एचएसबीसी मिड कॅप इक्विटी फंड

मागील एक वर्ष स्मॉल अँड मिड कॅप फंडाच्या परताव्यासाठी अपवादात्मक वर्ष ठरले आहे. स्मॉल अ‍ॅण्ड मिड कॅप फंडांचा मागील तीन वर्षांचा परतावा त्यांच्या फंड घराण्यांच्या लार्ज कॅप किंवा डायव्हर्सिफाइड फंडांच्या तद्नुरूप कालावधीतील परताव्यापेक्षा अधिक आहे. सर्वसाधारणपणे जोखीम मापनाच्या पट्टीकेवरील मध्यम जोखीम ते साहसी प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी मिड कॅप फंडांची शिफारस केली जाते. मागील तीन वर्षांच्या मिड कॅप फंडाच्या परताव्यामुळे जोखीम टाळणारे आणि पारंपरिक प्रकारच्या गुंतवणूक साधनांत गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. या प्रकारच्या गुंतवणूकदारांना मिड कॅप फंडाच्या परताव्याने भुरळ पाडली आहे. सामान्यत: गुंतवणुकीत मिड कॅपचे प्रमाण किती असावे हा म्युच्युअल फंड विक्रेते यांच्यातील नेहमीच मतभेदाचा विषय असतो. फंड विक्रेते गुंतवणूकदारांना बॅलन्स फंड किंवा लार्ज कॅपची शिफारस करतात, तर ‘दंताजींचे ठाणे उठले, फुटले दोन्ही कान’ अशी अवस्था झालेल्या गुंतवणूकदारांनासुद्धा मिड कॅपचा मोह अनावर ठरतो.

ज्यांना तरुणपणात निवृत्तीकोशासाठी तरतूद मिड कॅपच्या माध्यमातून तरतूद करायची आहे, अशा गुंतवणूकदारांसाठी आजची ही शिफारस आहे. या फंडाची पहिली एनएव्ही १९ मे २००५ रोजी जाहीर झाली. या दिवशीच्या ‘रेग्युलर ग्रोथ एनएव्ही’ला १ लाख रुपये गुंतविलेल्या गुंतवणूकदारांचे ३ ऑक्टोबर २०१७ च्या ‘रेग्युलर ग्रोथ एनएव्ही’नुसार ५.४३ लाख झाले असून १२ वर्षांत ४४३.४९ टक्के वृद्धी झाली असून परताव्याचा वार्षिक दर १४.६५ टक्के इतका आहे. ३ ऑक्टोबर २०१६ रोजी या फंडात गुंतविलेल्या १ लाखाचे ३ ऑक्टोबर २०१७ च्या ‘रेग्युलर ग्रोथ एनएव्ही’नुसार १.१८ लाख झाले असून परताव्याचा दर १८.२१ टक्के आहे. फंडाच्या सुरुवातीपासून ग्रोथ पर्यायामध्ये नियोजनबद्ध गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांच्या १.४९ लाख रुपयांचे ३ ऑक्टोबर २०१७ च्या ‘रेग्युलर ग्रोथ एनएव्ही’नुसार ३.९४ लाख रुपये झाले असून परताव्याचा दर १४.७७ टक्के आहे. मिड कॅप हे नि:संशय साहसी गुंतवणूकदारांसाठी आहेत. हा फंडसुद्धा ज्यांची गुंतवणुकीतील जोखीम क्षमता अधिक आहे त्यांच्यासाठी हा फंड आहे. जोखीम स्वीकारून अधिक परतावा मिळविण्याची इच्छा असलेल्या गुंतवणूकदारांसाठी हा फंड आहे. २००५ पासून सुरू झालेल्या या फंडाची ३१ ऑगस्ट २०१७ रोजीची मालमत्ता ४७८ कोटी होती. धीरज सचदेव हे या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. या व्यतिरिक्त एचएसबीसी इन्फ्रास्ट्रक्चर फंडाचे ते निधी व्यवस्थापक आहेत. अन्य मिड कॅप फंडाचा व्यवस्थापन खर्च २.१० ते २.४० टक्के असताना या फंडाचा व्यवस्थापन खर्च २.७५ टक्के असल्याची नोंद गुंतवणूकदारांनी घेणे आवश्यक आहे.

