खोक्यासारखा कॅमेरा वापरणाऱ्या ‘डेग्युरोटाइप’ या अधिक सुटसुटीत छायाचित्रण-तंत्राची सुरुवात फ्रान्समध्ये लुई डॅग्यूर आणि निसेफोर नेप्स यांनी १८३७ मध्ये केली, त्या तंत्राला १८३९ साली फ्रान्सच्या विज्ञान अकादमीनं मान्यता दिली आणि १९ ऑगस्ट १८३९ मध्ये, फ्रान्सच्या सरकारनं या तंत्राचं पेटंट स्वत: खरेदी करून हे तंत्र ‘मोफत वापरण्यासाठी खुलं’ ठरवलं! या घटनेची आठवण म्हणून दरवर्षी १९ ऑगस्ट हा दिवस ‘जागतिक फोटोग्राफी दिन’ म्हणून पाळला जातो. गेल्या १७८ वर्षांत फोटोग्राफीचं तंत्र बदलत गेलं, गेल्या २५ वर्षांत तर ते पूर्णत: ‘डिजिटल’ होत गेलं आणि हातोहाती असलेल्या मोबाइल फोनमध्ये कॅमेरे असल्यानं सर्वच कॅमेरायुक्त मोबाइलधारक आपापल्या परीनं ‘फोटोग्राफर’ झाले. फोटोग्राफीच्या या लोकशाहीकरणाचे सहप्रवासी म्हणजे समाजमाध्यमं. ‘फेसबुक’ तर आहेच, पण ब्लॉगसुद्धा. याच लोकशाहीकरणाचा पुढला टप्पा म्हणजे प्रत्येक जण एकमेकांचे फोटो काढू शकत असला तरी फोटोग्राफर काय टिपू शकतो, हे जणू दाखवून देणारा ‘हय़ूमन्स ऑफ न्यू यॉर्क’ हा न्यू यॉर्कवासी छायाचित्रकार ब्रॅण्डन स्टॅण्डन यांचा प्रकल्प. आधी ब्रॅण्डन दहा हजार न्यू यॉर्कवासींचे फोटो टिपणार होते. पण पुढे ते वाढतच गेलं. ब्लॉगसाठी जागा पुरवणाऱ्या ‘टम्ब्लर’या संकेतस्थळाच्या आधारानं ‘हय़ूमन्स ऑफ न्यू यॉर्क’ हा ब्लॉग ब्रॅण्डन स्टॅण्डन यांनी २०१० मध्ये सुरू केला, त्याचं फेसबुक पान एक कोटी ८२ लाख ७७ हजार ९१२ जणांना ‘आवडलं’ आहे. ‘ह्यूमन्स ऑफ न्यू यॉर्क’पैकी निवडक फोटोंचं पुस्तक २०१३ मध्येच निघालं, त्याच्या पुढल्या आवृत्त्याही येत आहेत. माणसांचे किंवा मानव-समूहांचे फोटो काढण्याचे एकाहून एक प्रयोग आजवर होऊन गेले. पण फोटोग्राफीच्या सार्वत्रिकीकरणामुळे, तसंच ‘हय़ूमन्स ऑफ..’नं विषयाचं आणि आशयाचंही बंधन अगदी शिथिल केल्यामुळे जे ‘लोकशाहीकरण’ झालं, त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. ‘या प्रकल्पाच्या निमित्तानं डिजिटल एसएलआर कॅमेरा मी पहिल्यांदाच हाताळत होते,’ अशी कबुली देणाऱ्या करिश्मा मेहतांसारखे ‘लोक’देखील आता फोटोंसाठी ओळखले जाऊ लागले आहेत.

