सध्या मार्च एन्डिंगचा धबडगा सुरू असला तरी निसर्गात सुरू आहे वसंतोत्सव. या ऋतुबदलाची निसर्गाने दिलेली चाहूलही केवढी मोहक होती.

मार्च महिना म्हणजे उन्हाळ्याची सुरुवात. मार्च महिना म्हणजे आंब्याची चाहूल. मार्च महिना म्हणजे पाणीकपातीला सुरुवात अशा ठरावीक घडामोडींची निरगाठ आपल्या डोक्यात पक्की बसलेली असते. याच जोडीला, मार्च एण्डिंग नावाची घटना बहुतेकांच्या आयुष्यात घडत असते. या घटनेमुळे आपल्या अवतीभोवती काय सुरू आहे, घडतंय हेही पाहायला फुरसत मिळत नाही. वसंताचे आगमन झाल्यानंतरचा निसर्ग इतका मनमोहक झालेला असतो की त्याचा नुसता विचारही मनाला ताजंतवानं करणारा असतो. पळस, पांगारा, सावरीच्या लालभडक अस्तित्वाने येणाऱ्या ग्रीष्माची जणू चाहूल लागलेली असते.

निसर्गात एखाद्या गोष्टीची चाहूल लागणं हे फार मनोरंजक असतं. ही चाहूल वेगवेगळ्या प्रकारे निसर्गात व्यक्त होत असते. वेगवेगळ्या ऋतूंची चाहूल झाडं, पानं गाळून, फुलाफळांनी भरून देत असतात. आसमंतातली जीवसृष्टीसुद्धा या चाहुलीशी अगदी घट्ट बांधली गेलेली असते. ॠतुबदलाबरोबर लागणाऱ्या प्रियाराधनाची चाहूल असो, की घरबांधणीची, अपत्य संगोपनाची चाहूल असो, प्रत्येक चाहूल आसमंतात महत्त्वाची समजली जाते. झाडांच्या, फुलांच्या, फळांच्या ऋतुबदलाची चाहूल आपल्या नजरेस पडते आणि आपण सहज म्हणतो ‘सिझन बदलला’.

हे सिझन बदलणं निसर्गात अगदी ठायलयीत सुरू असतं. निसर्गात कुठलीही गोष्ट अचानक किंवा द्रुत गतीत होत नसते. या ठायलयीद्वारे आसमंतात होणारे बदल टिपायची जणू संधीच निसर्ग आपल्याला देत असतो. माझ्या दररोजच्या प्रवासाच्या रस्त्यावर दिसणारी झाडं क्रमाक्रमाने रूप बदलताना मी पाहते, तेव्हा निसर्गाचं अव्याहत सुरू असलेलं ऋतुचक्र खरंच अचंबित करतं. या ऋतुचक्राचा विचार करायला लागलं की इतक्या साऱ्या गोष्टी नजरेस पडायला लागतात की बास रे बास. माझं काहीसं असंच झालं. कॉलनीत झाडांच्या वाळक्या पानांचा कचरा पाहून शोध घेतल्यावर लक्षात आलं की हा कचरा खोटय़ा बदामाच्या झाडाने केलेला आहे. मागे एका लेखामध्ये मी जंगली बदामाच्या झाडाबद्दल लिहिताना या खोटय़ा बदामाचा उल्लेख केला होता. आज या गळक्या पानांना पाहून मी खोटय़ा बदामाची कूळकथा मनमांजराला सांगायचं ठरवलं.

