यूटीआय बँकिंग सेक्टर फंड हा बँका व बिगर बँकिंग वित्तीय कंपनी (एनबीएफसी) यांच्या सामाभागात गुंतवणूक करणारा फंड आहे. बँकिंग उद्योग हा अर्थव्यवस्थेशी प्रत्यक्ष निगडीत उद्योग असल्याने सुधारत असलेल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे प्रतििबब बँकिंग उद्योगात हमखास पडलेले दिसेल. सध्या सगळ्यांचाच चिंतेचा विषय बँकांची अनुत्पादित कर्जे (एनपीए) त्यावेळी इतिहासातील गोष्ट ठरलेली असेल. कर्जाची मागणी वाढेल आणि परतफेडही सुरळीत होईल. या गृहीतकाच्या आधारावर यूटीआय बँकिंग सेक्टर फंडात दीर्घकालीन गुंतवणूक करण्याची शिफारस करावी असे वाटते.

लालित नांबियार हे या फंडाचे मुख्य निधी व्यवस्थापक आहेत तर अमित प्रेमचंदानी हे सह निधी व्यवस्थापक आहेत. हा फंड खाजगी बँका, राष्ट्रीयीकृत बँका व व बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या यांच्यात गुंतवणूक करतो. एकूण निधीच्या ७५ टक्के गुंतवणूक खाजगी बँकांच्या समभागांत, २० टक्के गुंतवणूक राष्ट्रीयीकृत बँकांच्या समभागात तर चार टक्के बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांच्या समभागात तर उर्वरित रोकड सममूल्य साधनांत गुंतविली जाते.
 

बाजार मूल्याचा विचार करता ३१ ऑगस्ट २०१४ रोजीच्या गुंतवणुकीनुसार ८१ टक्के गुंतवणूक लार्ज कॅप तर उर्वरित मिड कॅप बँकांमध्ये गुंतविला गेला आहे. ३१ ऑगस्ट २०१४ रोजी या फंडाची मालमत्ता ३४८.५२ कोटी रुपये होती. गुंतवणूकदाराने ५४८ दिवसांच्या आधी केलेली गुंतवणूक काढून घेतल्यास एक टक्का निर्गमन शुल्क (एग्झिट लोड) लागू होईल. हा फंड पुढील दोन वर्षांसाठी चांगला परतावा देऊ शकेल.