१९८९ मध्ये सविता गौडा यांनी स्थापन केलेली ही कंपनी ‘अ‍ॅक्टिव्ह फार्मा इनग्रेडिंट्स (एपीआय)’च्या उत्पादन आणि वितरणात आहे. गेल्या २५ वर्षांत कंपनीने देहारादूनखेरिज महाराष्ट्रातील तळोजा येथेही उत्पादन सुरू केले आहे. शेरॉन बायोच्या उत्पादनांना भारताखेरिज लॅटिन अमेरिका, दक्षिण पूर्व आशिया, आखाती देश तसेच सार्क देशांतूनही मागणी आहे. याखेरिज येत्या दोन वर्षांत जपान, यूरोप आणि अमेरिका येथेही वितरण करण्याची कंपनीची मनिषा असल्याने कंपनीने नुकताच विस्तारीकरणाचा कार्यक्रम राबवला. सुमारे १२५ कोटी रुपयांच्या या विस्तारीकरणामुळे देहारादून येथील उत्पादन क्षमता दुपटीपेक्षा जास्त वाढणार असून तळोजा येथील उत्पादनातही सुमारे ५०% वाढ होईल. शेरॉन बायो सध्या अ‍ॅण्टी अल्सर्स, हृदयरोग तसेच कॅन्सर अशा आजारांसाठी ‘एपीआय’मध्ये संशोधन करत आहे. दोन महिन्यांपूर्वीच आपल्या भागधारकाना बक्षीसी समभाग देणाऱ्या या कंपनीने आपल्या समभागांचेही विभाजन करून दर्शनी मूल्य २ रुपये केले. परिणामी शेअर बाजारातील समभागांची द्रवणीयता वाढली आहे. डिसेंबर २०१३ साठी संपलेल्या तिमाहीत कंपनीने उलाढालीत ३५% वाढ करून दाखवली. तर नक्त नफ्यातही ३०% वाढ होऊन तो १७.१ कोटी रुपयांवर गेला आहे. उत्पादनाची वाढती मागणी आणि त्याला पूरक अशी उत्पादनक्षमता वाढविल्याने येत्या आíथक वर्षांत कंपनीकडून भरीव कामगिरीची अपेक्षा आहे. सध्या ४३ च्या आसपास असणारा हा शेअर येत्या एक-दोन वर्षांत ५०% परतावा मिळवून देऊ शकेल.
दोनच आठवडय़ांपूर्वी सुचविलेला जेबीएम ऑटो आता १५० रुपयांवर गेला आहे. अपेक्षेप्रमाणे किंबहुना जास्तच परतावा मिळाला असल्याने हा शेअर विकून टाकून नफा पदरात पडून घ्यायला हरकत नाही.
भरीव कामगिरीचा ‘डोस’