अनेकदा जेव्हा तरुण मंडळींची त्यांच्या आर्थिक नियोजनाच्या निमित्ताने गाठ पडते तेव्हा त्यांनी आधीच चुकीची विमा योजना घेतलेली आढळते. अशा वेळी ही मंडळी बहुतेक वेळा बचतीसाठी योजना खरेदी केली असे सांगतात. दीर्घकालीन बचतीसाठी एलआयसीची पेन्शन योजना ही अव्वल योजना आहे. दुर्दैवाने एकही असा तरुण आढळला नाही ज्याने ही योजना खरेदी केली आहे. या निमित्ताने सर्वच तरुण वाचकांना सांगावेसे वाटते तुम्ही जेव्हा जेव्हा बचत करू इच्छीता तेव्हा ‘जीवन सुरक्षा’ या योजनेचा आग्रह धरा.

आजकालच्या तरुणाईबद्दल ज्या काही गोष्टी प्रचलित आहेत, त्यात असे म्हटले जाते की, आयुष्यातला पहिला पगार मित्रमत्रिणीवर खर्च होतो; दुसरा पगार प्रेयसीवर खर्च केला जातो अन् तिसऱ्या पगारापासून बचत गुंतवणूक वगैरेला तरुणाकडून सुरुवात होते. आज ज्यांचे नियोजन जाणून घेणार त्या रोहित देव यांना यांच्या पहिल्या पगारापासूनच त्यांना एखाद्या व्यावसायिक अर्थ नियोजकाकडून त्यांचे अर्थनियोजन करून घेण्याची इच्छा होती. अर्थातच यांच्यासमोर पहिले नांव आले ते ‘लोकसत्ता- अर्थ वृत्तान्त’चे. म्हणून विचारणा करणारी त्यांची मेल आल्यावर अर्थ नियोजनासाठी लागणाऱ्या इतर माहितीसाठी संपर्क करण्यास सांगितले.   

रोहित हे २४ वर्षांचे असून त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलीकम्युनिकेशन या विद्याशाखेत बीई ही पदवी घेतली असून डिजीटल सिग्नल प्रोसेसिंग या विषयात एमई ही पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्यांचा अभ्यासक्रम जुल २०१४ मध्ये पूर्ण झाला असून पुण्यातील एका विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक पदावर ते रुजूही झाले आहेत. पदव्युत्तर पदवी परीक्षेचा अद्याप निकाल न लागल्याने त्यांना एकत्रित मासिक वेतन २४,००० रुपये मिळते. परीक्षेच्या निकालानंतर वेतनात वाढ होईल. वेतनातील काही रक्कम घरी द्यावी असे कोणतेही बंधन त्यांच्यावर नाही. पदव्युत्तर शिक्षणासाठी त्यांनी दोन लाख ५० हजार रुपयांचे शैक्षणिक कर्ज आंध्र बँकेकडून (व्याजाचा दर १४%) घेतलेले आहे. मागील दोन वष्रे त्यांचे वडील त्याचे व्याज भरत आहेत. ते आíथकदृष्ट्या स्वावलंबी असावेत इतकीच घरातील वडीलधाऱ्या मंडळींची इच्छा आहे.  त्यांचे वडील महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागात सांगली येथे सहाय्यक अधीक्षक अभियंता असून त्यांच्या नोकरीची सहा वष्रे अद्याप शिल्लक आहेत. आई गृहिणी असून धाकटा भाऊ एम टेक करीत आहे. लौकिक अर्थाने त्यांच्या वर कोणतीही कौटुंबिक जबाबदारी नाही. भविष्यात प्राध्यापकी करायची की औद्योगिक क्षेत्रात काम करायचे की डॉक्टरेट करायची हे अद्याप ठरलेले नाही. याचा निर्णय दोन वर्षांत होईल. त्यांचा घरभाडे, खानावळ, पेट्रोल वैगरेचा खर्च दहा हजार होतो. शैक्षणिक कर्ज फेड व भविष्यातील खर्चासाठी बचत ही सध्या त्यांची दोनच आर्थिकउद्दिष्टे आहेत.


रोहित देव यांना अर्थ नियोजकाचा सल्ला
रोहित यांचे सर्वप्रथम अभिनंदन करावेसे वाटते. हे सदर सुरू करण्याचा उद्देश अर्थ साक्षरता हा आहे. व या सदराचे यश हे वाचकांच्या प्रतिसादावरच अवलंबून असते. तुमच्यासारखे वाचक जेव्हा आपले नियोजन प्रसिद्ध करू देण्यास परवानगी देतात तेव्हाच इतर वाचकांची अर्थ साक्षरता होईल. आज अनेक वाचकांना आपले नियोजन करून हवे असते पण आपली ओळख प्रगट करायला हे वाचक तयार नसतात तेव्हा त्यांचे नियोजन करण्यास अडचण होते.

