एलआयसी नोमुरा मिडकॅप फंड

आजचे मिडकॅप हे उद्याचे बहुप्रसवा (मल्टिबॅगर) जरी असले तरी एखादी चुकीची गुंतवणूक किंवा योग्य मूल्यांकन नसताना केलेली खरेदी परतावा नकारात्मक देऊ शकते. म्हणूनच नुसता परतावा हा निकष न ठेवता, प्रमाणित विचलन, शार्प रेशो यांचा विचार करणे गरजेचे आहे. या कसोटय़ांच्या आधारे सारासार विचार करता, हा फंड गुंतवणुकीसाठी नक्कीच उजवा ठरतो..

एप्रिल १, २०१६ रोजी सीएनएक्स मिडकॅप फंडाचा मागील एका वर्षांतील परताव्याचा दर -१.९% होता. दोन वर्षांच्या परताव्याचा दर ४८.१०% तर तीन वष्रे परताव्याचा दर ७०.३०% होता. याच दिवशी लार्ज कॅप निर्देशांक ‘निफ्टी’चा एका वर्षांच्या परताव्याचा दर -८.९०%, दोन वष्रे परताव्याचा दर १५.४०% तर तीन वष्रे परताव्याचा दर ३५.७०% होता. सामान्यत: मिडकॅप फंड हे गुंतवणुकीस जरी धोकादायक समजले गेले तरी मिडकॅप फंडातून दीर्घकालीन ‘सिप’ परताव्याचा दर हा लार्जकॅप गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडांपेक्षा अधिक असतो. हे जरी खरी असले तरी गुंतवणुकीसाठी योग्य फंडाची निवड करणे हे तितकेच महत्त्वाचे असल्याने मागील महिन्यात एक वर्ष पूर्ण केलेल्या या फंडाची पाच वर्षांहून अधिक कालावधीसाठी ‘सिप’ सुरू करण्याची शिफारस या सदरातून करावीशी वाटते.

प्रत्येक मिडकॅप फंडाची ‘मिडकॅप समभागां’ची व्याख्या वेगवेगळी असते. सीएनएक्स मिडकॅप निर्देशांकात सर्वाधिक बाजार मूल्य (मार्केट कॅप) ९६,००० कोटी तर सर्वात कमी १५,००० कोटी असल्याने या फंडात ज्या कंपन्यांचे बाजारमूल्य या दरम्यान आहे अशाच कंपन्या मिडकॅप धाटणीच्या समजून त्यांच्या समभागात गुंतवणूक केली जाते. या फंडाने गुंतवणूक केलेल्या कंपन्यांचे सरासरी बाजारमूल्य ७५,५०० कोटी रुपये आहे. साहजिकच या फंडाच्या गुंतवणुकीतून स्मॉलकॅप समभाग वगळले गेल्याने गुंतवणुकीतील जोखीम कमी झाली आहे. अन्य मिडकॅप फंडाचा परतावा -१२% ते (उणे) -४% असताना या फंडाचा परतावा (उणे) -६.१२% आहे. रेलिगेअर इन्व्हेस्को मिडकॅप फंडाचा एका वर्षांचा परतावा (उणे) -८.९६% व रिलायन्स मिड अँड स्मॉलकॅप फंडाचा एका वर्षांचा परतावा (उणे) -८.२४% असतानाच्या पाश्र्वभूमीवर या फंडाचा (उणे) -६.१२% परतावा समाधानकारक म्हणावा लागेल. या फंडाने पहिली एनएव्ही १६ फेब्रुवारी २०१५ रोजी जाहीर केली. मागील १३ महिने १,००० रुपयांची ‘सिप’ करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या १३,००० गुंतवणुकीचे ३१ मार्च रोजीचे बाजारमूल्य रुपये १२,२९४ होते.

