हॅरी पॉटरचं नवं – आठवं पुस्तक हे नाटय़रूपानं लिहिलं गेलं आहे. आधीच्या सात कादंबऱ्यांपेक्षा ते आणखीच निराळं आहे.. सातव्या कादंबरीअंती हॅरी पॉटर यापुढे दिसणारच नसल्याचं स्पष्ट झालं होतं खरं; पण त्याची ही पुनर्भेट कुठलाही नवा चमत्कार, जादू वा पराक्रम दाखवणारी नसून हॅरी पॉटरही अखेर माणूसच कसा होता, यावर भर देणारी आहे.. अन्य पात्रांच्या नातेसंबंधांचाही मागोवा घेणारी आहे..

एलिस इन वंडरलॅण्ड, अरेबियन नाइट्स, सिंदबाद, सिंड्रेला.. आपल्यापैकी प्रत्येकाचं बालपण समृद्ध करणाऱ्या या कथा. वयाची पस्तिशी पार केलेल्या प्रत्येकाने आपल्या लहानपणी किमान एकदा तरी यापैकी किमान एक तरी पात्राला आपलंसं केलं असेल. त्यांच्या कथांची पाने चाळताना त्या स्वप्नविश्वात प्रवेश केला असेल. ही पात्रे किंवा त्यांच्या कथा अनेकांना आजही भुरळ पाडत असतात. अशीच मोहिनी ‘हॅरी पॉटर’ या व्यक्तिरेखेने गेले दशकभर घातली आहे. जगातील आजवर सर्वाधिक खप झालेली हॅरी पॉटरच्या पुस्तकांची मालिका वाचकांना कल्पनेच्या वेगळ्याच जगात घेऊन गेली. जे. के. रोलिंग या लेखिकेने हॅरी पॉटरच्या रूपाने जगाला केवळ एक सुपरहिरोच मिळवून दिला नाही तर, त्याचं जग वास्तव वाटावं इतक्या हुबेहूब वाचकांसमोर उभं केलं. या जादूच्या जगात आपलं दानवी राज्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या ‘व्होल्डमार्ट’सोबतच्या हॅरी आणि त्याच्या मित्रांच्या लढय़ाच्या सात कहाण्या अवघ्या जगाला भावल्या. तब्बल ४५ कोटी प्रतींच्या खपाचा पल्ला गाठणाऱ्या या पुस्तकांवर बेतलेल्या चित्रपटांनाही भरभरून प्रतिसाद मिळाला. हॅरी पॉटरच्या कहाणीचं वाचकांना इतकं अप्रूप वाटू लागलं की, जेव्हा सातव्या पुस्तकात ‘व्होल्डमार्ट’चा पूर्णपणे अंत झाला, तेव्हा अनेकांनी यासाठी हळहळ व्यक्त केली की, यापुढे हॅरीचा अवतार पुन्हा अनुभवायला मिळणार नाही.

Viral Video Woman performs Aigiri Nandini on 17th century Jal Tarang instrument Do You Know About Jal Yantra
VIDEO: ‘जलतरंग’ वाद्यावर महिलेने सादर केले स्तोत्र; ‘या’ प्राचीन वाद्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
once upon a tome the misadventures of a rare bookseller book review
बुकमार्क : पुस्तकवेडे आणि बाकीचे सगळे!
Marathi JokeMarathi Joke
हास्यतरंग : इंग्रजीचं पुस्तक…
How to draw a cat using 5 four times
Video : चार वेळा इंग्रजीत पाच लिहून काढले सुंदर मांजरीचे चित्र, व्हिडीओ एकदा पाहाच

अशा ‘पॉटरप्रेमीं’ची प्रबळ इच्छा म्हणा की साहित्यात प्रबळ होत चाललेली व्यावसायिकता म्हणा (जे खपतं तेच पिकवायचं, हा कल आता जगभर रुजला आहे!) हॅरी पॉटर परतला आहे, हॅरी पॉटरचं आणखी एक पुस्तक निघालं. ‘हॅरी पॉटर अ‍ॅण्ड द कर्स्ड चाइल्ड’ असं या पुस्तकाचं नाव आहे. मुखपृष्ठावरील ‘हॅरी पॉटर’ ही मोठ्ठी अक्षरं वाचल्यानंतरच उत्कंठा चाळवणाऱ्या या पुस्तकात हॅरी पॉटरचीच गोष्ट आहे, पण ती आधीच्या सात पुस्तकांपेक्षा फारच वेगळी आहे.

