तो आला, त्यानं पाहिलं अन् त्यानं जिंकून घेतलं सारंअसं काहीसं विराट कोहलीचं वर्णन करावं लागेल. पश्चिम दिल्लीतून आपल्या क्रिेकेटध्यासाचा श्रीगणेशा   करणारा विराट तिन्ही प्रकारांतील क्रिेकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी बजावतो आहे. सचिन, राहुल, लक्ष्मण यांच्या निवृत्तीनंतर एको संक्रमणकाळातून जात असलेल्या भारतीय क्रिेकेटच्या नव्या नायकाची जागा विराट घेऊ पाहत आहे. संक्रमणकाळातील या नायकाची ही विराटकथा..

एक काळ असा होता की, सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग बाद झाल्यावर सामना पाहण्याचे कवित्वच हरपून जायचे. नैराश्याच्या भरात टीव्ही बंद केले जायचे, काही क्रिकेटचाहते तर चक्क मैदान सोडायचे. विराटने अद्याप ती उंची गाठलेली नाही, परंतु वाटचाल मात्र जरूर त्याच दिशेने सुरू झाली आहे. तेंडुलकर, सेहवाग, राहुल द्रविड आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांच्यासारखे भारतीय क्रिकेटचे तारे गेल्या काही वर्षांत अस्ताला गेले. ‘सचिन.. सचिन..’ हा नाद काही वर्षांपूर्वीपर्यंत जगभरातील स्टेडियमवर दुमदुमायचा. परंतु तब्बल दोन तपांनी भारतीय क्रिकेटमध्ये झालेल्या संक्रमणाने आता ती जागा ‘विराट.. विराट..’ या नव्या शब्दांनी घेतली आहे. विराट हा भारतीय क्रिकेटमधील नव्याने राज्याभिषेक झालेला जणू राजाच आहे. दडपणाची तमा न बाळगता क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये भारतीय आव्हानाची धुरा समर्थपणे पेलणाऱ्या विराटसारख्या ध्रुवताऱ्यापुढे युवराज सिंग, सुरेश रैना आणि रोहित शर्मा हे सारे तारे झाकोळून गेले आहेत. तो नेहमी मैदानावर फलंदाजीसाठी उतरल्यावर क्रिकेटरसिकांच्या असंख्य अपेक्षांचे ओझे त्याच्यावर येते. याची पुरती जाणीव असल्यामुळे तो प्रत्येक वेळी संघासाठी या अपेक्षांची पूर्तता आत्मविश्वासाने करतो. सचिन आणि विराट यांच्या बॅट पकडण्याच्या शैलीत विलक्षण साम्य आहे, मात्र फरक आहे तो फटके खेळण्याच्या शैलीत. परंतु सचिनवर जाणवणारे देशाच्या अपेक्षांचे ओझे कधीच विराटवर जाणवले नाही.

chess candidates 2024 nepomniachtchi beats vidit gujrathi
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : गुकेशची दुसऱ्या स्थानी घसरण’ विदितला नमवत नेपोम्नियाशी आघाडीवर; नाकामुराकडून प्रज्ञानंद पराभूत
Rohit breaks Dhoni's sixes record
IPL 2024 MI vs DC : रोहित शर्माने मोडला धोनीचा विक्रम! वॉर्नर-कोहलीच्या ‘या’ खास क्लबमध्येही झाला सामील
Katchatheevu Island
पोर्तुगीजांकडून ब्रिटिशांकडे, ब्रिटिशांकडून भारताकडे, भारताकडून श्रीलंकेकडे… कचाथीवू बेटाचा वादग्रस्त प्रवास!
Mayank bowls the fastest ball in IPL 2024
LSG vs PBKS : बुमराह किंवा शमीला नव्हे, तर दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ खेळाडूला मयंक यादव मानतो आपला आदर्श

