एसीएन नंबियार हे ‘जर्मनीतले नेताजींचे उजवे हात’, तर जॉर्ज फर्नाडिस यांच्या मते, ‘नेहरू घराण्याच्या कारवाया माहीत असलेला माणूस’! या दोन्ही नेत्यांशी, नेहरू कुटुंबाशी नंबियार यांचे उत्तम संबंध होते. पण हे नंबियार कोण? याचं गूढ उकलण्यासाठी अनेक परीनं शोध घेणारं हे पुस्तक..

बर्लिन. १४ ऑक्टोबर १९४२. हिटलरच्या राजवटीचे परराष्ट्रमंत्री रिबेनट्रॉप आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची बैठक. जपानी फौजांच्या हाती सिंगापूर पडलं होतं. आग्नेय आशियात ब्रिटिशांची पीछेहाट होत होती. या पाश्र्वभूमीवर नेताजी जर्मनीहून अतिपूर्वेकडे जाण्याच्या तयारीत होते. नेताजींच्या सोबत त्यांचे एक सहकारी होते. जर्मनीतून आपण गेल्यावर ‘आझाद हिंद कार्यालया’चे प्रमुख आपले हे सहकारी असतील, असं रिबेनट्रॉप यांना नेताजींनी सांगितलं.

raj thackeray, mns, Mahayuti, lok sabha 2024 election, Uddhav Thackeray group
महायुतीला पाठिंबा दिल्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांचा ठाकरे गटाकडे ओढा वाढला
Attack on Israel by terrorist groups
इराणच्या नेतृत्वात हिजबुल्ला, हुथी अन् पॅलेस्टिनी दहशतवादी गट एकत्र; इस्रायल हल्ले कसे रोखणार?
what is quds force
इस्रायलने सीरियात इराणी जनरलला का मारले; कुड्स फोर्स कोण आहेत?
Bhayander
भाईंदर : माजी आमदार गिल्बर्ट मेन्डोन्सांच्या भूमिकेकडे लक्ष, महायुती व महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच

हे सहकारी होते आरातिल कन्डोत नारायणन (एसीएन) नंबियार. नवी दिल्ली. १९ जून १९८८. ‘इंडियन एक्स्प्रेस’ या इंग्रजी वृत्तपत्राच्या प्रतिनिधीशी बोलताना जॉर्ज फर्नाडिस यांनी सांगितलं – ‘जर्मनीत स्वतंत्र भारताचे राजदूत असलेले नारायणन नंबियार यांच्या कारवायांमागील गूढ उकलल्यास तुम्हाला या शतकातील सर्वात मोठी बातमी मिळेल. नेहरू कुटुंबातील हयात असलेल्या व नसलेल्या सर्व सदस्यांच्या खऱ्या कारनाम्यांची बित्तंबातमी मिळवायची असल्यास नंबियार यांच्या परदेशातील कारवायांसंबंधीच्या फायली भारताच्या हाती येण्याची निंतात आवश्यकता आहे.’

नंबियार यांचं १९८६ साली नवी दिल्लीत निधन झालं होतं.

एकेकाळी ‘नेताजींचे जर्मनीतील उजवे हात’ मानले गेलेले; नंतर जॉर्ज फर्नाडिस यांना ‘नेहरू कुटुंबीयांच्या सर्व कारनाम्यांतील प्रमुख हस्तक’ वाटणारे हे नंबियार होते तरी कोण?

हे गूढ उकलण्याचा प्रयत्न वप्पाला बालचंद्रन यांनी ‘अ लाइफ इन श्ॉडो : अ सीक्रेट स्टोरी ऑफ एसीएन नंबियार – अ फरगॉटन अ‍ॅन्टी कलोनियल वॉरियर’ या पुस्तकात केला आहे. भारताची गुप्तचर संघटना असलेल्या ‘रॉ’मध्ये बालचंद्रन यांनी अनेक वर्षे वरिष्ठ पदावर काम केलं आहे. मुंबईवर २६/११ ला झालेल्या हल्ल्याच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीचेही बालचंद्रन हे सदस्य होते.