‘टरमिनालिया कटाप्पा’ अशा मजेशीर वनस्पतिशास्त्रीय नावाने ओळखलं जाणारं हे झाड आपल्याला इतकं परिचित आहे की याचं परदेशीपण आपल्या मनाला जाणवतही नाही. मादागास्कर, मलेशिया आणि ईस्ट इंडीज प्रांतातून जगभर नेलेलं हे झाड आपल्या बेहेडा, किंजळ, आईन या वृक्षांच्या ‘कॉम्ब्रेटसी’ कुळात मोडतं. साधारण २० मीटर्सची उंची सहज गाठणारं हे झाड त्याच्या छत्रीसारख्या फांद्यांमुळे डेरेदार वाटतं. या झाडाच्या दिसण्यातच त्याच्या वनस्पतीय नावाचा अर्थ सामावलाय. ‘टरमिनालिया’ म्हणजे फांद्यांच्या कडांना भरघोस पानं असणारा. अर्थातच, या झाडाकडे पाहिलं की लगेच या नावाची प्रचीती येते. गेल्या वर्षी चित्रपटांमधून धुमाकूळ घातलेल्या ‘कटप्पा’चा आणि याच्या वनस्पतीय नावातल्या ‘कटप्पा’चा दुरान्वयेही संबंध नाहीये. ईस्ट इंडियन भाषेतून हे कटप्पा नाव घेतलं गेलं आहे. तर असे हे कटप्पा महाराज सध्या प्रचंड कचरा करायच्या मूडमध्ये दिसताहेत. पानझडी प्रकारात गणलं जाणारं हे झाड जानेवारीपासून पानं गाळायची तयारी करतं. वर्षभर हिरवीगार असणारी याची पानं या पानगळीसाठी मातकट, किरमिजी आणि चक्क लाल होतात तेव्हा हे झाड अगदी चित्रातल्या सारखं दिसतं. या झाडाची पानं जशी मोठी तशीच फुलं लहान म्हणता येऊ शकतात. त्या फुलांना लहान का म्हणावं इतकी ती सूक्ष्म असतात. ही फुलं आल्यानंतर साधारण दोन-तीन महिन्यांनी झाडाला अंडाकृती आकाराची फळं लागतात. ही फळं हिरव्या रंगाची असतात नि पिकल्यावर लाल होतात. या फळाच्या आत, कठीण आवरणात एकच बी असते. ही बी, दुधाळ रंगाची व बिनचवीची असते. कदाचित या बीमुळेही या झाडाला ‘इंडियन आल्मंड’ हे नाव रूढ झालं असेल.

परदेशी असलेल्या या झाडाचे आपल्याकडे मोठय़ा प्रमाणात व्यावसायिक उपयोग होताना दिसत नाहीत. मलेशियात याचा मोठय़ा प्रमाणात वापर केला जातो. भारतीय आयुर्वेदही या झाडाबद्दल मौन बाळगताना दिसतो. आपल्याकडे बहुतांश ठिकाणी, शहरात लावलं गेलेलं हे झाड डोळ्याला सुखावतं हेही कमी नाहीच. या शोधयात्रेत, खोटय़ा बदामाच्या जोडीला मला श्रीलंकेतून भारतात स्थिरावलेलं एक अति परिचित झाड फुलायला सुरुवात करताना दिसलं. खोटय़ा बदामाच्या जोडीला खोटा अशोक! आसूपालव ऊर्फ अशोकाचं झाड म्हणजेच मास्ट ट्री फुलायला सुरुवात करताना दिसल्यावर मनात विचार आला की आपण किती सहजतेने विदेशी झाडांना, फुलांना फळांना आणि माणसांनाही आपलंसं करून घेतो. ‘अनोनसी’ कुटुंबातलं ‘पॉलिअ‍ॅलाथिया लाँगिफोलिया’ नावाचं झाड आपण अशोक असं नामकरण करून आपलंसं करून टाकलं. खोटय़ा बदामासारखंच, याच्या नावात याचं दिसणं सामावलंय. लाँगिफोलिया म्हणजे ज्याची पानं लांब आहेत तो. अर्थातच, अशोकाची पानं लांब लांब असतात. कायम हिरवीगार असणारी ही पानं हल्ली दारावर लावायच्या आम्रपानांच्या जागी कधी घुसली हे कळलंच नाही. ‘पॉलिअ‍ॅलथिया’ या शब्दाचा अर्थ आहे अनेक औषधी गुणधर्म असलेला. याच्या मूळ जागी म्हणजेच लंकेत, या झाडाचे औषधी वापर काय केले जातात हे माहीत नाही. आपल्याकडेही आयुर्वेदात कुठेही याचे वापर उल्लेखलेले नाहीत. तर अशा या सदाहरित झाडाची फुलं असतात हेच अनेकांना माहीत नसतं. चांदण्यांच्या आकाराची बारीक बारीक फुलं घोसात येतात नि पानांच्या आड दडून बसतात. ही फुलं हिरवट पिवळट रंगाची असतात. या फुलांतून जुलपर्यंत फळं तयार होतात. ही फळं झाडावर पिकली की काळपट रंगाची होतात. अशी काळपट पिकलेली फळं खारी, वटवाघळांसाठी फलोत्सव साजरा करायचं ठिकाण बनतात. यातूनच बियांचं वहन होतं आणि नवीन ठिकाणी आसूपालव रुजतात. बाकी विशेष उल्लेख करायचा तो याच्या नावातल्या गमतीचा. मास्ट ट्री हे नाव रुळण्यामागचं कारण म्हणजे, साधारण १५ मीटर्सची सरळसोट उंची गाठणाऱ्या या झाडाचा मुख्य वापर पूर्वी होडय़ांच्या डोलकाठय़ा बनवायला होत असे. या डोलकाठय़ा म्हणजेच मास्ट. म्हणून या झाडाचं नामकरण झालं ‘मास्ट ट्री’! आहे ना इंटरेस्टिंग?

