पीपीएफ खात्यामधील जमा रकमेसमोर गुंतवणूकदाराला कर्ज मिळू शकते. पण खातेदाराला प्राप्त होऊ शकणाऱ्या कर्जाची रक्कम फारच कमी असते. या योजनेचा मूळ उद्देश निवृत्तीनंतरच्या आíथक समस्यांना तोंड देण्यासाठी कमाईच्या कालावधीत करावयाची तरतूद असा असल्याने कर्जाऊ रकमेबाबतचे नियम बहुधा जाचक केले असावेत!
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) अर्थात सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी या गुंतवणूकदारांमध्ये सर्वात लोकप्रिय अशा योजनेचे प्रारूप गेल्या भागामध्ये आपण जाणून घेतले. आता ‘पीपीएफ’मधील इतर सुविधांचा विचार करू या.
* कर्ज :
पीपीएफच्या खात्यामधील जमा रकमेसमोर गुंतवणूकदाराला कर्ज मिळू शकते. या योजनेतील नियमानुसार, ज्या आर्थिक वर्षांत खाते उघडले असेल त्यानंतरच्या वर्षांपासून पुढील पाच वर्षे संपेपर्यंत खातेधारक कर्जाची मागणी करू शकतो. या कर्जाबाबतच्या अटींवर नजर टाकली तर खातेदाराला प्राप्त होऊ शकणाऱ्या कर्जाची रक्कम फारच कमी वाटते. या योजनेचा मूळ उद्देश निवृत्तीनंतरच्या आíथक समस्यांना तोंड देण्यासाठी कमाईच्या कालावधीत करावयाची तरतूद हा आहे. त्यामुळेच कर्जाऊ रकमेबाबतचे नियम बहुधा जाचक केले असावेत! उदाहरणादाखल समजून घेऊ.
गुंतवणूकदाराने जुलै २०१०मध्ये पीपीएफ खाते उघडले असेल तर ते आíथक वर्ष मार्च २०११ला पूर्ण होते. त्यानंतरचे एक वर्ष म्हणजे ३१ मार्च २०१२ या तारखेनंतर ज्या आíथक वर्षांमध्ये त्याने खाते उघडले आहे (२०१०-११) त्यानंतरच्या ५ वर्षांमध्ये म्हणजे मार्च २०१६पर्यंत खातेधारक आपल्या खात्यामधील जमा रकमेसमोर कर्ज घेऊ शकतो. समजा त्याने फेब्रुवारी २०१४ मध्ये कर्जाची मागणी केली तर त्या मागणीचे आíथक वर्ष होते २०१३-१४. त्यापूर्वीची २ वर्षे म्हणजे २०११-१२ या आíथक वर्षांच्या शेवटास त्याच्या खात्यामध्ये जितकी रक्कम जमा असेल त्याच्या २५ टक्के रक्कम त्याला कर्ज रूपात मिळू शकते.
वरील उदाहरणामधील गुंतवणूकदार आपल्या पीपीएफ खात्यामध्ये दर वर्षी ५०,००० रुपयांची गुंतवणूक करत असेल आणि त्याने फेब्रुवारी २०१४ मध्ये कर्जाची मागणी केली तर २०११-१२ या आíथक वर्षांच्या शेवटास त्याच्या खात्यामध्ये जी रक्कम जमा असेल (२०,००० रुपये) त्याच्या २५ टक्के रक्कम म्हणजे ५,००० रुपये इतकी रक्कम त्याला कर्ज म्हणून मिळू शकते. पीपीएफमध्ये त्याला मिळणाऱ्या व्याजापेक्षा २ टक्के जास्त व्याज या कर्जासाठी लागू पडते. म्हणजे सध्याच्या परिस्थितीत १०.७ टक्के. या कर्जाची परतफेड त्याला जास्तीत जास्त ३६ मासिक हप्त्यांमध्ये करावी लागते. त्यानंतरही कर्ज मिळण्याची सुविधा या पर्यायामध्ये आहे. परंतु त्यासाठी त्याला पूर्वीच्या कर्जाच्या संपूर्ण रकमेची परतफेड करावी लागते.