खरं तर ‘हॅरी पॉटर अ‍ॅण्ड डेथली हॉलोज’ या सातव्या पुस्तकात ‘व्होल्डमार्ट’चा अंत केल्यानंतर जे. के. रोलिंगने ‘पॉटर’च्या व्यक्तिरेखेला विराम देऊन आपला मोर्चा इतर लिखाणाकडे वळवला होता. पण त्याचदरम्यान जॉन टिफनी आणि जॅक थ्रोन या इंग्लिश नाटय़सृष्टीशी संबंधित असलेल्या लेखक-दिग्दर्शक द्वयीने हॅरी पॉटरवरील नाटकाची कल्पना पुढे आणली. रोलिंगनेही ती उचलून धरली आणि या तिघांच्या संयुक्त लिखाणातून ‘हॅरी पॉटर अ‍ॅण्ड द कर्सड् चाइल्ड’चा जन्म झाला. यावर्षी जुलै महिन्यात ‘ओरिजनल वेस्ट एण्ड प्रोडक्शन’ या ब्रिटिश नाटककंपनीने ते रंगमंचावरही आणलं. हॅरी पॉटरची जादू अजूनही ताजी असल्याने या नाटकाच्या प्रयोगांची पुढच्या वर्षीच्या मेपर्यंतची नोंदणी पूर्ण झाली आहे. (या मजकुरासोबतची छायाचित्रं त्या नाटकातलीच आहेत).

‘हॅरी पॉटर अ‍ॅण्ड द कर्सड् चाइल्ड’ हे पॉटरमालिकेतलं पुस्तक असलं तरी आधीच्या कादंबऱ्यांच्या तुलनेत ते प्रचंड वेगळं आहे. सर्वात मोठा फरक म्हणजे, हे पुस्तक नाटय़संहितेसारखं लिहिलं गेलं आहे. त्यामुळे रोलिंगच्या गोष्टरूपाचा बाज त्याला नाही. एखादी गोष्ट सांगताना त्यातील कल्पनांना मर्यादा नसते. परंतु, तीच गोष्ट नाटय़संहितेच्या रुपात लिहावी लागते, तेव्हा त्यातील दृश्यं रंगमंचावर अवतरली तर कशी दिसतील, याचा विचारही करावा लागतो. त्यामुळे कल्पनाविस्ताराला मर्यादा येतात. ‘..कर्सड् चाइल्ड’ वाचताना ही बाब जाणवते. या पुस्तकातील हा फरक लक्षणीय असला तरी, त्याही पलीकडे अनेक बाबतीत हे पुस्तक वैशिष्टय़पूर्ण आहे.

‘कर्सड् चाइल्ड’ची सुरुवात याआधीच्या, ‘हॅरी पॉटर अ‍ॅण्ड डेथली हॉलोज’च्या शेवटापासूनच होते. हॅरी पॉटरच्या हातून ‘व्होल्डमार्ट’चा अंत झाल्याच्या १९ वर्षांनंतर ‘कर्सड् चाइल्ड’ची कथा सुरू होते. आता हॅरी पॉटर जादू मंत्रालयाच्या महत्त्वाच्या विभागाचा प्रमुख आहे. त्याची मैत्रिण हर्मायनी जादुमंत्री आहे. मित्र रॉन एका गमतीजमतीच्या दुकानाचा मालक आहे. ही मंडळी आता प्रौढ झाली आहेत आणि त्यांची मुलं आता हॉग्वर्ट जादू विद्यापीठात शिक्षण घ्यायला निघाली आहेत. हॅरीच्या तीन मुलांपैकी मधला मुलगा अल्बस सिव्हीरियस (याचं नाव हॅरीचे गुरू अल्बस डम्बलडोअर आणि त्याचा छुपा समर्थक सिव्हीरियस स्नेप यांच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे) या कहाणीचा केंद्रबिंदू आहे. जन्मापासून त्याच्या भाळी बसलेला ‘हॅरी पॉटरचा मुलगा’ हा शिक्का अल्बसला छळतो आहे. ‘हॅरी पॉटर’ या नावाला असलेलं वलय, त्याची ताकद, क्षमता यांची तुलना आपल्याशी केली जात आहे, या अपेक्षांच्या ओझ्याचा त्याला तीव्र तिटकारा आहे. त्याच वेळी वडिलांकडून आपल्याकडे दुर्लक्ष होत असल्याची भावनाही त्याच्यात घर करून राहिली आहे. याचा परिणाम हॅरी आणि अल्बस यांच्यातील दरी रुंदावण्यात होतो आणि यातच अशा काही घडामोडी घडतात की, ज्या अवघा इतिहासच बदलण्याचं सामथ्र्य दाखवतात.

