आतापर्यंतच्या लेखांमधून विकल्पांचे अनेक डावपेच व ते डावपेच कसे वापरावेत हे आपण पाहिले. मागील लेखांमध्ये ज्याचा अनेकवार उल्लेख आला आहे, ते म्हणजे सर्वसामान्य लोकांना या बाजारात पसा कमावणे अवघड बाब आहे. त्यामुळे लोक या बाजाराबाबत लवकरच निराश होतात व शेअर बाजार हा जुगार आहे अशी उपरती सुचून चार हात दूर राहतात.
त्या उलट या स्तंभात सुचविलेल्या विकल्पांच्या डावपेचांवर विश्वास ठेऊन जनसामान्यांनी या शेअर बाजारातून यथाशक्ती अर्थलाभ करावा असे मत सुरुवातीपासून मांडण्यात आले आहे. डावपेच वापरून लाखाचे महिन्यांत दोन लाख होणार नाहीत याची मला जाणीव आहे. तशी आसही धोक्याचीच! पण मुद्दल सुरक्षित ठेऊन ३-४ टक्के महिन्याकाठी नफा मिळवणे सहज शक्य आहे. त्यासाठी अनेक डावपेच या अभ्यासवर्गात आपण शिकलो. आणखीही डावपेच आपणास शिकायचे आहेत.
आज तांत्रिक विश्लेषणाच्या मर्यादा समजून घेऊन त्यापासून आपण कसे सुरक्षित राहावे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
तांत्रिक विश्लेषणामध्ये सर्वात लोकप्रिय निर्देशक (Indicators) म्हणजे मूिव्हग अ‍ॅव्हरेजेस, ऑसिलेटर्स म्हणजेच आरएसआय (RSI), स्टॉकॅस्टिक (Stochastic), आरओसी (ROC), बोिलजर बँड (Bollinger Band) वगैरे जवळपास ३५० निर्देशक आहेत. त्यानंतर अनेक सिद्धांत जसे डाऊ, एलिएट वेव्ह, फिबोनासी, जपानी कँडलस्टीक इत्यादी प्रचलित आहेत. अचानक मंदी किंवा तेजी करणारे ट्रेंड्स व त्यानंतर येणारे विविध प्रकारचे करेक्शन्स, ट्रँगल्स, हॉरिझाँटल्स, डबल टॉप, हेड व शोल्डर्स  असे शब्दप्रयोगही तुमच्या कानावर असतील.
तांत्रिक विश्लेषणाला मर्यादा आहेत. यातले अनेक  निर्देशक (Indicators) किंमतीवरून घेतलेले असल्याने किंमत पुढे व हलती सरासरी व  निर्देशक (Indicators) मागे असा प्रकार असतो. म्हणजे लॅिगग इफेक्ट असतो.
बाजारात ४०% मोठे ट्रेडर्स, ऑंपरेटर्स, विदेशी वित्तसंस्था (एफआयआय), देशी वित्तसंस्था (डीआयआय)  इत्यादी मंडळीं अल्गो ट्रेिडग सिस्टीम्सवर काम करतात. त्यांच्याकडे चोख व तत्पर संगणक प्रणाली असते व ही सर्व मंडळी हेजिंगचा वापर करत असतात. त्या उलट त्यांना सामान्यांची धोका पत्करण्याची कुवत माहित असते. म्हणून तांत्रिक विश्लेषणावर विसंबून पसे कमावता येत नाहीत.

तांत्रिक विश्लेषणाचा सर्वात मोठा नकारात्मक पैलू म्हणजे विश्लेषणाचा कालावधी (Time Frame) होय.
प्रत्येक दिवसागणिक शेअर्सच्या किमतीच्या हालचालीचा तक्ता बघितला व ट्रेंड, मूिव्हग अ‍ॅव्हरेजेस, ऑसिलेटर्स इत्यादीचा अभ्यास केला असता एक कल अंदाजता येतो. मात्र एका मिनिटानुसार किंवा तासानुसार होणाऱ्या कोटय़वधी व्यवहारांअंती शेअर्सच्या किमतीच्या हालचालीचा तक्ता बघितला आणि ट्रेंड , मूिव्हग अ‍ॅव्हरेजेस, ऑसिलेटर्स इत्यादीचा अभ्यास केला असता त्या अगदी नेमका विरूद्ध कलही दिसून येतो. थोडक्यात तांत्रिक विश्लेषणाच्या अभ्यासावरून आपली दिशाभूल होण्याची शक्यता असते.
विरामभंग (Breakouts):
विरामभंग (Breakouts) हा बाजारातील सर्वात आवडता सिद्धांत. विरामभंग म्हणजे शेअर्स किंवा बाजाराने थोडी विश्रांती घेतल्यानंतर म्हणजे, दृढीकरणासाठी तो विसावल्यानंतर मोठय़ा वेगाने अवरोध बिंदू किंवा आधार पातळी तोडून त्याने खाली वा वर असे एका दिशेने जाणे होय.
मग सामान्य लोक विरामभंगाच्या दिशेने म्हणजे बाजाराच्या दिशेने खरेदी किंवा विक्री करतात. प्रत्येक व्यक्ती आपापल्या कौशल्याने किंवा बुद्धीप्रमाणे अभ्यास करतो व विरामभंग बिंदू निश्चित करतो. बाजारातल्या दिग्गज व चाणाक्ष मंडळीना सामान्य लोक कोणते बिंदू गृहीत धरून व्यवहार करतील याचा अंदाज अगोदरच आलेला असतो व त्यांना सामान्य लोकांसाठी सापळा सहज रचता येतो. त्यामुळे हा बिंदू फसवा असतो हे आपण लक्षात घ्यावे.
