श्रीलंका आणि मलयप्रांतातून आलेला सोनमोहोर आणि शंभर टक्के देशी असा आपला बहावा.. रणरणत्या उन्हात हे दोघंही फुललेत.. पण एक फक्त सावलीपुरता आणि दुसरा बहुपयोगी..

उन्हाळ्याच्या झळा जाणवायला जेव्हा सुरुवात होते तेव्हा डोक्यात कितीतरी ‘उन्हाळा स्पेशल समीकरणं’ बनायला सुरुवात झालेली असते. उन्हाळा म्हणजे कमी पाणी, उन्हाळा म्हणजे निव्वळ घाम, उन्हाळा म्हणजे थंडगार पन्हं, उन्हाळा म्हणजे आंबा अशी ठरलेली मानवी समीकरणं तयार होत असताना निसर्गाने आपली जुनी समीकरणं आवरती घ्यायला सुरुवात केलेली असते. सावरीचे, पळसाचे लाल रंगाचे कोडे सुटले असतानाच त्याच आसमंतात पिवळ्या रंगाची समीकरणं तयार असतात. कोरडय़ा, रखरखीत रंगाच्या अस्ताव्यस्त नि कंटाळलेल्या आसमंतावर निसर्गाने पांढरे, पिवळे, हिरवे, पोपटी रंग शिंपडायला सुरुवात केलेली असते. सरत्या वसंताबरोबर या निसर्ग चित्रातला पिवळा रंग गडद झालेला सहजच जाणवून जातो. या जाणिवेला गडद करण्याचं काम आजूबाजूला काही झाडं न चुकता पार पाडत असतात. या झाडांबद्दल आपण खूप विचार करतो असं होतच नाही. थोडक्यात, ही झाडं अगदी संदीप खरे यांच्या कवितेतल्या ओळी ‘नेमस्त झाड मी आहे, मूळ फांद्या जिथल्या तिथे, पावसात हिरवा झालो, थंडीत गाळली पाने’ च्या धर्तीवर स्वतचं ॠतुचक्र साजरं करत असतात. अगदी ताजं उदाहरण म्हणून सध्या अवतीभोवती बेभान फुललेल्या पेल्टोफोरम ऊर्फ कॉपर पॉड झाडाकडे बोट दाखवता येईल.

pune leopard marathi news, shirur leopard marathi news
कोंबड्यांच्या खुराड्यात बिबट्याची मादी कैद
Video How To Clean Sticky Oil Bottle with Spoonful of Rice Remove Bad Smell and stickiness from plastic
तेलाच्या चिकट बाटलीत चमचाभर तांदूळ टाकून तर बघा; ५ मिनिटांत डाग, दुर्गंध असा करा गायब, पाहा Video
crow trapped in Dombivli
डोंबिवलीत पतंगीच्या मांजात अडकलेल्या कावळ्याची अग्निशमन जवानांकडून सुखरूप सुटका
How To Make Home Made Raw Banana Fry Or Maharastrian Style Kachya Kelyache Kaap Note Recipe
१० मिनिटांत करा ‘कच्च्या केळ्यांचे तिखट काप’; ‘ही’ चटपटीत रेसिपी लगेच नोट करा…

श्रीलंका आणि मलयप्रांतांतून आपल्याकडे आलेल्या या विदेशी झाडाने जणू आपली शहरं, उद्यानं, रस्ते काबीजच करून टाकली आहेत. बघावं तिथे सध्या हे महाराज फुलले आहेत. जिथे जिथे हे झाड फुललं, त्या त्या ठिकाणी आसमंतात एक उग्र कडूसर पण गोडसर वास दरवळत असल्याचं जाणवतं. ‘सिसालपिनिएसी’ कुटुंबातलं हे झाड आपल्या बहावा आणि कांचनचं चुलत भावंडच. हल्ली सर्रास पिवळा गुलमोहोर म्हणून ओळखलं जाणारं हे झाड वनस्पतिशास्त्राला ‘पेल्टोफोरम टेरोकारपम’ म्हणून परिचित आहे. ‘पेल्टोफोरम’ या शास्त्रीय नावाचा ग्रीक भाषेत