मुघल वंशाचा पहिला राजा चेंगीझखान याच्यापासूनच मुघल राजवटींबद्दल अनेक गैरसमज पाश्चात्त्यांत आणि भारतीयांतही आहेत. ‘अकबरापासून औरंगजेबापर्यंतच्या मुघल सम्राटांच्या दरबारामध्ये संस्कृत भाषेला असलेले स्थान’ या विषयाचा सखोल अभ्यास करून अनेक दाखले देणाऱ्या या पुस्तकातून मात्र, हे गैरसमज गळून पडण्यास मदत होते..

सम्राट अकबराची ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल. येथील उच्चवर्णीय आणि कडव्या मुसलमानांना त्याच्याबद्दल काडीचीही आपुलकी नाही. कारण ते अकबराला खरा मुसलमान मानतच नाहीत. अकबर जरा जास्तच ‘सेक्युलर’ होता असे त्यांचे मत. ते हिंदू सनातन्यांना अजिबात अमान्य. त्यांच्या मते, तो कट्टर धर्मवादी होता, क्रूर होता, त्याचे पूर्वज आणि वंशज क्रूर होते, येथील हिंदूंच्या त्याने सरसकट कत्तली केल्या, त्याला दारूचे, अफूचे व्यसन होते, बायकांच्या बाबतीत तो नादान होता, अनैतिक होता. तेव्हा तो कसला थोर असा त्यांचा सवाल आहे. एकंदर कट्टर मुस्लीम आणि कडवे हिंदू यांचे अनेक बाबतीत एकमत असते. तसेच ते, अकबर थोर नव्हता याबाबतही आहे. त्यात तथ्य आहे असे मानले; येथील कट्टर हिंदुत्ववादी सांगतात त्याप्रमाणे अकबराचे आणि एकंदरच त्याच्या वंशजांचे चरित्र हे क्रूर आक्रमक आणि कट्टर हिंदुधर्मद्वेष्टय़ाचे होते असे मानले, तर मग अकबर आणि हिंदू रजपूत राजे यांच्या संबंधांचे काय करायचे हा प्रश्न उभा राहतो. अकबराने जैनांच्या पर्युषण पर्वात पशुवधावर घातलेल्या बंदीचे काय करायचे, मथुरेतील मंदिरांच्या संरक्षणासाठी त्याने जारी केलेल्या फर्मानांचे काय करायचे, अकबरापासून औरंगजेबापर्यंतच्या मुघल सम्राटांच्या दरबारात प्रवेश मिळावा म्हणून धडपडणाऱ्या ब्राह्मण पंडितांचे आणि जैन विद्वानांचे काय करायचे असाही प्रश्न पडतो. या सर्व सवालांतून एकच गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे कोणत्याही इतिहासपुरुषाचे चरित्र असे कृष्ण-धवल नसते. हिंदुस्थानातील मुघल कालखंडाकडे पाहायचे, तर ब्रिटिश कालखंडात आपल्या डोळ्यांवर चढविण्यात आलेला चष्मा बाजूला ठेवावा लागेल. बाबरापासून औरंगजेबापर्यंतचे मुघल राजे हे त्यांच्या काळातील अन्य राजांप्रमाणे धार्मिकच होते आणि धर्म हा त्यांच्या राजकारणाचा भाग होता. सोयीनुसार त्याचा वापर करण्यात येत होता. सोयीनुसार तो बाजूला ठेवण्यात येत होता. शिवाजी महाराजांसारख्या काही अपवादाने ही गोष्ट अधिकच स्पष्ट होते. तसे नसते, तर येथील असंख्य हिंदू राजे मुघलांच्या साम्राज्यासाठी झटले नसते. या झटण्यामध्ये अकबराच्या फौजांनी केलेल्या कत्तलींत भाग घेणे ही गोष्टही येते, हे लक्षात घेतले पाहिजे. मुघलांचा धर्म आणि त्यांचे राजकारण यांच्यातील हे नाते समजून घेण्याचे एक महत्त्वाचे साधन म्हणून ऑड्रे ट्रश्क (Audrey Truschke) यांच्या ‘कल्चर ऑफ एन्काउंटर्स’ या ग्रंथाकडे पाहता येईल. अकबरापासून औरंगजेबापर्यंतच्या मुघल सम्राटांच्या दरबारामध्ये संस्कृत भाषेला असलेले महत्त्वाचे स्थान हा त्यांच्या ग्रंथाचा विषय आहे. मुघल सम्राटांनी येथील हिंदू संस्कृतीची वाट लावली, ते रानटी आणि असंस्कृत होते, असा जो इतिहास उच्चरवाने सांगितला जातो, नेमका त्यालाच छेद देणारे असे हे प्रतिपादन आहे. ते पाहण्यापूर्वी हे मुघल म्हणजे कोण ते समजून घेणे आवश्यक आहे.

