तो आणि ती हे विदेशी कंपन्यांतल्या नोकरीत. दोघेही मोबाइल, शॉपिंग यांत गर्क.. त्यांच्या शहरावर दहशतवाद्यांची पकड घट्ट होत जाते आणि मग आपल्याच घरात निर्वासितांहूनही हलाखीत राहावं लागणारे हे दोघे सुखाच्या शोधात ‘जादूई द्वारा’तून बाहेर पडतात.. असं कथानक असलेली मोहसीन हमीद यांची ‘एग्झिट वेस्ट’ ही बुकर पारितोषिकाच्या यंदाच्या लघुयादीतली बहुचर्चित कादंबरी आहे..

गेल्या तीनेक वर्षांत अमेरिका-युरोपमधील निर्वासितांवरच्या अकथनात्मक साहित्याला पत्रकारितेने सर्वात मोठी जागा दिली आहे. साडेसहा कोटींच्या संख्येने देश आणि भूमी हरविलेल्या नागरिकांवर रिपोर्ताज, निबंध, राजकीय भूमिकांचे मंथनात्मक आलेख, टीका-टिप्पणी यांचा ऐवज आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या सर्वच मुद्रित माध्यमांत छायाचित्रांसह, तसेच दृक्-श्राव्य माध्यमांतही गाजला आहे; पण यापलीकडे, निर्वासितांच्या साहित्याचाही तांडा तयार होतो आहे. सध्या निर्वासितांच्या कटू-कहाण्या साहित्य आणि त्याच्या वाचकांसाठीही नव्या आहेत. लेबेनॉनमधील पॅलेस्टाइन निर्वासितांच्या मदतकेंद्रात घर थकलेल्या व्यक्तीची भीषण गोष्ट लैला अब्दलरझाक यांच्या ‘बदावी’ (२०१५) या ग्राफिक नॉव्हेलमध्ये चित्र-शब्दबद्ध झाली किंवा अमेरिकेत स्थायिक झालेल्या इराणी निर्वासित प्रोचिस्टा काकपोर यांच्या ‘लास्ट इल्यूजन’ (२०१४) या कादंबरीत इराणी निर्वासित मुलाचे अमेरिकेत स्थलांतर आणि दत्तकत्व मिळण्याच्या प्रवासाची गुंतवून टाकणारी कथा आहे. सीरियातील आलेप्पोमध्ये जन्मलेल्या आणि देश सोडावा लागलेल्या निहाद सिरीज यांच्या ‘द सायलेन्स अ‍ॅण्ड रोअर’ या कादंबरीमध्ये सामान्य माणसांच्या युद्धग्रस्त जगण्याचे सखोल दर्शन मांडले आहे. विएत थान न्युएन या गेल्या वर्षी पुलित्झर पारितोषिक मिळविणाऱ्या लेखकाची नंतरची- या वर्षांतील ‘रिफ्यूजीज’ ही कादंबरी व्हिएतनाममधून निर्वासित म्हणून अमेरिकेत स्थायिक झालेल्या नागरिकांचे आत्मवृत्त आहे. या सगळ्या लेखनामधील साम्य कुठचे असेल, तर निर्वासित अवस्था किनाऱ्याला लागून ब्रिटन-अमेरिकेसारख्या प्रगत देशांत स्थायिक होण्याची, चांगले जगू लागण्याची आणि सुदिन अनुभवण्याची अवस्था प्राप्त झाल्यानंतर त्या त्या लेखक-लेखिकांनी आयुष्यातील दु:खप्रद टप्प्यातील जगण्याला साहित्यात आणले, हे. वृत्तलेखांतील किंवा या कादंबऱ्यांतील निर्वासितांच्या गोष्टी वाचक ‘परदु:ख शीतल’ या तत्त्वानेच वाचतात तसेच या कादंबऱ्याही ‘दु:खरंजन’ म्हणून पाहिल्या जातात. (आपल्याकडे साठोत्तरीत एका साहित्याचा चांगला चाललेला प्रवाहच पुढे कुणी किती दु:ख अधिक प्रमाणात अनुभवले, याची उरस्फोड करणाऱ्या वर्गामुळे लोकप्रिय बनला होता. अगदी तसेच नसले तरी काही प्रमाणात तरी निर्वासितांच्या साहित्याचे ताजे खटले यासारखे झाले आहेत.) निर्वासितांच्या असंबद्ध लोंढय़ातून स्थिरस्थावर अवस्था प्राप्त करू शकणाऱ्या आणि पुढे लिहू धजणाऱ्या व्यक्ती फार थोडय़ा आहेत. प्रत्यक्षात निर्वासितांच्या जगण्याच्या भीषण अवस्था या पुस्तकांतील कथांहून कल्पनातीत आहेत. पाकिस्तानी-ब्रिटिश लेखक मोहसीन हमीद यांची ‘एग्झिट वेस्ट’ ही लघुकादंबरी बुकरच्या लघुयादीमध्ये दाखल होण्याचे कारण त्यात वरवरच्या लक्षवेधी दु:ख पापुद्रय़ापेक्षा निर्वासितांच्या अधिक खऱ्या आणि मृतवत जगण्याच्या नोंदी आहेत.

