म्युच्युअल फंडाचे नाव जरी काढले तरी ‘नको रे बाबा’ अशी प्रतिक्रिया देणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या फार मोठी आहे. (प्रत्यक्षात एका मोठय़ा बँकेच्या शिवाजी पार्क, दादर, मुंबई येथील एका महत्त्वाच्या शाखेच्या व्यवस्थापकबाईंनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली होती.) आणि म्हणूनच आपल्या देशात ५ टक्के जनताच म्युच्युअल फंडाच्या वेगवेगळय़ा पर्यायांमध्ये गुंतवणूक करते. त्यातही जास्त प्रमाणात जोखीम असलेल्या इक्विटी योजनांमध्ये गुंतवणूक करणारे फारच कमी आहेत. आणि जे कोणी या जोखमीच्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करतात, त्यापकी बहुतांशी गुंतवणूकदार लार्ज कॅप योजनांची निवड करतात. कारण या योजनांमध्ये जोखीम तुलनात्मकदृष्टय़ा कमी असते. मिड कॅप, स्मॉल कॅप किंवा मायक्रो कॅप योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या फारच कमी आहे. याला कारण म्हणजे त्याबाबतचे एकूणच अज्ञान.
शेअर बाजारात सूचिबद्ध सर्व कंपन्यांचे लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप अशा तीन प्रमुख गटांमध्ये विभाजन केले जाते. त्यासाठी मुंबई शेअर बाजारामध्ये ८०-१५-५ असे सूत्र वापरले जाते. सर्वात जास्त मार्केट कॅपपासून सर्वात कमी मार्केट कॅप असलेल्या कंपन्यांची क्रमवारी केली जाते. बाजाराच्या एकूण मार्केट कॅपच्या ८० टक्के मार्केट कॅप असलेल्या वरच्या क्रमांकाच्या कंपन्यांचे लार्ज कॅप गटामध्ये वर्गीकरण केले जाते. त्यांनतरच्या १५ टक्क्यांमधील कंपन्या मिड कॅप गटात येतात आणि बाजाराच्या मार्केट कॅपच्या क्रमवारीमध्ये सर्वात खालच्या थरामधील ५ टक्के कंपन्या स्मॉल कॅप म्हणून ओळखल्या जातात. त्यामध्ये आणखी तपशीलवार विभागणी केली जाते. लार्ज कॅपमधील सर्वात बलाढय़ कंपन्यांना मेगा कॅप म्हणूनही संबोधिले जाते आणि स्मॉल कॅपमधील सर्वात लहान कंपन्यांना मायक्रो कॅप म्हणतात. कंपन्यांची भरभराट झाली की स्मॉल कॅप कंपन्या मिड कॅपमध्ये जातात किंवा मिड कॅप लार्ज कॅपमध्ये जातात. एकेकाळी स्मॉल कॅप गटामधील इन्फोसिस ही कंपनी आज लार्ज कॅपमध्ये आहे. खराब कामगिरीमुळे कंपन्यांची पीछेहाट झाली तर उलट प्रवासही सुरू होतो. एकेकाळी लार्ज कॅपमध्ये असलेल्या ओर्के कंपनीचे आज नामोनिशाणही नाही. बाजारामधील भावांच्या चढ-उतारांकडे नजर टाकली तर असे दिसून येते की लार्ज कॅप कंपन्यांचे भाव तुलनात्मकदृष्टय़ा कमी अस्थिर असतात. त्यामानाने मिड कॅप कंपन्यांच्या भावांमध्ये जास्त प्रमाणात चढ-उतार होत असतात आणि त्याहीपेक्षा मोठय़ा प्रमाणात अफरातफर (बाजारातील शब्द- volatility) होत असते ती स्मॉल कॅप गटामधील शेअर्सच्या भावांमध्ये.
सर्वात जास्त प्रमाणात चढ-उतार होत असतात ते मायक्रो कॅप या गटामधील शेअर्सच्या भावांमध्ये. परंतु याच गटामधील कंपन्या भविष्यामध्ये स्मॉल कॅप, मिड कॅप किंवा लार्ज कॅप या गटांमध्ये जाण्याची शक्यता असते. त्याचा फायदा घेता आला तर मोठय़ा प्रमाणात परतावा प्राप्त करता येतो. त्याचबरोबर हेही सत्य आहे की, इतक्या कंपन्यांपकी किती कंपन्या त्या दृष्टीने सक्षम आहे हे शोधून काढणे सर्वसाधारण गुंतवणूकदाराच्या आवाक्याबाहेरचे काम आहे. हे काम तज्ज्ञांचे आहे आणि त्यासाठी जास्त अभ्यासाची गरज आहे.
माझ्या माहितीच्या अशाच एका तज्ज्ञाने २००४ मध्ये एफटीआयएलचे (फायनान्शिअल टेक्नॉलॉजिज्) शेअर्स ८२ रुपये दराने घेतले होते. २००७ मध्ये सुमारे १,९०० रुपयांच्या दराने ते विकले. त्याने २००२ मध्ये खरेदी केलेल्या फ्युचर रिटेल या कंपनीच्या शेअर्सची सरासरी किंमत आहे (बोनस, राइटस वगरे जमेस धरून) ९ रुपये प्रति शेअर. २००८ च्या तेजीमध्ये त्याची किंमत होती ८०० रुपये (द.सा.द.शे.सरासरी वाढ १११%).
