वस्त्रोद्योग क्षेत्रातील आशापुरा इंटिंमेंट्स फॅशनची उपकंपनी असलेल्या मोमाई अॅपरल्सने प्रारंभिक भागविक्री (आयपीओ)च्या माध्यमातून ४१ कोटी रुपयांची भांडवल उभारणी प्रस्तावित केली आहे. ‘एनएसई इमर्ज’ या बाजारमंचावर सूचिबद्धत होत असलेली ही सहावी कंपनी असून, लघू व मध्यम उद्योग क्षेत्रातील (एसएमई) कंपनीकडून प्रस्तुत झालेली आजवरची सर्वात मोठी भागविक्री असेल.
ही भागविक्री २५ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर दरम्यान सुरू राहणार असून, भागविक्रीपूर्वीच मोमाई अॅपरल्सच्या १३ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची खरेदी उच्च धनसंपदा प्राप्त गुंतवणूकदार तसेच ‘सिदबी’सारख्या वित्तसंस्थेने प्रत्येकी ७८ रुपये भावाने  केली आहे. बुक-बिल्डिंग प्रक्रियेच्या या भागविक्रीसाठी ७८ रु. ते ९० रु. या किंमत पट्टय़ादरम्यान बोली लावता येईल, असे या भागविक्रीचे व्यवस्थापन पाहत असलेल्या पँटोमॅथ अॅडव्हायजरी सव्र्हिसेस ग्रुपचे महावीर लुनावत यांनी सांगितले. ‘केअर’ या भागविक्रीला सर्वोत्तम आर्थिक स्थिती दर्शविणारे ‘एसएमई फंडामेंटल ग्रेड ४/५’ असे मानांकन बहाल केले आहे.
नाइटवेअर, बाथ रोब्स, स्पोर्ट्सवेअर, लेगिंग्ज, लाँजवेअर, ब्रायडल नाइट वेअर आणि अंतर्वस्त्रे वगैरे आबालवृद्धांसाठी घरात वापरावयाची तयार वस्त्रांची निर्मिती मोमाई अॅपरल्सकडून ‘व्हॅलेंटाइन, एन लाइन, नाइट अँड डे या ब्रॅण्ड नावाने केली जाते. अशा प्रकारची ‘इंटिमेट्स’ अर्थात अंतर्वस्त्रांच्या संपूर्ण श्रेणीत अस्तित्व असणारी जगात फार थोडक्या कंपन्या असून, भारतात मोमाईला स्पर्धक ठरेल, अशी कंपनीच नसल्याचे तिचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हर्षद ठक्कर यांनी सांगितले. कंपनीकडून तयार वस्त्रे ही विक्री ल निर्यात क्षेत्रात असलेल्या तिची पालक कंपनी आशापुराला मोमाईकडून वितरणासाठी दिले जातात. देशभरात १३,००० हून अधिक विक्रेत्यांकडून कंपनीच्या ब्रॅण्ड्सची विक्री सुरू आहे.
भागविक्रीतून उभ्या राहणाऱ्या निधीचा विनियोग कंपनीच्या नाशिक आणि वापी येथील वस्त्रनिर्मिती प्रकल्पांच्या क्षमता विस्तारावर खर्च होणार, वर्षभरात निर्मिती क्षमता सर्व उत्पादन वर्गात तिपटीने वाढविण्याचे नियोजन असे ठक्कर यांनी स्पष्ट केले. वापी येथे नवीन प्रकल्प स्थापनेचेही नियोजन असून, त्यासाठी केंद्राच्या ‘वस्त्रोद्योग अद्ययावतीकरण निधी (टफ)’मधून अनुदान मिळविले जाणार आहे. याच समूहातील आशापुरा इंटिमेट्स फॅशन्सने २०१३ सालात प्रत्येकी ४० रुपये भावाने त्यावेळची सर्वात मोठी एसएमई भागविक्री केली होती, आज या समभागांचा भाव १४० रुपयांच्या घरात गेला आहे.
    ’  व्यापार प्रतिनिधी