अर्थ होतो ढाल धारण केलेला. या झाडाने ढाल केलीय असा मात्र अर्थ याला अभिप्रेत नाही. जुनी ग्रीक चित्रं पाहिली तर त्यातल्या सनिकांनी धारण केलेल्या ढालींचा आकार आणि या झाडाच्या शेंगांच्या आकारात खूप साधम्र्य आढळून येतं. या नावातलं टेरोकारपम म्हणजे ज्याच्या फळांना पंख आहेत असं झाडं. यातला काव्यात्मक भाग वगळता, ज्याच्या बिया किंवा शेंगा वाऱ्याबरोबर उडून दूर जाऊन पडतात असा व्यवहार्य अर्थ आपण घेऊया. गेल्या दोनतीन दशकांमध्ये सामाजिक वनीकरण विभागाने, महानगर पालिकांच्या वृक्षारोपण विभागाने या झाडाची बेसुमार लागवड केलीय. कमी देखभालीत प्रचंड झपाटय़ाने वाढणारा हा पानझडी वृक्ष सहज वीस मीटर्सची उंची गाठतो. आपल्या भरभक्कम खोडावर स्वतची दहा ते बारा मीटर्स परिघाच्या फांद्यांची हिरवीगार छत्री मिरवणारं हे झाड सहज कुठेही बघायला मिळतं. झाडाखाली उभं राहून ऊनसावलीचा खेळ निरखला तर या हिरव्यागार फांद्यांची सावली कातरलेली दिसते. याचं कारण याची दोन दोनच्या जोडीत असलेली हिरवीगार पानं. ही पानं थंडीत गळून जातात नि वसंताबरोबर परत पालवतात. वसंताच्या सुरुवातीस पोपटी हिरव्या रंगात आकंठ बुडालेलं हे झाड खरंच सुंदर दिसतं. या सौंदर्याला चार चांँद लावणारी त्याची ती पिवळी फुलं जरूर जवळ जाऊन पहावी अशीच असतात.

वसंताच्या आगमनाबरोबरच सोनमोहोराचं झाड अंगावर नाजूक फुलांचे पिवळेधमक दागिने मिरवायला सुरुवात करतं. ही फुलं सुटी सुटी फुलं नसून मोठा फुलोरा प्रकारात येतात. फांदीच्या जोडाकडून टोकाकडे फुलत जाणारी ही फुलं नाजूकच असतात. जवळून पाहिल्यावर या फुलांच्या डोक्यावर गंजक्या रंगाचे केस तुरे दिसतात. या फुलांचा उग्र वास परिसरात भरून राहातो. हे फुलांचे अंगभर दागिने मिरवण्याचं काम हे झाड तडक मे महिन्यापर्यंत करत राहतं. वाऱ्याच्या प्रत्येक झुळुकीबरोबर झाडाखाली या फुलांचा जणू पिवळा सडाच पडत असतो. फुलांच्या या वाडी भरण्याच्या सोहोळ्यानंतर, झाड शेंगबाळं मिरवायला सुरुवात करतं. या शेंगा साधारण पाच ते सहा सेंमी लांब असतात. या शेंगांना दोन्ही बाजूला मस्त टोकं असतात. यांच्या ताम्र रंगामुळेच यांना कॉपर पॉड असं नाव मिळालं आहे. या शेंगा पूर्ण उकलत नाहीत. पावसाळ्यात जमिनीवर पडून कुजतात नि रुजतात. यातल्या दोनतीन बियांचं वजन जास्त नसल्याने त्या वाऱ्याबरोबर सहज दूर उडतात. या बिया सहज कुठेही रुजतात नि झाड पटापट वाढतं म्हणून याला लागवडीसाठी प्राधान्य दिलं जातं. पण हे करत असताना, या परदेशी झाडाचा उपयोग आपल्या पर्यावरणाला कितपत होतो हा विचार केला तर जाणवतं की उपयोगाच्या दृष्टीने या झाडाला शून्य मार्क मिळतात. कुठलेही पक्षी यावर घरटे बनवत नाहीत. नेत्रसुखद सावली- व्यतिरिक्त सोनमोहोराचा उपयोग काहीच नाही.

