प्काश्मीर धगधगत असताना, म्हणजे ९० च्या दशकातील खोऱ्याचे सचित्र आणि प्रभावी वर्णन व्यंगचित्रकार आणि लेखक मलिक सजाद यांनी या पुस्तकात केले असून हे पुस्तक लहानांसह मोठय़ांनाही खूप काही शिकविणारे आहे. लष्करावर त्यांनी केलेली टीका खडकणारी असली तरीही..

काश्मीर अद्भुत निसर्गसौंदर्य लाभलेला भारतातील महत्त्वाचा प्रदेश. १९४७ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर या काश्मीरचा काही भाग पाकिस्तानने बळकावला, तर भारताने काही भागावरील वर्चस्व कायम राखले. १९६५ आणि १९९९ मध्ये काश्मीर मुद्दय़ावरूनच भारत-पाकिस्तानमध्ये युद्धे झाली. दंगली, जाळपोळ, संचारबंदी, गोळीबार, दहशतवादी कारवाया यामुळे काश्मीर आजही धगधगत आहे. मात्र, या प्रदेशातील नागरिकांची स्थिती, मानसिकता, गोळीबाराच्या घटनांनंतर आपत्यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या मनावर झालेले आघात कोणी जाणून घेण्याचा प्रयत्न करताना दिसत नाही. वर्तमानपत्रांनी बातमी किंवा लेख छापण्यापलीकडे अशा घटना किंवा काश्मीरची धग समजून घेण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही.
‘मुन्नू- ए बॉय फ्रॉम काश्मीर’ या ग्राफिक नॉव्हेल्स आणि स्वकथेतून व्यंगचित्रकार आणि लेखक मलिक सजाद यांनी लष्कराच्या छावणीत बारमाही असलेल्या काश्मीरचे सचित्र आणि प्रभावी वर्णन केले असून हे पुस्तक लहानांसह मोठय़ांनाही खूप काही शिकविणारे आहे. ९०च्या दशकातील या घटना आहेत. मुन्नू हा काश्मीर खोऱ्यात बातामालो येथे आई, वडील, बहीण शहनाझ, भाऊ आदिल, अख्तर आणि बिलाल यांच्यासह राहणारा सात वर्षांचा मुलगा आहे. त्याला साखर खायला आणि चित्रे काढायला खूप आवडतात. मात्र, काश्मीरमध्ये जन्मलेल्या मुन्नूचे तेथील परिस्थितीमुळे जीवनच बदलून जाते. दहशतवादी कारवायांची काळी किनार, स्वतंत्र काश्मीरसाठी लढणारे तेथील बंडखोर आणि भारतीय लष्कराकडून सतत करण्यात येणाऱ्या कारवाया यांचा परिणाम मुन्नूच्या बालमनावर होतो. मुन्नूचे वडील तांब्याच्या भांडय़ावर नक्षीकाम करणारे कारागीर असल्यामुळे मुन्नूलाही चित्रांची आवड होती. दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयामुळे मुन्नू शिकत असलेल्या शाळेतील मुख्याध्यापकांना लष्करी जवान अटक करतात. त्यामुळे स्थानिक परिस्थिती चिघळते. शाळेतील शिक्षक, मुले आंदोलन सुरू करतात. त्यानंतर लष्कराकडून नेहमीप्रमाणे गोळीबार, अश्रुधुराचा वापर केला जातो. या प्रसंगामुळे मुन्नूचा प्रथमच लष्कराच्या कारवाईशी जवळून संबंध येतो. दरसगाह येथील मदरशामध्ये मुन्नूला शिक्षणासाठी पाठविण्यात येते. तेथे शिक्षण घेताना केलेल्या खोडय़ांमुळे मुन्नूला शिक्षकांचा नेहमीच मार मिळायचा. मग या शिक्षकांना जिंकण्यासाठी मुन्नू वडिलांकडे चित्रे शिकण्याचा आग्रह धरतो. वडीलही त्याला चित्रांचे रेखाटन शिकवितात आणि मुन्नूच्या चित्रविश्वाला सुरुवात होते.

two cop suspended over controversy on closing dj
नागपूर: डीजे बंद करण्यावरून वाद, बळाचा वापर करणारे दोन पोलीस निलंबित
deputy leader of Shiv Sena Thackeray group Sushma Andhare criticized BJP
‘‘…हा तर भाजपाचा डीएनए, आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही” सुषमा अंधारे यांची टीका, म्हणाल्या…
Left to right) Vijay Dev, Anurag Agarwal and Vikram Dev Dutt. (Express Archives)
चंदीगडच्या IAS अधिकाऱ्यांनी पॅरीसमध्ये केली जिवाची मुंबई, ऑडिट रिपोर्टमध्ये ठपका
jitendra awhad marathi news, lucky compound building collapse marathi news
“लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते, पण…”, आमदार जितेंद्र आव्हाड यांची पालिका अधिकाऱ्यांवर टीका