वर नोंदविल्या गेलेल्या ताज्या निर्वासित साहित्याच्या लोंढय़ाहून ‘एग्झिट वेस्ट’ या कादंबरीचा पोत आणि विचार वेगळा आहे. ही एका अजागळ- अशक्य जगतामध्ये सुरू होणारी, अजिबात कबुतरछाप नसलेली प्रेमकथा आहे. तिला बुडखा आहे, पण शेंडा नाही. या जगाचे नाव पाकिस्तानही असू शकते किंवा त्याहून अधिक युद्धखोर सीरिया किंवा यादवी युद्धाने नाडलेला हा कोणताही देश असू शकतो; पण मोहसीन हमीद यांना त्याचे नाव सांगायचे नाही. इथे प्राध्यापकाच्या पोटी जन्मलेला पापभीरू सईद आणि बुरखावेशात वावरणारी उत्तरआधुनिक विचारांची नादिया यांच्या घट्ट निर्वासित नात्याची गोष्ट आहे.

कादंबरीला सुरुवात होते ती या निनावी देशातील विरोधाभासी जगण्याच्या तपशिलांनी. म्हणजे तेथे सईद एका बहुराष्ट्रीय जाहिरात कंपनीमध्ये काम करतो. त्याचे काम ऑस्ट्रेलियापासून विविध खंडांमध्ये पोहोचत असते. या जाहिरात कंपनीमधील कामाव्यतिरिक्त संध्याकाळच्या फावल्या वेळेत तो आणखी एक आंतरराष्ट्रीय बाजारातील नोकरीसाठी उपयुक्त असा कोर्स करीत असतो. त्या वर्गात त्याची भेट पारंपरिक वेशभूषेतील नादियाशी होते. तो तिला कॉफीचे निमंत्रण देतो. विमा कंपनीत नोकरी करणारी नादिया केवळ पुरुषांचा त्रास टाळण्यासाठी पारंपरिक पोशाख करणारी असते. बाकी देवभोळेपणाऐवजी तिच्यात सईद किंवा कुठल्याही पुरुषाहून अधिक रांगडेपणा अस्तित्वात असतो.

उच्चशिक्षित आई-वडिलांसोबत राहणारा सईद आणि शहरात एकटीच भाडय़ाच्या घरामध्ये राहणारी नादिया यांच्या प्रेमगाण्यांना वावच राहू नये, अशी परिस्थिती त्यांच्या भेटीदरम्यानच्या काळामध्ये निर्माण व्हायला लागते. दहशतवादी शहर ताब्यात घेतात. लष्कर आणि त्यांच्या संघर्षांत सामान्य माणसे मारली जातात. संचारबंदी, हेलिकॉप्टरच्या घिरटय़ा, दहशतवाद्यांच्या कारवाया यांच्या परमोच्च अवस्थेतही मोबाइल फोनची रेंज आणि ऑनलाइन शॉपिंग यावर इथल्या माणसांचे जग सहिष्णू बनलेले असते. नादियाच्या भाडय़ाच्या घरामध्ये सईद बुरखा घालून प्रवेश करू लागतो. गृहयुद्ध आणखी तीव्र होते तेव्हा दोघांचे भेटणे अवघड होऊ लागते. त्यातच त्यांच्या कंपन्याही बंद पडू लागतात. सईदचे वरिष्ठ देश सोडून पळून जातात. नादियाच्या विमा कंपनीतील वरिष्ठ कर्मचाऱ्यांचे पगारही न देता पोबारा करतात. नादिया पगाराऐवजी कंपनीचे दोन लॅपटॉप आणि एक एलसीडी मॉनिटरच आपल्या टू व्हीलर गाडीवरून घरी नेण्यासाठी उचलते. काही दिवस असलेल्या पैशांमध्ये तिची गुजराण होते. त्यानंतर मग शहरातच पैसे आणि वस्तूंचा तुटवडा जाणवू लागतो. मोबाइल सेवा बंद होऊ लागते आणि इंटरनेटवरून वस्तू मिळविणे अवघड बनते. देश सोडून दक्षिण अमेरिकेत भ्रमंतीचे समविचार असलेल्या नादिया आणि सईद यांचे नाते याच काळात वाढते. नादिया आपले राहते घर सोडून सईदकडे राहायला येते. यादवी युद्ध नवे टोक गाठते तेव्हा सईदच्या घराजवळ झालेल्या स्फोटाचे पडसाद नादियालाही जाणवतात आणि नादियाच्या घराजवळ होणाऱ्या हवाई हल्ल्यांचे हादरे सईदच्या घरातूनही कळू शकतात. या सगळ्या हलाखीतच, सारे काही गमावलेल्या या शहराला एक जादूई द्वार असल्याची वावडी लोकांमध्ये मोठय़ा प्रमाणात उठते!

