रूक्ष, रखरखीत अशी विशेषणं देऊन आपण उन्हाळ्यावर एक नकाराची फुली मारून टाकतो खरी, पण ऐन उन्हाळ्यात फुलणारा गुलमोहोर, आंबटगोड करवंदं, लुसलुशीत, थंडगार ताडगोळे आपला उन्हाळा ताजातवाना करत असतात.

मागच्या आठवडय़ात मी पुणे-मुंबई प्रवास ट्रेनने केला. माझ्या शेजारी बसलेल्या मुलांना खिडकीतून खालच्या दरीत काय दिसतंय हे पाहायचं होतं. ‘उन्हाळ्यात काही पाहाण्यासारखं नसतं बाहेर. निसर्गसौंदर्य अजिबात दिसत नाही, उगाच कशाला जिवाला त्रास द्यायचा’ असं उत्तर त्या मुलांच्या आईने लग्गेच देऊन टाकलं. माय-लेकरांचा संवाद ऐकून मलाच हसू आलं. वय वाढायला लागलं की लहानसहान गोष्टींमधला आनंद जणू नजरअंदाज केला जातो. उन्हाळ्यात कसला आलाय निसर्ग, नुसता रखरखाट झालेला असतो हे सर्वसामान्य मत सहज व्यक्त केलं जातं. यात दोष कुणाचा, वगरे फार दूरच्या गोष्टी आहेत. कारणीभूत आहे ती आपली निसर्गाकडे पाहाण्याची दृष्टी! निसर्गाने कायम सुंदर, रम्य, नेत्रसुखद, हिरवंगार फुललेलं, तरारलेलं वगरे असायला हवं अशीच आपली कायम इच्छा असते. या सगळ्या अवस्थांव्यतिरिक्त, निसर्गात अजून काही होत असतं हे आपण आनंदाने स्वीकारतच नाही. मग ही असली नकोशी लेबलं आसमंताला लावली जातात. खरं पाहायला गेलं तर उन्हाळ्यातही आसमंतात भरपूर गंमत होत असते. अनेक झाडं भरभरून फुलत असतात, फळत असतात नि सृजनाची तयारी करीत असतात. आपण मात्र उन्हाळ्याच्या त्रासाने या आनंद सोहळ्याकडे वैतागून दुर्लक्ष करत असतो.

नीट निरखून पाहिलं तर बदललेल्या ऋतूच्या, अर्थात

ग्रीष्माच्या झळा निसर्गातल्या रंगातही जाणवतात. कोरडय़ा, मातकट रंगावर फुललेले पळस, बहावा निव्वळ रंगोत्सवच करत असतात. या देशी वृक्षांच्या जोडीला हजारो किलोमीटर्स दूरच्या खंडातून आलेली काही झाडं बेभानपणे फुलताना दिसतात. अनेकदा लोकांशी गप्पा मारताना मला जाणवतं की, आसमंतात नेहमी दिसणारी कित्येक झाडं भारतीय नाहीत हे त्यांच्या गावीही नसतं. साधं उदाहरण घ्यायचं तर भारतीय साहित्य, चित्रपटांमध्ये मानाचं स्थान मिळवलेल्या गुलमोहोराचंच घेता येईल. अनेकांची भावविश्वं स्वत:भोवती गुंफून, स्वतला शेकडो कवींच्या काव्यांत, चित्रकारांच्या चित्रांत रंगवून घेणारा गुलमोहोर भारतीय नाहीये! विश्वास बसत नाही ना? हे विधान अगदी खरंय. मूळचा मादागास्कर बेटावरचा हा वृक्ष ब्रिटिश आणि पोर्तुगीज लोकांनी सर्वप्रथम मॉरिशसमध्ये लावला. त्यानंतर स्वतबरोबर जगभर विविध देशांमध्ये नेऊन रुजवला. भारतात, ब्रिटिशांनी साधारण अठराव्या शतकात मुंबईत हे झाड लावलं असावं. १८४० साली मुंबईच्या शिवडी भागात गुलमोहोर फुलल्याची पहिली नोंद आहे. इंग्रजीत या झाडाला ‘फ्लेम ट्री किंवा फ्लॅॅमबॉयंट ट्री’ म्हणतात. याच जोडीला याला ‘गोल्ड मोहोर’ नि ‘रॉयल पॉइनसियाना’ अशीही नावं प्रचलित आहेत. बहुतेक सर्व भारतीय भाषांमध्ये गुलमोहोराला नावं आहेत. याचाच अर्थ, आपल्या देशात हे झाड सर्वत्र रुजलेलं आहे. बहावा, चिंच, कांचन यांच्या ‘सिसालपिनीएसी’ कुळात या झाडाचा समावेश होतो. याचं शास्त्रीय नाव आहे ‘डेलोनिक्स रेजिया’. ‘डेलोनिक्स’ म्हणजे याच्या फुलाच्या आत असलेल्या ठळकपणे दिसणाऱ्या हुक्ससारख्या टोकदार वळलेल्या नख्या आणि ‘रेजिया’ म्हणजे राजेशाही.

