जगभरात उजव्या विचारसरणीच्या नेतृत्वाची आलेली लाट, आयसिसचा उदय, ब्रेग्झिट व अगदी अलीकडचा ट्रम्प यांचा विजय.. हे आपलं वर्तमान. त्यात जे घडतंय त्यामागच्या प्रेरणा मात्र इतिहासात शोधाव्या लागतात. आजच्या अस्वस्थतेच्या या इतिहासप्रेरणा हे पुस्तक दाखवून देतं..

पंकज मिश्रा यांना ‘एज ऑफ अँगर’ या पुस्तकाची कल्पना २०१४ मध्ये सुचली. त्याच वर्षी पंकज मिश्रांच्या मायदेशी म्हणजे भारतात हिंदू राष्ट्रवादी नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत आले. तिकडे शेजारील पश्चिम आशियात इस्लामिक स्टेटचा उदय झाला आणि संपन्न अशा युरोपातून तरुण इस्लामिक स्टेटकडे आकर्षित झाले. या दोन्ही घटनांच्या संदर्भात आजच्या काळाचा विचार करीत असताना मिश्रांनी या पुस्तकाचे लेखन सुरू केले. पुस्तक लिहून पूर्ण झाले त्याच आठवडय़ात- म्हणजे जून २०१६ मध्ये ब्रिटनने युरोपियन युनियनमधून बाहेर पडायला हवे, असा कौल ब्रिटिश जनतेने दिला. पुस्तक छापायला गेले तेव्हा अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प निवडून आले होते. यापकी प्रत्येक घटना आंतरराष्ट्रीय राजकारणात आणि आपल्या विचारविश्वात खळबळ माजवणारी ठरली आहे. या पाश्र्वभूमीवर मिश्रा यांचे नवे पुस्तक वाचायला हवे.

मिश्रा गेली पंचवीस वष्रे लेखन करीत असून ‘फिक्शन’ आणि ‘नॉन-फिक्शन’ अशा दोन्ही प्रकारचे लेखन त्यांनी केले आहे. गार्डियन, न्यूयॉर्क टाइम्स अशा अनेक प्रतिष्ठित पाश्चिमात्य नियतकालिकांसाठी ते नियमितपणे लिहीत असतात. गेल्या अडीचशे वर्षांत पाश्चिमात्य संस्कृतीमधून आलेली आधुनिकता, उदारमतवाद, लोकशाही, व्यक्तिस्वातंत्र्य यांसारखी मूल्ये व युरोप आणि आशिया येथील पारंपरिक समाजांनी त्याला दिलेला प्रतिसाद हा मिश्रांच्या अभ्यासाचा विषय आहे. याआधी मिश्रांनी याच विषयावर दोन पुस्तके (२००६ मध्ये ‘टेम्प्टेशन्स ऑफ द वेस्ट’ आणि २०१२ मध्ये ‘फ्रॉम द रुइन्स ऑफ एम्पायर’) लिहिली आहेत. ‘एज ऑफ अँगर’मध्येही मिश्रा याच विषयाला हाताळतात. मात्र आधीच्या दोन पुस्तकांपेक्षा ‘एज ऑफ अँगर’ या पुस्तकाची वैचारिक खोली आणि स्थळ-काळाची व्याप्ती या दोन्ही दृष्टीने आवाका बराच जास्त आहे. मिश्रांच्या पुस्तकात एकूण सात प्रकरणे असून त्यांची रचना विषम आहे. सर्वात छोटे प्रकरण हे सव्वीस पानांचे असून सर्वात मोठे प्रकरण हे एकशे पंधरा पानांचे आहे. पुस्तकातील लेखनात आजच्या मुख्य संघर्षरेषा समोर ठेवलेल्या असल्याने राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता आणि इस्लामी जगत, धर्म, व्यक्ती आणि समाज यांचे परस्परसंबंध, आधुनिकीकरणाचे दुष्परिणाम, स्वातंत्र्याची प्रेरणा आणि त्यावरील बंधने इत्यादीविषयी विवेचन येऊन जाते.

