नियोजनाची सुरुवात शुद्ध विम्याने करणे गरजेचे असते. परंतु या पॉलिसी संरक्षणाच्या दृष्टीने उत्तम असल्या तरी त्यातील काही धोके समजावून घेणे जरुरीचे आहे. पहिली गोष्ट एकदा बंद पडलेल्या शुद्ध विम्याच्या पॉलिसीचे नूतनीकरण होत नाही म्हणून या पॉलिसीचा हप्ता वेळेत भरणे जरुरीचे आहे. जर विहित मुदतीत हप्ता भरला नाही तर पुन्हा वैद्यकीय चाचणीनंतर सुरू होणारी पॉलिसी नवीन समजली जाते. वाढलेलेव वय व वैद्यकीय चाचणीचे निष्कर्ष यांचा विचार होऊन पॉलिसीचा हप्ता वाढतो.

नळी फुंकिली सोनारें। इकडून तिकडे जाय वारें ।।
तसी तीं व्यर्थ शास्त्रें। हरिलीला न वर्णितां।।
न वर्णितां हरिचरित्र। व्यर्थ वटवट कायसे ग्रंथ।।
जैसीं अर्कफळें क्षुधार्थ। रुचि उडे भक्षितां।।

मेघा (३५) व अजित (३६) हे डोंबिवलीतील ‘लोकसत्ता’चे वाचक आहेत. त्यांचा मुलगा अक्षय हा दीड वर्षांचा आहे. दोघेही खासगी नोकरीत आहेत. मेघा या एका माध्यम समूहात तर अजित एका सुप्रसिद्ध नाममुद्रेच्या तयार कपडय़ांच्या कंपनीत विपणन अधिकारी आहेत. त्यांचे एकत्रित मासिक उत्पन्न ७२ हजार असून मागील वर्षी त्यांनी डोंबिवलीत एक घर खरेदी केले आहे. ते गृहकर्जाचा मासिक २५ हजारांचा हप्ता देत आहेत. मुलाच्या जन्मानंतर त्यांनी विमा बाजारपेठेत मुलांच्या शिक्षणासाठी उपलब्ध असलेल्या पॉलिसींपकी दोन पॉलिसी खरेदी केल्या. या पॉलिसींचाच वार्षकि २५ हजार रुपयांचा हप्ता ते भरत आहेत. आजवर दोन हप्ते भरले असून अजून १८ वष्रे ते या दोन पॉलिसींचा हप्ता भरणार आहेत. खर्च वजा जाता ते मासिक १५ हजाराची बचत करू शकतात. या बचतीचे मेघा यांना नियोजन करून हवे आहे.
‘‘मी व माझा नवरा तुमच्या सदरचे नियमित वाचक आहोत व आम्ही तुमच्या लेखांवर चर्चासुद्धा करतो,’’ असे लिहिणाऱ्या मेघा यांनी एकच विमा कंपनीच्या लहान मुलांच्या शिक्षणासाठी असलेल्या दोन वेगवेगळ्या पॉलिसी खरेदी केल्या आहेत. त्या स्वत: व अजित हे दोघेही कमावते असूनही त्या दोघांचा विमा नाही. तरीदेखील त्यांनी पहिली सात वष्रेच अजित व मेघा यांना विमा छत्र देणाऱ्या परंतु विमा विक्रेत्यांना श्रीमंत करणाऱ्या पॉलिसी विकत घेतलेल्या आहेत. प्रस्तुत वित्तीय नियोजकाला आलेला हा अनुभव हरिविजय ग्रंथात केल्याप्रमाणे ‘नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे जाय वारें’ असेच करावे लागेल.
आज मुलाच्या शैक्षणिक खर्चात मोठी वाढ होत आहे. साहजिकच कुठल्याही पालकांचे प्राधान्यक्रम हा स्वमालकीचे घर झाल्यानंतर मुलांच्या शिक्षणासाठी असणे स्वाभाविक आहे, परंतु आíथक नियोजनातसुद्धा वेगवेगळ्या वित्तीय ध्येयांची प्राथमिकता निश्चित करून नंतर त्यासाठी बचतीपकी कुठल्या गोष्टीसाठी किती तरतूद करावयाची हे या प्राथमिकतेवर अवलंबून असायला हवे. विमा व गुंतवणूक एकत्रित असलेल्या ‘मनी बॅक’ पॉलिसी घेण्याची चूक अनेक जण करतात. मुल सात वर्षांचे होईपर्यंत आई-वडिलांपकी एकाला विमाछत्राचा लाभ होतो. मुलाच्या वयाच्या सात वर्षांनंतर मुलाला विमाछत्र मिळते. विमा हा कमावत्या व्यक्तीचा मुदतीचाच विमा असायला हवा. उत्पन्न नसलेल्या व्यक्तीचा विमा घेणे याहून घोडचूक असू शकत नाही. आजचा व्यावसायिक अभ्यासक्रमाचा खर्च विचारात घेता या विम्याच्या पशातून (मनी बॅक) सहा महिन्यांच्या एका सत्राचा खर्च भागणे कठीण आहे. मुलांच्या शैक्षणिक खर्चाच्या पॉलिसी या मनी बॅक प्रकारच्या असतात. मनी बॅक पॉलिसीचा परताव्याचा दर सर्वात कमी असतो. मेघा व अजित गृहकर्जावर ९-९.५० टक्के व्याज देत असतांना ५ टक्के परतावा असलेली गुंतवणूक करणे योग्य नव्हे. विमा विक्रेत्याला जर अक्षयचे खरोखर भले करायचे असते तर त्याने शुद्ध विमा विकला असता. परंतु शुद्ध विम्यात विक्रेत्याला मोबदल्याचे प्रमाण अत्यंत अल्प असल्याने विक्रेते शुद्ध विमा न विकता विमा व गुंतवणूक असलेल्या योजना अर्थसाक्षर नसलेल्या व्यक्तीच्या गळ्यात मारतात. ही पॉलिसी सुरू ठेवणे म्हणजे विमा प्रतिनिधींचे भले करणे होय. आपले आíथक नुकसान करून घेण्यापेक्षा या पॉलिसीचे दोन हप्ते भरलेले असूनही या पुढचे हप्ते भरणे थांबवावे ही पहिली शिफारस आहे.
