जसजशी प्राप्तिकर विवरण पत्र (रिटर्न) भरण्याची वेळ जवळ येऊ लागते तसतशी सर्वाना त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जमवाजमव करण्याची घाई होते. बरेच जण प्राप्तिकर  विवरण पत्र हे सनदी लेखाकार किंवा कर सल्लागाराकडून भरून घेतात. यासाठी लागणारी कागदपत्रे त्यांना वेळेवर देणे गरजेचे असते जर ही कागदपत्रे संपूर्णपणे किंवा वेळेवर दिली नाहीत तर विवरण पत्र वेळेवर दाखल होऊ शकणार नाही किंवा त्यामध्ये काही त्रुटी राहू शकतात.  विवरण पत्रात चुकीची किंवा अपुरी माहिती दिल्यास दंडाची तरतूद प्राप्तिकर  कायद्यात आहे.
ज्या वैयक्तिक करदात्याचे उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे अशांना विवरण पत्र संगणकाद्वारे ऑनलाइन दाखल करणे मागील वर्षांपासून बंधनकारक करण्यात आले होते. या वर्षी यात भर टाकून ज्या करदात्यांनी कर परताव्याचा दावा (REFUND) केला आहे अशांनीही विवरण पत्र संगणकाद्वारे दाखल करणे बंधनकारक आहे. विवरण पत्रासोबत कोणतेही कागदपत्र जोडण्याची गरज नसते. परंतु जर आपले विवरण पत्र पडताळणीसाठी (SCRUTINY) निवडले गेले तर ही कागदपत्र आपणाला प्राप्तिकर  अधिकाऱ्याला सादर करावी लागतात. यामुळे  विवरण पत्र भरण्यापूर्वी खालील कागदपत्रे जमा करून त्या आधारे करपात्र उत्पन्न, करमुक्त उत्पन्न, त्यावर लागणारा कर, उद्गम कर, देय कर किंवा कर परतावा याची गणना केली तर ती अचूक होईल.    
पर्मनंट अकाऊण्ट नंबर (पॅन):
विवरण पत्र भरण्याच्या प्रक्रियेत पहिले पाऊल म्हणजे पर्मनंट अकाऊण्ट नंबर (पॅन) होय. हा नंबर असल्याशिवाय विवरण पत्र दाखल करता येत नाही. विवरण पत्र संगणकाद्वारे भरावयाचे असल्यास प्राप्तिकर  खात्याच्या https://incometaxindiaefiling.gov.in/ या संकेतस्थळावर आपला पॅन आणि इतर माहिती भरून नोंदणी करावी लागते. भ्रमणध्वनी क्रमांक आणि ई-मेल देणेही गरजेचे असते. ही नोंदणी फक्त एकदाच करावी लागते. या पूर्वी जर नोंदणी केली असेल तर संकेत-शब्द (पासवर्ड) तयार ठेवावा.   
 फॉर्म १६ :
पगारदार करदात्यांना मालकाकडून फॉर्म १६ मिळतो. यामध्ये करपात्र पगार, करमुक्त उत्पन्न, भत्ते, सवलती, देय कर, उद्गम कर, इत्यादी संबधी माहिती असते. मालकाने उद्गम कराचे विवरण पत्र (टीडीएस) भरल्यानंतर फॉर्म १६ करदात्याला मिळतो. या आधी मालकाला उद्गम कर भरावा लागतो. यामधील माहिती तपासून बघावी आणि काही त्रुटी असल्यास त्वरित मालकाच्या निदर्शनास आणून द्याव्या. मालकाला आपला अचूक पॅन देणे गरजेचे असते. जर पॅन चुकीचा गेला तर उद्गम कर हा आपल्या पॅनवर जमा होणार नाही. या फॉर्म १६ च्या आधारे पगाराच्या उत्पन्नाविषयी आणि उद्गम कराविषयी माहिती विवरण पत्रात भरावी. मालकाने फॉर्म १६ मध्ये दर्शविलेल्या सवलतींव्यतिरिक्त जर काही सवलती किंवा गंतवणूक केली असेल तर कर परताव्याचा दावा विवरण पत्र भरून करता येतो.   
