काझुओ इशिगुरो स्वतबद्दल काय म्हणतात, याचा हा अल्पाक्षरी आढावा..

‘‘तंत्रदृष्टय़ा मी आता अधिक प्रगत आहे.. पण वयाच्या विशीत लिहिलेल्या पहिल्यावहिल्या कादंबऱ्यांतून माझी कल्पनाशक्ती आणि सर्जकशक्ती अधिक दिसली होती.. बालपणीच्या कुठकुठल्या तुटक आठवणींना केवळ माझ्या एकटय़ाच्या आठवणी म्हणून न मांडता, मी कादंबरीतला अनुभव म्हणून (जपानची पाश्र्वभूमी असलेल्या पहिल्या दोन कादंबऱ्यांत) मांडत होतो. माझी ती क्षमता आता जवळपास संपलेली आहे. प्रत्येकच लेखकाचा तरुणपणीचा काळ महत्त्वाचा असतो, तो त्याच्याकडे तेव्हा जी ऊर्जा असते तिच्यामुळे.. मला तरुणपणाचा- माझ्या तरुणपणाचा आणि आजच्या तरुण लेखकांचासुद्धा- हेवा वाटतो कधीकधी!’’

– काझुओ इशिगुरो यांनी ‘नोबेल’ जाहीर होण्याच्या किमान दोन वर्ष अगोदर, महाविद्यालयीन तरुणांपुढे दिलेल्या संवादरूपी व्याख्यानात ही कबुली दिली होती. अर्थात, म्हणून त्यांनी स्वतचं पुढलं लिखाण कमअस्सल मानलं आहे वगैरे काही अर्थ काढू नयेत. कारण या संवादातच पुढे, आपल्या कादंबरीलेखन प्रक्रियेबद्दल ते बोलतात, तेव्हा ते आपल्या सर्वच कादंबऱ्यांबद्दल समभाव बाळगत असतात. यू-टय़ुबवर कुणा ‘डी. टोकिओमेट’ नावाच्या चॅनेलवर सुमारे पाऊण तासाच्या संवादाचा हा व्हिडीओ पाहताना, तसंच त्यांच्या अन्य काही ध्वनिचित्रबद्ध मुलाखती पाहतानाही एक लक्षात येतं, की इशिगुरोंकडे आत्ताच्या क्षणासाठी बोलण्याची क्षमता उदंड आहे! मग २०१५ सालच्याच ‘द बरीड जायंट’ या कादंबरीच्या प्रसिद्धीनिमित्त दिलेल्या मुलाखती असोत, की २००८ साली ‘पॅरिस रिव्ह्य़ू’ या साहित्यिक नियतकालिकाला दिलेली प्रदीर्घ मुलाखत असो. नागासाकीत १९५४ सालचा जन्म, वयाच्या पाचव्या वर्षी जपान सोडून ब्रिटनला येणं, पुढे १५व्या वर्षीपर्यंत ‘आपण परत जायचंय आपल्या देशात’ अशाच भावनेत जगणं आणि ‘मनातला जपान’ ताजा ठेवणं.. हे सारे तपशील न कंटाळता निरनिराळय़ा लयीत सांगणारे इशिगुरो, विद्यापीठ काळानंतरच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कुठेच फारसे बोलत नाहीत. पुढल्या आयुष्यात जणू ते फक्त कादंबरीकारच होते. ते तेवढेच नाहीत, त्यांनी गीतलेखनापासून सुरुवात केली आणि पुढे चित्रपटकथांचंही लेखन केलं, चित्रपट निर्मातेही बनले, हे कुठूनकुठून कळत जातं.