गुलमोहोराचं वर्णन काय करायचं? अगदी सवयीचं असलेलं हे झाड पाहातच आपण मोठे झालो आहोत. हे झाड साधारण वीस मीटर उंच वाढतं. अंदाजे सत्तर ते ऐंशी सेंमीचा व्यास असलेलं याचं राखाडी तपकिरी रंगाचं खोड आणि फांद्या बऱ्यापकी गुळगुळीत असतात. गुलमोहोराची पानं अगदी झिरझिरीत झिपरी असतात. लहानपणी पानाच्या देठाकडे पकडून दोन बोटांच्या चिमटीत सर्रकन पानं ओढून गोळा करून हुर्र्र करून प्रत्येकाने हवेत भिरकावलेलं असतंच. आणि हो! पावसाळ्यात येता-जाता याच्या फांद्या ओढून, मागनं येणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर पावसाचा शिडकावा पाडलेला असतोच असतो. माझ्या पिढीचा एक आवडता खेळ म्हणजे याच्या फुलातल्या नख्या एकमेकांमध्ये अडकवून राजाराणीचं बठं युद्ध खेळायचं. हे लिहीत असताना नजरेसमोरून लहानपणीच्या आठवणी झर्रकन तरळून गेल्या. थंडीला सुरुवात झाली की गुलमोहोराची सगळी पानं गळून पडतात. मग हळूहळू सरत्या वसंतात याला नाजूक पालवी फुटायला लागते नि सगळं झाड हिरवट पोपटी शालू नेसून फुलायला तयार होतं. आपल्याकडे साधारण मार्चमध्ये थंडी संपलेली असते. गुलमोहोराचा फुलण्याचा काळ म्हणजे एप्रिल ते सरता जून. याची फुलं खूप भडक नि चित्ताकर्षक असतात. या फुलांचे गुच्छ फांद्यांच्या टोकांना येतात. फुगीर नि गब्बू कळ्या खालून वर उमलत जातात. हे फूल साधारण दहा सेमी असलेल्या सुटय़ा पाच पाकळ्यांचं असतं. त्यात पुंकेसर असतात. या सगळ्या पाकळ्या साधारण लहानमोठय़ा असतात. यातल्या चार पाकळ्या लाल, केशरी किंवा भगव्याची रंगाची छटा असलेल्या असतात. नीट बघितलं की जाणवतं ते म्हणजे यांतली एकच पाकळी अगदी वेगळी असते. ती एक तर पिवळट असते किंवा पांढरट असते. या वेगळ्या पाकळीवर लाल रंगाच्या रेषा असतात. या फुलांना वास नसतो. पावसाळ्यात झाडाला चपटय़ा हिरव्या लांब लांब शेंगा लागतात. साधारण हातभर झाल्यावर या शेंगा हिवाळ्यात सुकतात नि खुळखुळ वाजतात. गुलमोहोराच्या शेंगेत काळसर चपटय़ा अशा तीस-चाळीस बिया असतात. या बियांमधून सहज रुजून गुलमोहोराची रोपं बनतात. झटपट वाढणाऱ्या या वृक्षाचा उपयोग फक्त उद्यानाच्या शोभेसाठीच केला गेलाय. देवपूजेसाठी किंवा शोभेसाठी या फुलांचा वापर कोणीच करत नाही. तीच गोष्ट याच्या लाकडाचीही आहे. लाकडाच्या कुठल्याही व्यवसायासाठी हे लाकूड कुचकामी असते. कारण ते टिकाऊ नसते. आपल्या पक्ष्यांना हे झाड कायम परकेच वाटत आल्याने त्यावर कोणीही घरटे करत नाही. या झाडाची आधारमुळे (बट्रेस्ट रूट्स) जमिनीच्या वरवरच्या थरात राहातात नि मुळं खूप खोलही जात नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात हे झाड पटकन कोसळतं. सगळ्यात मोठं म्हणजे, गुलमोहोराचा कचरा फार होतो, जो खतासाठी फारसा उपयोगी नसतो. गंमत म्हणजे, सामाजिक वनीकरणाने, झटपट वाढतं म्हणून आपल्याकडे भरमसाट वाढवलेलं हे झाड, ज्या मादागास्करमधून आलंय तिथंच आता चक्क नामशेष झालंय.. है ना मजे की बात?