पीपीएफ खात्यातील जमा रकमेमधून पसे काढून घेण्याचीही सुविधा यात आहे. खात्याच्या सातव्या वर्षांनंतर दर वर्षी एकदा पसे काढण्याचा पर्याय आहे. ज्या वर्षी पसे काढायचे आहेत त्यापूर्वीच्या चार आíथक वर्षांच्या शेवटास खात्यामध्ये जमा असलेला रकमेच्या ५० टक्के इतकी रक्कम गुंतवणूकदार काढू शकतो. त्यानंतर याच नियमानुसार खातेदाराला दर वर्षी एकदा पसे काढून घेण्याची सवलत आहे. या रकमेचा परत भरणा करण्याची गरज नाही.
* पीपीएफ योजनेचा मूळ कालावधी १५ वर्षांचा असतो. तो पूर्ण झाल्यावर गुंतवणूकदाराकडे तीन पर्याय असतात.
१. संपूर्ण जमा रक्कम काढून घेऊन खाते बंद करायचे.
२. पाच वर्षांच्या कालावधीसाठी खाते वíधत (extend) करायचे आणि त्यामध्ये दर वर्षी पसे जमा करायचे.
३. खाते वíधत करायचे. परंतु त्यामध्ये वार्षकि रकमेचा भरणा न करता जमा असलेल्या रकमेवर व्याज घेत राहायचे.
असे पाच वर्षांच्या हप्त्यांमधील वाढीव कालावधी हा प्रकार कितीही वेळा करता येतो. त्यावर कोणत्याही प्रकारचे बंधन नाही. यासाठीचा अर्ज खात्याच्या मॅच्युरिटीच्या तारखेपासून एक वर्षांच्या आत द्यावा लागतो.
या वाढीव कालावधीमध्ये पीपीएफ खात्यातून रक्कम काढून घेण्याचीही तरतूद आहे. अशा वेळी वाढीव कालावधीपूर्वी खात्यामध्ये जी जमा रक्कम असेल त्याच्या ६० टक्के रक्कम काढता येते. पीपीएफ खात्याचा कालावधी पाच वर्षांनी वाढविला आहे. परंतु त्यात वार्षकि रक्कम जमा करायची इच्छा नाही, अशा परिस्थितीत त्या खात्यामधून किती रक्कम काढावी याबाबत कोणतेही बंधन नाही. मात्र ही रक्कम आíथक वर्षांमध्ये एकदाच काढता येते. बाकी रकमेवर व्याजाचा स्रोत चालूच राहतो.
प्राप्तिकरामध्ये सूट मिळविण्यासाठी अनेक योजना आहेत. त्यातील तीन पर्यायांचा सर्वसाधारणपणे विचार केला जातो. लोकप्रियतेच्या बाबतीत क्रम लावायचा झाला तर जीवन विमा हा पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर आहे पीपीएफ आणि सर्वात शेवटी निवड केली जाते तो पर्याय आहे म्युच्युअल फंडामधील प्राप्तिकर बचत योजना. आíथक साक्षरतेचा अभाव असल्याने बहुतांशी लोक प्राप्तिकरामध्ये सूट मिळविण्यासाठी जीवन विम्याची निवड करतात. नफ्यासकटच्या पॉलिसीमध्ये किरकोळ विमाछत्राबरोबर गुंतवणुकीचा भाग असतो. परंतु वर निर्देशित केलेल्या इतर दोन पर्यायांपेक्षा परतावा फारच कमी असतो, आणि रक्कम १५ ते २० वष्रे (पॉलिसीच्या टर्मनुसार) अडकून पडते (in Period). गुंतवणूकदाराच्या गरजेनुसार अनेक पर्याय उपलब्ध असलेली पीपीएफ ही योजना प्राप्तिकरामध्ये सूट मिळवून देते आणि कमाईच्या काळात वेळोवेळी उद्भवणाऱ्या गरजांची पूर्तता करून निवृत्तीनंतरच्या काळाचीही सोय करते. त्यामुळे ज्यांच्यासाठी ईपीएफची (Provident Fund) सोय नाही त्यांच्यासाठी तर पीपीएफला पर्याय नाही, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. या