खरं तर ‘रॉ’मधील कार्यकाळामुळंच बालचंद्रन यांची प्रथम नंबियार यांच्याशी भेट झाली. युरोपातील एका देशातील भारतीय दूतावासात अधिकारी असताना त्यांना वरिष्ठांकडून संदेश आला की, स्वित्र्झलडमधील झुरिक या शहरात जाऊन सोबत दिलेल्या पत्त्यावर राहणाऱ्या एका वयोवृद्ध भारतीयाची भेट घ्यावी आणि त्यांची ख्यालीखुशाली विचारून त्यासंबंधीची माहिती कळवावी. भारतातील अतिवरिष्ठ राजकीय स्तरावरून हे काम तुमच्याकडं सोपवण्यात आल्याची पुस्तीही या संदेशाला जोडलेली होती.

भारतातून आलेल्या संदेशातील झुरिकमधील पत्त्यावर जाण्यापासून बालचंद्रन यांच्या पुस्तकाची सुरुवात होते आणि एखाद्या गूढ घटनेचा एक एक पदर उलगडत जावा, तसे नंबियार यांच्या व्यक्तिमत्त्वाचे एक एक पैलू वाचकांसमोर येत जातात.

वस्तुत: नंबियार –  त्यांच्या घनिष्ट  वर्तुळातील लोकांसाठी नानू – यांना बालचंद्रन प्रथम भेटले, ते २४ एप्रिल १९८० ला. नंबियार यांचं निधन झालं १७ जानेवारी १९८६ ला. केवळ या जेमतेम सहा वर्षांच्या काळातील भेटी व त्यावेळी झालेल्या गप्पांतून नंबियार व बालचंद्रन यांच्यात एक नवा भावबंध तयार झाला. वयाच्या नव्वदीत झुरिक येथे एकाकी आयुष्य कंठणाऱ्या नंबियार यांच्यासाठी बालचंद्रन यांची भेट हा एक मोठा विरंगुळा होता आणि त्यांच्याशी झालेल्या गप्पागोष्टीच्या ओघात नंबियार यांनी आपल्या आयुष्यातील अनेक घटना, त्यासंबंधातील व्यक्ती, त्यांच्याशी असलेले संबंध यांबाबत बालचंद्रन यांना तपशील सांगितला. स्वातंत्र्यपूर्व काळात युरोपात अनेक दशकं वास्तव्य केलेल्या आणि भारतीय स्वातंत्र्यलढय़ातील अनेक मोठय़ा नेत्यांच्या संपर्कात आलेल्या या व्यक्तीकडे असलेला या माहिती व तपशिलाचा खजिना भविष्यातील पिढीला उपलब्ध झाला पाहिजे, या विचारानं नंबियार यांनी आपल्या आठवणी लिहाव्यात म्हणून बालचंद्रन यांनी त्यांच्यामागं लकडा लावला. पण नंबियार प्रथम बधले नाहीत. अखेर आपल्या आठवणी ध्वनिमुद्रित करण्याची तयारी त्यांनी दाखवली. या ध्वनिमुद्रित आठवणींची १२८ पाने भरली. त्याचबरोबर बालचंद्रन यांच्याबद्दल विश्वास वाटू लागल्यानं पंडित जवाहरलाल नेहरू व इंदिरा गांधी यांच्याशी झालेला पत्रव्यवहार

आणि इतर सर्व कागदपत्रं त्यांच्या हवाली करण्यासही नंबियार तयार झाले. मात्र त्यापैकी फक्त नेहरूंच्या पत्राच्या प्रती व इंदिराजींशी झालेला पत्रव्यवहार बालचंद्रन यांनी स्वीकारला. पुढं नंबियार १९८४

साली दिल्लीत परतले आणि दोनच वर्षांत त्यांचं निधन झालं.

या घटनेला १५ वर्षे उलटून गेल्यावर २००१ साली बालचंद्रन यांनी या पुस्तकाच्या कामाला हात घातला, तो नंबियार यांच्या गूढ व्यक्तिमत्त्वानं त्यांना घातलेली भुरळ आणि वसाहतवादाच्या विरोधात युरोपात राहून स्वातंत्र्यलढय़ाला मदत करू पाहणाऱ्या नंबियार यांचं योगदान विस्मृतीच्या पडद्याआड जाता कामा नये, त्याची योग्य ती नोंद घेतली गेली पाहिजे, या दृष्टिकोनातूनच बालचंद्रन यांनी हे पुस्तक लिहिण्याचा निर्णय घेतला. नंबियार यांच्या ध्वनिमुद्रित आठवणी आणि नेहरू व इंदिरा गांधी यांनी लिहिलेली पत्रं यापलीकडे त्यांच्यापाशी फारसे काही दस्तऐवज उपलब्ध नव्हते. मात्र ‘रॉ’च्या सेवेतून १९८८ सालीच निवृत्त झालेल्या बालचंद्रन यांनी ‘नंबियार’ या व्यक्तीच्या भोवती असलेलं गूढ उकलण्यासाठी जे प्रयत्न केले आहेत आणि जे परिश्रम घेतले आहेत, त्याची प्रचीती या पुस्तकातील भरगच्च तपशील व त्याचा अन्वयार्थ लावणारं विश्लेषण आणून देतं.

