पोलारिस ही सॉफ्टवेअर (माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील) निर्मितीतील बऱ्यापैकी मोठी कंपनी असली तरीही तिला इन्फोसिस, विप्रो किंवा टीसीएससारखे गुंतवणूकदार आणि शेअर बाजाराचे वलय नाही. खरे तर जागतिक स्तरावर पोलारिस ही बँकिंग, इन्शुरन्स, वित्तीय सेवा क्षेत्रातील एक आघाडीची कंपनी आहे. गेल्या २५ वर्षांत कंपनीने गुणवत्तेच्या जोरावर अनेक पेटेण्ट मिळवली असून त्यापकीच एक ‘ग्लोबल युनिव्हर्सल बँकिंग (ॅवइ) एम १८०’ हे अनेक बँकांतून वापरले जाते. सध्या जगातील १० पकी ९ जागतिक बँकांमध्ये आणि १० पकी ७ इन्शुरन्स कंपन्यांमध्ये पोलारिस त्यांचा सेवा भागीदार म्हणून कार्यरत आहे.
काही दिवसांपूर्वी कंपनीने आपल्या व्यवसायातील उत्पादनांचे दोन भाग करायचे ठरवले असून, त्यापकी एक व्यवसाय ‘इंटेलेक्ट डिझाइन अरेना लिमिटेड’ या नावाने चालवला जाईल. यासाठी अर्थातच सेबी आणि भागधारकांची परवानगी आवश्यक असून त्याकरिता कंपनी पावले उचलत आहे. या ‘डीमर्जर’ योजनेप्रमाणे पोलारिसच्या सध्याच्या भागधारकांना प्रत्येक शेअरमागे एक शेअर इंटेलेक्टचा मिळेल. तसेच ज्या भागधारकांना हे शेअर्स नको असतील, त्यांना त्या बदल्यात ४२ रुपयांचा अपरिवर्तनीय रोखा मिळेल. या रोख्यांवर ७.७५% वार्षकि दराने व्याज मिळणार असून ९० दिवसांत त्यांची कंपनीमार्फत परतफेड केली जाणार आहे.
थोडक्यात, प्रत्येक शेअरमागे किमान ४३ रुपये मिळण्याची सोय कंपनीने केली आहे. नव्याने स्थापन करण्यात येणारी ‘इंटेलेक्ट डिझाइन अरेना लिमिटेड’ हीदेखील शेअर बाजारावर नोंदली जाणार असून अशा प्रकारची ही पहिलीच कंपनी असेल.