोर्टफोलियो असेल तर चलनवाढीच्या दरापेक्षा जास्त परतावा आणि भांडवल वृद्धी हे दोन्ही साध्य करता येते.

शेअर बाजारात गुंतवणूक करताना केवळ आर्थिक तयारी महत्त्वाची नसून, सखोल अभ्यास करण्याची तयारी ठेवावी लागते, याही पेक्षा सर्वात आवश्यक गोष्ट कोणती तर ती मानसिक तयारी! संयम आणि शांतपणे विचार करून गुंतवणूक करावी लागते. शेअर बाजारातील अभ्यासपूर्वक, योग्य आर्थिक सल्लागाराची मदत घेत अगदी तरुण वयापासूनच करणे अतिशय हिताचे ठरते. खरे तर शेअर बाजारात गुंतवणूक करताना सामान्य गुंतवणूकदाराकडून चुका होतात. या मागचे कारण म्हणजे अपुरे ज्ञान आणि काही गरसमज जसे की-

  • नवीन गुंतवणूकदारांसाठी पहिले पाऊल म्हणजे प्रारंभिक भागविक्री – आयपीओ.
  • शेअर बाजारातील गुंतवणूक करावयाची म्हणजे तांत्रिक विश्लेषण आवश्यक
  • ब्रोकरने दिलेली टिप म्हणजेच शेअर बाजारातील योग्य गुंतवणूक
  • कंपनीच्या नफ्याचा अभ्यास शेअर बाजारातील गुंतवणुकीस पुरेसा
  • गुंतलेले भांडवल परत मिळेपर्यंत शेअर न विकण्याची मानसिकता
  • कमी बाजारभावात उपलब्ध शेअर म्हणजे स्वस्त शेअर आणि तेच उत्तम शेअर

म्युच्युअल फंड  : आजच्या काळाची ही प्रमुख गरज. सर्वसामान्य गुंतवणूकदारांमध्ये म्युच्युअल फंडातील गुंतवणूक म्हणजे फक्त शेअर बाजारातील गुंतवणूक असा समज दिसून येतो. पण ते काही योग्य नव्हे. म्युच्युअल फंडामधील गुंतवणूक शेअरच्या बरोबरीने कर्जरोखे, मुदत ठेवी, सोने आदींमध्येसुद्धा असते. तरुण वयापासूनच, निवृत्तीनंतरच्या काळासाठी, नियमित गुंतवणुकीचा अतिशय योग्य असा पर्याय. गुंतवणूकदाराच्या विविध वयातील टप्प्यात आर्थिक उद्दिष्टे जशी बदलतात तशीच त्याची जबाबदारी, जोखीम घेण्याची क्षमता, होणारी बचत, इ. घटक देखील बदलतात. गुंतवणुकीचे पर्याय या विविध घटकांवर अवलंबून असतात. शेअर बाजार, रोखे, सोने, बँकेच्या ठेवी, मुच्युअल फंड, जमीन जुमला अशा विविध पर्यायांमध्ये योग्य पर्याय निवडणे हे खरे अर्थनियोजन आहे. पण म्युच्युअल फंड हा पर्याय आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात साथ देणारा आहे.

  • इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्स स्कीम्स (ईएलएसएस) हा म्युच्युअल फंडाचा प्रकार असून प्रामुख्याने गुंतवणुकीचा सर्वोच्च भाग शेअर बाजारात गुंतविला जातो. ‘ईएलएसएस’मधील गुंतवणूक मर्यादा तीन वर्षांची असून, ८० सी कलमाअंतर्गत ‘ईएलएसएस’मध्ये गुंतविलेल्या रकमेवर प्राप्तिकरातून वजावट मिळते तसेच मिळणारा परतावा व भांडवल वृद्धीवर कर सवलतही उपलब्ध होते. तरुण वयात निवडता येणारा हा एक योग्य पर्याय आहे.
  • गुंतवणुकीची उद्दिष्टे व जोखीम यांचा ताळमेळ, फंड घराणे, फंड व्यवस्थापकाबद्दल माहिती, फंडाची कामगिरी, फंड शुल्क रचना आणि खर्च यांचा अभ्यास करीत १०० हून अधिक म्युच्युअल फंडाच्या योजनेतील आपल्यासाठी योग्य अशा योजना निवडणे हे जरी काहीसे अवघड असले, तरीही थोडय़ा अभ्यासाने आणि योग्य आर्थिक सल्लागाराला जोडीला घेऊन अगदी सहज शक्य आहे.

– व्यावसायिक तज्ज्ञांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन, तुलनात्मकदृष्टय़ा कमी जोखीम, तरलता आणि पारदर्शकता या घटकांचा फायदा करून घेत तरुण वयातच सुरूकेलेल्या ‘सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान – एसआयपी’मुळे आर्थिक उद्दिष्ट साध्य करणे सोपे झाले आहे.

