kar-anvayमागच्या लेखात भांडवली नफ्याची मोजणी करताना तो अल्पकालीन आहे की  दीर्घकालीन हे पाहणे महत्वाचे का ठरते या विषयी माहिती घेतली आहेच. त्या संदर्भात एखाद्या व्यक्तीला वारसाहक्काने मालमत्ता म्हणजे समजा घर मिळाले असेल आणि असे घर त्याने काही काळानंतर विकले असेल तर होणाऱ्या भांडवली नफ्याविषयी एक महत्वाची तरतूद प्राप्तिकरदात्यांना माहित असणे गरजेचे वाटते. आजच्या लेखात त्याविषयी माहिती घेऊया.
एक उदाहरण घेऊनच ही महत्त्वाची तरतूद लक्षात घेऊ. श्रीनिवास पाटील यांचे वडील १४ जानेवारी २०१३ रोजी स्वर्गवासी झाले. श्रीनिवास यांना वारस म्हणून त्यांच्या वडिलांच्या मृत्युनंतर घर मिळाले. हे घर २५ एप्रिल २०१३ रोजी त्यांच्या मालकीचे झाले. श्रीनिवास यांच्या वडिलांनी हे घर २५ मार्च २००० साली १० लाख रु. किमतीला विकत घेतले होते. श्रीनिवास यांनी हे घर २५ मे २०१३ रोजी २० लाख रुपयांना विकले. श्रीनिवास यांना अल्पकालीन आणि दीर्घकालीन भांडवली नफ्याच्या बाबतीत एक महत्त्वाची तरतूद माहित नव्हती. त्यामुळे २५ एप्रिल २०१३ रोजी त्यांच्या नावावर झालेले घर दोनच महिन्यांनी २५ मे २०१३ रोजी म्हणजे तीन वर्षांच्या आत त्यांनी विकल्यामुळे झालेला भांडवली नफा अल्पकालीन समजून त्यावर ३०% (कारण ते स्वत: ३०% कराच्या दरात येत असल्याने) कर भरावा लागणार अशा (गर) समजुतीमध्ये होते. परंतु प्राप्तिकर कायद्यातील एका तरतुदीची त्यांना माहिती झाली आणि ते ताणमुक्त झाले!
वरील व्यवहारात श्रीनिवास यांना रु. तीन लाख प्राप्तिकर भरायची गोष्ट तर बाजूलाच त्यांना प्रत्यक्षात दीर्घकालीन भांडवली तोटा झाल्याचे सिद्ध झाले. हे कसे?
तर प्राप्तिकर कायद्याच्या कलम ४९(१) मधील तरतुदीनुसार एखाद्या वारसदार व्यक्तीला वारसाहक्काने जर एखादी भांडवली मालमत्ता मिळाली असेल आणि ही भांडवली मालमत्ता त्याने विकली तर भांडवली नफ्याची मोजणी करताना ती भांडवली मालमत्ता ज्या व्यक्तीकडून त्याला हस्तांतरित झाली त्या व्यक्तीच्या नावे ती भांडवली मालमत्ता किती काळ होती हा निकष लावला जातो.

वरील उदाहरणात ते घर वडिलांच्या पश्चात श्रीनिवास यांच्या नावे २५ एप्रिल २०१३ रोजी हस्तांतरित झाले. आणि त्यांनी ते घर २५ मे २०१३ ला विकले. म्हणजे श्रीनिवास यांच्या नावे ते घर दोन महिनेच होते. पण श्रीनिवास यांच्या वडिलांनी ते घर २५ मार्च २००० साली विकत घेतले होते. त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे तीन वर्षांहून अधिक काळ ते त्यांच्या नावे होते. आणि म्हणून ती भांडवली मालमत्ता (म्हणजे वरील उदाहरणात घर) अल्पकालीन धरले न जाता दीर्घकालीन धरले जाईल. आणि त्यामुळे दीर्घकालीन भांडवली नफ्याची मोजणी करताना कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्स (सीआयआय)चा फायदा मिळेल.
आता श्रीनिवास यांना दीर्घकालीन भांडवली तोटाच कसा झाला ते स्पष्ट करतो:
आíथक वर्ष १९९९-००चा सीआयआय    ३८९
आíथक वर्ष २०१३-१४चा सीआयआय    ८५२
घराची इंडेक्स कॉस्ट
१०००००० ७ ८५२/३८९ =     २१९०२३१
घराची विक्री किंमत        २००००००
वजा: घराची इंडेक्स कॉस्ट        २१९०२३१
दीर्घकालीन भांडवली तोटा        (१९०२३१)

त्यामुळे योग्य माहितीच्या अभावी तीन लाख रु. प्राप्तिकर भरणे सोडा, प्रत्यक्षात श्रीनिवास यांना दीर्घकालीन तोटाच झाला. पण इथे प्राप्तिकर नियोजन संपले नाही.. पिक्चर अभी बाकी है !
कलम ७०(३) आणि ७१ (३) नुसार हा १९०२३१ रु. इतका दीर्घकालीन भांडवली तोटा श्रीनिवास यांना त्या आíथक वर्षांत झालेल्या इतर दीर्घकालीन भांडवली नफ्याबरोबर ‘सेट-ऑफ’ करून मिळू शकतो. हे म्हणजे ‘आम के आम, गुठलीयों के भी दाम’ असे झाले. म्हणजे प्राप्तिकर वाचवण्यास पुन्हा वाव ! पण समजा त्या आíथक वर्षांत दीर्घकालीन भांडवली नफा झाला नसेल तर? अशा दीर्घकालीन भांडवली तोटयाचे काय करायचे? थांबा, थांबा पिक्चर अभीभी थोडा बाकी है! कलम ७४ नुसार असा दीर्घकालीन भांडवली तोटा पुढील आठ वर्षांत होणाऱ्या दीर्घकालीन  भांडवली नफ्याबरोबर सेट-ऑफ करण्यासाठी वापरता येतो. आणि त्या प्रमाणात प्राप्तिकर वाचू शकतो.
तेव्हा वारसा हक्काने मिळालेली भांडवली मालमत्ता विकल्यास प्राप्तिकरदात्यांनी वर नमूद केलेल्या आश्चर्यकारक पण वास्तवदर्शी आणि व्यवहारात उपयोगी अशा तरतुदीचा उपयोग करून प्राप्तिकर वाचवावा!
(लेखक प्राप्तिकर नियोजन सल्लागार dattatrayakale9@yahoo.in)