२०१५ मध्ये अनेक मिडकॅप कंपन्यांच्या समभागांच्या किमती वाढल्याने मूल्यांकन अवास्तव पातळीवर पोहोचले होते. साहजिकच साधारण मार्च २०१५ मध्ये मिडकॅप फंडांनी १००% वार्षकि परतावा दिला होता. वाढलेल्या मूल्यांकनाने निधी व्यवस्थापकास गुंतवणुकीच्या मर्यादित संधी उपलब्ध होत्या. या पाश्र्वभूमीवर फंडाच्या परताव्याच्या दराचा विचार दोन भागांत करावा लागेल. पहिला भाग फंड सुरू झाल्यापासून ते नोव्हेंबर २०१५पर्यंतचा काळ ज्या काळात एलआयसी नोमुरा म्युच्युअल फंडाने आपला निधी संपूर्ण गुंतविलेला नव्हता. याच काळात अन्य फंडांचा परतावा अधिक होता. नोव्हेंबर २०१५ नंतर बाजारात घसरण झाल्याने अन्य फंडाच्या एनएव्हीत घसरण झाल्याने परताव्याचा दर नकारात्मक होता. या काळात योग्य मूल्यांकन असल्याने एलआयसी नोमुरा म्युच्युअल फंड आपल्याकडे असलेली रोकड खर्च करून गुंतवणुकीत नवीन समभाग खरेदी करत होता. साहजिकच नोव्हेंबर २०१५ पश्चात या फंडाचा परतावा चौथ्या तिमाहीत अन्य मिडकॅप फंडांच्या तुलनेत उजवा आहे.

सचिन रेळेकर हे या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. रेळेकर यांच्या पाठीशी गुंतवणूक व म्युच्युअल फंड उद्योगातील १२ वर्षांचा अनुभव आहे. सरकारने अर्थसंकल्पातून वित्तीय तूट ३.५ टक्क्यांपर्यंत सीमित राखण्याची केलेली घोषणा व ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा संकल्प लक्षात घेऊन फंडाचे गुंतवणूक धोरण हे ग्रामीण अर्थव्यवस्थेशी निगडित समभागांमध्ये गुंतवणूक करण्याचे असेल. याचा प्रत्यय फंडाच्या गुंतवणुकीतील मॅरिको, ब्रिटानिया, आयशर मोटर्स, सेन्च्युरी प्लाय यांसारख्या समभागातून दिसून येते. फेब्रुवारीच्या संक्षिप्त गुंतवणूक विवरणपत्रानुसार फंडाने सर्वाधिक १६.५०% गुंतवणूक आरोग्यनिगा क्षेत्रात केली असून त्या खालोखाल ग्राहकोपयोगी टिकाऊ वस्तू, वाहन पूरक उत्पादने, तेल शुद्धीकरण, माहिती तंत्रज्ञान अशी क्रमवारी आहे. फंडाचे प्रमाणित विचलन जरी ६.२८ असले तरी फंडाची गुंतवणूक मिडकॅप असल्याने हा फंड गुंतवणुकीस धोकादायक असे म्हणता येणार नाही. आजचे मिडकॅप हे उद्याचे बहुप्रसवा (मल्टिबॅगर) जरी असले तरी एखादी चुकीची गुंतवणूक किंवा योग्य मूल्यांकन नसताना केलेली खरेदी परतावा नकारात्मक देऊ शकते. जानेवारी २०१६ नंतरच फंडाचा संपूर्ण निधी गुंतविला गेला आहे. त्या आधी फंड व्यवस्थापन रोकडसुलभ गुंतवणूक साधनात (सीएलओबी) योग्य संधीच्या प्रतीक्षेत होते. जानेवारीनंतर बाजार गडगडल्याने ही गुंतवणुकीची संधी उपलब्ध होऊ शकली. सध्या फंडाचा निधी पूर्णपणे समभागात गुंतविला गेला आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या अर्थसंकल्पाचे लाभार्थी म्हणता येतील असे कावेरी सीड्स, व्होल्टास, सद्भव इंजिनीअिरग, केईसी इंटरनॅशनल सारख्या कंपन्यांचे समभाग गुंतवणुकीत अर्थसंकल्पाच्या आधीपासून असल्याने फंड व्यवस्थापक रेळेकर यांची समभागांची निवड सार्थ ठरवते. अनेक गुंतवणूकदार बहुप्रसवा समभाग किंवा १४-१७ टक्के परतावा मिळावा, अशी आशा ठेवून गुंतवणूक करतात. परंतु नुसता परतावा हा निकष न ठेवता, प्रमाणित विचलन, शार्प रेशो यांचा विचार करणे गरजेचे आहे. या फंडाचा सारासार विचार करता, हा फंड पाच वष्रे किंवा त्याहून अधिक मुदतीच्या एसआयपी गुंतवणुकीवर १२-१४% परताव्याची अपेक्षा करता येईल.
Untitled-9

shreeyachebaba@gmail.com