बिंदूच्या वर किंमत गेली की वरच्या दिशेने तेजीचा ब्रेकआउट झाला असे समजून लोक खरेदी करायला सुरवात करतात. पण नेमके त्याच वेळी भाव पडायला सुरुवात होते किंवा त्या बिंदूच्या खाली किंमत गेली की खालचा ब्रेकआउट झाला असे समजून लोक विक्री करायला सुरुवात करतात पण भाव वर जायला सुरुवात होते. व त्यांची तोटा सहन करण्याची शक्ती कमी असल्याने ते तोटा घेऊन बाहेर पडतात .
शेअर्सने दिशात्मक चलत सरासरी पार (Crossover) केली की ब्रेकआउट, लहान चलत सरासरीने मोठय़ा हलत्या सरासरीला पार केले की ब्रेकआउट, किंमतीने ट्रँगल (Trangle) तोडणे, मागील उच्चांक वा नीचांक पातळी तोडणे, आधार (support) , अवरोध (resistance) तोडणे, फिबोनासी सिद्धांताच्या विविध पातळ्या तोडणे. इत्यादी हे सर्व ब्रेकआउटच्या प्रकारामध्ये मोडतात व असे समजण्यात येते की बाजार ब्रेकआउट झाल्यानंतर मोठय़ा प्रमाणात त्याच दिशेने धावेल.
बऱ्याच वाचकांचाही अनुभव असेल की, ते जेव्हा शेअर्स खरेदी करतात नेमके त्यानंतरच बाजार पडायला लागतो व जेव्हा शेअर्स विकतात नेमके त्यानंतरच बाजार किंवा तो शेअर्स वाढायला लागतो.
ऐतिहसिक उच्च पातळी तोडून शेअर वर गेला की खरेदी करावी असा विचार अनेक लोक करतात. परंतु हा सापळा असू शकतो त्यामुळेच वाचकांनी कोणत्याही पद्धतीने खरेदी विक्री केली तरी धोका रोधक (Stop Loss) पातळीचे जरूर पालन करावे.
दीर्घ मुदतीसाठी खरेदी विक्री करणारे गुंतवणूकदार २०० डीएमए म्हणजे २०० दिवसाची चलत सरासरी पातळीचा अभ्यास करतात व शेअर्सच्या किमतीने जर २०० डीएमएला खालून वरच्या दिशेने तोडले असता बाजार वर जाईल म्हणजे दीर्घकालीन तेजी येईल असे समजतात किंवा शेअरच्या किमतीने २०० डीएमएला वरून खालील दिशेला तोडल्यास बाजार मंदीचा आहे असे समजून शेअर्स विकावे असा मतप्रवाह बाजारात प्रचलित आहे.
आता हा समज किती बरोबर आहे हे पाहूया.
आपल्याला हे लक्षात आले असेल की निफ्टी या निर्देशांकाने अनेक वेळा २०० डीएमएचा ब्रेकआउट देऊन फसवे अंदाज दिले आहेत.
शेअरच्या किमतीने ऐतिहासिक उच्च पातळी वरच्या दिशेने खालून उसळी मारत तोडली की शेअर वर जाईल असा समज अनेक लोकांचा व बाजारामध्ये व्यवहार करणाऱ्या सर्वामध्ये प्रचलित आहे. हा समजही किती बरोबर आहे हे पाहूया.
आपल्याला हे लक्षात आले असेल की आयटीसीने जेव्हा जेव्हा ऐतिहासिक पातळी वरच्या दिशेने तोडली व सामान्य लोकांनी ब्रेकआउटच्या संकल्पनेवर विश्वास ठेऊन खरेदी केली ते सगळे त्या सापळ्यात अडकले. कारण त्यानंतर फार वेगाने आयटीसीचे भाव खाली आले. म्हणजेच हा ब्रेकआउट प्रकार किती फसवा आहे हे लक्षात यावे.
यावर उपाय काय? असा स्वाभाविक प्रश्न आपल्यासमोर उपस्थित होईल. त्याचे साधे उत्तर म्हणजे – आपण विकल्पांचा व्यवस्थित अभ्यास करावा व विकल्पांचे डावपेच घ्यावेत.
जर दिशात्मक नग्न फ्युचर्स किंवा कॉल व पुट घ्यायचे असतील तर कोणत्याही परिस्थितीत आपण खालील तीन प्रश्नांची उत्तरे शोधली पाहिजेत व त्यांची उत्तरे सकारात्मक असतील तरच व्यवहार करावा.
१) मी घेत असलेल्या ट्रेडचा पवित्रा समर्थनीय असला पाहिजे व माझा ट्रेड फायदेशीर होईल याची शक्यता जास्तीत जास्त असली पाहिजे.
२) माझी धोका रोधक (Stop Loss) पातळी कमीत कमी असली पाहिजे.
३) माझा अंदाजित नफा माझ्या तोट्याच्या कमीतकमी दुप्पट असला पाहिजे.        (क्रमश:)
info@primetechnicals.com