मिश्रा आजचे प्रश्न समोर ठेवतात आणि त्याची मुळे शोधत भूतकाळात जातात. आधुनिक काळाला जिथून सुरुवात झाली असे मानले जाते त्या फ्रेंच राज्यक्रांतीपर्यंत ते मागे जातात. आजचे राजकीय तत्त्वज्ञान, वैचारिक व कलेचे क्षेत्र आणि प्रत्यक्ष राजकारण यावर फ्रेंच राज्यक्रांतीचा खोलवर प्रभाव पडलेला आहे. त्यामुळे मिश्रा या राज्यक्रांतीच्या प्रक्रियेमधून आलेल्या विचारांचा, प्रेरणांचा आणि प्रतिसादांचा आढावा घेतात. ते असे नोंदवतात की, आधुनिकतेचे मूल्य हे ब्रिटन, अमेरिका आणि फ्रान्स या अटलांटिक किनाऱ्यावरील देशांमध्ये आधी रुजले. त्याला जोड औद्योगिक क्रांती आणि आर्थिक वाढीची मिळाली. परिणामी आशिया आणि युरोपातील इतर देशांपेक्षा हे देश फारच पुढे निघून गेले. या पुढारलेल्या देशांतील आधुनिकतेच्या मूल्यांवर आधारित समाजांनी आर्थिक, राजकीय आणि वैचारिक क्षेत्रात अतिशय मूलभूत बदल घडवून आणले. औद्योगिकीकरण आणि भांडवलशाहीप्रणीत अर्थकारण, लोकशाही आणि स्वातंत्र्याच्या कल्पनेवर आधारित राजकारण आणि आधुनिक मूल्यांवर आधारित समाज याचा जोमाने प्रसार आणि प्रचार अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात होण्यास सुरुवात झाली. अठराव्या शतकातील फ्रान्सचे चित्र उभे करताना मिश्रा प्रसिद्ध विचारवंत रुसो आणि व्होल्टेअर यांचे लेखन समोर ठेवतात. रुसो हा आधुनिकीकरणाची प्रक्रिया ज्या पद्धतीने जात होती त्या प्रक्रियेचा आणि ती प्रक्रिया पुढे नेणाऱ्या वर्गाचा विरोधक होता. दुसऱ्या बाजूला व्होल्टेअर हा आधुनिकीकरणाचा समर्थक, उदारमतवादी आणि वरिष्ठ वर्गाचा प्रतिनिधी होता. या दोघांतील वैचारिक द्वंद्वाला अठराव्या शतकाचे संदर्भ आहेत. रशियाचे आधुनिकीकरण, पोलंडचे विभाजन वा टर्कीशी झालेले युद्ध यांच्या संदर्भात रुसो आणि व्होल्टेअर यांच्या प्रतिक्रिया आणि एकमेकांविषयीची मते वाचणे हा रंजक अनुभव आहे. मात्र पुस्तकात असे रंजक भाग तुलनेने कमी आहेत.

मिश्रा यांनी येथे नमूद केले आहे, की या देशांच्या तुलनेत मागे पडलेल्या इतर देशांनी आधुनिकतेचे हे मूल्य आणि त्यावर आधारित सामाजिक-राजकीय व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न केला. आधी युरोपीय देशांनी केला आणि मग नव्याने स्वतंत्र झालेल्या आशिया-आफ्रिकेतील देशांनी केला. आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेला उशिरा सुरुवात झालेल्या या देशांमध्ये आधुनिकीकरणाची प्रक्रिया ही देशाबाहेरून आलेली असल्याने, वरिष्ठ वर्गाने बऱ्याचदा बळाचा वापर करून लादलेली असल्याने तिचा सहजपणे स्वीकार झाला नाही. तिला साहजिकपणे विरोध झाला. जर्मनी, रशिया, इटली, जपान आणि टर्की यांसारख्या नव्याने पण ब्रिटन आणि फ्रान्सच्या तुलनेत उशिरा आधुनिक होऊ पाहणाऱ्या समाजांनी दिलेल्या प्रतिसादातून अनेकविध प्रश्न त्या त्या देशांत आणि त्यांच्या वर्तनामुळे बाह्य़ जगात निर्माण झाले.