विजय लोकपल्ली यांच्या ‘ड्रिव्हन.. द विराट कोहली स्टोरी’ या पुस्तकात सचिन ते विराट हे महत्त्वाचे संक्रमण म्हणजेच क्रिकेटमधील मानसिकतेच्या बदलापासून सुरुवात होते. परंतु हे पुस्तक क्रिकेटची पत्रकारिता करणाऱ्या व्यक्तीने लिहिले आहे, कोण्या एका कथाकाराने नव्हे, ही जाणीव पुस्तकाच्या अथपासून इतिपर्यंत स्मरण करून देते. त्यामुळे यात विराटची कथा केवळ कथारूपात न मांडता, ती इतिहास, पाश्र्वभूमी या स्वरूपात पुढे जाते. त्याच्या फलंदाजीतील तांत्रिकता, फटक्यांची परिपूर्णता, पदलालित्य, आदी अनेक वैशिष्टय़ विस्तृतपणे समोर येतात. त्यामुळे लेखक हा कुठेही गोष्ट सांगण्याच्या फंद्यात पडत नाही. वडिलांचे निधन झाल्यानंतर विराटचे दुसऱ्या दिवशी संघासाठी खेळणे किंवा प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांना गुरुदक्षिणा म्हणून दिलेली स्कोडा कार, हे विराटच्या आयुष्यातील कथात्मक प्रसंग, परंतु ते मांडतानाही लेखक कथाकार बनला नाही, तर पत्रकारितेच्या भाषेतच ते मांडणे त्याने पसंत केले. याशिवाय बातमीदारी करताना आपले मत मांडण्याचे मुळीच स्वातंत्र्य नसते, त्रयस्थ पद्धतीने त्या घटनेकडे पाहायचे असते. नेमकी हीच गोष्ट पुस्तकात पदोपदी जाणवते. लोकपल्ली यातील अनेक घटना स्वत: गोष्टरूपात मांडत नाहीत, तर त्याऐवजी त्यांनी त्या घटनांचे साक्षीदार असलेले खेळाडू, प्रशिक्षक, अन्य मंडळी यांच्या शब्दांतून म्हणजेच त्यांच्या अवतरणांतून त्या अवतरतात. त्यामुळे यात विराटची गोष्ट नव्हे, तर विराटच्या आतापर्यंतच्या जडणघडणीचा रिपोर्ताज मांडला आहे, असे मत होऊ शकते. हे पुस्तक तीन दशके क्रिकेट पत्रकारिता करणाऱ्या व्यक्तीने लिहिले आहे, ही बाब पुस्तकाच्या अखेरच्या टप्प्यातसुद्धा पक्की होते. कारण रजनीश गुप्ता यांची ४० पानांची विराट आकडेवारी त्याचा आजवरचा प्रवास आणि खेळाची उंची आकडय़ांतून मांडते.

शिवाजी पार्कने मुंबईला अनेक क्रिकेटपटू दिले आहेत, नेमके तीच संस्कृती पश्चिम दिल्लीचीही आहे. याच परिसरातून विराट नावारूपास आला. वडील प्रेम कोहली यांनी मुलाला क्रिकेटपटू म्हणून घडवण्याची जबाबदारी राजकुमार यांच्याकडे सोपवली. त्यानंतर विविध वयोगटांच्या क्रिकेटमधील विराटच्या खेळी आणि त्याचा दृष्टिकोन हे सारे मांडतानाच त्याला ‘चिकू’ हे टोपणनाव कसं पडलं, याची कथा साहाय्यक प्रशिक्षक अजित चौधरी यांच्या शब्दांतून आपल्याला कळते. १९९९च्या विश्वचषकादरम्यान सचिनच्या वडिलांचे निधन झाले, पण अंत्यविधीसाठी मुंबईत येऊन गेल्यानंतर सचिनने विश्वचषकात आपला करिष्मा दाखवला आणि ती शतकी खेळी वडिलांना अर्पण केली होती. तसाच एक प्रसंग विराटच्या जीवनात घडला. दिल्लीचा संघ अडचणीत असताना रात्री वडिलांचे निधन झाले, कुटुंबावर जणू आभाळच कोसळले होते, परंतु सकाळी धीरोदात्तपणे विराटनं प्रशिक्षक राजकुमार यांना दूरध्वनी केला आणि ठामपणे संघाला गरज असल्यामुळे मी मैदानावर जाऊन अर्धवट राहिलेली नाबाद खेळी पूर्ण करणार असे सांगितले. विराट शब्दाला जागला. संघाला सावरल्यानंतरच तो घरी परतला. प्रतिस्पर्धी कर्नाटकच्या संघालाही त्याच्या या मन:सामर्थ्यांचे अप्रूप वाटले.

ऑस्ट्रेलिया हे विराटच्या फलंदाजीचे नंदनवन. याच भूमीवर त्याने महेंद्रसिंग धोनीकडून कसोटी क्रिकेटच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली. त्यानंतर भारतीय क्रिकेट आक्रमक स्वरूपात कसे प्रकट होत गेले, हे लोकपल्ली विस्तृतपणे मांडतात. कसोटी क्रिकेटचे भवितव्य अधांतरी आहे. कसोटी सामन्यांना चाहते पाठ फिरवत असल्यामुळे क्रिकेट धुरिण आणि प्रशासक चिंतेत आहेत. दिवस-रात्र कसोटीच्या गुलाबी पर्वालाही प्रेक्षकांचे सामथ्र्य लाभत नाही, हे वास्तव आहे. मात्र या अशा काळातसुद्धा विराट, जो रूट, स्टीव्ह स्मिथ आणि केन विल्यमसन यांनी कसोटी क्रिकेटची मूल्यं जपण्याचा आणि रसिकांना मैदानापर्यंत खेचण्याचा प्रयत्न केल्याचे लेखक ‘कसोटीसाठी सज्ज’ या लेखात मांडतो.