एसआयपीतून आर्थिक उद्दिष्टपूर्ती

  • एसआयपी आणि इतर शेअर बाजारांच्या गुंतवणुकीमध्ये फरक आहे. कारण एसआयपी ही छोटय़ाछोटय़ा रकमेच्या नियमित बचतीमधून केली जाणारी गुंतवणूक आहे.
  • दीर्घकालीन उद्दिष्टांच्या पूर्तता एसआयपीच्या माध्यमातून सहजपणे साधता येते. कारण एसआयपी शेअर बाजाराच्या चढ-उतारातही आपल्या गुंतवणुकीसाठी अनुकूल परिस्थिती कायम राखते. जसे शेअर बाजारात घसरण होते तेव्हा एसआयपीमध्ये जास्त युनिट्स जमा होत असतात. ज्याचा भविष्यात त्या गुंतवणुकीला फायदा होतो. दीर्घावधीसाठी एसआयपीच्या माध्यमातून खात्रीपूर्वक उत्तम परतावा मिळू शकतो.
  • म्युच्युअल फंडाच्या एसआयपीच्या अनेक योजना उपलब्ध आहेत. आपल्या भविष्याची उद्दिष्टे जसे, मुलांचे शिक्षण, मुलांचे लग्न, निवृत्तीनंतरचे आयुष्य, कर सवलत इ. ठरवून योग्य ती योजना थोडय़ाशा अभ्यासाने आणि जागरुकतेने सहज निवडता येते. आयुष्याच्या उभारणीच्या काळात प्रत्येकाला अल्प रकमेची गुंतवणूक करून देणारा पर्याय हवा असतो आणि त्यामुळे होणारी गुंतवणुकीची लवकर सुरुवात हाच तर एसआयपी गुंतवणुकीतील सर्वात महत्त्वाचा फायदा आहे.
  • पण म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याआधी लक्षात घेण्याच्या काही बाबी- जसे या पर्यायाचे परतावे अनिश्चित असतात, शेअर बाजाराचे चढ-उतार या पर्यायालासुद्धा जोखीम देऊन जातात, गुंतवणूकदाराला नियंत्रण ठेवता येत नाही, योग्य परतावा मिळविण्यासाठी, दीर्घकाळ थांबण्याची तयारी असावी लागते आणि मागील कामगिरीच्या आधारानेच गुंतवणूक करता येते.

आरोग्य विमा : आताचे आयुष्य बघता, नवनवीन जीवनशैली आजारांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन आरोग्य विम्याकडे परत एकदा सकारात्मक बाजूने बघण्याची नितांत गरज आहे. तरुण वयात येणारे आजार किंबहुना कमी असतील. पण त्यामुळे या वयात आरोग्य विम्याचे महत्त्व फारसे जाणवत नाही. पण आता आपले ठरले आहे ना की नंतरचा विचार करायचा.. आणि ते उद्दिष्ट समोर ठेवले की तुमच्या लक्षात येईल की, उतरत्या वयात हे आजारपणाशी निगडित खर्च वाढणार आहेत आणि तेव्हा आपले दरमहा उत्पन्नही थांबलेले असेल, त्या वेळी जमा पुंजीतून दैनंदिन खर्च आणि आजारपणाचे खर्च दोघांचे नियोजन खूपच अवघड होऊन बसेल. इच्छा असूनही त्या वयात आरोग्य विमा घेता येणार नाही किंवा असलेल्या आरोग्य विम्यात वाढ करता येणार नाही म्हणूनच तरुण वयात घ्यावा असा शहाणपणाचा निर्णय म्हणजे जितका जास्त आरोग्य विमा घेणे शक्य असेल तितका तरुण वयातच घ्यावा जेणेकरून या विम्याचे हप्तेही कमी रकमेचे असतील.

भविष्यातील आव्हानात्मक शक्यतांवर आपण नक्कीच मात करू शकतो पण फक्त गरज असते ती जागरूकतेची आणि दूरदृष्टी ठेवून, निवडलेल्या योग्य अशा आरोग्य विम्याच्या योजनेची. आरोग्य विमा निवडताना अभ्यासपूर्वक माहिती करून घेण्याचे काही महत्त्वाचे घटक –

  • देयकासाठी पर्याय
  • विमा संरक्षणास पात्र नसलेले आजार
  • कोणते मूल्य पात्र ठरत नाहीत
  • कालावधी
  • इतर मर्यादा
  • वयाची अधिकतम मर्यादा

निवृत्तीनंतरचा काळ अतिशय शांत असणार आणि आपल्यावर असलेली जबाबदारी म्हणजे त्या शांत काळाला सौख्यपूर्ण बनविण्याची. आणि त्याचे नियोजन करणे शक्य आहे ते तरुणवयापासूनच. अशा तरुण गुंतवणूकदारांनी, निवृत्तीनंतरच्या आर्थिक नियोजनासाठी, स्वत:चे वय लक्षात घेत, अभ्यासपूर्वक स्वत:ची जोखीम स्वीकारण्याचा अंदाज घेऊन, जबाबदाऱ्यांचे भान ठेवत, दीर्घ कालावधीसाठीच्या, जास्त परतावा देणाऱ्या, वाढत्या महागाई दराला मारक ठरणाऱ्या, गुंतवणुकीच्या उद्दिष्टाला समोर ठेवत, भांडवल वृद्धीत मदत करणाऱ्या गुंतवणुकीच्या पर्यायांना प्राधान्य देणे अत्यंत आवश्यक आहे आणि असेच काही पर्याय मांडण्याचा हा प्रयत्न..

दीपाली चांडक

arthasanvad@gmail.com