 फॉर्म १६ अ आणि फॉर्म १६ ब
पगाराव्यतिरिक्त उद्गम करासाठी फॉर्म १६ अ  दिला जातो. यामध्ये व्याज, दलाली, व्यावसायिक उत्पन्न, घरभाडे  वगैरे उत्पन्नावर भरलेल्या उद्गम कराचा समावेश आहे. जर करदात्याला पगाराव्यतिरिक्त उत्पन्न असेल आणि त्यावर उद्गम कर कापला असेल तर करदात्याने फॉर्म १६ अ ची मागणी उद्गम कर कापणाऱ्याकडे   करावी. हा फॉर्म कर कापणाऱ्याला ३१ मे पर्यंत द्यावा लागतो. असे सर्व फॉर्म १६ अ, विवरण पत्र भरण्यापूर्वी गोळा करावे. ५० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीची स्थावर संपत्ती (घर वगरे) विक्रीवर १% उद्गम कराची तरतूद मागील वर्षांपासून करणात आली आहे. त्याचे प्रमाणपत्र फॉर्म १६ ब मध्ये खरीददाराला द्यावे लागते. अशी विक्री आपण केली असेल तर खरीददाराकडून फॉर्म १६ ब घेणे गरजेचे आहे. या फॉर्म १६ अ आणि फॉर्म १६ ब मधील माहिती विवरण पत्रात भरावी लागते.
 फॉर्म २६ एएस :         
आपला कापला गेलेला उद्गम कर हा फॉर्म २६ एएसमध्ये दर्शविला गेला आहे, याची वेळोवेळी खातरजमा करण्यास प्राप्तिकर खाते करदात्यांना सांगते. उद्गम कर कापणाऱ्याने कर भरला आणि त्याचे विवरण पत्र भरले तर तो व्यवहार फॉर्म २६ एएसमध्ये दिसतो. जर एखाद्या व्यवहारामध्ये उद्गम कर कापला असेल आणि तो २६ एएसमध्ये दिसत नसेल तर उद्गम कर कापणाऱ्याशी संपर्क करावा. याचे कारण असे असू शकते की त्याने कर कापून सरकारी खात्यात जमा केला नसेल किंवा उद्गम कराचे विवरण पत्र भरले नसेल किंवा तुमचा पॅन चुकीचा टाकला असेल. याची दुरुस्ती केल्यावरच उद्गम कराची रक्कम फॉर्म २६ एएसमध्ये दिसेल. जो पर्यंत फॉर्म २६ एएसमध्ये उद्गम कराची रक्कम दिसत नाही तो पर्यंत तो कर तुमच्या वतीने भरला असे समजले जात नाही. या व्यतिरिक्त फॉर्म २६ एएसमध्ये अग्रिम कर, मोठ्या रकमेचे     व्यवहार, कर परतावा इत्यादी माहिती असतो.
 गुंतवणुकीचा दाखला :
कलम ८०सी प्रमाणे गुंतवणूक केली असेल तर त्याची रक्कम विवरण पत्रात दाखवावी लागते. विमा पावत्या, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) चे खाते पुस्तक, शैक्षणिक शुल्क पावत्या, गृह कर्जावरील मुद्दल रकमेच्या परतफेडीचे प्रमाणपत्र, इत्यादी तयार ठेवावे.  
 देणगी पावती :
कलम ८० जी नुसार जर सवलत घ्यावयाची असेल तर त्याची पावती आणि त्यावर त्या संस्थेचा पॅन, पत्ता आणि  कलम ८०जीचे प्रमाणपत्र किंवा फाईल क्रमांक असणे गरजेचे आहे. ही माहिती विवरण पत्रात भरावी लागते. पावतीवर पॅन आणि पत्ता असल्याशिवाय सवलत घेता येत नाही. काही देणग्यांवर १००% वजावट मिळते आणि काही देणग्यांवर ५०% इतकी सवलत मिळते.
 बँक खाते क्रमांक :
आता बँक खाते क्रमांक आणि आयएफएससी कोड विवरण पत्रात सादर करणे गरजेचे आहे. आता कर परताव्याच्या (रिफंड) धनादेशावर करदात्याचा खाते क्रमांक असतो. हा धनादेश त्याच खात्यात वटूू शकतो. जर खाते क्रमांक चुकीचा टाकला किंवा ते बँक खाते बंद केले तर कर परताव्याच्या धनादेश वटू शकणार नाही आणि परतावा मिळण्यास विलंब लागेल. हे बँक खाते बदलण्याची सुविधा प्राप्तिकर खात्याच्या संकेत स्थळावर आहे.