केरळच्या कण्णूर जिल्हय़ातील तेल्लिचेरी येथील एका उच्चशिक्षित श्रीमंत कुटुंबातील सहा भाऊ व बहिणींपैकी एक असलेले नंबियार हे शिक्षण पुरं झाल्यावर नोकरीच्या निमित्तानं भारताचा किनारा सोडून युरोपात गेले. नंतर जवळ जवळ सहा दशकं त्यांचं वास्तव्य – अधून मधून झालेल्या भारतभेटी सोडल्यास- युरोपातील विविध देशांत होतं. त्यापैकी मोठा कालखंड हा जर्मनीत व त्या खालोखाल ब्रिटनमध्ये गेला. या साऱ्या कालखंडात त्यांनी काय काय केलं, याचा घटना व व्यक्ती यांच्या भोवती गुंफलेल्या तपशिलाच्या आधारे अत्यंत चित्रमय शैलीत बालचंद्रन यांनी पुस्तकात मागोवा घेतला आहे.

विशेष म्हणजे ‘जर्मनीतील नेताजींचे उजवे हात’ मानले गेलेले नंबियार यांच्या बालचंद्रन यांच्याशी सहा वर्षांच्या कालावधीत ज्या गप्पागोष्टी झाल्या, त्यात अभावानंच त्या संबंधीचा तपशील उघड झाला होता.

नंबियार यांचं लग्न झालं होतं, ते सरोजिनी नायडू आणि वीरेंद्रनाथ व हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांची बहीण सुहासिनी हिच्याशी. कम्युनिस्ट चळवळीशी त्यांचा संबंध आला. तसंच जर्मनीत गेल्यानंतर तेथील भारतीयांशी संपर्क आल्यावर वसाहतवादाच्या विरोधातील मोहिमेच्या आखणीतही ते सहभागी झाले होते. हिटलरच्या नात्झी (नाझी) पक्षाच्या उदयाच्या आणि नंतर अस्ताच्या काळात नंबियार हे जर्मनीतच होते. जर्मन कायदेमंडळाला – ‘राइशस्टाग’ला – लागलेल्या आगीच्या प्रकरणात त्यांना संशयित म्हणून हिटलरच्या राजवटीनं अटकही केली होती; ती कम्युनिस्टांचे हितचिंतक असल्याच्या संशयावरून. पुढं त्यांना सोडून देण्यात आलं आणि जर्मनीतून हद्दपारही करण्यात आलं. नंबियार प्राग येथे गेले. तेथेच त्यांची १९३४ साली नेताजींशी प्रथम भेट झाली. पुढं नेताजी युरोपात येत, तेव्हा या भेटी घडत गेल्या. पण नेताजी भारतातून गुप्तपणे अफगाणिस्तानमार्गे पॅरिसला पोहोचले, तेव्हा त्यांच्याकडून आलेल्या पहिल्या मध्यस्थानं प्राग इथं नंबियार यांना शोधून काढलं. या घटनेचं एखाद्या गुप्तहेर कथेला शोभावं असं जे वर्णन बालचंद्रन यांनी केलं आहे, ते मुळातूनच वाचण्याजोगं आहे.

त्या वेळी फ्रान्स हा जर्मनीच्या ताब्यात होता. या भेटीत भारत सोडण्यामागचा उद्देश व पुढला बेत याची माहिती नेताजींनी नंबियार यांना दिली. जर्मनीत ‘आझाद हिंद कार्यालय’ स्थापन करण्यात आणि त्याचं काम बघण्यासाठी तुमची मदत हवी आहे, असं नेताजींनी नंबियार यांना सांगितलं. पण नंबियार यांनी लगेच होकार दिला नाही. पुढं सहा महिन्यांच्या कालावधीत नेताजींनी तीन वेळ नंबियार यांच्याकडे मध्यस्थ पाठवले. शेवटी नंबियार तयार झाले. मात्र नात्झी राजवटीबद्दलच्या नेताजींच्या मताशी नंबियार सहमत नव्हते. पण भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांच्या पाठीशी आपण उभे राहायला हवं, ही भावना त्यांच्या ठायी तीव्रतेनं होती. त्यामुळं त्यांनी नेताजींना साथ देण्याचं ठरवलं.