morarji desai drink urine
माजी पंतप्रधान मोरारजी देसाई खरंच ‘शिवांबू’ प्राशन करायचे? जाणून घ्या
Sita & Akbar: How names of two lions became the reason for a plea in Calcutta High Court
अकबराची बहीण लक्ष्मी? अकबर, सीता, तेंडुलकर आदी नावं प्राण्यांना द्यायची पद्धत कशी पडली?
loksatta kutuhal article about perfect artificial intelligence
कुतूहल : परिपूर्ण बुद्धिमत्तेचे धोके
Razmanama Mahabharata in Persian language
महाभारत संस्कृतातून फारसीत; अकबराच्या साहित्यिक आविष्काराबद्दल तुम्हाला माहितेय का?

सगळेच मुसलमान अरबस्तानातून आले असा सर्वसाधारण समज असतो. पण हे मुघल मूळचे मंगोलियातील. तार्तार, तातार, मुघल, मोगल, मंगोल अशा विविध नावांनी ही जमात ओळखली जाते. चेंगिझखान हा त्यांचा पहिला सम्राट. त्याने या जमातीला राष्ट्र दिले, कायदा दिला, सन्मान दिला. तो मुस्लीम नव्हता. निसर्गाचा, निळ्या आभाळाचा आणि सूर्याचा पूजक होता. त्याने अनेक जमाती, अनेक राज्ये जिंकली. इंग्रज वैज्ञानिक रॉजर बेकन यांनी त्याचे एक कारण सांगितले आहे. ते म्हणतात, ‘केवळ लष्करी बळामुळे नव्हे, तर विज्ञानाच्या जोरावर मंगोल यशस्वी झाले. युद्धासाठी ते सदा उत्सुक असतात, पण आपला फावला वेळ त्यांनी तत्त्वज्ञान शिकण्याच्या कारणी लावला म्हणून ते एवढे आधुनिक झाले.’ जेथे जेथे मंगोल गेले, त्या त्या देशातून त्यांनी नवनवे विचार आत्मसात केले. त्या-त्या देशांनाही नवे विचार दिले. पुढे युरोपियन इतिहासकारांनी, साहित्यिकांनी त्यांची एवढी बदनामी केली, की आज चेंगिझखान हा क्रौर्याचा मूर्तिमंत पुतळा म्हणूनच समोर उभा राहतो. पण इतिहास काही वेगळाच आहे, हे अमेरिकी मानववंशशास्त्रज्ञ जॉक वेदरफोर्ड यांनी ‘चेंगिझखान अँड द मेकिंग ऑफ द मॉडर्न वर्ल्ड’मधून दाखवून दिले आहे. युरोपातील रेनेसाँला चेंगिझखानचे आक्रमण कारणीभूत ठरले असे धक्कादायक प्रतिपादन करणारे हे पुस्तक. त्यात चेंगिझखानने केलेल्या कायद्यांची माहिती देताना वेदरफोर्ड सांगतात :  त्याने आपल्या राज्यात सर्वाना धार्मिक स्वातंत्र्य बहाल केले होते. पुढे याच मुघल घराण्यात तैमूरलंगसारखा क्रूरकर्माही जन्माला आला, हा भाग वेगळा. तैमूरप्रमाणेच अकबरही चेंगिझखानाच्याच वंशातला. त्याचा दुसरा मुलगा चागताई याच्या पंधराव्या पिढीतला. अकबर आणि चेंगिझखान यांची तुलना होऊ  शकत नसली, तरी त्यांची गुण-सूत्रे एकच आहेत हे ऑड्रे यांच्या प्रस्तुत पुस्तकातून समोर येते. अर्थात हे काही चेंगिझखान आणि अकबर यांची तुलना करणारे पुस्तक नाही. त्याचा प्रतिपाद्य विषय आहे मुघल दरबारातील संस्कृत.

भाषांतरापासून प्रार्थनेपर्यंत! 