मिश्रा आपल्या पुस्तकात फ्रान्स, जर्मनी, रशिया यांसारख्या देशांत आधुनिकीकरणाच्या विरोधात उमटलेल्या प्रतिक्रिया समोर ठेवतात. तसे करताना ते त्या त्या देशातील महत्त्वाचे, पण सध्या फार माहीत नसलेले विचारवंत, लेखक यांच्या लेखनाचा आधार घेतात. त्यामुळे पुस्तकात एकोणिसाव्या शतकातील जर्मनी, रशिया आणि इटली याविषयी बरेच विवेचन आढळते. ते लिहितात- झारच्या राजवटीतील रशियन विचारवंतांना याची जाणीव झाली होती, की रशिया पूर्णपणे आधुनिक होऊ शकत नाही आणि आधुनिक काळाच्या मागेही जाऊ शकत नाही. रशियाप्रमाणेच जर्मनीत एकाच वेळी आधुनिकीकरणाला तीव्र प्रतिक्रिया आली, तसेच जर्मनीने आधुनिकीकरणाची कासही धरली. परिणामी एकाच वेळी जर्मन इतिहासाचे, कला-संगीत यांच्याबाबत असलेला पूर्वगौरव आणि इतिहासाचे पुनरुज्जीवन करण्याची प्रेरणा व त्याला आधुनिक ऐहिक साधनांची जोड असे रसायन तयार होत गेले. तसेच जर्मन आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेतूनच हुकूमशाही राजवटी तयार होण्याची शक्यता  निर्माण झाली. नेहमीच्या तुलनेत अपरिचित विचारवंतांच्या, लेखकांच्या लेखनाचा आधार घेऊन आणि मुख्यत: वैचारिक क्षेत्राला समोर ठेवून केलेले हे विवेचन असल्याने काही वेळा ते फारच कंटाळवाणे वाटू शकते.

इस्लाम आणि सेक्युलॅरिझम यांच्याविषयी लिहिताना मिश्रा १९७९ मधील इराणी क्रांतीच्या पाश्र्वभूमीवरील इराण आणि तेथील वैचारिक घुसळण याविषयी लिहून जातात. इराणमध्ये शहांच्या राजवटीत सक्तीने आधुनिकीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला आणि तो कसा उलटला, याविषयी त्यांनी लिहिले आहे. आधुनिक जगाच्या वैचारिक धुरिणांनी कसे नेहमीच सक्तीने आधुनिक मूल्ये रुजवू पाहणाऱ्या हुकूमशाही राजवटींना पािठबा दिला हे ते अठराव्या शतकातील रशिया आणि विसाव्या शतकातील नवस्वतंत्र देश यांची उदाहरणे देऊन इराणच्या संदर्भात सांगतात. आजच्या जगातील दहशतवाद, जागतिकीकरण यांच्या प्रेरणा आणि वैचारिक प्रवाह हे नवे नसून जुनेच आहेत हे ते दाखवून देतात. त्यामुळे आजच्या जगातील दहशतवादी आणि एकोणिसाव्या शतकातील अराजकवादी गट यांच्या िहसाचारात मिश्रा यांना साम्य दिसते. िहसक राष्ट्रवादी प्रेरणा आणि स्थलांतरित, अल्पसंख्य, उदारमतवादी गट यांना होणारा विरोध हे एकविसाव्या शतकाचे अपत्य नसून या प्रेरणा अठराव्या शतकाच्या उत्तरार्धातही कार्यरत होत्या हे ते दाखवून देतात. जग एकोणिसाव्या शतकातसुद्धा कसे एकमेकांशी जोडलेले होते, त्याही काळात १८५७चा उठाव, अमेरिकी यादवी युद्ध, हंगेरी आणि पोलंडमधील बंडाळी वगरे आंतरराष्ट्रीय घटना-घडामोडींची चर्चा होत असे, याचे दाखले पुस्तकात दिलेले आहेत.