जर्मनीत परतण्याची परवानगी त्यांना मिळाली. ‘आझाद हिंद कार्यालय’ सुरू झालं. जर्मनीतून ‘आझाद हिंद’चं नभोवाणी प्रक्षेपणही सुरू करण्यात आलं. नंबियार यांनी नेताजींना ही साथ दिली, ती ८ फेब्रुवारी १९४३ पर्यंत. त्या दिवशी नेताजींनी जर्मन पाणबुडीतून आग्नेय आशियाकडे प्रयाण केलं. पुढे युद्धाच्या शेवटी नंबियार यांना ब्रिटिश फौजांनी ताब्यात घेतलं. नंतर त्यांची सुटका झाली. कालांतरानं ते झुरिकला परतले.

या सगळ्या कालखंडातील घटनांवर विस्तृत तपशिलांच्या आधारे प्रकाश टाकत बालचंद्रन यांनी त्यांचं सखोल विश्लेषण केलं आहे. नंबियार यांच्याशी नातं असलेल्या आणि त्यांच्या घनिष्ट वर्तुळात असलेल्या व्यक्तींशी त्यांचे जे संबंध होते, त्यावरही बालचंद्रन यांनी प्रकाश टाकला आहे.

या पुस्तकातील अनेक तपशील हे मराठी वाचकांना कदाचित नवी माहिती देऊ शकतील. उदाहरणार्थ, नंबियार यांनी प्रथम जर्मनीतील भारतीयांची जी संघटना बांधायचा प्रयत्न केला, त्यात नरहरी गोविंद गणपुले हे सहभागी झाले होते. त्यांच्या जोडीला तळवलकर हेही एक गृहस्थ होते. गांधीजींच्या ‘नवजीवन मुद्रणालया’साठी यंत्रसामग्री मिळते काय, हे पाहण्यासाठी गणुपले १९२२ साली जर्मनीत आले होते. तेथे ते वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय यांच्या संपर्कात आले आणि कम्युनिस्ट विचारांकडे वळले. गणपुले व तळवलकर यांनी मिळून ‘हिंदुस्तान हाऊस’ ही संघटना उभी केली होती आणि दोन व्यापारी नियतकालिकंही ते चालवत होते. कम्युनिस्ट प्रचारासाठी ही नियतकालिकं वापरली जात असल्याचं कारण देऊन ब्रिटिश सरकारनं ती भारतात प्रसारित करण्यास बंदी घातली होती.

अशीच गोष्ट नंबियार यांच्या पत्नी सुहासिनी यांची आहे. वैवाहिक संबंधातील ताणतणावापायी सुहासिनी या भारतात परतल्या. नंतर नंबियार यांचे एका जर्मन महिलेशी प्रेमसंबंध जुळेपर्यंत ते परत येतील याची वाट सुहासिनी या पाहात होत्या. त्या कम्युनिस्ट चळवळीत ओढल्या गेल्या. मेरठ कटाच्या खटल्यात त्यांचा हात आहे काय, याची चौकशीही गुप्तहेर खात्यानं केली होती. कालांतरानं त्या मुंबईत स्थिरावल्या आणि कम्युनिस्ट चळवळीतील रामकृष्ण महादेव जांभेकर यांच्याशी त्यांचा संबंध आला. ‘फ्रेंड्स ऑफ सोव्हिएत युनियन’ या संघटनेशी जांभेकर संबंधित होते. नंबियार हे भारतात परत आले नाहीत. तेव्हा सुहासिनी यांनी जांभेकर यांच्याशी विवाह केला. हे जांभेकर संघटनेच्या कामानिमित्त प्रागला जात असत. तेथे १९५० च्या सुमारास सुहासिनी व नंबियार यांची भेट झाल्याची नोंद बालचंद्रन यांनी केली आहे. जांभेकर व सुहासिनी हे मुंबईत खार येथे राहात असत. सुहासिनी यांचं १९७३ साली निधन झालं. त्यांच्यावरच्या कवितांचा  ‘गेला तुझा आता हातातील हात’ हा संग्रह जांभेकर यांनी नंतर प्रसिद्ध केला होता.