लेखक ‘आयपीएल’चा प्रवास मांडताना थोडासा भरकटल्यासारखा वाटतो. कारण विराटच्या आयपीएलमधील प्रवासाऐवजी आयपीएल कसे जन्माला आले आणि त्याच्या प्रवासातील खाचखळगेसुद्धा मांडण्याचा मोह त्याला आवरलेला नाही. परंतु या विस्तारिकरणाची मुळीच आवश्यकता नसल्याचे अधोरेखित होते.

‘एकदिवसीय क्रिकेट आणि विराट’या लेखात मात्र त्याने समर्पक शब्दांत त्याचे विराटपण रेखाटले आहे. विराटच्या २५ शतकांपैकी २१ सामन्यांत भारताचा विजय झाला आहे, हेच आकडे विराटच्या वेगळेपणाची दखल घेतात. इथेसुद्धा सुनील गावस्कर, व्हिव्हियन रिचर्ड्स यांच्यासारख्या क्रिकेटमधील अवलियांनी विराटच्या खेळीविषयी केलेली तांत्रिक विश्लेषणे लेखक मांडतो. शिकण्याची वृत्ती हे उत्तम कर्णधाराचे वैशिष्टय़ असते. वयाच्या १५व्या वर्षीपासून विराटमध्ये नेतृत्वाचे अंगभूत गुण दिसून येतात. विराटने युवा विश्वचषक जिंकून दिला होता. त्यानंतर आता कसोटी क्रिकेटमध्ये त्याने भारताला अव्वल स्थान प्राप्त करून दिले आहे, या लेखात ते विराटची तुलना लढवय्या मन्सूर अली खान पतौडीशी करतात.

विराटच्या आयुष्यात क्रिकेट म्हणजेच सर्वकाही आहे. सकाळी बिछान्यातून उठल्यापासून रात्री पुन्हा डोळे मिटेपर्यंत क्रिकेट हा एक प्राणवायू त्याला जगण्याची प्रेरणा देतो. ‘आक्रमकता म्हणजे सकारात्मकता’ हे त्याचे ब्रीदवाक्य. मैदानावर याच आक्रमकतेच्या वेगवेगळ्या रूपांमध्ये विराट दिसतो. त्यामुळेच त्याचे मैदानावरील आणि बाहेरील अनेक पंगे त्याला ‘सभ्य गृहस्थांचा खेळ’ असे बिरुद मिरवणाऱ्या खेळामधील आदर्श क्रिकेटपासून थोडेसे दूर नेतात. ऑस्ट्रेलियामधील चाहत्यांशी अशाच प्रकारे त्याचा वाद झाला होता आणि त्याने प्रेक्षकांना उद्देशून मधले बोट दाखवले होते. याबद्दल त्याला शिक्षाही झाली होती. मात्र त्या घटनेसंदर्भातील विराटची बाजू आणि प्रेक्षकांसाठीसुद्धा खेळाडूंप्रमाणेच आचारसंहिता का नसावी, ही त्याची मागणीसुद्धा लेखकाने यात मांडली आहे.

सचिनच्या निरोपाच्या कसोटीचा एक प्रसंग लेखकाने खूप छान पद्धतीने मांडला आहे. कोणतेही कार्य शुभदायी ठरावे, यासाठी विराटच्या वडिलांनी त्याला एक मनगटी धागा दिला होता. तो विराटने सचिनला त्या भावनिक प्रसंगी दिला. विराटच्या डोळ्यांतून अश्रूंचा बांध फुटला होता. त्याने सचिनला पदस्पर्श केला आणि आलिंगन दिलं. याच वेळी भारतीय क्रिकेटच्या अपेक्षांचे ओझे सचिनकडून विराटकडे संक्रमित झाले. क्रिकेटमधील संक्रमण मांडताना विराट आणि सचिन यांच्यातील खेळाडू म्हणून तुलना किंवा विराट आणि धोनी यांच्यातील नेतृत्वाची तुलना, हेसुद्धा लेखक खुबीने जाणकारांच्या प्रतिक्रियांतून मांडतो.

ड्रिव्हन विराट कोहली स्टोरी

  • लेखक – विजय लोकपल्ली
  • प्रकाशक – ब्लूम्सबरी
  • पृष्ठे – २२१, किंमत – ३९९ रु.

prashant.keni@expressindia.com