देशाचा ६८ वा प्रजासत्ताक दिन येत्या गुरुवारी साजरा होईल. त्याआधी, प्रजासत्ताकाविषयी आपले विचार, आपलं चिंतन अधिक समृद्ध करणाऱ्या दोन पुस्तकांची ही ओळख. ‘लोकशाहीच्या चार स्तंभां’च्या पलीकडे, प्रत्यक्ष लोकांमध्ये प्रजासत्ताक कसं आणि किती रुजलं आहे? ‘चार स्तंभां’मधल्या दोषांची चर्चा तर नेहमीचीच, पण ते दोष लोकांवर कसा परिणाम करतात? या प्रश्नांना भिडण्याची हिम्मत या दोन्ही पुस्तकांनी २०१६ सालात दाखवली होती..

भारतीय प्रजासत्ताकाची वाटचाल हा इतिहासकार रामचंद्र गुहांच्या आस्थेचा विषय. ‘इंडिया आफ्टर गांधी’, ‘मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया’ व ‘पॅट्रियटस् अ‍ॅण्ड पार्टिज्न्स’ या गुहांच्या पुस्तकांतून ते दिसून आलेच आहे. या पुस्तकामालिकेतील त्यांचं नवं पुस्तक अलीकडेच आलं आहे. ‘डेमॉक्रॅटस् अ‍ॅण्ड डिसेन्टर्स’ या शीर्षकाचं. आधीच्या पुस्तकांप्रमाणे हेही पुस्तक भारतीय लोकशाही व उदारमतवादी परंपरांचा वेध घेणारं आहे.

पुस्तकाचा पहिला विभाग ‘राजकारण आणि समाज’ या शीर्षकाचा आहे. या विभागातील आठही लेख राजकारण आणि समाज यांच्यातील परस्परसंबंधांवर भाष्य करणारे आहेत. यातले पाकिस्तान आणि चीन या दोन शेजारी देशांबाबतचे लेख वगळले, तर बाकी सारे लेख भारतीय राजकारण, लोकशाही व्यवस्थेची उभारणी यांवर केंद्रित आहेत. यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची वाटचाल, त्यातही विशेषत: नेहरू-पटेल यांच्या काळातील राजकीय संस्कृतीचा वेध घेणारा लेख जसा आहे, तसेच जयप्रकाश नारायण आणि जवाहरलाल नेहरू या दोघांमधील मतभेदाचे मुद्दे सांगणारा लेखही आहे. याच विभागात ‘एट थ्रेटस् टू फ्रीडम ऑफ एक्स्प्रेशन इन इंडिया’ हा महत्त्वाचा लेख आहे. खरं तर ते गुहा यांनी मुंबईमध्ये २०१६च्या जानेवारीमध्ये दिलेलं व्याख्यान आहे. या दीर्घ लेखात गुहा यांनी स्वातंत्र्योत्तर भारतात, विशेषत: गेल्या काही वर्षांमध्ये अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच होण्याची प्रक्रिया कशी चालू राहिली हे सांगताना अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या मार्गातील आठ अडथळेही नमूद केले आहेत. ते असे- जुनाट आणि लोकशाहीविरोधी कायदे, न्यायव्यवस्थेतील कमतरता, अस्मितावादी राजकारणाचा उदय, पोलिसांवरील दबाव, राजकारणी व राजकीय पक्षांची दुटप्पी भूमिका, माध्यमांचे जाहिरातींसाठी शासकीय तसेच इतर व्यावसायिक जाहिरातींवर अवलंबून असणे आणि विशिष्ट विचारसरणीला बांधील असणारे लेखक. या आठ बाबी अभिव्यक्तीसमोर आव्हान उभ्या करणाऱ्या आहेत, असे गुहा यांचे म्हणणे आहे. कोणत्याही देशाच्या लोकशाहीच्या विकासात विचारस्वातंत्र्य हे मूल्य सर्वात महत्त्वाचे. त्याचा आग्रह गुहा या लेखात जसा करतात, तसाच तो या पुस्तकातील इतर लेखांमध्येही ठळकपणे करताना दिसतात.