उन्हाळ्याला भले शुष्क महिना म्हटलं तरीही अनेक फळांची बाजारात आवक वाढलेली दिसते. आंब्याच्या जोडीला उन्हाळा स्पेशल अशी ठरावीक फळं उन्हाळ्यातच आपल्या भेटीला येतात. हवेतला उष्मा वाढला की थेट जंगलातून काळी मना आपल्या भेटीला येते. तीच ती! जंगलची मना! अर्थातच करवंद.

उन्हाळ्यात जी काही धमाल फळं येतात त्यातलं हे एक फळं. थंडीचा जोर वाढला की या करवंदाच्या जाळ्या हळूहळू फुलायला सुरुवात होते. साधारण गुलाबी छटेची बेधुंद वासाची पांढरट फुलं फुलायला सुरुवात होते. या जाळ्यांना मग छोटी फळं धरतात नि उन्हाळ्यात ती पक्की होऊन खाण्यासाठी तयार होतात. या जंगलच्या मनेबद्दल आपल्याला  बहुतांश माहिती नसतेच म्हणा! बहुतेक वनस्पतिशास्त्रज्ञ म्हणतात की, हे फळ शंभर टक्के भारतीय आहे नि याचं उगमस्थान म्हणजे नगाधिराज हिमालय आहे. तर काही लोक म्हणतात की, हे फळ जावा या ठिकाणाहून आपल्याकडे आलंय. भारताच्या बऱ्याच राज्यांमध्ये आढळणारं हे फळ आपल्याला स पर्वतामध्ये मुबलक आढळतं. ऑलेएॅन्डेर फॅमिलीतल्या, कॅरीस्सा कॅरॅदस असं वनस्पतिशास्त्रीय नाव असलेल्या या फळाची मोठेमोठे काटे असणारी झुडपं बऱ्याच ठिकाणी कंपाऊंड म्हणून लावली जातात. रानोमाळ दिसणाऱ्या या जाळ्या कुणी मुद्दाम लावलेल्या नसतात. अतिशय कोरडय़ा आणि कमी पाण्याच्या, तीव्र उन्हाच्या वातावरणातसुद्धा ही झुडपं सहज वाढतात.