मिश्रांच्या लिखाणाचे वैशिष्टय़ असे की, काल, स्थल आणि लेखनप्रकार यांच्याबाबत अगदी सहजपणे ते सीमारेषा ओलांडून जातात. अशा प्रकारच्या सहज हाताळणीमुळे आपण कधी अठराव्या शतकाच्या फ्रान्समधून एकविसाव्या शतकातील पश्चिम आशियामध्ये उडी मारली आणि पुन्हा एकोणिसाव्या शतकातील रशियामध्ये मागे गेलो असे अनुभव येत राहतात. तसेच नीत्शेसारख्यांच्या वैचारिक लेखनाचे संदर्भ देता देता कधी मिश्रा अचानक कोणाची तरी कविता किंवा दोस्तोव्हस्कीची कादंबरी, वॅग्नरची एखादी सांगीतिक रचना आपल्या पुढे आणतात. अशा पद्धतीच्या लेखनामुळे लेखकाचा व्यासंग दिसत असला तरी बऱ्याचदा वाचकाची दमछाक होऊन जाते. तसेच अनेकविध अपरिचित संदर्भ, स्थळ आणि काळाचे उल्लेख एकत्र आल्यामुळे नेमके काय चर्चिले जात आहे यापासून लक्ष ढळू शकते. मात्र मिश्रांची इंग्रजी भाषा सुबोध असल्याने या लेखनशैलीचा वाचकांना जितका त्रास व्हायला हवा तितका होत नाही.

पुस्तकात काही वेळा चमकदार निरीक्षणे किंवा माहिती येऊन जाते. उदा.- मॅझिनी या इटालियन विचारवंतांच्या लेखनाला कसा गांधीजी आणि सावरकर या दोघांनीही भारताच्या संदर्भात प्रतिसाद दिलेला आहे. किंवा आर्थिक उदारीकरणाच्या पहिल्या टप्प्यात म्हणजे १८७० ते १९१४ या काळात तेव्हा देशाबाहेरून येणाऱ्या कामगारांवर बंधने घालावीत अशी मागणी फ्रान्स आणि अमेरिकेत होत होती. लेखक असे सांगून जातो की, जसे आज आशिया आणि आफ्रिकेतील देशांमध्ये एका बाजूला अतिशय उदारमतवादी आणि आंतरराष्ट्रीय प्रवाहांना जोडलेला अभिजन वर्ग आणि दुसऱ्या बाजूला मागासलेली जनता आहे, नेमकी तशीच परिस्थिती एकोणिसाव्या शतकातील रशियात होती.

मिश्रा हे मूलत: वैचारिक विश्लेषण करणारे लेखक नाहीत. वैचारिक क्षेत्राकडे ते उशिराच वळले आहेत. आजच्या काळातील प्रश्नांचा दोष व्यक्तिवाद आणि स्वातंत्र्यावर आधारित आधुनिक मूल्यव्यवस्था आणि आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेला देता देता मिश्रा अतिशय प्रतिगामी आणि मागासलेल्या वैचारिक प्रेरणा यांच्याविषयी सहानुभूती व्यक्त करत आहेत की काय असा प्रश्न पडू शकतो. अतिरिक्त व्यक्तिवादामुळे समाजाचे आणि व्यक्तीच्या आयुष्याचे पूर्वीचे स्थर्य गेले असले तरी आधुनिक विचारांनी समाजात तसे स्थर्य यावे यासाठी काहीही दिलेले नाही; ज्या आधुनिकीकरणाने व्यक्तीच्या स्वातंत्र्याची हमी दिली तिच्याच अपत्यांमुळे आज व्यक्तीचे स्वातंत्र्य हरवून गेले आहे, असा मिश्रांच्या लिखाणाचा सूर आहे. मात्र आधुनिक मूल्ये आणि आजचे प्रश्न यांच्या संघर्षांतून मार्ग कसा काढायचा याचे कोणतेही ठोस आणि व्यवहार्य असे उत्तर मिश्रांकडे नाही. आजची गुंतागुंतीची परिस्थिती समजून घ्यायलासुद्धा मिश्रांच्या लिखाणाचा उपयोग मर्यादितच आहे. त्यामुळे आजच्या प्रश्नांच्या संदर्भात त्यांचे हे विवेचन वाचायला जरी रोचक असले तरी ते ग्राह्य़ मानायचे काही कारण नाही!

 ‘एज ऑफ अँगर’

लेखक : पंकज मिश्रा

प्रकाशक : जगरनॉट

पृष्ठे : ४०५, किंमत : ६९९ रुपये

 

संकल्प गुर्जर

sankalp.gurjar@gmail.com