‘‘चाळिशीत लक्षात आलं, की आतापर्यंतच्या निर्णयांचा बराच घोळ घालून ठेवलाय मी.. काही निर्णय अगदीच अपघातानं झाले होते. तर बऱ्याच निर्णयांवर माझं काही नियंत्रणच नव्हतं!’’ हे त्यांचं निरीक्षण ‘द गार्डियन’ या ब्रिटिश वृत्तपत्राला २००५ साली दिलेल्या मुलाखतीतलं. पण यानंतर अधिक जाणीवपूर्वक आणि अधिक कसोशीनं लिहू लागल्याचंही ते सांगतात. पण तिथून पुढे पुन्हा, एकेका कादंबरीबद्दलचं बोलणं सुरू होतं. पण अशा अनेक मुलाखतींचा विचार केल्यास लक्षात येतं, की बालपणाबद्दल तरी इशिगुरोंना कुठे मुद्दाम माहिती दिल्यासारखं सांगायचं होतं? स्वतच्या पहिल्या दोन कादंबऱ्यांबद्दल बोलताना अपरिहार्यपणे हे सारे उल्लेख केलेच पाहिजेत, असं जणू मानून ते- आणि तेवढंच- इशिगुरो सांगत राहिले. मुलाखतकारागणिक किंवा समोरचा श्रोतृवर्ग पाहून ते कमीजास्त खुलत गेले इतकंच. म्हणजे ब्रिटिश वृत्तपत्राला मुलाखत देताना इशिगुरो, वडिलांच्या नोकरीमुळे स्वतचं बालपण सरे परगण्यात अगदी आडगावातच गेल्याचं सांगतात, किंवा अमेरिकी चित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हेच इशिगुरो, बालपण अमेरिकेत गेलं असतं तर मी कसा घडलो असतो याबद्दल बोलतात..

लेखनप्रक्रियेबद्दलही इशिगुरोंचं बोलणं प्रत्येक वेळी ताजं वाटत राहातं. विद्यार्थ्यांपुढे ते, ‘‘मी ‘लोकेशन हंटिंग’साठी आधीच भरपूर वेळ घालवतो’’ असं म्हणतात, तर छापील मुलाखतीत मात्र कादंबरीसाठी एखादा प्रदेश निवडताना त्या भौगोलिकतेशी नातं जोडायचं पण बाकीच्या (इतिहास, राजकारण इ.) लिप्ताळय़ांपासून तुटायचं, हेदेखील ते आवर्जून नमूद करतात.

पण यापेक्षा वेगळी एक मुलाखत आहे; लहानशीच. मराठीत ‘साडेनऊच्या बातम्यां’मधली मुलाखत असते, त्यापेक्षा मिनिटभर जास्त फारतर. ही मुलाखत एका वृत्तवाहिनीवरचीच आहे आणि तीही ‘ब्रेग्झिट’च्या बाजूनं सार्वमताचा कौल गेल्यानंतर. युरोपीय संघात ‘राहा’ की तिथून ‘निघा’ अशा पर्यायांपैकी ‘निघा’चा पर्याय स्वीकारल्यामुळे आता ब्रिटन जगात आर्थिकदृष्टय़ा एकटा पडणारच, पण त्याहीपेक्षा ‘बाहेरचे लोक आपल्या नोकऱ्या बळकावतात’ वगैरे जो काही प्रचार या सार्वमतापूर्वी झाला होता, त्यातल्या भेदनीतीचे विकृत परिणाम आता देशामध्ये होणार, या भीतीबद्दलचे प्रश्न त्यांना विचारले गेले. ‘जपानी दिसण्यामुळे मला मी परका आहे असं कधीच वाटलं नाही’ असं या मुलाखतीत त्यांनी बालपणाबद्दल सांगितलं! बहुसांस्कृतिकता हीच ब्रिटनची मूळ वीण आहे आणि ती उसवू नये हे तर ‘निघा’च्या बाजूनं मत देणाऱ्यांनाही पटतच असेल, असं सांगतासांगता सहज ते म्हणाले- ‘माझा प्रश्नच नाही.. मी तर सरळच ‘राहा’च्या बाजूने (ब्रेग्झिटच्या विरुद्ध) आहे!’ याच छोटय़ाशा मुलाखतीत त्यांनी, आता ‘निघा’वाल्यांनीच आपसातल्या तिरस्कारालाही ‘निघा’च म्हणावं, अशी आशावादी अपेक्षा व्यक्त केली. पण इथं दिसला, तो अत्यंत ठाम आणि उघडपणे भूमिका घेणारा साहित्यिक! ‘टाइम आणि न्यूजवीक (साप्ताहिकांचे) वाचक जगभर आहेत म्हणून ते काही जागतिक साहित्य नव्हे’ असं म्हणणारे- किंवा वाङ्मयीन प्राधान्यक्रमांमध्ये तथ्यपूर्णतेला नेहमीच कमी लेखणारे इशिगुरो, प्रत्यक्षात वास्तवाशी जोडलेलेच आहेत.

‘मी खोटय़ाच गोष्टी लिहितो’ असं म्हणणाऱ्या साहित्यिकाचं हे वास्तव-भान आता नोबेल पारितोषिक स्वीकारल्यानंतरच्या व्याख्यानातून साकल्यानं उलगडणार आहे!