 व्याजाचे प्रमाणपत्र :
बँकेतील व अन्य ठेवींवर मिळणारे व्याजाचे प्रमाणपत्र घेणे गरजेचे आहे. या प्रमाणपत्रामध्ये असलेले व्याज विवरण पत्रात दाखवावे. मुदत ठेव जर संचयी (CUMULATIVE) असेल तर त्यावरील व्याज हे मुदतीनंतर मिळते त्यामुळे त्या आíथक वर्षांत जमा झालेले व्याज हे या प्रमाणपत्राद्वारे समजते. आता सर्व बँका संगणकीकृत झाल्यामुळे सर्व प्रकारच्या व्याजाचे एकच प्रमाणपत्र मिळते. यामध्ये मुदत ठेव, आवर्ती ठेव, बचत खाते इत्यादींवर मिळणाऱ्या व्याजाचा समावेश होतो.  
 गृहकर्ज फेड प्रमाणपत्र:
प्राप्तिकर कायद्याप्रमाणे गृहकर्जावरील व्याजाची वजावट घ्यावयाची असेल तर त्याचे प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. या प्रमाणपत्रात ज्या घरावर कर्ज दिले आहे त्याचा पत्ता, एकूण भरलेली रक्कम, व्याज, मुद्दल आणि शिल्लक रक्कम इत्यादी दर्शविण्यात येते. गृह कर्जावर दर महा रक्कम (EMI) भरत असल्यामुळे त्या रकमेतील व्याज आणि मुद्दल याचे विभाजन या प्रमाणपत्राद्वारे समजते. व्याज आणि मुद्दल यांची अनुक्रमे कलम २४ आणि ८०सी नुसार वजावट घेता येते. ही वजावट घेण्यापूर्वी घराचा ताबा घेतला आहे याची खात्री करावी.
 ब्रोकर्स नोट :    
जर करदात्याने शेअर्स किंवा मुच्युअल फंडात गुंतवणूक केली असेल तर त्यावर होणारा नफा किंवा तोटय़ाची या ब्रोकर्स नोटमध्ये दर्शविलेल्या रकमेप्रमाणे गणना करावी. यामध्ये शेअर उलाढाल कर (STT) ची वजावट घेता येत नाही. हा STT या ब्रोकर्स नोटमध्ये दर्शविलेला असतो. शेअर्स किंवा म्युचुअल फंडावरील विक्रीवरील नफा किंवा तोटा हा लघू आणि दीर्घ मुदतीमध्ये विभागून दाखवावा. दीर्घ मुदतीचा नफा जरी करमुक्त असला तरी तो विवरण पत्रात सादर करावा लागतो.
 घर भाडे उत्पन्न :    
जर एकापेक्षा जास्त घरे असतील तर ज्या घरांवरील उत्पन्न (मिळालेले वा गृहीत) करपात्र असेल त्याचे भाडे, त्यावर भरलेल्या मालमत्ता कराच्या पावत्या तयार ठेवाव्या. घरभाडे उत्पन्न ठरविण्यासाठी याचा उपयोग होतो.
 इतर उत्पन्नाचे दाखले :    
घर, जमीन, सोने, इत्यादी विक्री जर केली असेल तर त्याचे करार किंवा पावत्या (विक्रीची आणि खरेदीचीही) तयार ठेवाव्या जेणेकरून त्यावर होणारा भांडवली नफा आणि त्यावर लागणारा कर हा अचूकपणे निश्चित करता येईल. जर भेटी मिळाल्या असतील तर त्याचा तपशील तयार ठेवावा.
 करमुक्त उत्पन्न :    
काही उत्पन्न हे करमुक्त असले तरी विवरणपत्रात दाखवावे लागते. या मध्ये पीपीएफवरील व्याज, शेअर्स किंवा म्युचुअल फंडावरील वरील लाभांश, दीर्घ मुदतीचा नफ्याचा समावेश होतो.
 कर भरल्याची पावती :    
या वर्षांत भरलेल्या कराच्या पावत्यावरील चलन नंबर, बँकेचा कोड, तारीख, इत्यादी माहिती विवरण पत्रात भरावी लागते.
वरील माहिती गोळा करून तयार ठेवल्यास विवरण पत्र भरण्यासाठी लागणारा वेळ वाचेल आणि विवरण पत्रात अचूक माहिती सादर करता येईल.