या करवंदांची फुलं म्हणजे एक गंमतच असते. या फुलांमध्ये फळांपेक्षाही गोड मध असतो, जो गोळा करायला मधमाशांची अगदी लगबग सुरू असते. करवंदं जेव्हा कच्चं असतं तेव्हा तुरट नि कडसर लागतं. पण पूर्ण पिकल्यावर अगदी अमृततुल्य बनून जातं. या करवंदाचे दोन प्रकार असतात. एक असतं काळं नि एक असतं लाल करवंद. यात लाल करवंदात जास्त मांसल गर असतो, तर काळ्यात त्या मानाने कमी. करवंदाचं झाड, फांदी किंवा पानं तोडली तर त्यातून दुधाळ चीक वाहतो. हा चीक भयानक चिकट असतो. फळ कच्चं असलं की त्यातून चीक येतो, पण पूर्ण पिकलेल्या करवंदातून चीक येत नाही. करवंदाच्या दोन/ चार बिया फळाच्या आत एकमेकींना बिलगून लहानाच्या मोठय़ा होतात. या फळाचं महत्त्व नुसतं फळ म्हणून नाहीये. जंगलात जर तुम्ही हरवलात तर ज्या फळांच्या जोरावर तुम्ही जगू शकतात अशा फळांच्या यादीत याचा अगदी वरचा नंबर लागतो. करवंदाचं फळ गुणांनी अतिशय समृद्ध आहे. यात व्हिटॅमिन ए, लोह, खनिज, कॅल्शिअम आणि फायबर्स म्हणजेच तंतुमय घटक पदार्थ भरपूर असतात. यातली प्रथिनं आणि आम्लं शरीराला ऊर्जा नि तरतरी मिळवून देतात. आपण हल्ली अ‍ॅण्टिबायोटिक्सवर (प्रतिजैवकं) फार अवलंबून राहातो. पण आदिवासी समाजात शरीरातील साखरेचं प्रमाण स्थिर ठेवण्यासाठी अजूनही याचाच वापर केला जातो. आतडय़ाच्या दुखण्यांवर याचाच वापर अजूनही करतात. करवंदाचं लोणचं खाल्लं नसेल अशी व्यक्ती मी तरी पाहिली नाहीय. करवंदाचं सरबत, जॅम, जेली, ज्यूस बनवला जातो. अरब अमिरातीत याला खारवून येता-जाता तोंडात टाकायला वापरतात. शासनाने हल्ली या फळाच्या प्रक्रिया केलेल्या पदार्थ निर्मितीवर आधारित उद्योगांना उत्तेजन द्यायला सुरुवात केली आहे. जास्तीत जास्त लोकांनी अशा संधींचा फायदा घेतला पहिजे.

करवंदासारखंच आणखी एक फळ उन्हाळ्याची लज्जत वाढवताना अनेक ठिकाणी दिसतंय. ताडगोळा नावाने ओळखलं जाणारं शंभर टक्के भारतीय असलेलं हे झाड भारतीय उपखंडात सर्रास मिळतं. ‘अशियन पाल्मायरा पाल्म्स’ नावाने ओळखला जाणारा ताडगोळा, पाल्म वृक्ष गटामधला एक सदस्य आहे. याचं वनस्पतिशास्त्रीय नाव आहे ‘बोरास्सस फ्लाबेल्लीफेर’. साधारण १०० फुटांपर्यंत वाढणारं हे झाड जन्माला येतानाच ‘शतायुषी भव’ असा आशीर्वाद घेऊन येत असेल. कारण साधारण १०० वष्रे तरी हे झाड जगतच जगतं. सुरुवातीस अगदी हळूहळू वाढणारं हे झाड नंतर फटाफट वाढतं. नारळाच्या खोडासारखाच बुंधा असलेलं याचं खोड अगदी रखरखीत नि मळकट असतं. डोक्यावर गोलाकार झावळ्या तुऱ्यांसारखं मिरवणारं हे झाड अगदी लांबूनही नजरेत भरतं. नीट पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की नारळाची झावळी लांबसडक असते तर याची झावळी लांब दांडय़ाच्या पंख्यासारखी. या पानांचा उपयोग झोपडय़ा शाकारण्यासाठी, टोपल्या, पंखे, चटया आणि हस्तकलेच्या वस्तू बनवण्यासाठी होतो. दक्षिणेकडे या पानांवर पूर्वीची तामिळ महाकाव्यं लिहिली गेली आहेत हे विशेष. ताडगोळ्यांच्या पानांचा उपयोग, पारंपरिक तमिळ पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. सुगरण पक्ष्यांचं तर हे आवडतं झाड. याच्या झावळ्या म्हणजे त्यांचं खोपा बांधायचं हमखास आवडतं ठिकाण.

