पाकिस्तानने अमेरिकेत राजदूतपदी नेमलेले आणि पुढे पाकिस्तान सोडावा लागलेले हुसैन हक्कानी यांनी या पुस्तकात फाळणीपासून ते अगदी अलीकडच्या पठाणकोट हल्ल्याशी संबंधित घटनांचा ऊहापोह केला आहे. भारतीयांना त्यांचे काही मुद्दे जुने वाटतील; पण काही अपरिचित माहिती आणि नवे मुद्दे हक्कानी मांडतात आणि पाकिस्तानच्या भारतद्वेषी नीतीची प्रांजळ कबुलीही देतात..
आसिफ बागवान
भारत आणि पाकिस्तान.. क्रिकेटच्या मैदानापासून युद्धभूमीपर्यंत आणि द्विपक्षीय चर्चेपासून संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेपर्यंत नेहमी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले हे दोन देश. कधी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरील भूमिकेवरून, कधी शस्त्रसंधीच्या उल्लंघनावरून, कधी चित्रपटांच्या प्रदर्शनावरून, तर कधी कलावंत-खेळाडूंच्या दौऱ्यांवरून दोन्ही देश एकत्रितपणे चर्चेत असतात. मग या दोन देशांच्या नात्याचं नेमकं ‘स्टेट्स’ तरी काय, हा प्रश्न सर्वसामान्यांना पडल्याशिवाय राहात नाही. हे नातं शत्रुत्वाचं आहे, असं म्हणणं अर्थात खूप सोपं आहे. पण तरीही उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियासारखं अगदी टोकाला गेलेलं हे भांडण नाही, हे दोन्ही देशांच्या सरकारप्रमुखांत/ सुरक्षा सल्लागारांत होणाऱ्या चर्चेतून दिसून येतं. ही सगळी चर्चा, वाद ज्या पातळीवर होत असतात, त्या पातळीवरील उच्चपदस्थ व्यक्ती जेव्हा या दोन्ही देशांच्या संबंधांवर मतप्रदर्शन करते, तेव्हा त्याला निश्चितच महत्त्व लाभते. म्हणूनच पाकिस्तानचे अमेरिकेतील राजदूत म्हणून काम केलेले हुसैन हक्कानी यांच्या ‘इंडिया व्हर्सेस पाकिस्तान : व्हाय कान्ट वुइ जस्ट बी फ्रेंड्स?’ या पुस्तकाविषयीची उत्सुकता वाढते.
प्रकाशनाच्या मार्गावर असलेल्या या पुस्तकाची गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांत चर्चा होऊ लागली आहे. त्याचं प्रमुख कारण मुंबईतील ‘२६/११’ हल्ल्यांबद्दल त्यांनी केलेला गौप्यस्फोट. मुंबईवरील २००८च्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी गुप्तहेर संघटना, आयएसआयचे प्रमुख लेफ्ट. जन. अहमद शुजा पाशा अमेरिकेच्या ‘सीआयए’चे संचालक मायकल हेडन यांच्यासोबतच्या बैठकीसाठी अमेरिकेत आले असताना घडलेला प्रसंग, हा गौप्यस्फोट करणारा आहे. पुस्तकाच्या चौथ्या प्रकरणात हक्कानी लिहितात :
‘‘.. हेडन यांच्यासोबतच्या बैठकीत पाशा यांनी त्या हल्ल्याच्या सूत्रधारांमध्ये काही निवृत्त पाकिस्तानी लष्करी अधिकारी असल्याचे कबूल केले होते. पाशा यांच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोरांचा आयएसआयशी संपर्क होता, परंतु ती आयएसआयची अधिकृत मोहीम नव्हती. त्या वेळी माझ्या शासकीय निवासस्थानी (अमेरिकेतील पाकिस्तानचा राजदूत या नात्याने) पाशा यांनी मला उर्दूत सांगितलं, ‘लोग हमारे थे, ऑपरेशन हमारा नही था।’ (माणसं आपली होती, मोहीम आपली नव्हती). त्यावर मी त्यांना विचारलं, ‘अगर हमारे लोग भी हमारे काबू में नहीं तो आगे क्या होगा?’ (आपली माणसंच आपल्या नियंत्रणाखाली नसतील तर पुढे कसं होणार?) हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.’’