खऱ्या अशोकाची फुलं
खऱ्या अशोकाची फुलं

आता या खोटय़ा अशोकाबद्दल लिहिल्यावर खऱ्या अशोकाला जाणून घ्यायलाच हवं. नाहीतर घोळ होण्याची शक्यता जास्त. ज्या झाडाखाली बसून सीतेने विलाप केला तो सीतेचा अशोक म्हणजेच खरा अशोक. कांचन, बहावासारख्या परिचित फुलांच्या ‘सिसालपेनिसी’ कुटुंबातला हा रंगाकर्षक सदस्य शंभर टक्के भारतीय आहे. ज्याला शोक नाही असा अशोक ऊर्फ रक्ताशोक. सीतेने याच्याखाली बसून विलाप केला म्हणजे याची उंची काय, अशी शंका मनाला स्पर्शून जाणं स्वाभविकच आहे. ‘सराका अशोका’ अशा वनस्पतिशास्त्रीय नावाने ओळखलं जाणारं आणि साधारण आठ ते दहा मीटर्सची उंची गाठणारं हे झाड डेरेदार या सदरात जमा होतं. याच्या शालीनतेने खाली झुकून पसरलेल्या फांद्या आणि एका आड एक असलेली पानंसुद्धा अतीव सुंदर दिसतात. पानझडीनंतर बहरास सुरुवात होताना या झाडाला फुटणारी कोवळी पालवी किरमिजी लाल, राणी रंगाची झाक असलेला गुलाबी लाल मग पोपटी आणि शेवटी हिरवीकंच अशा रंगक्रमात मोठी होताना पाहणं निव्वळ नेत्रसुखदच असतं. सरता फेब्रुवारी ते मे महिना हा या अशोकाचा फुलण्याचा काळ समजला जातो. काही वेडे अशोक पावसाळ्यानंतरही फुलतात.

