‘सेक्स अ‍ॅण्ड आर्ट आर द सेम थिंग’ – पाब्लो पिकासो पिकासोच्या या विधानानंतर त्या वेळेस खळबळ उडाली होती. त्यावर खूप विविध तऱ्हेने रसिक व सर्वसामान्य माणसे व्यक्त झाली. पिकासोला काही ना काही वाद निर्माण करण्याची हौसच आहे, इथपासून ते लैंगिक संबंधांमधूनही ऊर्जा निर्माण होते, तिला चांगल्या कामाकडे वळविले की, सृजनाचा आविष्कार होतो इथपर्यंत.

एकमेकांवरील असलेल्या दृढ प्रेमाचे उन्नयन म्हणजे अंतिम टप्प्यातील लैंगिक संबंधांची पातळी असे जगभर मानले जाते. लैंगिक संबंधांविषयी आपल्याकडे फारसे बोलले जात नाही व त्यावर उघडपणे बोलणाऱ्याला बोल लावले जातात. पण हा आपल्याच म्हणजे माणसाच्या आयुष्याचा एक अविभाज्य कोन आहे, हे मात्र आपण विसरतो. आपल्याकडे तर अध्यात्माचा मार्गही इथूनच जातो, असे सांगणारे तत्त्वज्ञानही आहे. आयुष्यातील या नसíगक गोष्टीवर व्यक्त होताना आपल्याकडे अनसíगक, कृत्रिम गोष्टीच अधिक असतात.

पिकासो अशा प्रकारे व्यक्त झाला त्या वेळेस काही जणांना असे वाटले की, ही त्याची मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे आणि सतत चच्रेत राहण्याच्या उद्योगाचा एक भाग म्हणून त्याने हे विधान केले आहे.  सिग्मंड फ्रॉइडने लैंगिकतेचा संबंध माणसाच्या मनोव्यापाराशी असल्याचे सप्रमाण सिद्ध केले. काहींनी त्या थिअरीशी पाब्लोच्या विधानाचा संबंध जोडला. तर काहींच्या दृष्टीने लैंगिक संबंधांमध्ये असलेली उत्कटता, आवेग आणि अनुभूती हीच कलेमध्येदेखील असते. फक्त इथे ती कलानिर्मितीच्या संदर्भात असते. काही मानसोपचारतज्ज्ञांनी तर फ्रॉइडचीच थिअरी पुढे नेत कलाकृती साकारल्यानंतरच्या समाधानाची तुलना लैंगिक संबंधांनंतर मिळणाऱ्या उत्कट आनंदाशी केली.

जगभरात अनेक कलावंतांनी लैंगिक संबंधांचे चित्रण केले तर काहींनी नतिकतेची ढाल पुढे करत त्या कलाकृतींवर फुली मारली. काहींच्या बाबतीत मोठे वाद उभे राहिले. काहींच्या कलाकृतींची पोर्नोग्राफी म्हणून निर्भर्त्सनाही झाली. पोर्नोग्राफी आणि कलात्मकता यात एक पुसट रेषा असते अनेकदा. त्यातील कलात्मकता म्हणजे काय हे नेमके समजून घ्यायला हवे एकदा. तशी संधी आपल्याकडे फारशी मिळत नाही. ही जाणीव नेमकी व्हायची असेल तर आपल्याला डॅनिअल तळेगावकर यांची अलीकडे प्रदíशत झालेली चित्रे पाहायला हवीत.

तळेगावकर केवळ शाईचा वापर करून चित्रण करतात. कधी ते चित्रण रेखाटनाप्रमाणे असते तर कधी चित्रच. एका ठिकाणी कागदावर किंवा कॅनव्हॉसवर पेन टेकवल्यानंतर ते न उचलता रेषांआकारांतून ते रूपाकार साधतात आणि एक अप्रतिम चित्र आपल्यासमोर साकारले जाते. कधी ते रूपाकार निसर्गातील असतात तर कधी निसर्गदृश्यांमधील. कधी इमारती, कधी प्राणी तर कधी इतर काही. त्यांच्या चित्रामध्ये चित्रचौकटीचा एक चांगला विचारही असतो, असमतोलातून साधलेला. त्यात गती, लय, आवेग सारे काही जाणवण्यासारखे असते. माध्यम म्हणून ते शाईचा वापर ब्रशच्या माध्यमातून करतात त्याही वेळेस ती गती, आवेग तर कधी लय सारे काही त्यांच्या त्या फटकाऱ्यांतून जाणवतेच जाणवते.

अलीकडेच पार पडलेल्या प्रदर्शनाचे शीर्षक होते ‘फ्लेश मेल्टस् इन प्लेजर’ विषय थेट लैंगिकच होता. पण त्यातून व्यक्त झाली ती उत्कटता, आवेग आणि अनुभूती हे सारे काही केवळ आणि केवळ कलात्मकच होते. त्यातील काही चित्रांमध्ये तर एक लयकारीही सहज जाणवावी. वानगीदाखल सोबत या मालिकेतील काही चित्रे दिली आहेत. पोर्नोग्राफी आणि कलात्मकता यातील भेद या चित्रांतून नेमका पुरता स्पष्ट व्हावा, हाच उद्देश!
विनायक परब – vinayak.parab@expressindia.com
@vinayakparab