नियोजनाची सुरुवात शुद्ध विम्याने करणे गरजेचे असते. मेघा व अजित यांना त्यांच्या वयोमानानुसार व सेवानिवृत्तीच्या वयानुसार अनुक्रमे पन्नास लाख व पंचाहत्तर लाखाचे विमा कवच देणाऱ्या विमा पॉलिसीची शिफारस केली आहे. शुद्ध विमा पॉलिसी या विम्याच्या दृष्टीने उत्तम असल्या तरी त्यातील काही धोके समजावून घेणे जरुरीचे आहे. पहिली गोष्ट एकदा बंद पडलेल्या शुद्ध विम्याच्या पॉलिसीचे नूतनीकरण होत नाही म्हणून या पॉलिसीचा हप्ता वेळेत भरणे जरुरीचे आहे. जर विहित मुदतीत हप्ता भरला नाही तर पुन्हा वैद्यकीय चाचणीनंतर सुरू होणारी पॉलिसी नवीन समजली जाते. वाढीव वय व वैद्यकीय चाचणीचे निष्कर्ष यांचा विचार होऊन पॉलिसीचा हप्ता वाढतो. या नवीन पॉलिसीचा दावा तीन वर्षांच्या आत आल्यास विमा कंपनी kEarly Claiml  असे मानून मृत्यूच्या कारणांचा शोध घेऊन प्रसंगी विम्याचा दावा नाकारला जाण्याची शक्यता असते. शुद्ध विमा पॉलिसीचा हप्ता देय तारखेच्या आधी भरणे हिताचे आहे. ‘लोकसत्ता’चे वाचक व विमा विक्रेते असूनही शुद्ध विम्याचे पुरस्कत्रे असलेले उमेश कुलकर्णी यांनी ही गोष्ट वाचकांच्या लक्षात आणून देण्याची अनमोल सूचना केली. ते म्हणतात, ‘शुद्ध विमा म्हणजे कधीच वाढत होत नाही, असा नवजात शिशू होय. दहा-पंधरा वष्रे हप्ता भरून एखाद्या वर्षी हप्ता भरायचा राहिला तर पॉलिसी बंद पडते. हा नियम ध्यानात ठेवूनच शुद्ध विमा खरेदी करावा.’
गुंतवणूकदार विमा पॉलिसीचे २०-२५ वष्रे नेमाने हप्ते भरतात. परंतु म्युच्युअल फंडातील सुरू असलेल्या ‘सिप’चा सरासरी कालावधी २८ महिने इतकाच आहे. याची अनेक कारणे आहेत. विमा विक्रेता बदलणे शक्य नसल्याने व गुंतवणूक सल्लागार बदलणे सहज शक्य असल्याने निवडलेला फंडात ‘सिप’ बंद होण्याची शक्यता अधिक आहे. बिर्ला सनलाइफ म्युच्युअल फंड व रिलायन्स म्युच्युअल फंड ही दोन फंडघराणी आपल्या निवडक योजनांमध्ये ‘सिप’ करणाऱ्यांना मर्यादित परंतु मोफत विमा छत्र देत आहेत. बिर्ला सनलाइफ म्युच्युअल फंड आपल्या ‘सेंच्युरी सिप’द्वारा सिप रकमेच्या शंभरपट विमाछत्र व रिलायन्स म्युच्युअल फंड आपल्या ‘सिप इन्शुरन्स’ या योजनेद्वारा म्युच्युअल फंडात सुरू असलेल्या ‘सिप’ रकमेच्या १२० पट विमाछत्र देत आहे. ‘सिप’ सुरू केल्यापासून एका महिन्यानंतर सुरू होणारे विमाछत्र दरमहा वाढत जाणार आहे.
मेघा व अजित यांच्या मासिक १५ हजार बचतीचे नियोजन करून देणारे कोष्टकसोबत दिले आहे. आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यास रोकड सुलभतेसाठी आवर्ती ठेवींचा पर्याय सुचविलेला आहे. त्यानुसार मेधा व अजित यांनी गुंतवणूक करावी, अशी शिफारस केली आहे.

(या लेखाचा उद्देश वर उल्लेख केलेल्या योजनांची शिफारस करणे नसून वाचकांना अर्थसाक्षर करणे हा आहे. वर उल्लेख केलेल्या योजनांच्या अधिक माहितीसाठी व मनातील सर्व शंकानिरसनासाठी फंड घराण्याच्या संकेतस्थळाला भेट देऊन ‘सिप इन्शुरन्स’मधील ‘वारंवार विचारले जाणारे प्रश्न’ अर्थातोअद वर क्लिक करावे.)

chat

 

chat-2

वसंत माधव कुळकर्णी
shreeyachebaba@gmail.com