सर्वसाधारण गुंतवणूकदार हे सर्व करू शकत नाही. त्याच्यासाठी योग्य पर्याय म्हणजे मायक्रो कॅप म्युच्युअल फंड योजना. डीएसपी ब्लॅकरॉक या म्युच्युअल फंडाची मायक्रो कॅप फंड नावाची योजना आहे. जून २००७ मध्ये ती बाजारात आली. २००८ च्या तेजीमध्ये त्या योजनेने १०० टक्क्यांपेक्षा जास्त वाढीची नोंद केली. २००९ पासूनच्या एनएव्हीवर नजर टाकली तर भावांच्या चढ-उताराची कल्पना येते.
वरील आकडय़ांचा अभ्यास केला तर एक वर्ष किंवा त्याहीपेक्षा कमी कालावधीत या योजनेचा एनएव्ही फार मोठय़ा प्रमाणात वर-खाली झालेला आहे. हे सर्व घडत असताना ज्या गुंतवणूकदारांकडे सुरुवातीपासूनची १० रुपये दराची युनिट आजही आहेत, त्यांच्या बाबतीत आजचा प्रति युनिट भाव (रु. २८.४६) हिशेबात धरला तर त्यांना प्राप्त झालेला सरासरी परतावा आहे द.सा.द.शे. सुमारे १४ टक्के आणि तोही प्राप्तिकरमुक्त.
सुंदरम म्युच्युअल फंडाने अशाच प्रकारची योजना सुंदरम मायक्रो कॅप फंड (सीरिज १ ते ४ ) जानेवारी २०१४ मध्ये बाजारात आणली. ती पाच वर्षांच्या सीमित मुदतीच्या प्रकारातील आहे. १० रुपयाने वितरण केलेल्या युनिटचा आजचा दर आहे सुमारे १६ रुपये. (द.सा.द.शे. १०० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ) ज्यांनी डिव्हिडंड हा पर्याय निवडला होता. त्यांना १४/८/२०१४ ला १ रु. (१० टक्के) प्रति युनिट डिव्हिडंडही देण्यात आलेला आहे. त्या योजनेच्या मूळ शर्तीनुसार पुढील पाच वर्षांमध्ये त्या म्युच्युअल फंडामार्फत युनिटची खरेदी किंवा विक्री करता येणार नाही.
गुंतवणूकदारांचा प्रतिसाद लक्षात घेऊन त्याच म्युच्युअल फंडाने अशाच प्रकारची पाचवी सीरिज बाजारात आणली आहे. सीमित मुदत आहे ४२ महिने. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा ठोस परतावा नाही. ज्या गुंतवणूकदारांकडे पूर्वनियोजित जोखीम घेण्याची क्षमता आहे त्यांनी या योजनेमध्ये गुंतवणूक केली तर बँकेच्या मुदत ठेवीपेक्षा २५ टक्के (किंवा त्याहूनही जास्त) निव्वळ परतावा प्राप्त होण्याची शक्यता आहे.
लेखक गुंतवणूक आणि विमा सल्लागार
(म्युच्युअल फंडामधील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळे त्या योजनेच्या लेखाचित्राचा अभ्यास करून किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी.)
मार्केट कॅपिटलायझेशन (बोली भाषेत मार्केट कॅप) हा शब्द कुठेना कुठे तरी कानावर पडलेला असतो, परंतु प्रत्यक्षात हा काय प्रकार आहे त्याची माहिती नसते. सोप्या भाषेत सांगायचे तर एखाद्या कंपनीचे बाजारात जितके शेअर्स आहेत ते सर्व विकत घ्यायचे असतील तर जी किंमत मोजावी लागेल ती रक्कम म्हणजे त्या कंपनीची मार्केट कॅप. त्याचे सूत्र आहे :
मार्केट कॅप = बाजारात उपलब्ध असलेले एकूण शेअर्स  बाजारातील प्रति शेअर भाव
उदारणार्थ – ‘अबक’ या कंपनीचा आजचा बाजारभाव आहे रु. २०० प्रति शेअर आणि बाजारात एकूण एक कोटी शेअर्स आहेत. तर अबक कंपनीची मार्केट कॅप होते २०० कोटी रुपये. बाजारातील सर्व कंपन्यांच्या मार्केट कॅपची बेरीज केली तर ती असते संपूर्ण बाजाराची मार्केट कॅप. सध्या मुंबई शेअर बाजारची मार्केट कॅप आहे ९०,००,७५३ कोटी रुपये.
डीएसपी ब्लॅकरॉक
मायक्रो कॅप फंडाची कामगिरी
तारीख    एनएव्ही    वाढ / घट
१९ ऑगस्ट २००९    रु. ८.९०      —
१० नोव्हे २०१०    रु. १८.७१    +११०%
१६ डिसें २०११    रु. १२.८४    -३२ %
८ जाने २०१३    रु. १७.१८    +३३ %
२ सप्टें २०१३    रु. १३.३३    -२२.५ %
७ ऑगस्ट २०१४    रु. २८.४६    +११३ %