सन १८२० ते १९२० या कालखंडातील या नोंदी वसाहतवादी ब्रिटिशांनी किंवा त्या वसाहतवादास मान्यता देणाऱ्या तत्कालीन भारतीय अभिजनांनीच केलेल्या असूनही, त्यातले असे काही संदर्भ या पुस्तकात नेमकेपणाने हुडकून काढलेले आहेत की, ज्ञात इतिहासापेक्षा निराळे, मानवी दर्शन वाचकाला होत राहाते..
ब्रिटिशकालीन महाराष्ट्र आणि बंगाल या प्रांतांमधला प्रबोधनाचा काळ मानला जातो, त्या साधारण १८२० पासून १९२० पर्यंतच्या कालखंडात भारताच्या स्थितीबद्दल बरेच लिखाण मराठी आणि बांग्ला भाषेत झाले आहे. पण या कालखंडात ब्रिटिश शासकदेखील भारत पाहात होते आणि इंग्रजीत नोंदीही करीत होते. ब्रिटिशांच्या या लिखाणापैकी अनेक पुस्तके, अनेक दस्तावेज आज कालौघात विसरले गेले आहेत. त्यांना ऐतिहासिक महत्त्व नाहीच असे नाही, पण तत्कालीन वर्तमानाच्या या नोंदी, काहीशा तात्कालिकही होत्या हेही खरे. त्या नोंदी आज पाहिल्या तर, रूढ इतिहासापेक्षा निराळा- फार धक्कादायक नव्हे पण अवांतर म्हणावा असा- इतिहास आपल्यासमोर येतो. तशा नोंदींचा धांडोळा घेऊन स्वतच्या नजरेतून त्यांपैकी काहींचे सार सांगण्याचे काम मालविका कार्लेकर यांनी ‘मेमरीज ऑफ बिलाँगिंग’ या पुस्तकातून केले आहे. मालविका या मूळच्या कोलकात्याच्या आणि पुढे दिल्लीकर. स्त्रीवादाचा त्यांचा अभ्यास आहे आणि ‘जर्नल ऑफ जेंडर स्टडीज’चे संपादनही त्यांनी काही काळ केले आहे. इतिहासाचे संदर्भ केवळ शाब्दिक नसतात तर छायाचित्रे आणि चित्रे यांतूनही आपण इतिहासाकडे जातो, अशी त्यांची भूमिका आहे व त्या धारणेतून त्यांची अनेक पुस्तके सचित्र झाली आहेत. हे पुस्तकही त्या भूमिकेस अपवाद नाही. पण या पुस्तकाचे वैशिष्टय़ म्हणजे, या नोंदी वसाहतवादी ब्रिटिशांनी किंवा त्या वसाहतवादास मान्यता देणाऱ्या तत्कालीन भारतीय अभिजनांनीच केलेल्या असूनही, त्याकडे आरपार पाहण्याची लेखिकेची दृष्टी मात्र केवळ वसाहतोत्तर (पोस्टकलोनियल) नसून स्त्रीवादी आणि बिगर-अभिजनवादी आहे. ही दृष्टी रूढार्थाने बहुजनवादी नाही, पण टीकात्म नजरेतून ब्रिटिशांच्या चुकाही दाखवून देणारी आहे.
उदाहरणार्थ, बिशप रेजिनाल्ड हेबर यांनी १८२४-२५ साली कोलकाता ते मुंबई असा प्रवास करून दोन खंडांत त्याचे वर्णन लिहिले, त्याबद्दल लिहिताना, कुणा राधाकांत देब यांची श्रीमंती पाहून बिशप हेबर कसे भुलले होते हे कार्लेकर सांगतातच, शिवाय या देब यांनी ‘सती प्रथेला उदार संरक्षण दिल्याबद्दल’ गव्हर्नर मार्कीस हेस्टिंग्ज (कार्यकाळ १८१३ ते २३) हेही नमूद करतात. पुढे विल्यम बेंटिंकने (१८२८-३०) सतीप्रथा बंद केलीच; परंतु त्याआधीच्या त्या नोंदीतून आज उपरोधिक भावनाच मनात दाटेल, यात शंका नाही.
