डाऊ यांनी सुरू केलेल्या ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ या वर्तमानपत्राच्या संपादकीयांतून स्वत:चे विचार मांडले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या लेखांचे संकलन करून या संकलनाच्या अभ्यासांती ‘डाऊ थियरी’चा जन्म झाला. बाजाराची वर्तणूक ही समभागाच्या किमतीचे भाकीत करण्यासाठी आधार असण्याऐवजी व्यवसायाच्या आíथक परिस्थितीचे निदर्शक असते असे डाऊ यांचे मत होते. मागील भागात ‘डाऊ थियरी’ची तीन तत्त्वे समजावून घेतली. आजच्या भागात उर्वरित तीन तत्त्वे समजावून घेऊ.
‘अ‍ॅव्हरेजेस’ने एकमेकांना पुष्टी देणे आवश्यक
डाऊ यांच्या मते प्रचलित ‘इंडस्ट्रीयल अ‍ॅव्हरेजेस’ व ‘ट्रान्सपोर्टेशन अ‍ॅव्हरेजेस’ हे दोन निर्देशांक वरच्या किंवा खालच्या परंतु एकाच दिशेने वाटचाल करणे सुसंगत आहे. त्यांच्या मते व्यवसायाची परिस्थिती सुधारत असल्यास समभागाच्या किमती वाढणारच, अर्थात विस्तारलेल्या अर्थव्यवस्थेत वाढलेले उत्पादन विकले गेले तरच नफा होणार. त्यासाठी उत्पादन ग्राहकापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. अर्थात मालाची हाताळणी वाढणे आवश्यक आहे. उत्पादन व वाहतूक या दोघांनी एकमेकांना पुष्टी देणे आवश्यक आहे. यांच्या दिशेत तफावत आढळली तर बाजाराचा कल बदलण्याची आगाऊ चिन्हे समजावीत. वाढलेल्या माल हाताळणीमुळे रेल्वेची मालकी असणाऱ्या कंपन्यांचे समभाग नफा होण्याच्या अपेक्षेने वर जाऊन ‘ट्रान्सपोर्टेशन अ‍ॅव्हरेजेस’सुद्धा वरच्या दिशेने जावयास हवा. एकाच दिशेने जाणाऱ्या निर्देशांकापकी एका निर्देशांकाने दिशा बदल केल्यास कंपन्यांच्या व्यवसायाच्या परिस्थितीत वातावरणात बदल झाला असे समजावे.
निर्देशांकाचा कल हा वाढत्या उलाढालीने सिद्ध होत असतो
डाऊचे असे म्हणणे होते की किमतीतील वरच्या दिशेचा कल हा वाढत्या उलाढालीने सिद्ध होतो किंवा जर एखाद्या शेअरची किंमत वर जात असेल तर त्या शेअरच्या उलाढालीतसुद्धा वाढ होणे गरजेचे आहे. एखाद्या शेअरची किंमत वर जाताना किंवा खाली येताना ज्या वेगाने वाढ किंवा घट होते, त्या वेगाशी सुसंगत उलाढाल असावी. डाऊचे असे मानणे होते की, असे असलेच तरच त्या शेअरबाबतचा बाजाराचा खरा दृष्टिकोन स्पष्ट होतो. कमी उलाढालीत किंमत वेगाने वर खाली होत असेल तर वर किंवा खाली जाणे हे बाजाराचे त्या शेअर किंवा निर्देशांकाबाबतचे प्रातिनिधिक मत समजता येणार नाही.
एकदा सुरू झालेला बाजाराचा कल स्पष्ट संकेत मिळेपर्यंत सुरूच असतो:
बाजाराने एकदा कलनिश्चिती केल्यानंतर स्पष्ट संकेत मिळेपर्यंत हा कल सुरूच असतो. या दरम्यानच्या काळात संशयाचा फायदा मूळ दिशेला देणे आवश्यक असते. बाजाराने खरोखरच दिशा बदल केला किंवा कसे हे जाणून घेणे कठीण असते. डाऊ यांच्या मते बाजाराचा चढता कल (तेजी) म्हणजेच किमती चढत असताना काही काळासाठी त्या घसरल्या तरी एका बिंदूपासून पुन्हा चढायला लागतात. तसेच हा बिंदूदेखील वरच्या दिशेला सरकत असतो. याला ‘हायर टॉप, हायर बॉटम’ असे म्हणतात. उतरता कल म्हणजे मंदी असताना समभागाच्या किमती कमी होताना काही काळ वरही जातात. या वर जाण्याला अडथळे निर्माण होऊन किमती पुन्हा खाली येऊ लागतात याला ‘लोअर टॉप, लोअर बॉटम’ असे म्हणतात. बाजाराने कल बदलला आहे हे तेव्हाच नक्की होते, जेव्हा तेजी असताना व मंदी असताना ऌळऌइ दिसू लागतात. या गोष्टी आलेखांमधून अधिक स्पष्ट होतात.
सचिन मुळे
sachinm67@yahoo.co.in