डीसीबी बँक म्हणजे पूर्वाश्रमीची डेव्हलपमेंट क्रेडिट बँक. आगा खान फंड फॉर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हा विश्वस्तांकडून ती प्रवर्तित झाली आहे. ही काही मोठी बँक वगरे नसली तरी १९३० पासून अस्तित्वात असलेली ही खासगी बँक गेली काही वष्रे बऱ्यापकी प्रगतिपथावर आहे. गेल्या तीन वर्षांत बँकेच्या कर्जवाटपात दुप्पट वाढ झाली आहे. बँकेचे जून २०१४ साठी जाहीर झालेले आíथक निष्कर्षदेखील अपेक्षेप्रमाणेच आहेत. गतवर्षीच्या तुलनेत नक्त व्याज उत्पन्नात ३१% वाढ होऊन ते ८२.८८ कोटींवरून १०८.३७ कोटींवर गेले आहे, तर ढोबळ नफाही ५८.२५%ने वाढून ५१.३३ कोटींवरून ८१.२३ कोटींवर गेला आहे. महाराष्ट्राखेरीज आंध्र प्रदेश आणि गुजरात या राज्यात व्यवसाय असणारी ही बँक येत्या वर्षभरात आपली सेवा विस्तार करीत असून त्याकरिता इतर राज्यांत म्हणजे मध्य प्रदेश, ओदिशा, पंजाब आणि राजस्थान येथे नवीन शाखा उघडण्याच्या बेतात आहे. त्यामुळे शाखांची संख्या १३४ वरून १८५ पर्यंत वाढणार आहे. येत्या दोन वर्षांत बँकेच्या अनुत्पादित कर्जातदेखील घट होऊन ती ०.९१% वरून ०.६०% पर्यंत येतील अशी अपेक्षा आहे. सध्या मिड कॅप शेअर्स पुन्हा आपटी खाऊन १५-२०% खाली आले आहेत. याचाच फायदा घेऊन गुंतवणूकदारांनी असे चांगले शेअर्स दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी खरेदी करून ठेवावेत. सध्या ८० रुपयांच्या आसपास असलेला हा शेअर आगामी १८ महिन्यांत तुम्हाला ५०% परतावा देऊ शकेल.