सोनमोहोराच्या जोडीला आसमंतात अजून एक पिवळं गारुड फुलत असताना सहज दिसतंय. सध्या जागोजागी पिवळी झुंबर फुलताना दिसताहेत. ‘आरग्वध’ अशा संस्कृत नावाने उल्लेखलेल्या वृक्षाचं मराठी नाव कित्ती साधं नि सुंदर आहे, ‘बहावा’! आसेतू हिमाचल आढळणारं हे झाडं अगदी शंभर टक्के भारतीय आहे. ऋग्वेदात उल्लेखल्याप्रमाणे कर्णिकार नि कृतमाल म्हणजेच कानात घालता येणारा अलंकार नि ज्याला फुलांच्या माळाच येतात असं हे झाड फुललेलं पाहणं म्हणजे नेत्र सुखच आहे. महाराष्ट्राच्या पानझडी जंगलामध्ये हे झाड खूप आढळतं. इतर वेळेस बहाव्याचं हे अस्तित्व सामान्य असतं, पण जेव्हा उन्हाळ्यात याची ‘कळी खुलते’ तेव्हा रूपच पालटून जातं. खूप उंच नाही की बुटुकबंगणही नाही, मध्यम चणीचं नि साधंसुधं झाड आपल्या कशाही वाढलेल्या फांद्या नि त्यातच लोंबकळणाऱ्या त्याच्या रबरी नळ्यांसारख्या शेंगा घेऊन उभं बघितल्यावर मला पोरांचं लटांबर बाळगणाऱ्या एखाद्या लेकुरवाळ्या बाईचीच आठवण येते. वनस्पतिशास्त्र सांगतं की बहाव्याचं शास्त्रीय नाव आहे क्यॅशिया दिफश्चुला. िहदीत याला अमलताश म्हणतात. मला आठवतंय की डेहेराडूनला होस्टेलच्या स्टडी भागातून एक खूप सुंदर बहावा फुललेला दिसायचा नि त्याच्या फुलांचा रंग पूर्ण पांढरा असायचा. ही फुलं पांढरी का, हे विचारल्यावर मला कळलं की बहाव्याचे सहासात प्रकार आपल्याकडे मिळतात. एकाची फुलं पांढरी येतात नि उरलेली पिवळी. ‘सिसालपिनिएसी’ कुटुंबाचा सदस्य असलेले हे झाड अति पावसाव्यतिरिक्त कुठल्याही प्रकारच्या जमिनीत जगतं, रुजतं.