याच विभागातील ‘डेमॉक्रसी अ‍ॅण्ड व्हॉयलन्स- इन इंडिया, श्रीलंका अ‍ॅण्ड बियॉण्ड’ या लेखात लोकशाही व्यवस्थेचा विचार करताना ते लोकशाही व्यवस्था ही तिच्या ‘हार्डवेअर’ व ‘सॉफ्टवेअर’ या दोन घटकांनी तयार होते हे सांगतात. लोकशाहीचे हार्डवेअर चांगले चालण्यासाठी तिच्यात राजकीय पक्षांची विविधता; नियमित निवडणुका; माध्यमांचे स्वातंत्र्य; स्वतंत्र न्यायव्यवस्था; आणि देशाच्या नागरिकाला देशभरात कुठेही राहण्याचा, काम करण्याचा व संपत्ती निर्माण करण्याचा अधिकार या बाबी गरजेच्या असल्याचे सांगतात. तर श्रद्धा व उपासनास्वातंत्र्य, भाषिक विविधता व स्वातंत्र्य, सांस्कृतिक विविधता या बाबी लोकशाहीचे सॉफ्टवेअर ठरवीत असतात. इथे गुहांनी लोकशाही व्यवस्थांच्या बळकटीसाठी तिच्या संस्थात्मक अंगाबरोबरच लोकशाही व्यवस्थांमधील सांस्कृतिक, भावनिक बाजूलाही महत्त्व दिले आहे.

या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे. यात गुहांनी वापरलेली तुलनात्मक अभ्यासपद्धती. ‘ट्रायबल ट्रॅजेडीज इन इण्डिपेण्डन्ट इंडिया’ हा लेख त्याचे उत्तम उदाहरण आहे. या दीर्घ लेखात त्यांनी आदिवासी व दलित या दोन वंचित समूहांच्या सद्य:स्थितीचे तुलनात्मक विवेचन केले आहे. आदिवासी समूह हा मुख्यत: देशाच्या विशिष्ट भागात वसलेला आहे. त्यामुळे मतदारसंख्या म्हणून त्यांचा प्रभाव दलितांप्रमाणे सर्वत्र नाही. तसेच आदिवासी समूहाला संघटित करणे हे तुलनेने कठीण आहे. या बाबींमुळे आदिवासी समूहाच्या वंचिततेत अधिक भर पडली आहे, हे गुहा दाखवून देतात.

‘विचारसरणी आणि बुद्धिवंत’ या शीर्षकाचा पुस्तकाचा दुसरा विभागही आठ लेखांचा आहे. यात गुहा यांनी मार्क्‍सवादी इतिहासकार एरिक हॉब्सवम, राष्ट्रवादावरच्या मांडणीसाठी विख्यात असलेल्या बेनेडिक्ट अ‍ॅण्डरसन, इतिहासकार धर्मानंद कोसंबी, आंद्रे बेतेल, अमर्त्य सेन, धर्म कुमार, यू. आर. अनंतमूर्ती यांच्याविषयी लिहिले आहे. या साऱ्या विचारवंत, अभ्यासकांच्या ज्ञाननिष्ठेविषयी लिहिले आहे. त्या त्या अभ्यासकाच्या जीवनाची, त्यांच्या ज्ञानात्मक योगदानाची ते इथे ओळख करून देतात. हे सारे करताना गुहा यांनी उदारमतवाद, लोकशाही मूल्य रुजवण्यात बुद्धिवंतांचा हा ज्ञानात्मक व्यवहार कसा उपयोगी पडतो हे संदर्भानिशी दाखवून दिले आहे.

  • ‘डेमॉक्रॅटस् अ‍ॅण्ड डिसेन्टर्स’
  • लेखक : रामचंद्र गुहा
  • प्रकाशक : पेंग्विन / अ‍ॅलन लेन
  • पृष्ठे : ३१७, किंमत : ६९९ रुपये