विजयलक्ष्मी पंडित आणि कृष्णा हाथिसिंग या पंडितजींच्या दोन्ही बहिणींचा नंबियार यांच्याशी झालेला पत्रव्यवहार नेहरू कुटुंबीयांतील कुरबुरींपासून ते त्या काळातील राजकारणावर बरंच बोलकं भाष्य करतो. हीच गोष्ट आहे नंबियार व इंदिरा गांधी यांच्यातील पत्रव्यवहाराची. कमला नेहरू आजारी असताना परदेशात औषधोपचारासाठी गेल्या होत्या, तेव्हा प्रथम इंदिरा गांधी व नंबियार यांची भेट झाली होती. तेव्हापासून ते इंदिरा गांधी यांच्या हत्येच्या आधी केवळ १० दिवसांपूर्वीचं शेवटचं पत्र इतका मोठा हा पत्रव्यवहार आहे. त्यातील एका पत्रात इंदिरा गांधी नंबियार यांना लिहितात- ‘मी सध्या फार व्यथित आहे. मला माझ्या नातवाला भेटू दिलं जात नाही. त्याचा उद्या वाढदिवस आहे, मला त्याची खूप आठवण येत आहे, पण भेटणं कठीण झालं आहे.’ हा संदर्भ मेनका आणि वरुण गांधी यांच्याबाबतचा आहे. पुढील पत्रात इंदिरा गांधी म्हणतात, ‘नातवाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याला भेटवस्तू देण्यासाठी सोनियाला मी त्याच्या शाळेत पाठवलं. पण केवळ काही मिनिटंच त्याला भेटू देण्यात आलं आणि नंतर वृत्तपत्रात बातमीही प्रसिद्ध झाली, की सोनिया त्याचं अपहरण करण्यासाठी आली होती.’ सर्वशक्तिमान पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधी आपल्या व्यक्तिगत आयुष्यातील वेदना नंबियार यांच्याशी खुलेपणानं व्यक्त करताना आढळतात.

हे व असेच व्यक्तिगत संबंध हे नंबियार यांच्या व्यक्तिमत्त्वाभोवती गूढतेचं वलय निर्माण करणारे ठरत गेले. त्यामुळंच नेहरूंशी घनिष्ट  संबंध असूनही नेताजींना नंबियार जवळचे वाटत होते आणि त्यामुळंच ‘नंबियार यांच्यापाशी नेहरू-गांधी घराण्याच्या कारनाम्यांचा तपशील आहे,’ अशी जॉर्ज फर्नाडिस यांची समजूत होती.

मात्र खुद्द बालचंद्रन आपलं मत नोंदवताना सांगतात – ‘नंबियार यांची कार्यपद्धती व त्यांचे विविधांगी संबंध असा समज रुजण्यास कारणीभूत ठरले होते. त्यामुळंच नंबियार यांच्याभोवती गूढतेचं वलय निर्माण झालं होतं आणि ते तसं टिकवण्यात त्यांनाही रस होता.’

आपल्या ३४४ पानांच्या पुस्तकाच्या शेवटी बालचंद्रन जेव्हा हा निष्कर्ष काढतात, तेव्हा वाचकालाही तो पटण्याएवढा पुरावा त्यांनी आधीच्या ३४३ पानांत दिलेला असतो. पुस्तक खाली ठेवल्यावर मनावर ठसा उमटतो, तो देशी व विदेशी राजकारणाच्या मुख्य प्रवाहाच्या परिघावर राहूनही त्यावर नजर ठेवणाऱ्या आणि वेळ पडल्यावर त्यात सहभागी होणाऱ्या एका हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाचा.

 

‘अ लाइफ इन शडो – द सीक्रेट स्टोरी ऑफ एसीएन नंबियार-अ  फर्गॉटन अ‍ॅन्टिकलोनियल वॉरियर

प्रकाशक : रोली बुक्स

लेखक : वप्पाला बालचंद्रन

पृष्ठे : ३४४; किंमत : ६९५ रुपये

 

प्रकाश बाळ

prakaaaa@gmail.com