बहाव्याबद्दल बोलताना मनात फक्त वाहवा! एवढाच शब्द येतो. याचं वर्णन करायला गेलं तर इथे रकानेच्या रकाने भरतील. बहाव्याच्या प्रत्येक भागाचा, मग ते फूल असो, पान असो की शेंग, शंभर टक्के उपयोग आहेच. या झाडाचा फुलण्याचा सोहळा उन्हाळ्यात सुरू होतो. हिरवी पाने जाऊन नवी कोवळी पालवी येत असतानाच पांढरी पिवळी नि हिरवट झाक असलेली टपोरी गोल गोल फुलं घोसात यायला लागतात. अचानक रखरखीत भुरकट, मातकट नि हिरवट आसमंतात हे सामान्य दिसणारं झाड असामान्य सुंदर होऊन जातं. पावसाळ्यात धरलेल्या शेंगा आता काळ्या-नळ्या झालेल्या असतात नि वाऱ्याच्या प्रत्येक झुळुकेबरोबर बहाव्याच्या फुलांचे जमिनीकडे झेपावणारे घोस हलत असतात. या फुलांना बऱ्यापकी मंद, पण कडसर हवाहवासा सुवास असतो. बहाव्याच्या फुलांमधे भरपूर फुलरस असतो त्यामुळे या रसरशीत तरुण कळ्यांभोवती िपगा घालायला भुंगे नि कीटक येतातच. हे फुलांचे घोस साधारण एक दीड हात लांब असतात. वरच्या देठाकडून टोकाकडे फुलत जातात. या फुलांच्या शेजारी डुलणाऱ्या शेंगा उन्हाळ्यात पिकायला लागतात. या शेंगा पिकल्या की आत गोड चिकट चॉकलेटी गर बनतो. हे झाड कसं हट्टी आहे पहा! इतर झाडांसारख्या आपल्या बिया उधळून न देता अख्खीच्या अख्खी शेंगच खाली टाकून देतं. साधारण हातभर लांबीच्या या शेंगांमध्ये ५० ते १०० चप्पट बदामी अशा कठीण नि छोटय़ा बिया असतात. बियांच्या बाबतीत या झाडाने आपलं पालकत्व इतकं मस्त पार पाडलेलं असतं की बस रे बस! आपल्या प्रत्येक ‘बी लेकराला’ गुबगुबीत गरात स्वतंत्र कप्प्याचा जणू फ्लॅटच दिलेला असतो. है ना मज्जेकी बात? या शेंगांचा उपयोग जोरदार असतो.. कसा? हा गर खाता येतो. तो एकदम ‘सुखसारक’ असतो. अजूनही याचा उपयोग गावोगावी सारक म्हणजेच पोट साफ करायला एकदम ‘बहावाबाण’ म्हणून होतो. याच गुणधर्मामुळे आपल्या काही पग्रेटिव्ह औषधांमध्ये या शेंगांचा वापर होतो. मांजरं जशी पोट बिघडलं की गवत खातात, तसेच जंगलात कोल्हे, माकडं, अस्वलं, भेकर हरणं या शेंगांवर पहिले तोंड चालवतात आणि मग पोट साफ करतात. या रेचक शेंगा खाऊन त्यांच्या पोटाची अवस्था काय होत असेल हे सांगायला नकोच. अर्थात बहावा अगदी सुरक्षित समजला जात असल्याने गरोदर बायका, लहान मुलांना औषध म्हणून वैद्य हेच देतात. बहाव्याचा याव्यतिरिक्त उपयोग म्हणजे याचं लाकूड चांगलं असल्याने बलगाडय़ा, होडय़ा, शेतीची औजारे, शोभेच्या वस्तू, मूर्ती बनवण्यासाठी वापर होतो. बहाव्याचं लाकूड त्याच्या उष्मांक मूल्यामुळे चांगलं सरपण समजलं जातं. त्याच्यापासून उत्तम कोळसाही मिळतो. हे झाड अति मोठं असतं ना तर याच्या लाकडाचा वापर घरे बांधायलाही झाला असता. याच जोडीला याची सालही उपयोगी आहे, जिचा वापर कातडं कमवण्यासाठी करतात. आयुर्वेदामध्ये याच्या सालीचा काढा करून घशाच्या गाठींवर देतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, गुरं याच्या पाल्याला तोंड लावत नाहीत म्हणून हा सगळीकडे लावता येतो. दुनियाभरच्या गोष्टी आपण आपल्या देशात फॅशन म्हणून आणत असतो. मला बहाव्याचा खूप अभिमान वाटतो. कारण हे शंभर टक्केभारतीय झाड जगभर नेलं गेलंय आणि त्याचा उपयोग लोक करताहेत. वेस्ट इंडीज, आफ्रिकेत औषधाबरोबर याचा उपयोग सजावटीचा वृक्ष म्हणूनही करतात. आपल्याकडेही हल्ली शहरांमध्येही अनेक ठिकाणी सुशोभीकरणासाठी हे झाड लावलं जातंय ही उत्तम गोष्ट आहे.

