आजकाल आपण बऱ्याचदा वाचतो, ऐकतो किंवा बरेच लोक आपल्याला कुठे गुंतवणूक करा, कशी गुंतवणूक करा याचे सल्ले देत असतात आणि त्यानुसार वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायांमध्ये आपण गुंतवणूक करीतही असतो. पण ही गुंतवणूक केल्यानंतर आपण बरेचदा एकदा गुंतवणूक झाली की, त्याच्यावर लक्ष ठेवायचे असते हेच विसरून जातो आणि त्याकडे दुर्लक्ष करतो. असे लक्ष ठेवणे किती गरजेचे आहे हे समजून घेण्यासाठी आज तुम्हाला माझ्या एका गुंतवणूकदार मैत्रिणीचा अनुभव सांगणार आहे.

माझी मैत्रीण अनुजा राजाध्यक्ष (नाव अर्थातच बदलेले आहे) जी स्वत: बँकेतील नोकरीतून स्वेच्छेने निवृत्त झाली तिने व तिच्या मिस्टरांनी मिळून एका प्रथितयश गुंतवणूक सल्लागाराकडून बऱ्याच वेगवेगळ्या पर्यायांमध्ये गुंतवणूक केली होती. जोपर्यंत तिचे पती होते तोपर्यंत तेच सर्व गुंतवणुकीवर लक्ष ठेवत होते आणि ती निर्धास्त होती. त्यांच्यापश्चात जेव्हा तिने नवीन गुंतवणूक केली तेव्हा तिच्या लक्षात आले की तिच्या गुंतवणुकीच्या स्टेटमेन्टवरील पत्ता बदलला आहे. जेव्हा तिने खोलात जाऊन चौकशी केली तेव्हा खालील घटनाक्रम लक्षात आला :

१. प्रथम तिची केवायसी कागदपत्रे वापरून एका प्रथितयश खासगी बँकेमध्ये तिच्या नावाने मुंबईबाहेरील शाखेत खाते उघडण्यात आले. त्या वेळी तिचा कायमचा पत्ता तसाच ठेवून संपर्काचा पत्ता मुंबईबाहेरील शाखेजवळचा देण्यात आला . तसेच फोन नंबरपण दुसराच देण्यात आला.

२. नंतर काही काळानंतर तिची केवायसी कागदपत्रे तसेच या बँकेचा पत्ता वापरून म्युच्युअल फंडामध्ये तिचा पत्ता व फोन नंबर बदलण्यात आला. ज्यायोगे तिला तिच्या गुंतवणुकीबद्दल व त्यातील फेरबदलाबद्दल काहीही माहिती कळणार नाही याची खबरदारी घेतली गेली.

दरम्यान त्या बँक खात्यात खाते उघण्यासाठी भरण्यात आलेले पैसे काढून घेण्यात आले. त्यामुळे बँकेने खात्यात किमान शिलकीसाठी पैसे भरण्यासाठी मूळ पत्त्यावर पत्र पाठवले, तेव्हा तिच्या लक्षात आले की, असे तिच्या नावाने बोगस खाते उघण्यात आले आहे.

या पुढची पायरी अशी असू शकेल की, तिच्या बँक खात्याचा नंबर बदलून हा नवीन बोगस नंबर देणे आणि मग तिच्या गुंतवणुकीचे पैसे काढून या बोगस खात्यात जमा करणे व ते लंपास करणे. पण तिच्या वेळीच लक्षात आल्याने, पुढील संभाव्य मोठय़ा आर्थिक नुकसानीपासून ती बचावली.

जरी तिचे आर्थिक नुकसान झाले नसले तरी सर्वाच्या बाबतीत असेच घडेल असे नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांनी काळजी घेणे, सावध राहणे गरजेचे आहे.

हा फक्त आर्थिक नुकसानीचाच प्रश्न नसून तुमची कागदपत्रे वापरून कोणी तरी तुमची ओळख चोरण्याचा आणि त्यायोगे अनैतिक गोष्टी  – घोटाळे करण्याचा प्रकार झाला तरी अधिक गंभीर गोष्ट असेल.

अर्थातच माझ्या मैत्रिणीच्या प्रकाराबाबत योग्य ती कारवाई केली जाईलच पण जर पुढचा सर्व त्रास वाचवायचा असेल तर आपली सावधगिरी खूपच आवश्यक आहे. सर्व गुंतवणूकदारांना सल्ला हाच की त्यांनी एकदा गुंतवणूक केल्यावर ती विसरून जाऊ  नये तर त्यावरील आपला पत्ता, फोन, बँक खाते क्रमांक वेळोवेळी तपासून पाहावा आणि बदलला असेल तो अद्ययावत करून घ्यावा. फक्त एकदा गुंतवणूक केली तेव्हाच नाही तर नंतरसुद्धा वारंवार तपासून बघावा आणि हे जर करणे शक्य नसेल तर चांगल्या, माहितीच्या आणि विश्वासू सल्लागाराची मदत घ्यावी. कारण तुम्हाला योग्य गुंतवणूक सल्ला देणे आणि तुमच्या गुंतवणुकीवर लक्ष ठेवणे हे त्याचेही काम आहे.

गुंतवणूकदार म्हणून या गोष्टींची काळजी आवश्यकच :

  • ओळखीचा पुरावा म्हणून तुमची केवायसी कागदपत्रे स्वैरपणे कुणा व्यक्तीकडे सोपवू नये.
  • कागदपत्रांच्या छायांकित प्रतींवर सही करताना, सहीचा थोडा भाग मुद्रित भागावर जाईल याची काळजी घ्या.
  • तुम्ही कागदपत्र कोणत्या कारणासाठी देत आहात ते आणि तारीख लिहायला विसरू नका.
  • एकदाच नाही तर दर तीन/ सहा महिन्यांनी गुंतवणुकीचे स्टेटमेंट तुम्हाला नियमित मिळेल याची खातरजमा करा.
  • गुंतवणुकीचे स्टेटमेंट आल्यावर सर्व तपशील – आपला पत्ता, फोन, बँक खाते क्रमांक बरोबर आहे ना हे तपासून पाहा.

 

स्वाती शेवडे

cashevade.swati@gmail.com