२६/११ हल्ल्याबद्दल हक्कानी यांनी पुरवलेली ही माहिती नवीन नाही किंवा तिच्या उघड होण्याने नवीन काही घडामोडी घडण्याची शक्यताही नाही, कारण अमेरिकेचे राजदूत म्हणून कार्यरत असतानाच २०११मध्ये घडलेल्या ‘मेमोगेट’ प्रकरणानंतर हक्कानी यांची पाकिस्तानने हकालपट्टी केली आणि त्यानंतर त्यांच्यावर देशद्रोहाचा खटलाही भरला. त्यामुळे हक्कानी जे सांगताहेत ते फारसं कुणी गांभीर्याने घेण्याची शक्यता नाही.
पण ‘२६/११’ हल्ला हे हक्कानींच्या येऊ घातलेल्या पुस्तकाचं सार नाही. या पुस्तकातील ‘टेररिझम = र्इेग्युलर वॉरफेअर’ (‘दहशतवाद अर्थात अनियमित युद्ध’ या प्रकरणातील वरील उतारा हा शेवटचा परिच्छेद आहे. हक्कानी यांचं पुस्तक त्यापलीकडे खूप काही सांगणारं, मांडणारं आहे. पाच प्रकरणांत विभागल्या गेलेल्या या पुस्तकात हक्कानी यांनी भारत-पाकिस्तान संबंधांवर प्रकाश पाडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात फाळणीपासून अगदी अलीकडच्या पठाणकोट हल्ल्याशी संबंधित घटनांचा ऊहापोह करण्यात आला आहे.
फाळणीपासून युद्धापर्यंत..
पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणात हक्कानी यांनी भारत-पाकिस्तान फाळणी आणि त्यानंतर उद्भवलेले संघर्षांचे प्रसंग तसेच युद्ध यांचा आढावा घेतला आहे. पाकिस्तानची निर्मिती धर्माच्या आधारावर झाली असली तरी, त्या देशाचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांना धर्म या देशात संघर्ष निर्माण करू शकतो, याची पुरेपूर जाणीव होती. म्हणूनच त्यांनी पाकिस्तानला ‘धर्मराज्य’ असा दर्जा देण्याऐवजी ‘धर्मनिरपेक्ष’ असा दर्जा देण्याचा प्रयत्न केला. त्यांना भारताशी बंधुत्वाचे नाते हवे होते. त्यासाठी त्यांनी प्रयत्नही केले, असे हक्कानी सांगतात. जिना यांच्या मृत्यूनंतर सत्तेवर येणाऱ्या प्रत्येक राष्ट्रप्रमुखाने, पक्षाने आपल्या राजकीय फायद्यासाठी ‘भारतद्वेष’ वाढवत ठेवला, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले आहे. साधनसंपत्ती आणि लष्कर यांच्या विभाजनात आपल्याला डावलण्यात आल्याची भावना पाकिस्तानी नेत्यांत तीव्र होती. तिला वेळोवेळी हवा दिली गेली. दुसरीकडे, पंडित नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनीही पाकिस्तानशी हळूहळू संबंध तोडून टाकण्याऐवजी ‘एक घाव दोन तुकडे’ करण्यास प्राधान्य दिले, असे हक्कानी यांनी म्हटले आहे. भारतीय राजकारण्यांकडून येणारी वक्तव्ये, निर्णय यामुळे पाकिस्तानी जनतेच्या मनातही भारताबद्दल अविश्वास निर्माण झाला. एकीकडे राजकीय पातळीवर पाकिस्तानमध्ये भारतद्वेष पेटत असतानाच, सुरुवातीपासूनच बळकट होत चाललेल्या लष्कराला ही संधी मिळाली आणि तत्कालीन लष्करप्रमुख जनरल अयूब खान यांनी देशाची सूत्रे आपल्या हाती घेतली. अयूब खान यांचाच कित्ता पुढे सहा दशकांत आणखी लष्करप्रमुखांनी गिरवला. त्यामुळे पाकिस्तानची आर्थिक, राजकीय, सामाजिक प्रगती खुंटत राहिली. या सर्वानी ‘हिंदू भारत’ हा आपला शत्रू असल्याचे जनतेला भासवले. पुढे १९७१च्या युद्धानंतर बांगलादेशची निर्मिती झाल्यानंतर हा द्वेष आणखी वाढला. तो आजवर कमी झालेला नाही, हा आपणा भारतीयांना चांगलाच माहीत असलेला इतिहास हक्कानी यांनीही नोंदवला आहे.
