आपले स्वत:चे एक घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. मग ते छोटे का असेना पण आपले असावे. घराच्या किमती गगनाला भिडल्या आहेत आणि घराच्या किमती या वार्षकि उत्पन्नापेक्षा सध्या किती तरी पटीत अधिक आहेत. याला पर्याय म्हणजे घर भाडय़ाने घेणे, परंतु घर भाडय़ाने घेतले तर दरमहा भाडे द्यावे लागते. शिवाय घरमालक दोन किंवा तीन वर्षांपेक्षा एकाच भाडेकरूला ते घर जास्त काळासाठी भाडय़ाने देत नाही. म्हणजे त्यानंतर दुसरे घर भाडय़ाने बघणे आले. जोपर्यंत नोकरीधंदा आहे तोपर्यंत भाडे भरणे जड जात नाही. परंतु निवृत्त झाल्यानंतर काय? यासाठी स्वत:चे घर घेणे हे दीर्घकालीन दृष्टीने फायदेशीरच आहे. स्वत:चे घर घेण्यासाठी सरकारने खूप योजना राबविल्या आहेत. सर्वसामान्यांना स्वस्त दरात घरे पुरविण्यासाठी गृह विकास आणि प्राधिकरणांची स्थापना केली आहे. गृहकर्ज स्वस्त दरात उपलब्ध आहे. प्राप्तिकर कायद्यात घरासंबंधी अनेक सवलती दिल्या आहेत. घर हे वयाच्या ५० वर्षांपर्यंतच्या कालावधीत घेतले तर चांगले. कारण त्यानंतर गृहकर्ज मिळणे कठीण असते. त्यामुळे गृहकर्ज घेऊन घर विकत घेणे हे घरभाडे देण्यापेक्षा फायदेशीर आहे. निवृत्तीनंतर उत्पन्नाचे साधन नसले तर फएश्एफरए टडफळॅअ‍ॅए करूनही उत्पन्न मिळू शकते. प्राप्तिकर कायद्यात घरासंबंधी काय तरतुदी आहेत ते या लेखात पाहू या :
गृहकर्जाची मुद्दल परतफेड :
१.    प्राप्तिकराच्या कलम ८० सीद्वारे मुद्दल रकमेच्या परतफेडीची उत्पन्नातून वजावट मिळू शकते. ही वजावट वार्षिक १.५० लाख रुपयांपर्यंत (मागील वर्षांपर्यंत एक लाख रुपये) मिळू शकते.
२.     हे कर्ज केंद्र किंवा राज्य सरकार, बँक, भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी), नॅशनल हाऊसिंग बँक (एनएचबी), गृहकर्ज देणाऱ्या सार्वजनिक कंपन्या, सहकारी संस्था किंवा मालकाकडून (जेथे करदाता नोकरी करतो), जर मालक सार्वजनिक कंपनी, विद्यापीठ, महाविद्यालय किंवा स्थानिक संस्था असेल आणि यांच्याकडून घेतले असले पाहिजे.
३.    याव्यतिरिक्त व्यक्तींकडून घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीवर (उदा. नातेवाईक, मित्र, इत्यादी) ही वजावट मिळत नाही.
४.    घर घेण्यासाठी भरलेले मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क किंवा इतर खर्च याचीसुद्धा वजावट मिळते.
५.    ही वजावट घेण्यासाठी घराचा ताबा असणे गरजेचे आहे.
६.    सहकारी संस्थेला भरलेले प्रवेश शुल्क, सहकारी संस्थेचे भागभांडवल, सभासद होण्यासाठी भरलेले मूल्य याची वजावट मिळत नाही.
कर्जावरील व्याज :
१.     प्राप्तिकर कायद्याच्या कलम २४ प्रमाणे गृहकर्जावरील व्याजावर उत्पन्नातून वार्षिक २ लाख रुपयांपर्यंतची सूट मिळते. (ही सूट गेल्या वर्षांपर्यंत १.५० रुपये होती). ही मर्यादा स्वत:च्या एका घरासाठी आहे, ज्याचे घरावरील घरभाडे उत्पन्न शून्य आहे. दुसऱ्या घराचे घरभाडे उत्पन्न करपात्र उत्पन्नात दाखवावे लागते (जरी घर भाडय़ाने दिले नसले तरी) त्यांच्यासाठी ही मर्यादा लागू नाही. ही मर्यादा जर घर कर्ज घेऊन १ एप्रिल १९९९ नंतर घेतले किंवा बांधले असेल आणि तीन वर्षांच्या आत घर घेणे किंवा बांधणे पूर्ण झाले असेल (ज्या आíथक वर्षांत कर्ज घेतले आहे त्या वर्षांपासून) तरच वरील मर्यादा लागू आहे.  अन्यथा ही मर्यादा ३०,००० रुपये आहे.   