भाषा हे सत्ताधाऱ्यांच्या हातातील राजकीय शस्त्र असते. ती सांस्कृतिक आणि अंतिमत: सामाजिक सत्तेचे वहन करते. म्हणून राज्यकर्ते आपली भाषा लोकांवर लादण्याचा प्रयत्न करीत असतात. येथे मुघलांनीही तेच केले यात नवल नाही. या मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर याचा जन्म (सध्याच्या) उझबेकिस्तानातला. तो मंगोल तुर्की. त्याची भाषा तुर्की. त्याच्या राज्यात तिला इस्लामी भाषेचा दर्जा मिळाला. पुढे त्याचा नातू अबुलफतह जलालुद्दिन मुहम्मद अकबर याने हिंदुस्तानातील मुघल साम्राज्याची इमारत बळकट केली. त्याच्या काळात दरबारात पर्शियन भाषेचे प्राबल्य वाढले. ती दरबारी भाषा बनली. पण अकबरापासून औरंगजेबापर्यंतच्या सर्व सम्राटांनी संस्कृत भाषेला, संस्कृत विद्वान-पंडितांना दरबारात कमी-जास्त स्थान दिले आहे. हे केवळ त्या राज्यकर्त्यांची चूष म्हणून घडलेले नाही. त्यामागे बहुसांस्कृतिकतेचा, बहुभाषिकतेचा विचार आहे. असा विचार अंतिमत: राजकीयच असतो. ऑड्रे ट्रश्क यांच्या सर्व प्रतिपादनाच्या पाश्र्वभूमीवर सातत्याने ही जाणीव दिसून येते. म्हणूनच मुघल सम्राटांवर कोणतीही आधुनिक विचारधारा आरोपित करण्याच्या फंदात हे पुस्तक पडत नाही.

तसे मुघलांच्याही पूर्वी हिंदुस्थानात राज्य केलेल्या काही घराण्यांचे संस्कृतशी संबंध आलेले आहेत. १३१८मधील नूह सिफर (नऊ  आकाश) या ग्रंथात आमीर खुसरोने तर संस्कृत ही पर्शियन (दरी) पेक्षा वरच्या दर्जाची असल्याचे म्हटले आहे. चौदाव्या शतकात फिरोझशहा तुघलकाने बृहत्संहितेसारख्या अनेक संस्कृत ग्रंथांचे पर्शियनमध्ये भाषांतर करून घेतले होते. त्याच्या आधी मुहम्मद बिन तुघलकाच्या दरबारात जैन विद्वानांचे येणेजाणे असे. अकबराने हाच वारसा पुढे नेल्याचे दिसते. वयाच्या तेराव्या वर्षी गादीवर बसलेल्या अकबराने साधारणत: तिसाव्या वर्षांपर्यंत हिंदुस्थानात आपली सत्ता स्थिर केली. त्यानंतरचा त्याचा काळ हा मोठय़ा प्रमाणावरील सांस्कृतिक आदानप्रदानाचा काळ आहे. त्याच्या दरबारात संस्कृत पंडितांचे सुरुवातीपासूनच स्वागत असे. पुढील काळात त्यांचा वावर वाढल्याचे दिसते. १५७०च्या मध्यावर त्याने धार्मिक वादसंवादाकरिता इबादतखाना ही संस्था उभारली होती. प्रारंभी त्यात केवळ मुस्लिमांनाच प्रवेश होता. लवकरच तेथे ब्राह्मण, ख्रिश्चन, जैन यांनाही प्रवेश देण्यात आला. ही अकबराने तेराव्या शतकातील मंगोल परंपरेशी जोडलेली नाळ. याचबरोबर त्याने आणि त्याच्यानंतर जहांगिर, शहाजहान यांनी संस्कृत भाषेतील अनेक पंडित, कवी यांना आश्रय दिला. अनेक संस्कृत ग्रंथांचे भाषांतर करून घेतले. संस्कृत विद्वान वाचून अर्थ सांगणार आणि पर्शियन विद्वान तो त्यांच्या भाषेत मांडणार असा हा कारभार असे. अथर्ववेदापासून महाभारत आणि रामायणापर्यंतच्या अनेक ग्रंथांचा त्यांत समावेश आहे. हा उद्योग केवळ ग्रंथालयांची सजावट म्हणून केलेला नव्हता. हिंदू संस्कृती समजून घेण्याच्या प्रयत्नांचा तो एक भाग होता. ‘गंगा-जमनी तहजीब’ म्हणून आज जी ओळखली जाते तिचे ते उगमस्थान होते. जैन आचार्य भानुचंद्र अकबराला संस्कृतातील सूर्यसहस्रनाम शिकवितात आणि अकबर दिवसातून चार वेळा नामजप करीत सूर्यप्रार्थना करतो, ही गोष्ट अशा संस्कृती संगमाशिवाय शक्य नसते.

