गुंतवणूक आणि गुंतवणूकदारांचे करदायित्व हा दुर्लक्षित पण मूलभूत धागा मजबूत करण्यास चालना देणारे सदर
बेंजामिन फ्रँकलीन या जगप्रसिद्ध तत्त्ववेत्त्याने वर्तवलेलं एक वाक्य आहे- ‘या जगात दोनच गोष्टी अटळ आहेत- मृत्यू आणि कर!’ पण मृत्यू अटळ असेल, कर अटळ असेल तर पुढे जाऊन असं नक्की म्हणता म्हणता येईल की कर वाचविणे हेही तितकेच अटळ (आणि शक्य) आहे. प्राप्तिकर भरणाऱ्या व्यक्तींमध्ये व्यावसायिक व्यक्तींबरोबरच पगारदार व्यक्ती, सेवानिवृत्त व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांचासुद्धा मोठा वर्ग आहे. प्राप्तिकरामुळे एकूण उत्पन्नातील काही भाग कमी होत असल्याने त्याला जबाबदार असणारा प्राप्तिकर कायदा हा माझा शत्रू आहे अशी भावना काही प्राप्तिकरदात्यांमध्ये आढळते. त्यामुळे प्राप्तिकर कायद्याविषयी एक प्रकारे पूर्वग्रह निर्माण होऊन त्याविषयी माहिती घेण्यास सर्वसामान्य जनता फारशी उत्सुक नसते. ‘प्राप्तिकर कायदा समजून घेणे हा आपला प्रांत नाही, ते खूप किचकट काम आहे, माझा टॅक्स सल्लागार काय ते पाहून घेईल’ अशी विधाने प्राप्तिकरदात्यांकडून ऐकायला मिळतात. पण त्यामुळे आपण आपल्या आर्थिक नियोजनाला/ प्राप्तिकर नियोजनाला योग्य दिशा देऊ शकत नाही. खरं म्हणजे या प्राप्तिकर कायद्यामध्ये प्राप्तिकर वाचविण्यासाठी अनेक कलमं आणि तरतुदी आहेत. या कायद्यालाच ‘काय द्याल?’ म्हणजे प्राप्तिकर वाचण्याच्या दृष्टीने कायद्यात असा सवाल केलात तर प्राप्तिकर वाचवण्यासाठी तुमच्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांना उत्तरं सापडतील.
वाढती महागाई, रुपयाची घटती क्रयशक्ती आणि वाढते खर्च पाहता प्रत्येक रुपया वाचवणं हे येणाऱ्या भविष्यकाळात महत्त्वाचे ठरणार आहे. कर बचतीच्या रूपात पैसा वाचवणं म्हणजे पैसा मिळवण्यासारखंच आहे. म्हटलंच आहे ना ‘Rupee Saved Is Rupee Earnedl आणि म्हणूनच गुंतवणूक नियोजनाबरोबर प्राप्तिकर नियोजन करणे हेही  तितकेच महत्त्वाचे!
दरवर्षी २८ फेब्रुवारीला आपल्या देशाचे अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करतात. या अर्थसंकल्पात प्राप्तिकर कायद्याविषयी नव्याने कोणत्या तरतुदी करण्यात आल्या आहेत याविषयी सामान्य गुंतवणूकदार, पगारदार व्यक्ती, व्यावसायिक व्यक्ती इ. सर्वानाच कुतूहल वाटणे साहजिक आहे. पण ‘करमुक्त उत्पन्नाची मर्यादा कितीने वाढली? ८०सी मध्ये मिळणाऱ्या वजावटीमध्ये वाढ  झाली का? करांच्या दरांमध्ये काही अनुकूल बदल झाला का? इ. तरतुदीच पाहिल्या जातात. या तरतुदी महत्त्वाच्या नाहीत असं नाही, पण प्राप्तिकर नियोजनाचा आवाका या तरतुदींपेक्षा खूप मोठा आहे. तेव्हा प्राप्तिकरदात्यांनी केवळ याच दोन-चार तरतुदींचा विचार करून प्राप्तिकर वाचेल की नाही हे पाहू नये. या पलीकडे जाऊन अनेक कलमांचा/ तरतुदींचा खुशीने उपयोग करून जास्तीत जास्त कर वाचवावा, पण त्यासाठी प्राप्तिकर नियोजनाविषयी स्वत:हून माहिती घेऊन ती अमलात आणणे गरजेचे आहे.