‘कर्सड् चाइल्ड’चं हेच वेगळेपण वाचकांना भावून जातं. ही गोष्ट ‘हॅरी पॉटर’ची असली तरी, त्यात जादू किंवा जादूई जग हे केंद्रस्थानी नाही. बाप आणि मुलगा यांच्या नात्यात असलेला एक प्रकारचा अलिप्तपणा, प्रेमातील कोरडेपणा आणि परस्पराकडून अपेक्षा पूर्ण होत नसल्याने या नात्यात येणारा कडवटपणा हे या कथेचे मूळ आहे. पुन्हा ही केवळ हॅरी आणि त्याच्या मुलाच्या नात्याची किंवा त्यातल्या ताणतणावांचीच कहाणी नाही. नातेसंबंधांवर भर आहे, पण बाप आणि मुलाची अनेक नाती त्यात आहेत. एकीकडे आपल्या मुलाकडे पुरेसं लक्ष देऊ न शकल्याचं शल्य बाळगणारा हॅरी आणि वडिलांच्या ‘उदोउदो’ला कंटाळलेला अल्बस, दुसरीकडे आपल्या उच्चकुलीन घराण्याच्या मुलाकडून तशाच वागणुकीची अपेक्षा ठेवणारा ड्रॅको मॅलफॉय (हॅरीच्या शालेय जीवनातील एक शत्रू) आणि त्याचा मुलगा स्कॉर्पियस (हा अल्बसचा मात्र जिवलग मित्र बनतो), तिसरीकडे अनेक वर्षांपूर्वी ‘व्होल्डमार्ट’सोबतच्या लढाईत हॅरीऐवजी हल्ल्याची शिकार बनलेल्या सेड्रिक डिगोरीला वर्तमानात जिवंत करून आणण्यासाठी ‘टाइमटर्नर’ या भूतकाळ-भविष्यकाळाची सफर घडवू शकणाऱ्या प्रतिबंधित यंत्राची मदत घेण्यासाठी आग्रह करणारा त्याचा वृद्ध पिता अमोस अशी पिता-पुत्रांची नाती या कहाणीत उलगडत जातात.

याखेरीज या कहाणीत आणखी एक असाच पिता-अपत्य नातेसंबंध कहाणीच्या शेवटी उघड होतो. ‘व्होल्डमार्ट’ने मृत्यूपूर्वी केलेल्या शरीरसंबंधांतून एक मूल जन्माला आले आहे, अशी चर्चा जादूई दुनियेत दबक्या आवाजात सुरू असते. तो ‘स्कॉर्पियस’ असावा, असा अनेकांचा होरा असतो आणि त्यामुळे ‘स्कॉर्पियस’ला टोमणे मारणंही सुरू असतं. या सगळ्याची उकल करण्यासाठी अल्बस आणि स्कॉर्पियस ‘टाइम टर्नर’ मधून भूतकाळाची सफर करण्याच्या तंत्राचा वापर करून काही र्वष मागे जातात आणि त्या घटनाक्रमात बदल करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे अवघा इतिहास बदलतो आणि वर्तमानातही मोठे बदल घडतात. या सगळय़ा संक्रमणातून ‘कर्स्ड चाइल्ड’ची कथा शेवटाला येते, तेव्हा अल्बस आणि स्कॉर्पियसला भुलवणारी डेल्फी हीच ‘व्होल्डमार्ट’ची मुलगी असल्याचं उघड होतं. ती कशासाठी हे करते?