जैन आणि ब्राह्मण पंडित

हे मंगोलवंशीय राज्यकर्ते म्हणजे रानटी, क्रूर, ऐयाश अशी समजूत असणारांनी हे लक्षात घ्यायला हवे की मुघल आणि हिंदू संस्कृतीचा हा संवाद एकतर्फी मुळीच नव्हता की तो राजकीय वटहुकुमांच्या जोरावरही होत नव्हता. मुघल सत्ता जेव्हा येथील हिंदू, मुसलमान राज्यकर्त्यांशी लढाया करीत होती, त्या सर्व काळात मुघलांच्या दरबारात जैन आणि ब्राह्मण पंडितांचा राबता होता, ही लक्षणीय बाब आहे. तो कशासाठी होता याचे सुस्पष्ट उत्तर ऑड्रे ट्रश्क यांनी दिले आहे. त्या सांगतात, हे सगळे राजकीय फायदे उपटण्यासाठी चालले होते. त्यातही ब्राह्मणांपेक्षा जैनांचा अधिक लाभ झाला. याचे कारण गुजरातमध्ये थेट मुघलांची सत्ता होती. बाकी उपखंडातील ब्राह्मण पंडित स्थानिक राज्यकर्त्यांच्या दरबारात जात असत. यासंदर्भात ट्रश्क यांनी जैन तपगच्छचे थोर आचार्य हीरविजय यांचे दिलेले उदाहरण लक्षणीय आहे. १५८३ ते ८५ अशी दोन वर्षे ते मुघल दरबारात होते. अकबराने जगत्गुरू ही उपाधी देऊन त्यांचा गौरव केला होता. या हीरविजय यांनी मुघलांकडून अनेक विशेष सुविधा पदरात पाडून घेतल्या होत्या. जैनांच्या पर्युषण पर्वासह वर्षांतील बारा दिवस पशुवध बंदीचे फर्मान, गुजरातवरील मुघल आक्रमणाच्या वेळी पकडण्यात आलेल्या कैद्यांची सुटका अशा काही महत्त्वाच्या बाबींचा त्यात समावेश आहे. अकबराच्या दरबारातील स्थानाचा वापर करून जैनांमधील विरोधी गटांनी एकमेकांविरोधात सरकारी आदेश काढून घेतल्याचेही उल्लेख आहेत. मथुरेनजीकची मंदिरे आणि गाईंचे संरक्षण करण्यासंदर्भातही अकबराने फर्माने काढली होती. पुढे काही ब्राह्मणांच्या विनंतीवरून जहांगिरनेही पशुवधावर बंदी घातली होती. बनारस आणि प्रयागमध्ये हिंदू यात्रेकरूंवर बसविण्यात आलेला कर कविंद्राचार्य सरस्वती यांच्या विनंतीवरून शहाजहाँने माफ केला होता. ट्रश्क यांनी अशी अनेक उदाहरणे दिली आहेत. त्यावरून संस्कृत पंडितांचे मुघल दरबारातील वजनच अधोरेखित होते. या वजनासाठी जैनांमधील गट जसे एकमेकांशी झगडत होते, तसेच जैन आणि ब्राह्मण पंडितही एकमेकांशी लढत होते. मुघल सम्राटांच्या दयादृष्टीसाठी त्यातील काहींनी मग त्यांची संस्कृत स्तुतिकवनेही आळवल्याची उदाहरणे आहेत. जैन कवी समयसुंदर यांनी ‘अर्थार्थनावली’ या ग्रंथात तर अकबराच्या नावाचे अकवर असे संस्कृतीकरण करून या ‘भारतीय राजा’ला ब्रह्मा (क), वायू (व) आणि अग्नी (र) यांच्या पंक्तीत नेऊन बसवले होते. राजा हा ईश्वरी अवतार असल्याचा सिद्धान्त अशा तुलनांतून बळकट होत असे. बदायुनीसारख्या कट्टर इस्लामी इतिहासकाराला ते अमान्य होते. त्याने त्याच्या ‘मुंतखाब अल् तवारीख’ या पुस्तकात पवित्र सार्वभौमत्वाच्या संस्कृतमधून आलेल्या कल्पनेला विरोध दर्शविताना, तत्कालीन ब्राह्मण अकबराची तुलना रामाशी करीत यावर जोरदार टीका केली आहे. मुघल साम्राज्याला याहून अधिक धार्मिक मान्यता कोणती असणार होती? काही ब्राह्मण पंडितकवींनी तर मुघल राज्यकर्त्यांची गौरवस्तोत्रे रचली होती. बागलाणच्या प्रतापसिंहाच्या पदरी असलेला रुद्रकवी हा संस्कृत पंडित यात मोठाच कुशल होता. अकबरपुत्र दानियलवरील दानशाहचरित, अब्दलरहीम खान-इ-खानन याच्यावरील खानखाननचरित, जहांगीरवरील जहांगीरचरित, खुर्रम अर्थात शहाजहाँवरील कीर्तिसमुल्हास हे या रुद्रकवीचे ग्रंथ. मिथिलेच्या हरिदेव मिश्र यांचा जहांगीरबिरुदावली किंवा काश्मीरच्या मुकंदराय यांच्या पदरी असलेले सुप्रसिद्ध संस्कृतकवी जगन्नाथ पंडित यांनी असफखानवर लिहिलेला असफविलास हा ग्रंथ ही अशी आणखी काही उदाहरणे. औरंगजेब हा सध्याचा हिंदूंचा शत्रू क्रमांक एक. पण ईश्वरदास या तेव्हाच्या ज्योतिषतज्ज्ञाने लिहिलेल्या ‘मुहूर्तरत्न’ या संस्कृत ग्रंथात औरंगजेबाला एक संपूर्ण प्रकरण वाहिलेले आहे. गेल्या एक-दोन शतकांत मुघलांबद्दलची जी प्रतिमा येथील हिंदू मानसावर रुजविण्यात येत आहे त्याला छेद देणाऱ्या अशाच या गोष्टी आहेत.