Untitled-9
लष्करी जवान एके दिवशी मुन्नूच्या घरावर धाड टाकतात आणि त्याचे वडील आणि भाऊ बिलाल यांना चौकशीसाठी घेऊन जातात. या वेळी पकडून नेण्यात आलेल्यांमध्ये मुस्तफा आणि अन्य व्यक्तीला जवान ठार करतात. आपण दहशतवादी नसल्याचे सांगितल्यानंतरही मुस्तफाला मारले जाते. या घटनेमुळे काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती अतिशय तणावपूर्ण होते. या घटनेने मुन्नूच्या मनावर इतका गंभीर परिणाम होतो की, त्याला रात्री स्वप्नातही लष्करी कारवाईत ठार झालेला मुस्तफाच आठवत असतो. भाऊ बिलाल यालाही लष्कराने संपविले, अशा स्वप्नांमुळे मुन्नू आणखी घाबरतो. मुन्नूच्या मनातील भीती दूर करण्यासाठी आई-वडिलांकडून विविध उपाय सुरू केले जातात. त्याच्या शाळेतील मित्राच्या वडिलांनाही लष्कराने ठार केलेले असल्यामुळे या मुलांमध्ये भारतीय लष्करी जवानांबाबत राग असतो. या जवानांना धडा कसा शिकविता येईल, याचाच ही मुले विचार करत असतात. मात्र, चित्रांची साथ मिळाल्यामुळे मुन्नू पुन्हा चित्रांमध्ये स्वत:ला रमवून घेतो. बिलालने त्याला रंगपेटी घेऊन दिल्यामुळे मुन्नूचा उत्साह अधिकच वाढतो. मुन्नूने रेखाटलेली आकर्षक चित्रे पाहून बिलाल ही चित्रे स्थानिक उर्दू दैनिकात लहान मुलांच्या रविवारच्या विशेष पानासाठी पाठविता येतील, असे मुन्नूला सुचवितो. वर्तमानपत्रात पहिले व्यंगचित्र प्रसिद्ध झाल्यावर मुन्नूला झालेला आनंद शब्दात मांडणे कठीण आहे, इतका तो व्यंगचित्रात लेखकाने प्रभावीपणे मांडला आहे. ही व्यंगचित्रे रेखाटताना मुन्नू स्थानिक विषय कसे मांडायचे याबाबत बिलालशी कायमच चर्चा करत असे. आकर्षक व्यंगचित्रांमुळे ‘अल्साफ’ या उर्दू दैनिकात मुन्नूला लहान वयातच व्यंगचित्रकार म्हणून काम करण्याची संधी मिळते. दरम्यान, मुन्नू काश्मीरमधील तणावाची परिस्थिती प्रभावीपणे मांडून वाहवा मिळवितो. त्यानंतर ‘ग्रेटर काश्मीर’ या इंग्रजी वर्तमानपत्रात मुन्नू रुजू होतो. इतक्या लहान वयात वर्तमानपत्रात काम करणाऱ्या मुन्नूला गस्तीवर असलेल्या जवानांकडून नेहमीच चौकशीचा सामना करावा लागे. वर्तमानपत्राची डेडलाइन पाळण्यासाठीची होणारी मुन्नूची धावपळ लष्करी जवानांच्या मनात संशय निर्माण करायची. एका कार्यशाळेसाठी काठमांडूला गेल्यावर आणि तेथे आशियाई पत्रकारांना भेटल्यावर काश्मीरच्या इतिहासाबाबत आपण कच्चे असल्याची जाणीव मुन्नूला होते. मग याच कार्यशाळेतून तो काश्मीरच्या इतिहासाची पुस्तके घेतो. मानवाची जडणघडण होताना काश्मीरची काय परिस्थिती होती? काश्मीरमधील समाज, बाजारपेठा, व्यापार कसा स्थिरस्थावर होत गेला? मुघल, अफगाण, शीख यांनी लढलेली युद्धे, ब्रिटिशांनी चाणाक्षपणे स्थानिक राजामार्फत काश्मीरवर राज्य करून काश्मीरची लूट कशी केली? अशा काही प्रश्नांची मुन्नूला उत्तरे मिळाली. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर अमृतसर करारानुसार डोग्रा घराण्याने काश्मिरी जनतेवर अनन्वित अत्याचार केले. या काळात काश्मिरी जनतेने तीव्र आंदोलन केले. मात्र, ही आंदोलने चिरडण्यात आली. त्यामुळे यातील काही आंदोलक पाकव्याप्त काश्मीरमध्ये सशस्त्र प्रशिक्षण घेऊन आले आणि काश्मीरमध्ये कारवाया सुरू केल्या. असा इतिहास लेखकाने चित्ररूपाने या पुस्तकात मांडला आहे. इतिहासाची माहिती घेतल्यावर मुन्नूच्या व्यंगचित्रांचा कल्पनाविस्तार वाढतच गेला. यानंतर मुन्नू काश्मीरमध्ये लष्करी जवानांच्या कारवाईची छळ पोहोचलेल्या कुटुंबीयांच्या कथा लिहिण्यासाठी त्यांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात करतो. त्यातून त्याला लष्कराकडून करण्यात आलेल्या अत्याचाराची व्याप्ती समजली. पकडण्यात आलेल्या काश्मिरी युवकांना दहशतवादी असल्याचे सांगत गोळ्या घालणाऱ्या जवानांना भारत सरकारकडून विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात येते, हेदेखील लेखकाने मांडले आहे.
पेस्ली या विदेशी चित्रपटनिर्मितीत असलेल्या मुलीला काश्मीरची ओळख करून देताना काश्मिरी पंडित आणि काश्मिरी मुस्लीम यांच्यातील वादाची पाश्र्वभूमी लेखकाने विस्तृतपणे मांडली आहे. या वादात महिला आणि लहान मुलांवरही कसे अत्याचार करण्यात आले आणि कित्येकांचा बळी गेला, तर हजारो काश्मिरी पंडितांनाही भारतात इतरत्र आश्रय घ्यावा लागल्याचे सजाद यांनी सचित्र वर्णन केले. दिल्लीत एका प्रदर्शनासाठी गेलेल्या लेखकाला सायबर कॅफेमध्ये काम करताना इंटरनेटवर काश्मीरचा शोध घेतला म्हणून दहशतवादी ठरवून तुरुंगात टाकण्यात येते. त्याच वेळी दिल्लीत बॉम्बस्फोट झाल्याची त्याला पाश्र्वभूमी असते. केवळ काश्मिरी असल्यामुळेच असा प्रसंग ओढवल्याचे सजाद यांनी म्हटले आहे.
काश्मीरमध्ये संचारबंदी लागू असताना सजाद यांच्या आईवर तातडीने शस्त्रक्रिया करणे आवश्यक असताना लष्कराकडून त्यांच्यावर अविश्वास दाखविला जातो. रुग्णवाहिका थांबवून लेखकाच्या वडील आणि भावांनाही मारहाण केली जाते. मात्र, अखेर रुग्णालयातील पुराव्यांमुळे त्यांची सुटका होते. प्रसारमाध्यमांमध्ये काम करत असतानाही लेखक मलिक सजाद यांनी लष्कराची बाजू मांडलेली नाही, तर संपूर्ण पुस्तकात लष्करावर टीकाच केली आहे. ही बाब खटकणारी आहे. पुस्तकाच्या अखेरच्या टप्प्यातही लेखकाला चीनची किंवा कुठल्याही विदेशी हल्ल्याच्या संभाव्य धोक्याबाबत कुठलीही काळजी नाही, तर काश्मीरमधील परिस्थितीचीच त्याला काळजी आहे. पुढे सजाद यांनी ‘व्हिज्युअल आर्ट’ या विषयात लंडन आणि न्यूयॉर्क येथून पदवी शिक्षण पूर्ण केले.
अत्याधुनिक युगात संगणकाच्या पुढे दोन पावले टाकणाऱ्या आजच्या पिढीसाठी व्यंगचित्रांच्या माध्यमातून सजलेले हे पुस्तक निश्चितच वाचनीय आणि माहिती देणारे आहे. मलिक सजाद यांनी रेखाटलेली व्यंगचित्रे हे या पुस्तकाचे खास वैशिष्टय़ असून त्यामुळे पुस्तकाचा वेगळेपणा लगेच लक्षात येतो. देशभरात अशाच प्रकारे खडतर परिस्थितीचा सामना करणारे अनेक मुन्नू आहेत. हा मुन्नू म्हणजेच मलिक सजाद व्यंगचित्रांच्या माध्यमातून व्यक्त झाले. त्यांना त्यांच्या आई-वडिलांचीही मोलाची साथ मिळाली. त्याचप्रमाणे देशातील विविध परिस्थितीशी झगडणाऱ्या मुलांकडूनही व्यक्त होण्याची गरज आहे.

मुन्नू- ए बॉय फ्रॉम काश्मीर
लेखक – मलिक सजाद
प्रकाशक – फोर्थ इस्टेट, लंडन
पृष्ठे – ३४८, किंमत – ५९९ रु.

उमेश जाधव
umesh.jadhav@expressindia.com