मागे एकदा मी लिहिलं होत की, माणूस निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीचं उपयोगमूल्य सर्वप्रथम माहीत करून घेतो. म्हणूनच या झाडाच्या प्रत्येक भागाचा उपयोग माणसाला अवगत आहे. ताडाचं लाकूड चिवट समजलं जातं. कम्बोडिया देशात ताडाचं झाड मुबलक प्रमाणात आढळतं. त्यामुळे तिथल्या लहान आकाराच्या होडय़ा याच्यापासूनच बनतात. कुंपणासाठीचं लाकूड म्हणूनही याचा उत्तम वापर होतो. अगदी कोवळा ताड तुटला तर त्याची शिजवून भाजीही केली जाते. याच्यात असलेलं पिष्टमय तंतूंचं प्रमाण हे अतिशय उत्तम समजलं जातं. ताडाच्या भाजलेल्या बिया हे श्रीलंकेतलं आवडतं खाणं समजलं जातं. ताडाचे कोवळे कोंब, कोवळी पानं हीसुद्धा खाण्यासाठी योग्य असतात नि खाली दक्षिणेकडे ताडगोळ्याच्या बऱ्याच पाककृती बनवल्या जातात. इंडोनेशियात, ताडगोळा आणि नीरा दररोजच्या स्वयंपाकात वापरली जाते.

ताडाचं फळ म्हणजेच ताडगोळा. घोसाघोसांनी येणारं हे प्रत्येक फळ साधारण तीन/ सहा इंच मोठं असतं. याच्यावरचा भाग काळसर भुरकट आणि अतिशय कठीण असतो. हा कठीण भागच आतल्या लुसलुशीत ताडगोळ्याला जपतो. हे कठीण कवच सोलणं म्हणजे जिकिरीचं काम असतं. पण एकदा का ते सोललं की आत दुधाळ रंगाचा तीन कप्प्यांत असलेला ताडगोळा मिळतो. या दुधाळ फळावर पुन्हा एक मातकट-राखडी रंगाचं अजून पातळ साल असतं, जे काढल्यावर आतला दुधाळ पाणेरी ताडगोळा खायला मिळतो. हे वरचं नाजूक सालही खाता येतं, पण त्याला तुरट चव असते. या मांसल नि रबरबीत ताडगोळ्याच्या आत नारळासारखं थोडंसं गोड पाणी असतं. गोळा सोलणाऱ्याचं कौशल्य यातच असतं की गोळा न फोडता, पाणी न सांडता अख्खा काढायचा. आपल्यापकी अनेकांना बंगाली मिठाया आवडतात. मला आवडणाऱ्या संदेश मिठाईचं उगमस्थान आहे हा ताडगोळा. अगदी त्याच्याप्रमाणेच ही मिठाई बनवली जाते. आत गोड नि वर थोडीशी कडक. बंगाली नि तमिळ लोक या ताडगोळ्याचे जास्तीत जास्त पदार्थ बनवतात. आपण शक्यतो याला फळ म्हणूनच खातो.

जाता जाता सांगायचं म्हणजे याच झाडाच्या कोवळ्या शेंडय़ांवर चिरा देऊन तिथं मडकं बांधतात. त्यातून निघणारा चीक म्हणजे अर्थात नीरा.. याच नीरेला आंबवून ताडी नामक देशी दारू बनवली जाते. ताडगोळ्याचा सर्वात महत्त्वाचा औषधी गुणधर्म म्हणजे शरीरातली उष्णता कमी करणे. ताडगोळा खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो. यातील तंतुमय पिष्ट पदार्थ आतडय़ाला चांगलंच कामाला लावतात. या तंतुमय पिष्ट पदार्थाचा गुण म्हणजे मलावरोध कमी करणं. अशा या बहुगुणी फळाची जेवढी माहिती करून घेऊ तितकं अधिकच चकित व्हायला होतं!

उन्हाळा आता अगदी रंगात आलाय. बाजारात अनेक प्रकाराचा रानमेवा दाखल होतोय. हा रानमेवा त्याच सुकलेल्या रखरखीत निसर्गातून येतोय, ज्याला आपण या ऋतूत दुर्लक्षून त्याची उपेक्षा करीत असतो. या रानमेव्याचं कौतुक आंब्याच्या जोडीने करणं गरजेचं आहे. कारण तोही वर्षांतून एकदाच येतो. गरज आहे त्याच्याकडे डोळे उघडून पाहण्याची नि मोकळ्या मनाने कौतुकायची. चला तर, आसमंतात रानमेवा तुमची वाट पाहतोय..
रुपाली पारखे देशिंगकर – response.lokprabha@expressindia.com