या अशोकाच्या फुलांची एक मोठी गंमत असते. इतर फुलांसारख्या यांना पाकळ्याच नसतात. साधारण दीड ते दोन सेमी आकाराची ही फुलं फुलतात तेव्हा भगव्या, नारंगी आणि लाल रंगाचा निव्वळ नेत्रसुखद उत्सव घडवतात. अप्रतिम सुवासाची मधयुक्त असलेली ही फुलं घोसात फुलल्याबरोबर  मधमाशा आणि किडय़ांचा अड्डाच बनतात. या फुलांपाठोपाठ साधारण दहा ते बारा सेमी लांबीच्या शेंगा झाडावर येतात. यात सात-आठ काळ्या बिया असतात ज्या पटकन रुजतात नी फुलतात. शंभर टक्के भारतीय झाड असल्याने या गुणी झाडाचे अनेक उपयोग आयुर्वेदाला ज्ञात आहेत. ते प्रसिद्ध अशोकारिष्ट आणि अशोककल्प याचीच देणगी आहे. पोटाच्या, मूत्रमार्गाच्या समस्यांवर या झाडाचा विविध प्रकारे होणारा वापर लक्षणीय आहे. असं गुणी झाड आपल्याकडे उपेक्षित असलं तरी दक्षिण भारतात, जनककन्येमुळे पूजनीय समजलं जातं. पूर्वेच्या राज्यांत अशोकाच्या झाडाखाली राजपुत्र सिद्धार्थाचा जन्म झाला असं मानत असल्याने त्याला तोडलं जात नाही. भगवान महावीरांनी याच्या सावलीत बसून हितोपदेश केल्याने जैन धर्मीयांनादेखील हे पूज्य आहेच. असं पूज्य असलेलं झाड अजून एका गोष्टीमुळे नशीबवान आहे. उत्तर प्रदेश राज्याने या अशोकाला राज्यवृक्षाचा दर्जा दिला आहेच, पण याच जोडीला, ओरिसा राज्याने याच्या फुलांना राज्यफुलांचा दर्जा दिलाय. फार थोडी झाडं अशी सन्मानित होतात. या झाडाला प्रचंड आकार नसल्याने याचं लाकूड मोठय़ा कामासाठी वापरलं जात नाही. कमी कचरा करणारं हे सदाहरित झाड अनेक ठिकाणी फुलतंय. त्याला फुलताना पाहायला मिळणं ही संधी पुढच्या वर्षांपर्यंत येणार नाही, तेव्हा पाहायला विसरू नका.

आसमंतातल्या चर्चेमध्ये देशी आणि विदेशी झाडं असा फरक सांगण्याचा हेतू हाच आहे की, पूर्वापार भारतीय ऋतुचक्र आणि जीवनशैलीची नाळ एकमेकांशी घट्ट जोडली गेली आहे. शिशिराच्या थंडीने आळसावलेला निसर्ग वसंतात आनंदून ग्रीष्माच्या तयारीला लागताना पाहाणं खरंच रंजक असतं. मार्च महिना निसर्गात खूप घटना घडण्याचा असतो. पण आपल्या ‘मार्च एण्ड’च्या धबडग्यात वर्षांनुर्वष मार्च येतो नि जातो. निसर्ग फुलतो नि ते बघायचं राहूनच जातं. मार्चच्या दगदगीत अनेकदा गुलझार लिखित  ‘दिल ढुंढता है, फुरसत के रात दिन’ गाण्याची प्रचीती कुठे ना कुठे मन घेत असतंच. हल्ली ऑफिसमधल्या शोभेच्या झाडांनाच हिरवा निसर्ग समजून, एसीच्या गारव्यालाच थंडी म्हणणारे लोक जेव्हा घाटमाथ्यावर, दरीखोऱ्यात नि कातळ कपारींमध्ये अजूनही रेंगाळलेल्या गारव्याचा आनंद अनुभवतात, तेव्हा मनापासून म्हणतात, ‘बॉस, छोटा रिचार्ज जरुरी है’! ऑफकोर्स, असे छोटे रिचार्ज वारंवार जरुरी है! आसमंतात जागोजागी अनेक लहानलहान नेत्रसुखद रिचार्जिग पॉइंट्स उपलब्ध आहेतच, ते शोधणं जरुरी आहे. सो चलो, लेट्स गेट रिचाज्र्ड क्विकली..

खोटा बदाम
खोटा बदाम

response.lokprabha@expressindia.com