पुस्तकाची ३२ प्रकरणे, तीन भागांत विभागलेली आहेत. प्रत्येक प्रकरण काही अशा उपरोधिक नोंदीने भरलेले नाही. पुस्तकाचा पहिला भाग ‘ऑफ बर्ड्स, बंगलोज अँड प्रीऑक्युपेशन्स’ हा तर पक्षीनिरीक्षण व पक्ष्यांच्या नोंदी यांना वसाहतकाळात कसे महत्त्व आले, त्यातून कोणत्या अभ्यास होत गेला व या पक्षीनिरीक्षक ब्रिटिशांचे भारतीय उपखंडात आल्यानंतर एरवीचे आयुष्य कसे होते, याबद्दल आहे. दुसरा भाग ‘पॉइंट्स ऑन अ कम्पास’ असा आहे, त्यात काश्मीरच्या शालीमार बागेचे मूळ मुघल आराखडय़ाबरहुकूम संधारण, दार्जीलिंगचा रुळांमध्ये दोनच फूट अंतर असलेला सात मैलांचा रेल्वेमार्ग, तत्कालीन भारतीय उपखंडात असलेला रोगांचा प्रादुर्भाव व त्याचा ब्रिटिशांनाही झालेला त्रास, आदमजी पीरभॉय यांनी केलेली माथेरान गिरिस्थानाची उभारणी आणि त्यासाठी दार्जीलिंगप्रमाणेच त्यांनी बांधलेला ‘नॅरो गेज’ लोहमार्ग.. अशा अनेक टप्प्यांचे तपशील आहेत. अखेरचा भाग ‘वांडरिंग्ज ऑफ अ पिलग्रिम अँड अदर्स’ या नावाचा आहे. त्यात प्रवासाचे हेतू आणि अनपेक्षित प्रवास-वर्णने यांचा धांडोळा आहे. उदाहरणार्थ, ओरिसातील थोर शिक्षणतज्ज्ञ शैलबाला दास यांनी १९०६ साली, म्हणजे वयाच्या ३२ व्या वर्षी इंग्लंडमधील ‘मारिया ग्रे ट्रेनिंग कॉलेजा’त शिक्षणाकरिता जाण्यासाठी ‘पी अँड ओ’ कंपनीच्या ‘मोल्दाविया’ बोटीतून जो प्रवास केला, त्याचे वर्णन शैलबाला यांनी ‘बिलात प्रबाश’ या पुस्तकात नोंदविले, त्याआधारे कार्लेकर यांनी लिहिले आहे. हे प्रकरण खास आहे, कारण ही एका भारतीय स्त्रीची मोकळी निरीक्षणे आहेत. हा प्रवास बहुश सुखकर होता. मात्र त्या बोटीवरील पहिल्या वर्गाचे प्रवासी सहसा कुणाशी बोलतच नाहीत, तर दुसऱ्या वर्गाचे प्रवासी ‘सभ्यतेच्या संस्कारांनी त्यांना पंगू केले नसल्यामुळे’ एकमेकांशी बोलत, असे शैलबाला नोंदवतात. एका ब्रिटिश महिलेशी संवाद साधताना, ‘आम्हाला तुम्हा लोकांची भीतीही वाटतेच.. आणि तुम्ही आम्हाला हलके समजता हेही आम्हाला कळते’ असे शैलबाला सांगतात. हाच संवाद जेव्हा भारतीय परंपरेत स्त्रीचे दुय्यम स्थान या विषयावर येतो, तेव्हा मात्र शैलबाला गप्प राहणेच पसंत करतात आणि तिथे संभाषण संपते.
शैलबाला यांच्याविषयीची ही नोंद बरेच काही सांगणारी आहेच. पण कार्लेकर यांना केवळ हे मनोव्यापार उलगडून दाखवायचे आहेत, असेही नव्हे. शैलबाला यांच्या प्रवासवर्णनापूर्वी विलायतेच्या प्रवासाची कोणकोणती वर्णने पुस्तकरूपाने आली होती, हेही कार्लेकर याच प्रकरणात सांगतात. अभ्यासकीय सर्वेक्षणाच्या कामात त्या कमी पडत नाहीत. वसाहतवादातील विषमता आणि ती सांधण्याच्या त्या काळी उपलब्ध असलेल्या संधी किंवा प्रसंग, यांचा पट पुस्तकातून विणला जातो, तो या अशा भरपूर अभ्यासकीय संदर्भामुळे आणि त्यांतून एखादाच हृद्य संदर्भ नेमका निवडण्याच्या कार्लेकर यांच्या कौशल्यामुळे!