आज तुम्ही ज्या परिस्थितीत आहात त्या परिस्थितीतून सर्व जणच गेले आहेत. करिअरच्या सुरुवातीचा एक दोन वर्षांचा काळ सर्वासाठीच अनिश्चिततेचा असतो. याच काळात एक दोन नोकऱ्या बदलल्या जातात. आगामी दोन वष्रे थोडीशी अशाश्वत जरी असली तरी काही गोष्टी आजच निश्चित करणे जरूरीचे आहे. म्हणून दीर्घकालीन वित्तीय धोरणे आखतानाच अल्पावाधीतील उपाययोजना कुठल्या व त्यांना प्राथमिकता देणे का जरूरीचे आहे हे ठरवावे लागेल. अर्थातच आर्थिकध्येये निश्चित करताच काही गृहीतकेही ठरविणे गरजेचे ठरते. यातील पहिले गृहितक म्हणजे तुमचा पगार परीक्षेचा निकाल व या अनुषंगाने प्रशासकीय बाबींची पूर्तता होऊन  जानेवारी २०१५ पासून साधारण ५०,००० रुपये होईल (नक्की ते ठाऊक नाही हा एक अंदाज आहे) तसेच वेळोवेळी पगार वाढत जाईलच व तुमचा विवाह तुमच्या वयाच्या  २८-२९ व्या वर्षांदरम्यान होईल. पुढील पाच वर्षांचे नियोजन मुखत्वे या दोन मुद्यांवर आधारीत आहे.

पुढील दोन वष्रे थोडीशी अशाश्वत जरी असली तरी शैक्षणिक कर्ज फेड नक्की करायचीच आहे. तसेच आईवडिलांची तुमच्याकडून पसे पाठवावे अशी अपेक्षा नसली तरी त्यांचा विचार या आर्थिकनियोजनात होणारच आहे. या मुद्यांवर तुमची व नियोजकाची एक वाक्यता झाल्यावर प्रत्यक्ष नियोजनाकडे वळूया.

आजच्या घटकेला (जानेवारी २०१५ पर्यंत) तुमच्याकडे तुमचा वैयक्तिक खर्च वजा जाता दरमहा १४,००० रुपये शिल्लक राहतात. यापकी दरमहा १० हजार रुपये कर्जफेडीकरता वापरावे. कारण लवकरच तुम्ही गृहकर्ज घ्याल. तुम्ही आजपासून ३६ वष्रे कमावते राहणार आहात. विद्यमान महागाईचा दर पहाता तुम्हाला एकूण पाच कोटीच्या विम्याची जरुरी आहे. इतक्या मोठ्या रक्कमेचा विमा कोणतीही विमा कंपनी आजच देणार नाही. म्हणून हा विमा टप्याटप्याने वाढवत न्यायाचा आहे. पुढील दहा वर्षांचा विचार करून तुम्ही ३६ वष्रे मुदतीचा दोन कोटी विमा छत्र असलेला विमा खरेदी करावा. यासाठी १४,००० रुपये वार्षकि हप्ता भरावा लागेल. जानेवारी २०१५ पासून तुमचा पगार ५०,००० रुपये होईल असे गृहीत धरले तर त्यापकी २५,००० रुपये कर्ज फेड करावी. म्हणजे डिसेंबर २०१५ पर्यंत तुम्ही कर्जमुक्त व्हाल. वैयक्तिक खर्च वजा जाता तुमच्याकडे १५,००० रुपये गुंतवणूकयोग्य शिल्लक राहील. या पकी तुमच्या वडिलांनी सुचविल्यानुसार बँकेत आवर्ती ठेव खाते उघडावे व या खात्यात दरमहा ५,००० रुपये जमा करावेत. उर्वरीत ५,००० रुपये तीन म्युच्युअल फंडांच्या योजनेत गुंतवावेत. पुढील दोन वर्षांनी गुंतवणुकीचा आढावा घ्यावा. ‘जीवन सुरक्षा’ ही एलआयसीची पेन्शन योजना आहे. अनेकदा जेव्हा तुमच्या सारख्या तरुण मंडळींची त्यांच्या आर्थिकनियोजनाच्या निमित्ताने गाठ पडते तेव्हा त्यांनी आधीच चुकीची विमा योजना घेतलेली आढळते. अशा वेळी ही मंडळी बहुतेक वेळा बचतीसाठी योजना खरेदी केली असे सांगतात. दीर्घकालीन बचतीसाठी एलआयसीची पेन्शन योजना ही अव्वल योजना आहे. दुर्दैवाने एकही असा तरुण आढळला नाही ज्याने ही योजना खरेदी केली आहे. या निमित्ताने सर्वच तरुण वाचकांना सांगावेसे वाटते तुम्ही जेव्हा जेव्हा बचत करू इच्छीता तेव्हा ‘जीवन सुरक्षा’ या योजनेचा आग्रह धरा. तसेच दर वर्षी आपल्या नियोजनाचा वार्षकि आढावा घेण्यास विसरू नका.