दहशतवाद आणि परस्परसंवाद
‘‘सहा दशके आणि चार युद्धांनंतर भारत-पाकिस्तानमधील संबंध खूपच बिघडले आहेत. नजीकच्या काळात तरी ते सुधारण्याची शक्यता दिसत नाही. कोणी कितीही म्हटले तरी, दोन्ही देशांतील जनतेतही परस्परांबद्दल द्वेष आणि शत्रुत्वाची भावनाच अधिक आहे,’’ असे हक्कानी म्हणतात. या सर्वाचा दोषारोप त्यांनी दोन्ही देशांच्या धोरणकर्त्यांवर केला आहे. ‘‘कुठल्याही आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने दोन्ही देशांचे प्रमुख एकत्र येतात ते केवळ लोकप्रियतेपुरतेच. तेथे मैत्री पुनस्र्थापित करण्याची, संवाद सुरळीत करण्याची चर्चा होते. मग मध्येच भारतात एखादा दहशतवादी हल्ला घडतो आणि मग ही बोलणी खुंटतात. ती पुढे अशाच कोणत्या तरी परिषदेपर्यंत..’’ अशा शब्दांत हक्कानी यांनी धोरणकर्त्यांच्या धरसोडपणावर आणि राजकीय अपरिहार्यतेवर निशाणा साधला आहे.
साधनसंपत्ती आणि मालमत्ता वाटपात दुजाभाव झाल्याची भावना पाकिस्तानात सुरुवातीपासूनच होती. त्यात बांगलादेशच्या निर्मितीने खतपाणी घातले. विशेषत: पाकिस्तानातील नोकरशहा आणि लष्करातील अधिकाऱ्यांना ही सल खूपच लागून राहिली. त्यातूनच ‘पाकिस्तानने भारताविरोधात दहशतवादी कारवायांचे स्वस्त हत्यार उपसले,’ असे हक्कानी म्हणतात. मघाशी म्हटल्याप्रमाणे, अधिकृत नाही तर अनधिकृतपणे या अधिकारी मंडळींनी भारतविरोधी कारवायांना बळ दिल्याचे ते मान्य करतात. त्याच वेळी भारत बलुचिस्तानातील पाकविरोधी कारवायांना बळ देत असल्याच्या पाकिस्तानच्या आरोपांना अजूनही पुरावे सापडलेले नाहीत, असेही ते सांगतात.
हक्कानी यांनी पाच प्रकरणांमध्ये विस्तृतपणे भारत-पाकिस्तानच्या संबंधांवर भाष्य केलं आहे. यातील सगळेच नसले तरी बरेचसे मुद्दे नवीन आहेत; पण सर्वसामान्यांना माहीत असलेल्या आणि नसलेल्या अशा दोन्ही प्रकारच्या मुद्दय़ांची सांगड घालून भारत-पाकिस्तानात नेमके काय बिनसते, हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. हे करताना त्यांच्या टीकेचा बराचसा रोख पाकिस्तानच्या दिशेनं दिसतो. कदाचित पाकिस्तानातच वाढल्यामुळे किंवा आता पाकिस्तानातूनच परागंदा व्हावं लागल्यामुळे तसं असेल! पण हे करताना हक्कानी यांच्या भाषेत प्रांजळपणा दिसतो, हे नक्की!

आसिफ बागवान – asif.bagwan@expressindia.com