करिश्मा मेहता यांचं ‘हय़ूमन्स ऑफ बॉम्बे’ हे पुस्तक (मुंबई नव्हे, बॉम्बे) आता प्रकाशित झालं आहे.  या पुस्तकाच्या सर्व ३०२ पानांवर फोटो आहेत. त्यात शाब्दिक मजकूरही आहे, पण प्रत्येक पानावर शब्द आहेतच, असं नाही. फोटो मात्र – ‘लेखिकेचे मनोगत’ सांगणारं एक पृष्ठ वगळता अगदी प्रत्येक म्हणजे प्रत्येकच पानावर आहेत. ही अशी पानोपानी फोटोच असलेली पुस्तकं आपण पाहिलेली असतात, त्यांचा मोठा आकार, त्यांचा ‘कॉफीटेबल बुक्स’ म्हणून  होणारा वापर हे सारं आपल्याला माहीत असतं. पण याचा आकार अजिबात कॉफीटेबल पुस्तकासारखा नाही. पुस्तकांच्या नेहमीच्या आयताकारापेक्षा थोडासा अधिक पसरट चौकोनी आहे, इतकंच. ‘हय़ूमन्स ऑफ न्यू यॉर्क’चं सुद्धा हेच वैशिष्टय़ होतं. आकार जरा मोठा, पण कॉफीटेबल पुस्तकाइतका मोठा नाही. उभंच उघडणारं पुस्तक. पण ‘ह्यूमन्स ऑफ न्यू यॉर्क’मध्ये छायाचित्रकाराचं निवेदन अनेकदा येतं. ‘ह्यूमन्स ऑफ बॉम्बे’चं वैशिष्टय़ म्हणजे, इथं जिचा फोटो काढला आहे, त्या व्यक्तीचं आत्मनिवेदनच शब्दांमधून येतं. ही काही न्यू यॉर्क आणि बॉम्बे पुस्तकांची तुलना नव्हे, पण ‘ह्यूमन्स ऑफ बॉम्बे’चं हे वैशिष्टय़ नक्कीच उत्तम आहे.

अनुक्रमणिकेऐवजी मुंबईतल्या ‘बर्फगोळय़ाच्या गाडी’वर असतात, तशा आठ रंगांचं सरबतवजा पाणी असलेल्या बाटल्यांचा फोटो आहे आणि फोटोंचे आठ प्रकार कोणते, यांची ‘बम्बइया हिंग्लिश’ भाषेतली नावं आहेत. पुढे पुस्तकभर, त्या आठ प्रकारांची सरमिसळ दिसते. स्त्रीजीवन या प्रकारात मोडणाऱ्या फोटोंसाठी ‘बॉम्बे बेब्ज’ असं नाव आहे. ते शोभत नाही. का? याचा पुरावा आठव्या-नवव्या पानावरच मिळेल. नवव्या पानावर, माळीकाम करणारी एक महिला दिसते. दाक्षिणात्य असावी. तिनं दोन्ही नाकपुडय़ांत चमकी घातली आहे. लुगडं पाचवारी, पण आंध्रमध्ये तयार झालेलं असावं. दोन्ही हातांत डझन-डझनभर बांगडय़ा काचेच्या. ती सांगते आहे की, तिचा मुलगा दारूच्या आहारी जाऊन अकाली मरण पावला. दोन नातवंडं आणि सून हेही आता या महिलेच्या घरीच राहतात. महिलेला नवरा आहे, तिच्या सुनेला नाही. सून छोटी-मोठी कामं करते, पण ही महिलादेखील घर चालवण्यासाठी कष्ट उपसते. परवाच तिचा नातू तिच्याजवळ येऊन म्हणाला, ‘‘आज्जी तू काही काळजी करू नको. मी खूप शिकीन, मोठ्ठा होईन, आपल्यासाठी मोठ्ठं घर घेईन!’’ ही महिला ‘बेब’ या प्रकारातली नक्कीच नाही. पण काही हसत्या-खिदळत्या, ‘बेब’ हाच शब्द वापरणाऱ्या मुलीही आहेत. त्या हलकंफुलकं काही तरी सांगतात. याच ‘बेब्ज’मध्ये ‘‘माझ्या आईनं मला सशक्त- समर्थ बनवलंय. पाच फूट अकरा इंच उंची आहे माझी.. मी कधीच रडूबाई होणार नाही.’’ असं सांगतानाच कर्करोगानं निधन झालेल्या आईची आठवण काढणारी एक सुखवस्तू सबलाही आहे. किंवा, एका पोरानं छेड काढली म्हणून समोरच्याच पोलीस ठाण्यात तक्रार करणारी आणि त्यावर काकांकडून ‘स्लीव्हलेस घालून गेलीच कशाला ही?’ असंही ऐकावं लागलेली एक चाळकरी मुलगी आहे.

