कमांडर दिलीप दोंदे यांनी ‘म्हादेई’ या शिडाच्या नौकेतून सागरी जगप्रदक्षिणा केली, त्याबद्दल त्यांनीच लिहिलेले आणि गेल्या वर्षी प्रकाशित झालेले हे पुस्तक केवळ प्रदक्षिणेचे अनुभवकथन नसून, साहस कसे सुनियोजित असते याचीही एक कथा आहे.
एव्हरेस्टवर आतापर्यंत चढणारे काही हजारांत आहेत, तर शिडाच्या नावेतून एकटय़ाने जगप्रदक्षिणा करणारे फक्त १७४ झालेत. त्यात २०१० सालापर्यंत भारतीय एकही नव्हता. कसा असेल? पूर्वापार, हिंदूंच्या धार्मिक रूढींतून समुद्र पर्यटनावरच बंदी आल्यामुळे बहुसंख्य भारतीयांच्या साहसी वृत्तीचंही खच्चीकरण झालं. अर्थात, आपल्या कोकणाचाही छत्रपती शिवाजी महाराजांपासूनचा आरमारी इतिहास आहे, पण तोवर फिरंगी जहाजं अरबी समुद्रात येऊ लागली होती हेही खरं आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय नौदलाचा अभिमान साऱ्यांनाच असला तरी एकटय़ानं शिडाच्या नावेतून जग-प्रदक्षिणा कुणीच केली नव्हती, ती कमांडर दिलीप दोंदे यांनी केली. त्याविषयी त्यांनी लिहिलेलं पुस्तकही गेल्या वर्षीच प्रकाशित झालं. त्यात या सागरी साहसाची साद्यंत कथा खुद्द दोंदे यांनीच सांगितली आहे.
भारतीयांना सागरी साहसाची सवय लागावी, म्हणून निवृत्त व्हाइस अ‍ॅडमिरल मनोहर आवटी यांनी ‘सागर परिक्रमा’ ही योजना आखली. त्यासाठी लागणारा निधी मिळवण्यासाठी त्यांनी अनेक कोटय़धीशांकडे खेटे घातले, पण तसा दाता कोणी मिळेना. शेवटी भारतीय नौदलानेच त्यांना अनुदान देण्याचं मान्य केलं. नौदलातल्या कमांडर दिलीप दोंदे या अधिकाऱ्याने त्यासाठी आपले प्राण धोक्यात घालायची तयारी दाखवली. भारतात तशा शिडाच्या नावा म्हणजे ‘यॉट’ बांधण्याचं एकही यार्ड नव्हतं. एक थोडी वापरलेली यॉट युरोपातून विकत घेणं सोपं, कमी खर्चाचं आणि वेळ वाचवणारं झालं असतं; पण भारतीय शिपयार्डला तो अनुभव मिळाला नसता. म्हणून अ‍ॅडमिरल आवटी यांनी भारतातच नाव बांधून घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी लागणारी ब्लू िपट्र मात्र एका डच डिझायनरकडून विकत घ्यावी लागली. गोव्याच्या रत्नाकर दांडेकर यांच्या म्हादेई नदीतल्या यार्डमध्ये एका वर्षांत ती नाव तयार करून देण्याचं कंत्राट दिलं. इथं तयार झालेल्या बोटीला म्हादेई हे देवीचंच नाव दिलं. ‘म्हादेई’ नाव तयार होऊन सफरीला निघेपर्यंतचे वर्णन करण्यात पुस्तकाची पहिली ११४ पाने खर्च झाली आहेत.
दिलीप दोंदे यांना हवा असलेला सेिलगचा म्हणजे शीड बोटीच्या प्रवासाचा अनुभव सर रॉबिन नॉक्स-जॉन्स्टन या दोनदा जगप्रदक्षिणा करणाऱ्या सराईत नाविकाकडून इंग्लंडमध्ये तीन आठवडे सेिलग आणि त्यांच्या बोटीवर काम करून मिळाला. या सरावाशिवाय मुंबई ते कोलंबो आणि मुंबई ते मॉरिशस आणि परत एकटय़ाने किंवा दोघांनी प्रवास, अशी ‘रंगीत तालीम’सुद्धा केली.
हे सर्व होत असताना आपल्या संरक्षण मंत्रालयाची लालफीत म्हणजे काय प्रकार आहे ते वाचून आश्चर्य वाटतं. कधी दिल्लीतल्या बाबू लोकांच्या सामान्यज्ञानाची कीव येते, तर त्यांच्या भौगोलिक अज्ञानाचं पोटभर हसू येतं.