माझ्या या आसमंती गप्पांमध्ये मी सातत्याने झाडांच्या देशी आणि विदेशी फरकाबद्दल लिहितेय. कारण सभोवताली दिसणाऱ्या अनेक झाडांचं उगमस्थान आपल्याला माहीत नसतं. मध्यंतरी पळस, पांगाऱ्याबद्दल लिहीत असताना थोडंसं पळसासारखंच दिसणारं लाल-केशरी फुलं येणारं झाड फुलताना दिसत होतं. चौकसपणे खातरजमा केल्यावर लक्षात आलं की हे लालभाई विदेशी आहेत. बेसुमार सामाजिक वनीकरणाची अजून एक देणगी म्हणून या झाडाकडे बोट दाखवता येईल. शहरांमध्ये रस्त्यांच्या कडेला लावलेलं ‘स्प्यॅथोडिया’ हे झाड फुललेलं सहज दिसून जातं. पूर्व आफ्रिकेतल्या अंगोला या देशातून जगभर नेलं गेलेलं हे झाड अठराव्या शतकाच्या शेवटी भारतात आणलं गेलं. पाहुणेपण बाजूला ठेवून या झाडाने स्वत:ला इतकं सुस्थापित केलंय की आजमितीस हे झाड विदेशी आहे हे सांगितलं तर विश्वास बसणार नाही. देशाच्या कानाकोपऱ्यात सुखाने नांदणाऱ्या या झाडाचं वनस्पतिशास्त्रीय नाव आहे ‘स्प्यॅथोडिया क्यॅम्पॅन्युलाटा’. या झाडाला मराठी किंवा इतर भारतीय भाषांमध्ये नावं नाहीत. मात्र याच्या स्प्यॅथोडिया नावाचा अर्थ होतो बोटीसारख्या आकाराची आणि क्यॅम्पॅन्युलाटाचा अर्थ आहे घंटेच्या आकाराची फुलं. झाडाखाली पडलेली भडक केशरी लाल रंगाची फुलं उचलून पाहिलं तर स्पष्ट दिसतं की या झाडाची फुलं थोडीशी बोटीच्या आणि थोडीशी घंटेच्या आकाराची दिसतात. आपल्या देशात विविध भागात वर्षभर हे झाड कमीअधिक जोमाने फुलत असतं.  युगांडा फ्लेम ट्री, स्कारलेट बेल ट्री अशाही नावांनी ओळखलं जाणारं ‘बिग्नोनिएसी’ कुटुंबातलं हे झाड मध्यम आकाराचं वाढतं. या झाडाला उन्हाळ्यात म्हणजेच सध्याच्या हंगामात शेंगा सदृश्य दिसणारी पंधरा ते वीस सेंमी आकाराची, टोकेरी हिरव्या रंगाची फळं लागतात. या फळशेंगा आकाशाकडे तोंड करून वाढतात. यातल्या बिया वाऱ्यावर सहज उडतात आणि कुठेही रुजतात. बाकी पेल्टोफोरमच्या झाडाप्रमाणेच, याही झाडाचा आपल्याला आणि आपल्या पर्यावरणाला उपयोग नाहीच.

कोण कुठल्या दूरदूरच्या खंडांतून आलेली ही वनसंपदा आपण सहजतेने स्वीकारतो आणि अंधपणे जोपासत जातो. आपल्या स्थानिक वनसंपदेकडे पाठ फिरवल्याने स्वतच्याच परिसरातून त्यांना गायब व्हावं लागतंय. यावर उपाय काय? ऑस्ट्रेलियासारखे कडक नियम केल्यास आपण ते पाळूच याची खात्री नाहीच. देशी वनसंपदेचा आर्त आपल्या व्यवस्थेत कधी घुमणार? घुमल्यास त्यासाठी आपण काय करणार हे प्रश्न आज आसमंतात मागे रेंगाळलेत.
छायाचित्रे – अनिरुद्ध देशिंगकर
रुपाली पारखे देशिंगकर – response.lokprabha@expressindia.com