२.     घर संयुक्त नावाने असेल तर प्रत्येकाला त्याच्या हिश्शाप्रमाणे वजावट मिळते आणि प्रत्येकासाठी ही २ लाख रुपयांची मर्यादा लागू होते. उदा. पती आणि पत्नीने संयुक्त नावाने घर विकत घेतले आणि त्यांचा हिस्सा प्रत्येकी ५०% आहे आणि कर्जावरील व्याज हे वार्षिक ५ लाख रुपये आहे, तर दोघेही २ लाखांपर्यंत व्याजाची वजावट घेऊ शकतात.
३.     या कलमाप्रमाणे वजावट घेण्यासाठी घराचा ताबा घेणे गरजेचे असते. घराचा ताबा घेण्यापूर्वी भरलेल्या व्याजाची वजावट ही घराचा ताबा घेतल्यानंतर किंवा घर बांधून पूर्ण झाल्यावर, ज्या वर्षांत घराचा ताबा घेतला त्या वर्षांपासून पुढील पाच वर्षांत समान विभागून घेता येते. परंतु ही १/५ रक्कम आणि त्या वर्षांचे व्याज या दोन्हींसाठी वरील २ लाखाची किंवा ३० हजारची मर्यादा आहे.
४.     ही वजावट देय व्याजावर आहे. प्रत्यक्ष व्याज त्या वर्षांत दिले असलेच पाहिजे असे नाही.
५.     घर घेण्यासाठी कर्ज परदेशातील व्यक्तीकडून घेतले असेल, तर त्या कर्जाच्या व्याजावरील वजावटदेखील मिळते, परंतु त्यावर प्राप्तिकर कायद्याप्रमाणे उद्गम कर (टीडीएस) कापून भरला असला पाहिजे आणि परदेशातील व्यक्तीचा भारतात प्रतिनिधी (कलम १६३ प्रमाणे) असू नये.
६.     या कलमाद्वारे वजावट फक्त घरमालकालाच मिळते. उदा. जर पतीने घराचा हप्ता भरला आणि घर पत्नीच्या नावाने असेल, तर त्याची वजावट पतीला मिळत नाही.
७.     मित्र किंवा नातेवाईकांकडून कर्ज घेतले आणि त्यांना व्याज दिले तरी या कलमाप्रमाणे वजावट मिळू शकते, परंतु अशा कर्जाच्या मुद्दल परतफेडीची वजावट कलम ८० सी अंतर्गत मिळू शकत नाही.
८.     एक गृहकर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज घेतले तर त्यावरील व्याजासाठीदेखील सूट मिळते. परंतु याचा दाखला प्राप्तिकर अधिकाऱ्याला द्यावा लागू शकतो.
९.     गृहकर्जाचा हप्ता वेळेवर भरला नाही आणि त्यावर बँकेला अतिरिक्त व्याज दिले तर त्याची सूट मिळत नाही.  
१०. या कलमाप्रमाणे वजावट घेण्यासाठी व्याज भरल्याचे प्रमाणपत्र घेणे गरजेचे आहे.
११. घर दुरुस्तीसाठी कर्ज घेतले असले, तरी त्या कर्जावरील व्याजावर या कलमाप्रमाणे वजावट मिळू शकते. या व्याजाची मर्यादा ३०,००० रुपये आहे. एकूण दिलेले व्याज वर दर्शविलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असू शकत नाही. परंतु अशा कर्जाच्या मुद्दल परतफेडीची वजावट कलम ८० सी अंतर्गत मिळू शकत नाही.
करपात्र उत्पन्न :
यामध्ये इमारत आणि त्या संबंधित जमीन याच्या भाडय़ाचे उत्पन्न घरभाडे उत्पन्नात गणले जाते. यामध्ये खालील गोष्टी महत्त्वाच्या आहेत :
१.    इमारत आणि त्या संबंधित जागेचे भाडे असले पाहिजे. इमारतींमध्ये सर्व प्रकारच्या इमारतींचा समावेश होतो. जसे – राहते घर, कार्यालय, दुकान, गोदाम इत्यादी. एखादी इमारत आणि त्या भोवतालची जमीन भाडय़ाने दिली असेल, तर ते घरभाडे उत्पन्न धरले जाते. फक्त जमीन भाडय़ाने दिली असेल तर त्याचे उत्पन्न घरभाडे उत्पन्नात गणले जात नाही. ते धंद्यातील उत्पन्न (जर धंदा असेल तर) किंवा इतर उत्पन्नात गणले जाते.