शीड बोटीतून जगप्रदक्षिणा करणाऱ्यांच्या यादीत नाव येण्यासाठी पश्चिम ऑस्ट्रेलियातील लीउविन, दक्षिण अमेरिकेतील हॉर्न आणि आफ्रिकेचं गुडहोप या तीन भूशिरांना (इंग्रजीत ‘केप’ वळसा घालावा लागतो आणि विषुववृत्त दोनदा ओलांडावं लागतं. या शिडाच्या नावेला इंजिन आहे, पण ते फक्त बंदरात धक्क्याला लागताना किंवा निघतानाच वापरायला परवानगी असते. मुंबईहून निघून पश्चिम ऑस्ट्रेलियातील फ्रीमॅन्टल, न्यूझीलंडमधील लिट्लटन, फॉकलंड बेट आणि केपटाऊन या चार बंदरांत प्रत्येकी तीन-चार आठवडे दुरुस्तीसाठी थांबून हा नाविक लेखक नऊ महिन्यांनी मुंबईस सुखरूप परत आला.
‘एक अब्ज लोकवस्ती असलेल्या देशात अशी जगप्रदक्षिणा करणारे तुम्हीच पहिले कसे?’ हा प्रश्न त्यांना अनेकांनी विचारला. त्याचं समाधानकारक उत्तर त्यांच्याकडे नव्हतं. त्याच सुमारास जेसिका वॉटसन ही १६ वर्षांची ऑस्ट्रेलियन मुलगीही एकटीने जगप्रदक्षिणा करीत होती. तिच्या असामान्य धर्याबद्दल ऑस्ट्रेलियात तिला अगदी ‘मर्लिन मन्रोपेक्षाही जास्त’ प्रसिद्धी मिळाली.. याउलट आपल्याकडे, दोंदे यांचं पुस्तकसुद्धा तसं दुर्लक्षित राहिलं. दक्षिण महासागर (सदर्न ओशन) हा बहुतेक खवळलेलाच असतो. त्याची पहिलीच चुणूक लेखकाने लिहून ठेवली आहे. त्यांची बोट दर अध्र्या अध्र्या मिनिटात लाटांवर जवळजवळ सरळ उभीच होत होती किंवा खाली पाताळात डोकं खुपसल्यासारखी होत होती. वादळात फाटलेली शिडं एकटय़ानेच बदलावी लागली. जिवावरचे अनेक प्रसंग त्यांनी एकटय़ानेच निभावले. शारीरिक मेहनत खूप होत असे आणि मोकळा वेळ फारसा मिळतच नसे. या उठारेटीतून दिलासा मिळायचा तो बंदराला तारू लागल्यावरच. परदेशात इमिग्रेशन आणि कस्टम यांनी त्यांना मत्रीपूर्ण वागणूक दिली. लिट्लटनने बंदराचं भाडं माफ केलं. तिथल्या शीख बांधवांनी लंगराचं आमंत्रण दिलंच आणि बोट निघायच्या वेळेस धक्क्यावर येऊन ‘बोले सो निहाल सत् श्री अकाल’च्या आरोळ्यांनिशी दोंदे यांच्या पुढल्या प्रवासाला शुभेच्छा दिल्या.
या शुभेच्छांची आवश्यकताही भासावी, असा पुढला प्रवास होता.. दक्षिण अमेरिकेतल्या हॉर्न या भूशिराला शिडाच्या बोटीतून वळसा घालणं हा नौकानयनातला सर्वात कठीण भाग समजला जातो. लिट्लटनहून निघाल्यावर दक्षिण पॅसिफिक महासागरातील एक महिन्याभराच्या एकाकी प्रवासानंतर, घोंघावणाऱ्या वादळात हॉर्न भूशीर दिसलं त्या वेळी झालेला आनंद आणि मिळालेलं समाधान हे, परिक्रमा जवळजवळ पूर्ण झाल्यासारखंच होतं.
लेखकाने लॉगबुक किंवा डायरी ठेवल्याचा उल्लेख नाही; पण रोज कॉम्प्युटरवर ब्लॉग लिहीत असे. प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे भारतात काहीही ठरल्या वेळेत, ठरल्या बजेटमध्ये होत नसे; पण ‘सागर परिक्रमा’ त्याला अपवाद ठरला, कोटय़वधी रुपयांची भारतीय बनावटीची एक बोट पुढील अनेक पिढय़ांना वापरायला मिळाली, भारताचं नाव आणि झेंडा त्रिखंडात गाजला. या यशानंतर नौदलाच्याच लेफ्टनंट कमांडर अभिलाष टोमी या सहकाऱ्याने ‘म्हादेई’वर तशीच प्रदक्षिणा कुठेही न थांबता केली हा ‘सागर परिक्रमा’चा उद्देश सफल- सुफळ झाल्याचा आणखी एक पुरावा!
पुस्तकात मुद्दाम काढलेला नकाशा आणि त्यावरील मार्ग संदर्भासाठी उपयोगी पडतो. अनेक कृष्ण-धवल आणि रंगीत चित्रांनी भरलेलं हे पुस्तक भारतासाठी तरी अशा तऱ्हेचा पहिलाच वृत्तांत आहे. त्यामुळे ते अवश्य संग्रही असावे.

‘फर्स्ट इंडियन- स्टोरी ऑफ द फर्स्ट इंडियन सर्कमनॅव्हिगेशन अंडर सेल’
लेखक : कमांडर दिलीप दोंदे
प्रकाशक : मेरिटाइम हिस्टरी सोसायटी,
पृष्ठे : २३७, किंमत : ४९९ रु.