‘बॉम्बे ग्यान’ आणि ‘बॉम्बे ओल्ड स्कूल’ या प्रकारांमध्ये बरीच आयुष्यं वाचायला मिळतात. अनेक वयोवृद्ध जोडपी, आमचं लग्न कसं जुळलं हे सांगताना एखादी मर्मबंधांतली आठवण उघड करतात. एक (बहुधा अँग्लोइंडियन किंवा पारशी) वृद्धा म्हणते, ‘‘तो निवृत्त झाल्यावर आम्ही दोघे संध्याकाळी फिरायला जायचो. रस्ता ओलांडताना तो नेहमी माझा हात धरायचा. रस्ता ओलांडण्यापुरताच हात धरायचा. त्याला जाऊन आता १५ र्वष झाली. आजही प्रत्येक वेळी रस्ता ओलांडताना भीती वाटते.. त्या वेळी त्याचीच आठवण येते.’’ काही टॅक्सीवाले आपापल्या आठवणी सांगतात. ‘‘त्या दिवशी मुंबईत इतकं पाणी चढलं होतं की, माझी गाडी १५ तास जागची हलू शकली नव्हती.. एक माणूस आणि त्याची लहानगी मुलगी होते माझ्या गाडीत..’’ अशी २६ जुलै २००५ ची आठवण सांगणारा एक टॅक्सीचालक भेटतो, तर दुसरा सरदारजी टॅक्सीचालक ‘‘एका दारुडय़ाला पहाटे पहाटे त्याच्या घरी सोडल्यावर तो पैशासाठी खळखळ करू लागला. मला वाटलं आता करूच नये धंदा. निघून जावं चंदिगढला; पण त्याच वेळी एअरपोर्टचं भाडं आलं. एवढय़ा पहाटे या प्रवाशानं माझी नम्रपणानं चौकशी केली. मग डबा उघडून सँडविच काढली आणि ‘तुम्हीही खा.. भूक लागली असेल’ म्हणाला. मी त्याचा आग्रह मोडला नाही. वर त्यानं ५० रुपये जास्त दिले.. का तर म्हणजे आधी तिघा-चौघा टॅक्स्यांनी त्याला ‘वो बाजू नही जाएगा’ सांगितलं होतं!’’ अशी अगदी साधी आठवण सांगून थांबतो; पण वाचकाला, मुंबई कशामुळे चालते इथपासून ते (कुठेही) जीवन कसं असतं इथपर्यंतचं काही तरी ओळींमधून वाचायला मिळतं.

शब्द हेच या पुस्तकाचं वैशिष्टय़ आहे, असं पुन:पुन्हा जाणवत राहातं. फोटो बहुतेकदा बसलेले, स्थिर उभे राहिलेले, ‘पोज’ घेतलेले, असे आहेत. अगदी एखाददोन फोटो जरा हलत्या व्यक्तींचे आहेत. इथं ‘ह्य़ूमन्स ऑफ न्यू यॉर्क’ची मुद्दाम आठवण करून द्यायला हवी. ब्रॅण्डन स्टॅण्डनचं वैशिष्टय़ म्हणजे, हलत्या/ चालत्या/ नाचत्या व्यक्तींचे फोटो तो सहज, पण नेमकेपणानं टिपतो. कॅमेऱ्याचा वेग वाढवून हे साधता येतं आणि हल्ली अतिप्रगत कॅमेरे मिळतात वगैरे ठीक; पण फोटोग्राफरनं समोरच्या व्यक्तीसंदर्भात नेमका क्षण पकडण्याची जी किमया असते, तशी करिष्मा मेहता यांच्या ‘ह्य़ूमन्स ऑफ बॉम्बे’ या अख्ख्या पुस्तकात चुकून अपघातानंच एखादवेळी दिसू शकेल. समोरच्या व्यक्तीशी संवाद साधून, मग त्याला सजगपणे कॅमेऱ्यात पाहू देऊन त्याआधीच्या संवादाची झाक त्याच्या त्या रोखलेल्या डोळ्यांत राहू देणं, हे कौशल्य मात्र ‘ह्य़ूमन्स ऑफ बॉम्बे’मध्ये नक्कीच जमलं आहे.

