म्युच्युअल फंडांनी ‘डायरेक्ट प्लान’ विकावे यासाठी ‘सेबी’ आग्रही असताना केवळ डायरेक्ट प्लान विकणाऱ्या एका फंडाने ‘रेग्युलर प्लान’ सुरू करणे दखल घेण्याजोगे निश्चितच ठरते.

म्युच्युअल फंडासाठी मालमत्ता स्पर्धा तीव्र होत आहे. एकूण मालमत्तेत पहिला क्रमांक मिळविल्यानंतर आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाला ज्या काही कोलांटय़ाउडय़ा मारायला लागत आहेत त्या पाहता मालमत्ता व्यवस्थापन उद्योगातील स्पर्धेची तीव्रता लक्षात येते. गुंतवणुकीसाठी कायम खुल्या असणाऱ्या व अव्वल परतावा देणाऱ्या अनेक योजना पदरी असूनही मालमत्तेच्या स्पर्धेत पहिला क्रमांक मिळविण्यासाठी अनेक तीन वर्षांच्या मुदतबंद योजनांची शृंखला आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाने सादर केली. या योजनांची मुदतपूर्ती होत असल्याने आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाकडून दोन वर्षांच्या मुदतबंद योजना सादर होत आहेत. या मुदतबंद योजनांच्या गुंतवणुकीतून झालेला नफा काढून घेऊन खुल्या योजनेत गुंतविणे योग्य असताना हा फंड आता दोन वर्षे मुदतीच्या योजनांतून पैसे गुंतविण्यासाठी आर्जव करीत आहे. हे सर्व मालमत्तेच्या स्पर्धेत टिकण्यासाठी होत असल्याचे लक्षात येते.

मालमत्तेच्या स्पर्धेत टिकण्यासाठी आणखी एका म्युच्युअल फंडाने मारलेल्या कोलांटीउडीची दखल घेणे प्राप्त आहे. क्वांटम म्युच्युअल फंडाला मालमत्तेच्या स्पर्धेत मागे पडत चालल्याचे लक्षात आल्यावर आपली धोरणे बदलण्याची आवश्यकता या म्युच्युअल फंडाला भासली असावी. देशातील पहिला व फक्त ‘डायरेक्ट प्लान विकणारा म्युच्युअल फंड’ असे बिरुद मिरविणारा हा म्युच्युअल फंड १ एप्रिल २०१७ पासून ‘रेग्युलर प्लान’ सुरू करीत आहे. रेग्युलर प्लान सुरू केल्यामुळे वितरक क्वांटम म्युच्युअल फंडाच्या योजनांची शिफारस गुंतवणूकदारांना करतील अशी आशा क्वांटम म्युच्युअल फंडाला वाटत असावी. एखादे उत्पादन यशस्वी होण्यासाठी उत्पादनाचा दर्जा चांगला असून चालत नाही तर मार्केटिंगसुद्धा चांगले असावे लागते. म्युच्युअल फंड आपले ‘डायरेक्ट प्लान’ गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचवीत नसल्याबद्दल सेबी म्युच्युअल फंडांना धारेवर धरत असतानाच क्वांटम म्युच्युअल फंडाला मालमत्तेच्या स्पर्धेत मागे पडल्याने रेग्युलर प्लान उपलब्ध करून द्यावे लागल्याने याची नोंद घेणे गरजेचे आहे. मी नाही त्यातली कडी लावते आतली या म्हणीप्रमाणे क्वांटम म्युच्युअल फंडाचे वर्तन आहे. ज्यांची आपल्या ‘पाथ टू प्रॉफिट’ या म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांशी संवाद साधणाऱ्या कार्यक्रमात यथेच्छ टवाळी केली. प्रत्येक कार्यक्रमात डायरेक्ट प्लान कसे चांगले हे गुंतवणूकदारांच्या मनावर ठसविले. त्या म्युच्युअल फंड वितरकांना लोटांगण घालावे लागले. याचे कारण नियंत्रणाखाली मालमत्ता हेच कारण आहे. विक्री अधिकाऱ्यांची सर्वात मोठी तैनाती फौज पदरी बाळगणाऱ्या या म्युच्युअल फंडाला या तैनाती फौजेचा फोलपणा दिसून आला. ही तैनाती फौज स्थापनेपासून केवळ १० हजार कोटी मालमत्ता जमवू शकली. देशात आज म्युच्युअल फंड उद्योगाची वाढ जोमाने होत आहे. सेबीच्या संचालक मंडळाच्या ताज्या बैठकीत अर्थमंत्र्यांनी त्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत.

आज म्युच्युअल फंडाची बाजारपेठ विस्तारत असताना या स्पर्धेत मागे पडत असल्याची जाणीव क्वांटम म्युच्युअल फंडाला झाली आहे. नियंत्रणाखालील मालमत्ता वाढवायची असेल तर क्वांटम म्युच्युअल फंडाच्या योजना कोणीतरी विकणे भाग होते. यांची तैनाती फौजेला देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचणे शक्य नाही म्हणून ज्यांना आजपर्यंत अस्पृश्य मानले त्या म्युच्युअल फंड वितरकांच्या मांडीवर जाऊन बसावे लागण्याशिवाय यांना पर्याय नव्हता. म्युच्युअल फंड वितरकांना ज्यांचे फंड विकायचे त्या म्युच्युअल फंडांकडे आपली नोंदणी करणे आवश्यक असते. ज्यांची टवाळी केली त्या म्युच्युअल फंड वितरकांच्या दाराशी आमचे विक्रेते व्हा आणि आमचे फंड विका असे म्हणत क्वांटम म्युच्युअल फंडाची तैनाती फौज म्युच्युअल फंड वितरकांच्या दाराशी खेटे घालेल. पारदर्शकता या शब्दाचा मोह केवळ राजकीय पक्षांना असतो असे नव्हे तर यांनासुद्धा आपली चूक कबूल करायला या शब्दाचा आधार घ्यावा लागला. यांना पारदर्शकतेची इतकी हौस होती तर वितरकांना कमिशन देऊन त्यांची माहिती गुंतवणूकदारांना द्यायला सेबीने मुळीच बंदी घातली नव्हती. आज दरमहा सरासरी ३० हजार कोटी सिपच्या माध्यमातून गुंतवणूकदारांच्या बचतीचे पैसे म्युच्युअल फंड उद्योगात गुंतविले जात आहेत. असे असताना यांचा वाटा नगण्य असल्याचे मान्य करण्याऐवजी भलतीच कारणे दिली जात आहेत. ‘आम्ही मालमत्तेच्या स्पर्धेत नाही परंतु विक्रेत्यांना किती कमिशन दिले जाते यात पारदर्शकता आली असल्याने आम्ही रेग्युलर प्लान १ एप्रिलपासून सुरू करीत आहोत,’ असे यांनी सांगितले. यांना वितरकांचे वावडे असल्याने यांच्या योजना वितरक विकत नव्हते. आता डायरेक्ट प्लानच्या जोडीला रेग्युलर प्लान सुरू झाल्याने म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना चांगल्या योजना वितरकांच्या माध्यमातून उपलब्ध होतील. म्युच्युअल फंडांनी डायरेक्ट प्लान विकावे यासाठी सेबी आग्रही असताना केवळ डायरेक्ट प्लान विकणाऱ्या म्युच्युअल फंडाने रेग्युलर प्लान सुरू करणे हे म्हणूनच दखल घेण्याजोगे ठरते.