एडविन आनरेल्ड हे तथागत बुद्धांवरील ‘द लाइट ऑफ एशिया’ या पुस्तकाचे लेखक म्हणून सर्वानाच माहीत असतात. पण १८५६ पासून पुण्याच्या डेक्कन कॉलेजात (- त्या वेळी डेक्कन कॉलेज हे नाव नव्हते. ‘संस्कृत कॉलेज’ म्हटले जाई-)आनरेल्ड होते, त्या दरम्यान १८६० साली त्यांनी जो महाबळेश्वरचा प्रवास केला, त्याचे वर्णन फार कमी जणांना माहीत असेल. या प्रवासवर्णनातील जो भाग कार्लेकर निवडतात, तो आहे पुण्याहून सातारामार्गे महाबळेश्वर हा प्रवास तट्टांच्या गाडीतून आणि पुढे तट्टावरूनच आनरेल्ड यांनी कसा केला, याबद्दल. या ‘सुमारे १०० मैलांच्या’ प्रवासात दर काही कोसांवर घोडे बदलण्याची व्यवस्था आनरेल्ड यांनी करविली होती. वाटेतील एक मुक्काम अगदी गवतावरच खुल्या आकाशाखाली करून साताऱ्यात ते पोहोचले, तेव्हा पटकीची (कॉलरा) साथ तेथे सुरू होती. भारतातील वास्तव्यात आनरेल्ड यांना पाणी तर फार प्यावे लागत असे. साताऱ्यात पाणी भरणे वा पिणे धार्जिणे नसल्यामुळे आनरेल्ड यांनी तसे केले नाही. आणि सातारा ते महाबळेश्वर या प्रवासात त्यांना जाणवली ती कंठशोष पाडणारी तहान! ही तहान भारतातच अनुभवाला येते, असे आनरेल्ड यांनी कोणत्याही किल्मिषाविना किंवा कटुतेविना नोंदविले आहे, याची दखल कार्लेकर घेतात. यातून एडविन आनरेल्डसारख्या बहुभाषाकोविद आणि सांस्कृतिक बहुविधता पचवू पाहणाऱ्या विद्वानाचे विनम्र कुतूहल किती कष्टमयसुद्धा होते, हे सुजाण वाचकांना भिडेल.
कोलकात्याच्या एका इंग्रजी दैनिकात (द टेलिग्राफ) आठवडी सदर म्हणून कार्लेकर यांनी जी लेखमाला लिहिली होती, तिच्यावर संस्कार करून हे पुस्तक झाले आहे. साहजिकच पुस्तकात संदर्भ अधिक आहेत आणि छायाचित्रेही भरपूर. आनरेल्डच्या लेखातील मुठा नदीचे १९३० मधील छायाचित्र वा माथेरान येथील घरपट्टीच्या १९०५ सालच्या नोंदींमधील ‘जमशेटजी एन. टाटा’ हे पहिलेच नाव आणि त्याखाली देखील दिनशॉ पेटिट. प्रेमचंद रॉयचंद अशी (मुंबईच्या इतिहास महत्त्वाची भर घालणाऱ्यांची) नावे असलेल्या कागदाची छायाप्रतच या पुस्तकात आहे. मुंबईची जुनी छायाचित्रे नेहमीची, परिचितच आहेत, तसेच कोलकात्याबद्दलही थोडय़ाफार प्रमाणात झाले आहे. परंतु पाँडिचेरी (आताचे पुद्दुचेरी) किंवा काश्मीर, सिमला, यांची छायाचित्रे सहसा नजरेखालून गेलेली नसावीत, अशी आहेत.
पुस्तक वाचताना सतत जाणवत राहाते की, कार्लेकर यांनी रूढ इतिहासाच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न केला आहे. जागतिकीकरणोत्तर काळातही पुरोगामी ठरणाऱ्या अनेक सिद्धान्तांमध्ये ‘अदर’ किंवा ‘दुसऱ्या’चे पाहणे महत्त्वाचे असते. पुस्तक अर्थातच, इतिहासातील नोंदी रसाळपणे सांगणारे असले, तरी हे सैद्धान्तिक पाठबळ त्यामागे नक्कीच आहे. त्यामुळेच ते वाचनीय आणि वेगळे ठरते!

‘मेमरीज ऑफ बिलाँगिंग’ लेखिका: मालविका कार्लेकर.
प्रकाशक : नियोगी बुक्स,
पृष्ठे : २२६, किंमत : ७९५ रुपये