पर्यायामध्ये एकच गोष्ट खटकते आणि ती म्हणजे १५ वर्षांचा कालावधी. ज्या वर्षी खाते उघडले असेल त्यानंतरची १५ आíथक वर्षे म्हणजे एकूण १६ वष्रे रक्कम अडकून पडते. याशिवाय परतावाही भाववाढीपेक्षा कमी असतो. या दोन्ही त्रुटींवर मात करायची असेल तर म्युच्युअल फंडाच्या प्राप्तिकर बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. यामध्ये ठोस परतावा नसतो. त्यामुळे पूर्वनियोजित जोखीम घ्यावी लागते. या योजनांपकी तीन फंड असे आहेत की त्यांनी सुरुवातीच्या काळापासूनचा आढावा घेतला तर द.सा.द.शे. सरासरी २४ टक्क्यांपेक्षा जास्त वाढीची नोंद केली आहे. आपल्या हिशेबासाठी त्यापेक्षा अर्धी म्हणजे १२ टक्क्यांची वाढ गृहीत धरली तरी पीपीएफच्या तुलनेत ती द.सा.द.शे. २५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. (जीवन विम्याच्या बाबतीत जर पूर्वी दिलेला बोनस भविष्यातील परताव्यासाठी गृहीत धरू शकतो तर म्युच्युअल फंडाच्या प्राप्तिकर बचत योजनांच्या परताव्याबाबत नोंद केलेल्या ऐतिहासिक वाढीपेक्षा अर्धी वाढ गृहीत धरणे हे माझ्या मते वाजवी आहे.)
या वरकरणी किरकोळ वाटणाऱ्या वाढीचा २५ ते ३० वर्षांच्या कालावधीमध्ये जमा होणाऱ्या गंगाजळीमध्ये लक्षणीय फरक पडतो.
* उदाहरणार्थ:
३० वर्षांच्या गुंतवणूकदाराने पीपीएफमध्ये वार्षकि ५०,००० रुपयांची गुंतवणूक केली तर आजच्या ८.७० टक्क्यांच्या ठोस परताव्याने ६०व्या वर्षी त्याची गंगाजळी होते रु. ७०,०६,०२५. म्युच्युअल फंडाच्या प्राप्तिकर योजनेमध्ये अशा प्रकारच्या गुंतवणुकीची रु. १,३५,१४,६३० इतकी गंगाजळी होण्याची शक्यता असते. आíथक नियोजनाच्या मूलभूत नियमानुसार पूर्ण रक्कम जोखमीच्या पर्यायामध्ये गुंतविणे धोकादायक ठरू शकते. त्यानुसार सदर गुंतवणूकदाराने वरील दोन्ही पर्यायांमध्ये एकूण रकमेच्या अर्धी रक्कम (पीपीएफरु. २५,००० आणि म्युच्युअल फंड रु. २५,०००) गुंतविली तर तो रु. १.०२ कोटी (पीपीएफ रु. ३५.०३ लाख आणि म्युच्युअल फंड रु. ६७.५७ लाख) इतकी गंगाजळी तयार करू शकतो. या गुंतवणुकीमध्ये परताव्याचा सरासरी दर १०.६३ टक्के पडतो.
* निष्कर्ष :
प्राप्तिकरामध्ये सूट मिळविण्यासाठी आणि निवृत्तीनंतरच्या आíथक स्वातंत्र्यासाठी पीपीएफ ही एक अतिशय उपयुक्त गुंतवणूक आहे. परंतु तरुण वयामध्ये त्याला म्युच्युअल फंडाची जोड दिली तर वरील दोन उद्दिष्टांची पूर्तता होते. शिवाय भाववाढीपेक्षा जास्त परतावा प्राप्त होण्याची शक्यता निर्माण होते. निव्वळ प्राप्तिकरामध्ये सूट मिळविण्यासाठी, गुंतवणुकीच्या उद्देशाने जीवन विमा योजनेमध्ये पसे गुंतविले तर भविष्यात पश्चात्तापाची वेळ येते. कारण विमाछत्र किरकोळ असते आणि परतावाही फार कमी असतो आणि सर्वात मुख्य म्हणजे महत्त्वाची वष्रे निघून गेल्याने हतबल होण्यापलिकडे काहीही करता येत नाही.
—————————————
लेखक गुंतवणूक आणि विमा सल्लागार