ज्या वेळी व्होल्डमार्ट हॅरी पॉटरच्या आईवडिलांना ठार करतो, तेव्हा त्याच्या हल्ल्यातून बचावलेल्या तान्हुल्या हॅरी पॉटरच्या शरीरात व्होल्डमार्टच्या शक्तीचा अंश प्रवेश करतो. या घटनेनंतरच हॅरी पॉटरकडे ‘व्होल्डमार्टचा विनाशकर्ता’ म्हणून पाहिलं जातं आणि तसं खरोखरच घडतही. तान्हुल्या हॅरीवर असा हल्ला झाला नसता तर आपले वडील आज जिवंत असते, असे डेल्फीचे मत असते. त्यामुळेच ती ‘टाइम टर्नर’द्वारे भूतकाळात जाऊन तान्हुल्या हॅरीवरील हल्ला करण्यापासून ‘व्होल्डमार्ट’ला रोखण्याचा प्रयत्न करते. त्यात ती अपयशी ठरते की पुन्हा इतिहास बदलतो, हे जाणण्यासाठी ‘कर्स्ड चाइल्ड’ वाचलंच पाहिजे.

‘कर्सड चाइल्ड’चं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे, ते ‘हॅरी पॉटर’ या पात्राला अधिक वास्तवदर्शी बनवतं. एका अर्थानं, नाटकरूपानं लिहिण्यात आलेलं असलं तरी त्यात रोलिंगच्या हॅरी पॉटरची समीक्षाच करण्यात आली आहे. हॅरी पॉटर जसा आहे तसा का आहे, हॅरी पॉटर तसा नसता तर कसा दिसला असता, या प्रश्नांची कोरडी चर्चा न करता त्याला नाटय़रूप- गोष्टरूप देण्यात आलंय इतकंच! रोलिंगच्या पुस्तकातला हॅरी अद्भुत असायचा.. तो काही तरी अचाट करत असायचा.. म्हणून तर  तो ‘सुपरहिरो’ ठरला होता. याउलट ‘कर्सड चाइल्ड’मध्ये हॅरी अधिक वास्तवातला वाटतो. त्याच्याभोवती असलेलं ‘सुपरहिरो’चं वलय नाहीसं होतं. त्याऐवजी आपल्याला एक विवेकी, संयमी, प्रामाणिक, धैर्यवान आणि तरीही स्वत:च्या मर्यादांची जाणीव असलेल्या व्यक्तिरेखेची ओळख होते. खरं तर रोलिंगच्या कथेतील हॅरी पॉटरही सामान्य मुलगाच आहे.  आपल्या स्वभावामुळे कमावलेले मित्र, गुरू आणि हितचिंतक यांच्या मदतीने तो असामान्य अशा विघातक शक्तींशी मुकाबला करतो. पण याची जाणीव आपल्याला खऱ्या अर्थाने होते ती ‘कर्स्ड चाइल्ड’मधून. हॅरी पॉटरच्या ‘सुपरहिरो’ व्यक्तिरेखेवर प्रेम करणाऱ्यांना कदाचित ही कथा आवडणार नाही. पण ‘कर्स्ड चाइल्ड’ हॅरीला अधिक सक्षम, खंबीर व्यक्ती म्हणून उभं करतं. ‘सुपरमॅन’, ‘स्पायडरमॅन’, ‘बॅटमॅन’ यांच्या अचाटकथा गेली अनेक दशकं आबालवृद्धांना भुरळ पाडत आहेत. त्यांचं ‘मानवातीत’पणा संपत नाही आणि संपणारही नाही. कारण ज्या वेळी त्यांच्या शरीराला बिलगलेले चमत्कारी शक्तींचे अंगरखे/ मुखवटे गळून पडतील, त्या वेळी हे सारे ‘मॅन’ सामान्य ठरतील. हॅरी पॉटरच्या बाबतीत मात्र तसं घडू शकत नाही, हे ‘..कर्स्ड चाइल्ड’मधून स्पष्टपणे दिसतं.

हॅरी पॉटर अ‍ॅण्ड कर्स्ड चाइल्ड’ (भाग १ व २)

लेखन: जे. के. रोलिंग, जॅक थ्रोन, जॉन टिफनी

प्रकाशक : लिटिल ब्राऊन

 पृष्ठे : ३५२किंमत : ८९९ रु.

 

आसिफ बागवान

asif.bagwan@expressindia.com