यातून लगेच मुघल राज्यकर्ते म्हणजे सेक्युलरिझमचे पुतळे अशी प्रमाणपत्रे देता कामा नये. राजकीय वा धार्मिक राजकारणासाठी तेही प्रसंगी धर्माचा वापर करीत असत हे विसरता कामा नये. मात्र त्याचबरोबर मुघल राज्यकर्त्यांनी येथील संस्कृत भाषेचा, ज्ञानपरंपरेचा द्वेष केला नाही याकडेही दुर्लक्ष करता कामा नये. संस्कृत आपल्या साम्राज्यशाही कारभाराकरिता टाकाऊ म्हणून फेकून देण्याऐवजी या राज्यकर्त्यांनी संस्कृत पंडित, कथा-कहाण्या आणि ज्ञानव्यवस्थेचा आपल्या दरबारात अंतर्भाव केला होता. पुढे औरंगजेबाच्या कालखंडात त्याला उतरती कळा लागली, हे खरे. पण ऑड्रे ट्रश्क यांच्या मते त्याची कारणे वेगळी आहेत आणि त्यांचा औरंगजेबाच्या धार्मिक कट्टरतावादाशी फारसा संबंध नाही. किंबहुना त्याच्याबद्दलच्या विविध समजुती – म्हणजे तो बहुसांस्कृतिकतेच्या विरोधात होता, संगीताचा शत्रू होता वगैरे – चुकीच्या असल्याचे ट्रश्क यांनी कॅथरीन शोफिल्ड यांच्या अभ्यासाच्या हवाल्याने म्हटले आहे. याबद्दल वाद असू शकतात. आपले डोळे आपल्या पारंपरिक वैचारिक पडद्याने बांधून घेतलेले असतील, तर हे सर्वच्या सर्व चुकीचे आहे असेही कोणी म्हणू शकते. तसे म्हणणाऱ्यांची संख्या तशी मोठी असते. याचे कारण इतिहासाचा अर्थ अपरिवर्तनीय असतो असे मानण्याकडेच अनेकांचा कल असतो. वस्तुत: तो तसा नसतो. हे मान्य असणाऱ्यांसाठी ऑड्रे ट्रश्क यांचे हे सत्ता आणि साहित्य यांचे नाते मुघल दरबार आणि संस्कृत यांच्या संबंधांतून उलगडून सांगणारे पुस्तक नवदृष्टीदायक ठरेल.

  •  ‘कल्चर ऑफ एन्काउटर्स – संस्कृत अ‍ॅट द मुघल कोट’
  • लेखिका : ऑड्रे ट्रश्क,
  • प्रकाशक : अ‍ॅलन लेन (पेंग्विन बुक्स), २०१६,
  • पृष्ठे :  ३६२, किंमत :  ६९९ रुपये

 

– रवि आमले

ravi.amale@expressindia.com