वर्ष १९९३ मध्ये स्थापन झालेली पंजाब राज्यातील जीएनए अ‍ॅक्सल्स प्रकाशात आली ती गेल्या वर्षीच्या प्रारंभिक भागविक्री – आयपीओमुळे. सप्टेंबर २०१६ मध्ये १९७ रुपये अधिमूल्याने केलेल्या समभाग विक्रीला गुंतवणूकदारांचा उत्तम प्रतिसाद लाभला होता. कंपनी प्रामुख्याने अ‍ॅक्सल शाफ्ट तसेच इतर शाफ्ट व स्पिंडल्सच्या उत्पादनात असून ती वाहन उद्योगाला पूरक तसेच इतरही उद्योगासाठी लागणारी शाफ्ट आणि अ‍ॅक्सल शाफ्टची निर्मिती करते. यात मुख्यत्वे सर्व प्रकारची वाणिज्य वाहने तसेच बस आणि ट्रकसाठी लागणारे अ‍ॅक्सल शाफ्ट कंपनी पुरवते. तसेच ट्रॅक्टर्स व शेतीसाठी लागणारी अवजारे, बांधकाम उद्योग, खाणकाम व इतर उद्योगांसाठी लागणारी यंत्रसामग्री तसेच इलेक्ट्रिक वाहनांसाठी लागणारे शाफ्ट अशा अनेक उद्योगांना पूरक असणारे शाफ्ट व सुटे भाग बनविते. कंपनीच्या एकूण उत्पन्नांपैकी ५० टक्के उत्पन्न निर्यातीचे आहे.

ब्राझील, अमेरिका, ब्रिटन, इटली, मेक्सिको, जपान, स्पेन, फ्रान्स, जर्मनी, चीन, ऑस्ट्रेलिया इ. देशांत आपली उत्पादने निर्यात करणाऱ्या जीएनए अ‍ॅक्सल्सचे दोन्ही प्रकल्प पंजाबमध्ये होशियारपूर व कपूरथला येथे आहेत. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षांकरिता कंपनीने ५१३.४ कोटी रुपयांच्या उलाढालीवर २९.६ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. जीएनए अ‍ॅक्सल्सचे प्रमुख उत्पादन अ‍ॅक्सल्स असल्याने वाणिज्य वाहनांच्या मागणीवर कंपनीचे भवितव्य अवलंबून आहे. कंपनीच्या ग्राहकांच्या मांदियाळीत महिंद्र, जॉन डीअर, टाफे, दाना, क्लास इंडिया, एस्कॉर्ट, इंटरनॅशनल ट्रॅक्टर अशा अनेक नामांकित कंपन्या आहेत. गेल्या पंचवीस वर्षांत आपल्या गुणवत्तेच्या जोरावर कंपनीने भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपले स्थान भक्कम केले आहे. येऊ  घातलेली वस्तू व सेवा अर्थात जीएसटी करप्रणाली आणि पायाभूत सुविधांवर सरकारने दिलेला भर यामुळे येत्या दोन वर्षांत वाणिज्य वाहनांना चांगले दिवस येतील अशी अपेक्षा आहे. या सर्वाचा अप्रत्यक्ष फायदा जीएनए अ‍ॅक्सल्ससारख्या कंपन्यांना होईल. एक मध्यमकालीन गुंतवणूक म्हणून ही स्मॉल कॅप कंपनी तुमच्या पोर्टफोलिओसाठी योग्य वाटते.