जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असे बिरुद धारण करणारी आपली अर्थव्यवस्था खरोखर ७-७.५% दराने वाढत आहे का, की अर्थव्यवस्था ६-६.५०% दरानेच वाढत असून वाढ मोजण्याच्या सूत्रात केलेल्या बदलामुळे ‘अर्थवृद्धीचा आभास’ निर्माण केला जात आहे याबाबत साशंकता आहे. तसेच चीनची अर्थगती संथ झाल्यामुळे हा मान भारताला लाभला आहे आणि अर्थव्यवस्था वाढीचा दर ही सरकारची हातचलाखी आहे असे मानणाऱ्या अर्थतज्ज्ञांचा मोठा वर्ग आहे..

राजा विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तलवार उपसून पुन्हा तो झाडावर चढला अन् फांदीवर लटकणाऱ्या प्रेताला खांद्यावर घेऊन मौनात चालू लागला. त्यासरशी प्रेतामधला वेताळ पुन्हा एकदा जागा होऊन विक्रमादित्यास प्रश्न विचारू लागला. ‘‘राजा अमेरिका दौऱ्यात एका मुलाखतीत डॉक्टरांनी भारतीय अर्थव्यवस्थेबाबत ‘अंधोके राजमे काना राजा’ वापरलेले शब्द निर्मला सीतारामन यांना झोंबले याचे कारण तुला माहीत असूनही तुझे प्रामाणिक मत सांगितले नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायावर लोळू लागतील,’’ वेताळाने सांगितले.

‘‘राजकारणातच नव्हे तर जगातच माणसाचे नाव व मानसिकता यांच्यात बरेचदा विरोधाभास आढळून येतो. जसे की शरदरावांची ख्याती शरदातल्या चांदण्याची शीतलता देण्याऐवजी ग्रीष्मातली दाहकता देण्यासाठी आहे. नाव जरी देवेंद्र असले तरी ‘नाथां’भाऊंपासून लोकांच्या मनातील मुख्यमंत्री समजल्या जाणाऱ्या पंकजा मुंढे ताईपर्यंत सर्वच देवेंद्रांना आपल्या वाग्बाणांनी बेजार करीत असतात. तेव्हा निर्मलाबाई या आपले निर्मल मत मांडतील ही अपेक्षा ठेवणेच चुकीचे होते. त्यात निर्मलाबाई अर्थ राज्यमंत्री असून वाणिज्य उद्योग खात्याचा स्वतंत्र कारभार त्यांच्याकडे आहे. तसेच निवडणुका होण्याआधी भारतीय जनता पक्षाच्या त्या सहा प्रमुख पक्ष प्रवक्त्यांपैकी एक होत्या. त्यामुळे डॉक्टरांच्या वक्तव्याला निर्मला सीतारामन यांनी उत्तर देणे क्रमप्राप्तच होते. म्हणून डॉक्टरांच्या शब्दांची निवड चुकली असे निर्मलाबाईंना वाटणे साहजिकच आहे.’’

‘‘डॉक्टर व निर्मला सीतारामन यांच्यातील वादाला आणखी एक वेगळी पाश्र्वभूमी आहे. केंद्र सरकारच्या सांख्यिकी खात्याने ‘जीडीपी’ अर्थात स्थूल राष्ट्रीय उत्पादन मोजण्याच्या सूत्रात जो बदल केला तो बदल अनेकांना सुसंगत वाटत नाही. तसा रिझव्‍‌र्ह बँकेलासुद्धा वाटत नाही. साहजिकच रिझव्‍‌र्ह बँक व केंद्र सरकारच्या ‘जीडीपी’वाढीचा दर वेगवेगळा आहे. जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असे बिरुद धारण करणारी आपली अर्थव्यवस्था खरोखर  ७-७.५% दराने वाढत आहे का, की अर्थव्यवस्था ६-६.५०% दरानेच    वाढत असून वाढ मोजण्याच्या सूत्रात केलेल्या बदलामुळे ‘अर्थवृद्धीचा आभास’ निर्माण केला जात आहे याबाबत साशंकता आहे. तसेच चीनची अर्थगती संथ झाल्यामुळे हा मान भारताला लाभला आहे व अर्थव्यवस्था वाढीचा दर ही सरकारची हातचलाखी आहे असे मानणाऱ्या अर्थतज्ज्ञांचा मोठा वर्ग जगात आहे. डॉक्टर या वर्गाचे प्रतिनिधित्व करतात,’’ राजा म्हणाला.

‘‘दुसरी गोष्ट अशी की भारताची अर्थ परिमाणे सकारात्मक होण्यात सरकारी धोरणांपेक्षा सरकारचे नियंत्रण नसलेल्या घटकांचा अधिक हात आहे. कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यामुळे व सरकारने इंधानावरच्या अबकारी करात वाढ केल्यामुळे अनुदानात मोठी बचत झाली. साहजिकच परराष्ट्र व्यापारातील तूट व चालू खात्यावरील तूट आटोक्यात राहिली. रुपयाचे डॉलरसोबतचे विनिमय मूल्य अपेक्षेपेक्षा कमी घसरले. सतत १५ महिन्यांपासून निर्यातीत होणारी घसरण वाढत्या अनुत्पादित कर्जाचा विळखा स्थापित क्षमतेच्या केवळ ३५-४०% पातळीवर होणारे औद्य्ोगिक उत्पादन वित्तीय सुधारणांना होणाऱ्या विलंबाचे सरकारचे अपयश हे सर्व असूनही वित्तीय परिमाणे सकारात्मक आहेत व याचे श्रेय सरकारचे आहे असे सरकारमधील काही जणांचे मानणे असल्याने सीतारामन यांना डॉक्टरांचे शब्द झोंबणे साहजिकच आहे,’’ राजाने खुलासा केला.

तथापि राजा पुढे म्हणाला, ‘‘सरकारची सर्वच धोरणे योग्य आहेत असे नव्हे, सरकारला वित्तीय सुधारणांचा कार्यक्रम राबविण्यासाठी अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. निर्मलाबाईंनी डॉक्टरांच्या शब्दांची निवड योग्य की अयोग्य ठरविण्यापेक्षा सरकारला अजून काय काय करता येईल याचा विचार करणे योग्य ठरेल.’’ अशा तऱ्हेने राजाचे मौन भंगल्यामुळे वेताळ शवासहित गायब झाला आणि झाडावर जाऊन बसला.

 गाजराची पुंगी
gajrachipungi@gmail.com