प्राप्तिकर नियोजनाचा उपदेश केवळ प्राप्तिकर वाचवण्यापुरताच मर्यादित नसून, त्याचबरोबर  करपश्चात जास्तीत जास्त उत्पन्न मिळवणे आणि आपल्या नावे भांडवल तयार करणे हा आहे. कर चुकविणे किंवा उत्पन्न कमी दाखवून कर भरण्याचे टाळणे या गोष्टी प्राप्तिकर नियोजनामध्ये कधीच येत नाहीत.
प्राप्तिकर कायद्यानुसार ‘उत्पन्न’ या संज्ञेमध्ये खालील गोष्टींचा अंतर्भाव होतो.
१) पगारातून मिळणारे उत्पन्न
२) घरापासून मिळणारे उत्पन्न
३) भांडवली नफा
४) व्यवसाय/ उद्योग यामधून मिळणारे उत्पन्न
५) इतर उत्पन्न
या प्रत्येक स्त्रोतातून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर वाचवण्याच्या दृष्टीने कोणती कलमं/ तरतुदी आहेत याविषयी आपण या स्तंभातून माहिती घेणार आहोत.
तूर्तास प्राप्तिकर नियोजनाविषयी तीन मुख्य नियम या ठिकाणी मांडत आहे.
१) कर वजावटी आणि रिबेट यांचा पूर्ण लाभ घ्या.
२) जास्तीत जास्त करमुक्त उत्पन्न मिळवा.
३) करपात्र उत्पन्नाची कुटुंबातील व्यक्तींमध्येच विभागणी करा.
प्राप्तिकर नियोजनाचे काही फायदे-
१) सर्वात मोठा फायदा म्हणजे कायद्यानुसार प्राप्तिकर वाचतो.
२)  वाचलेल्या प्राप्तिकरामुळे जी बचत होईल ती योग्य ठिकाणी गुंतवून तुम्ही अधिक उत्पन्न मिळवू शकाल.
३) वाचलेला पैसा कुटुंबातील व्यक्तींच्या कल्याणासाठी वापरता येईल.
४) प्राप्तिकरविषयक कागदपत्रे कायद्यानुसार तयार राहातील, जी तुम्हाला कर्ज वगैरे घेण्यासाठी किंवा व्हिसा मिळवण्यासाठी उपयोगी येतील.
‘कराग्रे वसती लक्ष्मी, करमध्ये सरस्वती।
करमूलेतू गोविंदम्, प्रभाते-कर दर्शनम्।।’
हा श्लोक तुमच्या परिचयाचा आहे. आपल्या दोन्ही हातांनी आपण कष्ट करून पै पैसा मिळवतो. आपल्या या दोन्ही हातांमध्ये लक्ष्मी आणि सरस्वती वास करतात आणि म्हणून सकाळी उठल्या उठल्या दिनचर्या सुरू करण्यापूर्वी प्रत्येकाने हा श्लोक म्हणून आपल्या हातांचे दर्शन घ्यावे असा या श्लोकाचा मथितार्थ! ज्या योगे आपण जे कष्ट कराल, त्याला सरस्वती आणि लक्ष्मी यांचा आशीर्वाद लाभून तुमच्या घरात धनसंपत्ती कायम येत राहील. पण पुढे जाऊन ‘करा’ग्रे वसतेकर म्हणजे प्राप्तिकर हा आपल्या हातांच्या मुठीत ठेवून म्हणजेच प्राप्तिकर कायदेशीररीत्या वाचवून बचत कशी करता येईल या संदर्भात प्राप्तिकर कायद्यातील कायदेशीर पळवाटांची आपण माहिती घेऊया.
(लेखक गुंतवणूक समुपदेशक आहेत.)