हे जादूई द्वार देशातून सुरक्षित जागी पोहोचविण्यास मदत करणारे असल्याची चर्चा शहरामध्ये सुरू असते. सईदच्या आईच्या मृत्यूनंतर त्याच्या वडिलांशी समझोता करून हे दोघे प्रेमी जोडपे असलेला सारा पैसा आणि मौल्यवान वस्तूंसह जादूई द्वाराकडे निघतात. ग्रीस, जर्मनी, ब्रिटन, अमेरिका आदी राष्ट्रांर्प्यत पोहोचण्यासाठी त्यांना आणखी अनेक द्वारे पार करावी लागतात. तोवरचा प्रवास मात्र सोपा नसतो.

मोहसीन हमीद यांनी आपल्या वयाची २० वर्षे पाकिस्तान आणि उरलेला काळ ब्रिटन आणि अमेरिकेत काढला. अमेरिकेवर झालेल्या हल्ल्यानंतर वैचारिक पर्यावरणच बदलत गेलेल्या अमेरिकेत राहून हमीद यांनी अतिवास्तववादी लेखन केले आहे. या कादंबरीमधील व्यक्तींच्या फरफटीचे तपशील वाचकांना अंगवळणी पडलेल्या, काहीशा कोरडय़ा तरीही भिडणाऱ्या रिपोर्ताजी शैलीत मांडण्यात आले आहेत. इथल्या शहरातील युद्धग्रस्त आणि जगण्यास लायक नसलेल्या परिस्थितीचे भीषण तपशील या दोघांचे पुढे काय होणार, त्यांच्या वाटेला कोणते जगणे येणार या कथाभागापायी पकडून ठेवतात. १३२ पानांच्या या कादंबरीमध्ये निम्मा भाग हा शहराच्या पडझडीकडे जाण्याच्या प्रवासाचा आहे. लोक निर्वासित का होतात, त्यांना कोणत्या परिस्थितीमध्ये सुरक्षिततेसाठी आपला देश, आपले घर, आप्त सोडावे लागतात, याचा खोलवर शोध इथे घेण्यात आलेला आहे. सईद-नादियाचे कादंबरीच्या सुरुवातीचे जगणे हे कोणत्याही आधुनिक शहरापेक्षा कमी दाखविलेले नाही. या मूलतत्त्ववादी शहरात चायनीज रेस्तराँदेखील असते. त्यांची पहिली प्रेमभेट तेथेच होते. बुरख्याआड जीन्स घालणारी नादिया ऑनलाइन शॉपिंगद्वारे मशरूम खरेदी करते. शहर बदलते तेव्हा हिंसाचारात मृत्यू होण्यासोबत पाणी आणि विजेचा प्रश्नदेखील गहन बनतो. लोक उघडय़ावर शौच करण्यासाठी खंदक बनवितात. तेथे जाण्यातील दहशत आणि शहरातल्या स्फोटांची दहशत ही सारखीच असते.

इथल्या दहशतवाद्यांच्या गटाची नावे नाहीत, मात्र त्यांचे क्रौर्य फुटबॉल म्हणून मानवी शिराचा वापर करण्यातून स्पष्ट होते. पुढे या दोघांच्या प्रवासामध्ये भेटणारी जगभरातील विस्थापित माणसे आणि नव्या द्वारांचे मध्यस्थ यांचे विश्वास-अविश्वासाचे जगणे कादंबरीभर पसरले आहे. विस्थापित- निर्वासितांच्या प्रश्नावर इथे उगा भावुक आणि घायाळ करणारी चलाख भूमिका नाही. या आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर शहाजोग सल्ला नाही. मात्र याच प्रश्नांशी झगडणाऱ्या मानवी प्रवृत्तीचा, दोन प्रातिनिधिक उदाहरणांद्वारे घेतलेला हा शोध आहे. अमेरिकेने मुस्लीम राष्ट्रांतील नागरिकांना देशात येण्यास घोषित केलेले निर्बंध, युरोपमधील ब्रेक्झिटोत्तर परिस्थितीत निर्वासितांची चिघळलेली परिस्थिती या पाश्र्वभूमीवर ती ‘बुकर’ मिळवू शकते.

येत्या काळात निर्वासितांना आणखी भीषण जगणे अनुभवायला लागू शकते, अशी जगाची सध्याची आर्थिक परिस्थिती आहे. त्यामुळे त्या जगण्याला पुढील काळातही मोठय़ा प्रमाणावर साहित्यामध्ये स्थान मिळेल. ‘परदु:ख शीतल’ भावना सोडून त्याकडे पाहिल्यास आपल्या जगण्याचे भान वरच्या पायरीवर जाऊ शकेल.

‘एग्झिट वेस्ट’,

लेखक : मोहसिन हमीद

प्रकाशक : हॅमिश हॅमिल्टन

पृष्ठे : २४०, किंमत : ४०७