२.     या प्रकारामध्ये उत्पन्न फक्त इमारतीचे मालकच दाखवू शकतात. उदा. घर पतीच्या नावाने असेल, तर त्या घरावर मिळणारे भाडे हे पत्नीच्या नावाने उत्पन्न म्हणून दाखविता येत नाही. इमारतीच्या मालकीमध्ये पूर्ण मालकी (फ्री होल्ड), लीज होल्ड आणि डीम्ड मालकांचा समावेश आहे. डीम्ड मालक म्हणजे घर पती किंवा पत्नीच्या किंवा अजाण मुलांच्या नावाने अपुऱ्या आíथक मोबदल्याने हस्तांतरित केले असेल तर हस्तांतरित करणाराच या कलमासाठी मालक असतो. सहकारी गृहसंस्थेचे सभासद ज्यांना घर दिले आहे आणि ज्यांनी मालमत्ता मुखत्यारपत्राने मिळवली असेल (ट्रान्स्फर ऑफ प्रॉपर्टी कायदा कलम ५३अ प्रमाणे) ते या कलमासाठी मालक असतील.       
३.     इमारतीचा वापर हा कोणत्याही कारणासाठी होत असेल, तरी ते घरभाडे उत्पन्न गणले जाते. फक्त स्वत:चा धंदा किंवा व्यवसायासाठी जागा वापरत असेल तर त्या जागेचे उत्पन्न करपात्र उत्पन्नात गणले जात नाही.
४.     इमारत आणि त्याबरोबर फíनचर, यंत्र किंवा इतर सामान भाडय़ाने दिले असेल आणि हे इतर सामान इमारतीपासून वेगळे करता येत असेल तर इमारतीचे भाडे हे घरभाडे उत्पन्नात गणले जाते आणि फíनचर, यंत्र किंवा इतर सामान यांचे भाडे हे धंद्यातील उत्पन्न (जर धंदा असेल तर) किंवा इतर उत्पन्नात गणले जाते. आणि जर असे वेगळे करता येत नसेल तर ते धंद्यातील उत्पन्न (जर धंदा असेल तर) किंवा इतर उत्पन्नात गणले जाते. उदा. चित्रपटगृह हे खुच्र्या आणि इतर सामानाशिवाय वापरता येत नाही आणि वेगळे करता येत नाही म्हणून चित्रपटगृहाच्या भाडय़ाचे उत्पन्न हे धंद्यातील उत्पन्नात गणले जाते.  
५.     घरभाडे उत्पन्नाचे करपात्र उत्पन्न ठरवताना नगरपालिकेने ठरविलेले मूल्य, त्या भागातील जागेचे वाजवी मूल्य आणि जर भाडेकरू भाडेनियंत्रण कायद्यांतर्गत असेल तर ते आदर्श भाडे विचारात घ्यावे लागते. करपात्र उत्पन्न ठरवताना नगरपालिकेने ठरविलेले मूल्य, त्या भागातील जागेचे वाजवी मूल्य यापकी जे जास्त असेल ते घरभाडे उत्पन्न म्हणून गणले जाते; परंतु हे आदर्श भाडय़ापेक्षा जास्त असू शकत नाही.    
६.     एकच राहते घर असेल तर घरभाडे उत्पन्न शून्य असते. एकापेक्षा जास्त घरे असतील तर कोणतेही एक घर राहते दाखवून बाकी घरांचे घरभाडे उत्पन्न दाखवावे लागते, जरी ते घर भाडय़ाने दिले नसले तरी.  
७.     जागा भाडय़ाने दिली नसेल तर वरीलप्रमाणे भाडे करपात्र आहे. आणि जर जागा भाडय़ाने दिली असेल तर प्रत्यक्ष मिळालेले भाडेसुद्धा विचारात घ्यावे लागते.
पुढील भागात घराविषयीच्या इतर तरतुदींची माहिती घेऊ.
लेखक सनदी लेखाकार आहेत.
jpjassociates@rediffmail.com

Devendra Fadnavis, Ajit Pawar & Eknath Shinde Astrology
शिंदे, पवार, फडणवीसांना ‘या’ अंकाचा धागा ठेवतो जोडून; २०२४ मध्ये मात्र येईल ‘हा’ अडथळा, ज्योतिषी काय सांगतात?
in Relationships Your self-esteem is in your hands
नातेसंबंध : आपला आत्मसन्मान आपल्या हाती!
decision to create an independent family is right or wrong
स्वतंत्र संसार थाटण्याचा निर्णय : समंजस की असमंजस?
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र