या पुस्तकाचं नाव  ‘ह्य़ूमन्स ऑफ मुंबई’ असं नसल्याबद्दल अनेक जण नाराज होतील. पण ‘ह्य़ूमन्स ऑफ मुंबई (डॉट) इन’ या नावाचं ब्लॉगवजा संकेतस्थळ आहे. ‘टम्ब्लर’वरच हाही ब्लॉग आहे. ब्लॉगचालक हुमायँ नियाझ अहमद पीरजादा हे छायाचित्रकारच आहेत. ते लिहितातही. पण याच ब्लॉगवरून ते ‘येथे सर्व प्रकारचे व्यावसायिक छायाचित्रण करून मिळेल’ अशा प्रकारची जाहिरातही करतात. त्यांचे फोटो चांगले आहेत. पीरजादा आणि मेहता, या दोघांचंही प्रेरणास्थान ‘ह्य़ूमन्स ऑफ न्यू यॉर्क’वाले ब्रॅण्डन स्टॅण्डन हेच आहे, असं दोघांनीही आपापल्या मनोगतांत नमूद केलेलं आहेच; पण मेहता यांचं पुस्तक निघालं. पीरजादा यांचं नाही. ‘ह्य़ूमन्स ऑफ मुंबई’च्या फेसबुक-पानाला फक्त आठ हजार १८६ ‘लाइक’ आहेत, तर  ‘ह्य़ूमन्स ऑफ बॉम्बे’च्या फेसबुक पानाला मात्र सात लाख ३८ हजार ५५८ वगैरे. मेहता यांनी ‘ह्य़ूमन्स ऑफ बॉम्बे’ हा प्रकल्प अधिक व्यावसायिकपणे राबवला, असा निष्कर्ष यातून निघतो.

पण व्यावसायिक म्हणजे किती? ते अखेरच्या पानावर कळतं.. ‘टीम’चे फोटो आहेत हे! त्यावरून असं लक्षात येऊ शकेल की, हल्ली प्रथितयश चित्रकार जसे रंगांचे पॅचेस भरून घ्यायला वगैरे मदतनीस ठेवतात, तसे करिष्मा मेहतांनीही मदतनीस ठेवले होते, तेही चार-पाच. इथं मग, प्रत्येक फोटोला ज्याचं-त्याचं श्रेय द्यायला काय हरकत होती, असा मुद्दा निघेल. पान क्रमांक अमुक, तमुक, इतका आणि तितका यांवरील छायाचित्रे याची..’ असा उल्लेख अखेरीस झाला असता तरी चाललं असतं; पण ते झालेलं नाही. हे फोटोग्राफीच्या नव्या रूपांपैकी विचित्रच रूप; पण या मदतनीसांनी नेमकी कोणत्या प्रकारची मदत केली, याची माहिती उघड झालेलीच नसल्यामुळे ‘सर्व फोटो मीच काढलेत’ असंही मेहता म्हणू शकतात. ते खरंही ठरू शकतं.

फोटो आहेत. ते छायाचित्रणकलेच्या किंवा छायापत्रकारितेच्या दृष्टीनं फार लक्षणीय आहेत, असं नाही. तरीही पुस्तक एकदा पाहावं आणि वाचावं असं आहे. कारण यातून मुंबईची माणसं भेटतात! तेवढय़ासाठी, ही कलात्मकतेच्या अपेक्षा बाजूला ठेवणारी ‘लोक’शाही आपण थोडा वेळ जरूर सहन करावी अशीच आहे.

 ‘ह्य़ूमन्स ऑफ बॉम्बे

लेखिका : करिश्मा मेहता

प्रकाशक : पॉप्युलर प्रकाशन प्रा. लि.

पृष्ठे : ३०४, किंमत : ९९५ रुपये

 

– अभिजीत ताम्हणे

abhijit.tamhane@expressindia.com