योग्य समभागांची योग्य वेळी केलेली निवड हे फंडाच्या निधी व्यवस्थापकांचे कौशल्य आहे. बाजारात नोंदणी असलेल्या आणि म्युच्युअल फंड गुंतवणुकंीसाठी पुरेशी तरलता असलेल्या समभागांची संख्या ३००० ते ४००० दरम्यान असेल. यापैकी अनेक कंपन्यांच्या बाबतीत गुंतवणूकपूर्व संशोधन विकल्पांपैकी योग्य समभागाचा योग्य प्रमाणात अंतर्भाव केल्यास फंडाच्या गुंतवणुका अन्य स्पर्धकांच्या गुंतवणुकीपेक्षा वेगळ्या असतात आणि परतावाही अधिक असतो. या फंडाच्या गुंतवणुकीत अनेक समभागांचा पहिल्यांदा समावेश झाला. बाजार नेहमीच विक्रीत आणि पर्यायाने नफ्यात वाढ होणाऱ्या कंपन्यांना पसंती देतो. मिड कॅपमधील बहुतांश कंपन्याच्या बाबतीत गुंतवणुकीसाठी आवश्यक असलेली माहिती उपलब्ध माहिती स्रोतांपासून मिळविता येत नाही. अशा कंपन्यांची माहिती मिळविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. या फंडाने बहुतांश उभरत्या कंपन्यांचा फंडाच्या गुंतवणुकीत पहिल्यांदा समावेश केला. मागील चार-पाच वर्षांत केलेल्या गुंतवणुकांनी मागील दोन वर्षांत समभाग गुंतवणुकीला अनुकूल दिवस येताच आपआपली कामगिरी चोख बजावली. मागील तीन वर्षांत सरासरीपेक्षा अधिक वृद्धीदर नोंदविल्यामुळे चोख कामगिरी करणारे म्हणून व्हीएसटी टिलर, इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स, विनाती ऑरगॅनिक्स, दिवाण हाऊसिंग फायनान्स, ऑरोबिंदो फार्मा, कावेरी सीड्स, नवीन फ्लोरिन ही उदाहरणे देता येतील. या फंडात पाच वर्षे नियोजनबद्ध गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांच्या ६० हजारचे १.१४ लाख रुपये झाले असून परताव्याचा वार्षिक दर २६.२३ टक्के आहे. या फंडाच्या गुंतवणुकीत मागील वर्षभरात महिनाअखेर ४४ ते ४६ समभाग आढळून आले. फंडाने गुंतवणुकीत धातू, ग्राहकोपयोगी वस्तू, आर्थिक सेवा, स्थावर मालमत्ता यांना प्राथमिकता दिलेली आहे.

एचएसबीसी मिड कॅप इक्विटी फंड हा मिड कॅप फंड गटातील चांगला परतावा देणारा फंड आहे. या फंड घराण्याच्या धोरणांनुसार हा फंड केवळ बँका व निवडक वितरकांमार्फत विकला जातो. हा फंड सहसा कोणाच्या गुंतवणुकीचा हिस्सा असल्याचे आढळत नाही. भारतातील बहुराष्ट्रीय बँकांच्या मार्फत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीत हा फंड अभावाने दिसतो. अन्य फंड घराण्यांच्या तुलनेत अनोळखी असलेल्या या फंडात गुंतवणूक करण्याची कुणा गुंतवणूकदाराला इच्छा झाल्यास या फंडात गुंतवणुकीसाठी एखाद्या बँकेची सेवा स्वीकारायची किंवा या फंडाच्या डायरेक्ट प्लानमध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय चोखाळायचा. बाजाराची नजीकच्या काळातील वाटचाल चढ-उतारांची असल्याने नजीकच्या काळात एकरकमी गुंतवणुकीपेक्षा एसआयपीच्या माध्यमातून केलेली गुंतवणूक लाभदायक ठरेल. आपापल्या आर्थिक ध्येयांप्रमाणे आणि जोखीम सहन करण्याच्या क्षमतेनुसार या फंडात गुंतवणूक करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी मिड कॅप फंड गटातील हा एक चांगला पर्याय असू शकेल.

वसंत माधव कुलकर्णी

shreeyachebaba@gmail.com