दोन दशकांपूर्वी भारतीय म्युच्युअल फंड उद्योगात खासगी क्षेत्राला कवाडे खुली झाली. बहुअंगी व्यवसाय असलेल्या आदित्य बिर्ला उद्योग घराण्यानेही त्याचवेळी यात शिरकाव केला. अधिकतर समभाग बाजाराशी संबंध येणाऱ्या योजना, गुंतav08वणूक असणाऱ्या फंड घराण्यासाठी सध्या निर्देशांकांच्या विक्रमाची मुशाफिरी सुरू असणे हर्षांचेच ठरेल. फेब्रुवारीअखेरीस सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे डोळे लागले असताना त्यात म्युच्युअल फंड उद्योगाच्या भविष्याबाबत बिर्ला सन लाईफ असेट मॅनेजमेंट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए. बालसुब्रमण्यन यांच्या आशा-अपेक्षांचा हा प्रश्नोत्तराच्या रुपात घेतलेला हा वेध..

सध्या अर्थव्यवस्थेत कमालीच्या उत्साहाचे वातावरण आहे. त्याचे निर्देशक सेन्सेक्स, निफ्टी मानले तर तेही सध्या ऐतिहासिक टप्प्यावर आहेत. काय निमित्त आहे या साऱ्याचे?
सप्टेंबर २०१४ पासून भांडवली बाजाराचा सुरू झालेला तेजीवरील प्रवास २०१५ च्या सुरुवातीपासून अधिकच बहरला आहे. आपल्या अर्थव्यवस्थेला बळकटी आणण्याचे चित्र त्यात दिसले आहे. म्युच्युअल फंड उद्योगाबाबतच म्हणायचे झाल्यास एकूण उत्साहपूर्ण वातावरणाप्रमाणे येथेही तिच स्थिती आहे. त्यातच सध्या तीन ते चार नवे फंड आले आहेत.  अर्थव्यवस्थे संदर्भात, महागाई कमी होताना दिसत आहे. गुंतवणूकही वाढत आहे. त्याचे पोषक वातावरण प्रत्यक्षातील परिणामही लवकरच दिसून येतील. देशातील औद्योगिक उत्पादनाच्या वाढत्या रुपात ते अधिक स्पष्ट होईल.
अशा स्थितीत गुंतवणूकदारांची नजर कशावर हवी? कोणत्या क्षेत्राला प्राधान्य द्यावे, असे तुम्हाला वाटते?
भांडवली बाजाराच्या दृष्टिने क्षेत्रनिहाय बोलायचे झाल्यासच बँक, वाहन, ग्राहकपयोगी वस्तू, औषधनिर्मिती समभागांना येणाऱ्या कालावधीत मूल्य उठाव असेल. महागाई कमी होऊन व्याजदर कमी होतील. तेव्हा त्याच्याशी निगडित समभागांना मागणी असेल. एकूण म्युच्युअल फंड उद्योगासाठीही येणारी तीन ते पाच वर्षे अधिक परताव्याची असतील, यात शंका नाही.
आधीच्या नजीकच्या कालावधीतील परतावा दुहेरी आकडय़ातील राहिला आहे. गुंतवणूकदारांनीही पुढील तीन ते पाच वर्षांच्या गुंतवणुकीचे लक्ष्य म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करताना ठेवावे. सरकारप्रमाणे आपणही गुंतवणूकदार म्हणून २०२० (ट्वेन्टी ट्वेन्टी) चे लक्ष्य ठेवावयास हरकत नाही!
म्युच्युअल फंड उद्योगात सध्या ताबा आणि विलिनीकरणाच्या व्यवहारांची संख्या वाढली आहे. आयएनजीच्या रुपात बिर्ला सन लाईफचा तसेच कोटक महिंद्रचा पाईनब्रिज फंड खरेदी नुकतीच झाली आहे. सध्या यूटीआय, एलआयसी नोमुराचीही चर्चा सुरू आहे. तुम्हाला याबाबत कुठे संधी दिसते का?
आयएनजीच्या सर्व योजना ताब्यात घेण्याचा व्यवहार गेल्या वर्षांच्या मध्यालाच झाला. त्याची प्रक्रियाही आता पूर्ण झाली आहे. यामाध्यमातून १,१०० कोटींच्या मालमत्ता व्यवस्थापनाचे अधिकार आम्हाला मिळाले. तिच्या ७५ हजारांहून अधिक गुंतवणूकदारांच्या जोरावर कंपनीला भारतीय फंड क्षेत्रातील एक लाख मालमत्ता व्यवस्थापनाचा मानही मिळाला. शिवाय या क्षेत्रातील आघाडीचे चौथे स्थानही प्राप्त झाले. तूर्त आम्ही कोणत्याही ताबा अथवा विलिनीकरणाच्या प्रक्रियेत नाहीत. मात्र भविष्यात संधी असेल तर ती निश्चितच नाकारणार नाही.
आर्थिक समाप्तीनजीक आली आहे. तेव्हा आता उर्वरित कालावधीत नव्या योजना सादर करण्यासारखे काही नाही, असे आहे काय?
नाही. तूर्त आम्ही विद्यमान योजना कायम ठेवून त्यावर अधिक लक्ष केंद्रीत करत आहोत. विद्यमान अर्थवर्ष संपण्यापूर्वी एक फंड बाजारात आणण्याचा आमचा विचार आहे. त्याबाबत आताच अधिक काही सांगता येणार नाही. मात्र तो यापूर्वीचे आमचेच सर्व आडाखे मागे टाकेल, एवढे निश्चितच. नवा फंड येणाऱ्या गटात आम्हाला २००८ मध्ये सादर केलेल्या योजनेच्या अभूतपूर्व प्रतिसादापेक्षाही अधिकची अपेक्षा आहे.
देशातील खासगी फंड व्यवसायाप्रमाणेच बिर्ला सन लाईफमध्येही तुम्ही गेल्या दोन दशकांपासून आहात. तुमच्या नजरेत फंड व्यवसायाचा इतिहास कसा राहिला आहे?
पहिल्या दशकाबाबत फार काही विशेष असे सांगता येणार नाही. मात्र गेल्या दहा वर्षांत खूपच घडामोडी घडल्या. म्युच्युअल फंड उद्योग आणि भांडवली बाजार व गुंतवणुकीबाबतही. अगदी ताजेच घ्यायचे झाले तर या क्षेत्रासाठीची सेबीची नियमावली.
..ती या एकूणच व्यवसायाठी कठोर ठरली का?
कठोर नाही मात्र या व्यवसायात त्यामुळे अधिक पारदर्शकता आली असे नक्कीच म्हणता येईल. या व्यवसायासाठी धोरणे आखली गेली. यातून गुंतवणूकदारांचे संरक्षण हाच मुख्य हेतू होता.
तर या फंड व्यवसायाने २००८ पर्यंत फारशी हालचाल नोंदविली नाही. त्यानंतर त्याचा प्रवास उल्लेखनीय राहिला. येत्या पाच वर्षांत तर एकूण म्युच्युअल फंड व्यवसायातील मालमत्ता व्यवस्थापन हे २० कोटी रुपयांचे होईल. येत्या तीन ते चार वर्षांत त्याचा प्रवास अधिक वेगाने होईल.
म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक वाढली पाहिजे. प्रत्यक्ष गुंतवणूकदारांचा सहभाग वाढला पाहिजे. अधिक परताव्यासाठी चिटफंडसारख्या मार्गाकडे वळण्यापेक्षा दीर्घकालीन परतावा देणाऱ्या योजनांकडे का वळू नये?